गुरुवार, १३ डिसेंबर, २०१२


सुख ??

           सकाळी सहा वाजता गजर झाला. वीणाने नेहमीप्रमाणे बंद डोळ्यांनी झोपेतच चाचपडत तो बंद केला. गजराच्या आवाजाने बाळ उठलं तर सकाळची कोणतीच कामं आपल्याला वेळेवर पूर्ण करता येणार नाहीत. नाताळच्या सुट्टीचा आजचा शेवटचा दिवस, उद्यापासून महाविद्यालय सुरु होणार आणि परत सगळी धावपळ सुरु.. तेव्हा आज काय काय तयारी करून ठेवायची याची चक्र वीणाच्या डोक्यात चालू झाली. पेंगुळलेल्या डोळ्यांनी तिने अंगावरची दुलई बाजूला सारली. बाळ आणि बाबा दोघेही शांतपणे झोपले होते. बऱ्याच महिन्यांनी सुरेशनी रजा घेतल्यामुळे आठवडा कसा गेला समजलंच नाही. “ झोपू दे अजून दोघांनाही.. आपण आपलं सगळं काम उरकून घेऊ. ” तिने विचार केला. प्रेमाने दोघांच्याही गालावरून हात फिरवून अलगद चुंबन घेतले.

          थोड्याच वेळात वीणा आंघोळ करून केस पुसत बाहेर आली.  सुरेशची चुळबूळ पाहून आता थोड्याच वेळात साहेब उठतील आणि चहा मागतील हे तिला समजले. एकीकडे नाश्त्याची तयारी करत तिने चहाचे आधण गॅसवर ठेवले. बैठकीच्या खोलीत येऊन वर्तमानपत्र हातात घेईपर्यंत सुरेश उठलेच. चहा, उपमा आणि बातम्या अशा तीन गरमागरम गोष्टी घेऊन ती आत गेली. वीणाच्या लांबसडक केसातून अजूनही पाण्याचे थेंब खाली ओघळत होते. मुळातच असलेली नाजूक आणि गौर कांती थंडीमुळे किंचितशी गुलाबी झाली होती. पिवळसर रंगाच्या साडीवर लाल रंगाची फुले असलेली साधीच, घरात नेसायची साडी असली तरी वीणा त्यातही अगदी अगदी टापटीप आणि मोहक दिसत होती. झाडावर उमललेली ताजी गुलाबाची फुलं जास्त टवटवीत दिसत होती की वीणा हेच लक्षात येऊ नये अशी ती लोभसवाणी वाटत होती. सुरेशनी चहा बाजूला ठेवून तिला जवळ ओढले. “तुझे गाल पुण्याच्या थंडीमुळे असे गुलाबी झाले आहेत, की काल रात्री मी.. ” त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच ती नव्या नवरीप्रमाणे लाजली आणि अजून बिलगली. नाश्ता होईपर्यंत आर्या उठली. मग त्या बाहुलीला न्हाऊ माखू घालण्यात वीणा गुंग झाली. आर्या आता आई, बाब्बा, आज्जी असे बोबडे बोल बोलू लागली होती. तिच्या तोंडून असं ऐकून, तिची दिवसागणिक होणारी प्रगती पाहून ती सुखावून जात असे.

          आर्याला खेळामध्ये रमवून ती दुपारच्या स्वयंपाकाची तयारी करू लागली. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. “सुरेश, पाहता का कोण आलं आहे दारावर? मी इथे बाळाला सांभाळते आहे आणि काम करते आहे. ” बेल परत परत वाजत होती. आता मात्र वीणा वैतागली. ती दार उघडण्यासाठी वळते न् वळते तोच तिच्या लक्षात आलं की सुरेश तर आपल्याला सांगूनच आई अण्णांना आणायला गाडी घेऊन स्टेशनवर गेले आहेत. “ किती ग वेंधळी मी..! आताशा असं रोजंच होऊ लागलं आहे आपलं. सुरेश म्हणतात तसं खरंच मी एवढ्यातच म्हातारी झाले आहे.. ” पुटपुटत वीणाने दार उघडलं. शेजारच्या रमा काकू कसलासा प्रसाद घेऊन आल्या होत्या. वीणाच्या हातात प्रसाद देत त्या म्हणाल्या, “ हा प्रसाद घे म्हणजे यंदा पेढा मिळणार पहा आम्हाला.. ” त्यांचं बोलणं ऐकून वीणाच्या कपाळावरची शीर तडकली. कसनुसं हसून तिने तो प्रसाद निमुटपणे गिळला आणि दरवाजा लावून घेतला. “ केवढा चोंबडेपणा हा.. काय करायचं असतं यांना इतरांच्या आयुष्यात सतत डोकावून देव जाणे..!! जे आहे.. जसं आहे त्यात मी सुखी आहे हे कळत कसं नाही या लोकांना? ” तेवढ्यात तिचं लक्ष मिश्किलपणे हसणाऱ्या त्या पिल्लाकडे गेलं. “राणी, आपल्याला काही कमी आहे का? आहे की नाही सगळं आपल्याकडे? कशाला हवं अजून काही? ” आईचं बोलणं जणू समजल्यासारखं राणी हुंकार देत होती. त्या प्रतिक्रियेने वीणाच्या चेहऱ्यावर परत हसू फुललं.

          आज बऱ्याच दिवसांनी अण्णांना आवडते तशी काळ्या वाटण्याची उसळ छान जमली होती. आईंनीही कौतुक केलं. आपल्या बायकोचं कौतुक होतंय त्यामुळे सुरेशच आपल्यापेक्षा अधिक आनंदात होते. चार दिवस नातेवाईकांकडे जाऊन आल्यामुळे आई अण्णा मस्त ताजे होऊन आले होते आणि खरंतर सुट्ट्या आहेत हे पाहून आपल्याला एकांत मिळेल म्हणूनच ते काही कारण नसताना नाशिकला गेले हे तिला पक्कं ठाऊक होतं. लग्न झाल्यापासून सासू सासरे सोबतच राहत असल्यानं तिला त्यांची अगदीच सवय होती त्यामुळे हव्या हव्याशा एकांतातही एकटेपणा जाणवत होता. पण दोन दिवस माहेरचे आले असल्यामुळे घरात परत वडीलधाऱ्यांचा वावर झाल्यानं तिला बरं वाटलं. सगळं कसं दृष्टं लागण्याएवढं सुंदर.. सुरळीत.. स्वतःशीच विचार करत ती झोपलेल्या सुरेशना गुड नाईट किस देत आर्याशेजारी झोपली.

          आठवडाभराच्या सुट्टीनंतर पुन्हा सकाळी उठून सगळं आवरून कामावर जाण्याचा कंटाळाच आला होता. तरीही सुरेशचा कंटाळा जावा म्हणून त्यांना लाडीगोडीनं उठवत तिने भराभर आपलं आवरलं, डब्बा भरला आणि स्कुटीवरून कर्वे नगरला तिच्या महाविद्यालयात पोहोचली. बऱ्याच दिवसांनी विद्यार्थांचे घोळके, त्यांचा गलका ऐकून तिला बरं वाटलं. मगाशी घर सोडवत नव्हतं आणि आता आपण इतके दिवस या गर्दी, गोंधळ, आवाजाशिवाय कसे राहिलो असं वाटतंय..! वीणा गालातल्या गालात एकटीच हसली. सुट्टीनंतरचा पहिलाच दिवस असल्याने आज काहीही न शिकवता सगळ्या विद्यार्थ्यांसोबत गप्पागोष्टी करण्यातच वेळ गेला. वीणा प्रसन्न व्यक्तीमत्वाची, आकर्षक, बोलकी आणि प्रेमळ अशी.. केवळ तरुणच नाही त्यातही उंची जरा कमी आणि सततची मजा मस्ती, यामुळे लहानशी वाटत असे. ती सगळ्या विद्यार्थ्यांची लाडकी शिक्षिका तर होतीच पण गोल्ड मेडलिस्ट असल्याने विषयातले सखोल ज्ञान आणि अभ्यासाच्या वेळेस कडक शिस्तीत अभ्यासंच या नियमाने वागणारी.. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच सहकारी आणि वरिष्ठही तिच्याशी अदबीनं वागत. त्यादिवशी मितालीने डब्बा आणला नसल्याने त्या दोघींनी अन्नपुर्णामध्ये जाण्याचं ठरवलं. मिताली ही वीणाची लहानपणापासूनची जिवाभावाची मैत्रीण. आयुष्यामधील प्रत्येक बरे वाईट क्षण दोघींनी एकमेकींसोबत वाटून घेतले होते. कोणताही आडपडदा न ठेवता प्रामाणिकपणे त्यांनी हे नातं जपलं होतं.

          गेली अनेक वर्ष त्या दोघी अन्नपूर्णा हॉटेलमध्ये येऊन त्यांच्या आवडीच्या चीझ पावभाजीवर मनसोक्त ताव मारत. अगदी हॉटेलचे मालक कामथ काकाही त्यांना जवळून ओळखू लागले होते. बरेचदा गप्पांच्या ओघात दोघी ऑर्डर देण्यास विसरल्या की स्वतः काका त्यांची फर्माईश घेऊन हजर असंत. काकांसोबत गप्पा मारून झाल्यावर दोघी आत बसल्या. इकडचं तिकडचं बोलून होईपर्यंत पावभाजी आली. “ मला जरा तुझ्याशी काही बोलायचं आहे.. खूप महत्त्वाचं आहे.. आणि यावेळी तरी टाळू नकोस. प्लीझ.. ” पहिला घास तोंडात घेत मितालीने सांगितलं. वीणाच्या हातातला घास मात्र तसाच हातात राहिला. आता पुढे कोणता विषय निघेल याची तिला पूर्ण कल्पना होती आणि म्हणूनच ती वैतागली. तिचा वैताग.. चिडचीड सगळं मितालीपर्यंत पोहोचत होतं. तिने शांतपणे वीणाचा हात हाती घेऊन घट्ट दाबला आणि तिला शांत करण्याचा एक विफल प्रयत्न केला. वीणाच्या चेहऱ्यावर स्पष्ट नापसंती दिसत असूनही मितालीने तो विषय निश्चयपूर्वक काढलाच.

          “ लग्न कधी करणार आहेस राणी? अगं यावर्षी बत्तीस वर्ष पूर्ण होतील ना..! ” राणी.. किती वर्षांनी मितालीने अशी हाक मारली ..! आई बाबा लहानपणी प्रेमाने हाक मारायचे मला अशी.  वीणा स्वतःच्याच विचारांमध्ये.. “ उशीर झालाच आहे पण अजून वेळ गेली नाही. तू सुंदर आहेस, सुशिक्षित आहेस. उत्तम नोकरी आहे. मग काय हरकत आहे? आपल्यासोबातच्या सगळ्या मैत्रिणीची लग्न झाली आता. माझंपण पहा.. लग्नाला नको.. नको.. करता करता अविनाश भेटला आणि मी खरंच खूप सुखात आहे आता. अगदी आत्ता आत्तापर्यंत मलाही वाटायचं.. जाऊ दे तुला नाही करायचं ना लग्न नको करू.. काय बिघडणार आहे? पण खरं सांगू? अव्या, त्याचे आई बाबा, बाकी नातेवाईक यांच्यासोबत असले ना की खूप जाणवतं की तू उगाच या सगळ्यांना पारखी झाली आहेस आणि तेही स्वतः ठरवून. खरं म्हणजे आयुषीच्या जन्मानंतर मला जास्त जाणीव झाली तुझ्या एकटेपणाची..! ” वीणा अजूनही स्वतःतच अडकलेली... जणू मिताली तिथे दुसऱ्याच कोणाशीतरी बोलते आहे.. वीणा स्वतःच्याच कोषात... वेगळ्याच जगात हरवलेली.. तिच्या डोळ्यातील ते अलिप्त आणि हरवल्यासारखे भाव पाहून मितालीने तिला अक्षरशः हलवलं. जरा भानावर येईपर्यंत डोळ्यातून ते भाव टपाटप ओघळू लागले. जरासं थोपटल्यावर ती शांत झाल्यासारखी वाटली.. तोच परत “ तुझे आई वडील घटस्फोट घेऊन वेगळे झाले. दोघांपैकी कोणीच किंवा इतरही नातेवाईकांनी तुला मायेने वाढवलं नाही हे खरंच दुर्दैवी आहे. तुझी होणारी घुसमट.. तो त्रास.. तुझ्यावर होणारा अन्याय पाहायला मी नेहमीच तुझ्यासोबत होते. आयुष्यातल्या तुझ्या हातात नसलेल्या पण तुझ्या पदरी पडलेल्या सर्व अपयाशांना तू तुझ्या शिक्षणाने आणि जे तुला सोडून गेले त्यांनाही सतत हसतमुखाने मदत करून मात केलंस. आठवतंय.. आपण लग्न आणि पुढच्या आयुष्याच्या किती गप्पा मारायचो.. मला कधीच या कशाबद्दल आवड नव्हती, पण तू नेहमीच भरभरून बोलत असायची. माझ्या मुलीला मी असं शिकवेन.. नवऱ्यासाठी हे करेन.. आमचं घर... घरातली माणसं.. थकायची नाहीस असं बोलून.. बोलून.. मग आत्ता का असं वागतेस?? राहुलसोबत इतकी वर्ष असलेलं तुझं प्रेम नाही झालं यशस्वी.. तुला कधी समजलंच नाही तो तुझा केवळ फायदा घेत होता. जरा समजावलं तरी तुला मीच वेडी वाटले. यातून सावरून तुझ्या काकांनी पाहिलेल्या स्थळाला होकार दिलास.. पण साखरपुड्यानंतर लग्न मोडलं त्याने. त्यातही तुझी काहीच चूक नव्हती. अगं, बऱ्याच जणांच्या आयुष्यात असे चढ उतार येत राहतात पण म्हणून त्यांनी पुढचा रस्ता कसा असेल या भीतीने तिथेच थांबावं का? ” बोलता बोलता मितालीच आवाज चढला होता आणि वीणा लालबुंद होऊन.. हमसून हमसून रडत होती. तिला हे सगळं असहाय्य झालं होतं. आता एकाही क्षण इथे थांबणं शक्य नाही हे समजल्यावर सगळा जीव एकवटून “ मी माझ्या आयुष्यात खरंच सुखी आहे आणि मला अजून कोणाचीही गरज नाही.. ” असं सांगून ती एकटीच धावत हॉटेल बाहेर पडली. स्कुटी घेऊन थेट घरचा रस्ता धरला. वाटेत दिसणाऱ्या प्रत्येकाच्या नजरा जणू तिला.. ही बाई दिसते तर बरी.. पण एकटी का आहे अजून?? असंच विचारात आहेत अशा वाटत होत्या.. बोचत होत्या. घराखाली स्कुटी लावत असताना रमा काकू तिच्याच बाजूने येताना तिला दिसल्या. घाईगडबडीत इमारतीत शिरेपर्यंत त्यांनी कितीतरी हाका मारल्या होत्या. “ हा मुलगा कसा वाटतो पहा.. तो पहा.. काय बाई..! मी इतकी स्थळं आणते पण तुला एकही पटत नाही. यंदाच्या वर्षी तरी लग्नाचा पेढा मिळू दे हो.. ” असं टुमणं वाजवत बसतील या विचाराने वीणा लिफ्टमध्ये शिरली.

          घरी येऊन थंड पाण्याने तिने खसाखस तोंड पुसले.. जणू त्या असावांसोबतच्या सर्व आठवणीही ती साफ करत होती. बऱ्याच दिवसांनी घरात एकटेपणा तिला जाणवत होता. बऱ्याच दिवसांनी.. कारण इतके दिवस तर आपण.. मनातल्या मनातही ते वाक्य ती पूर्ण करू शकली नाही. सुन्नपणे तिने दैनंदिनी उघडली. त्यात सुरुवातीच्या पानांवर होता तिचा एकटेपणा.. आणि नंतर तिने तिच्या मनाच्या खेळांनी त्यावर केलेली मात.. कोणालाही खरंच एखाद्या विवाहितेची वही वाचत असू असेच वाटेल. वाचता वाचता काही क्षण सुरेश, आई, अण्णा, आर्या, सगळी सगळी आपल्या मनाचीच पात्र असल्याचं तिला जाणवत होतं.. पण ते जग खोटं आहे हे मानण्याची मात्र तिची मुळीच तयारी नव्हती. शेवटी तिने नवे पान उघडले आणि त्यावर लिहिले.. मला ठाऊक आहे हे सगळे माझ्या मनाचे खेळ आहेत.. आणि यामुळे एक दिवस ठार वेडी होईन मी. पण खरंतर एवढं सगळं पाहून अजून वेडी कशी झाले नाही तेच माझं मला समजत नाही. बाहेरच्या जगापेक्षा हे जग खरंच खूप चांगलं, सुरक्षित आहे. इथे मला कोणीही सोडून जात नाही आणि वेडी झाले तरी हे सर्व माझ्यासोबतच रहातील याची मला खात्री आहे. मी खूप सुखात राहते त्यांच्यासोबत.. खूप सुखात. ” तेवढ्यात तिला सुरेशनी हाक मारली. आर्या उठली असेल.. तिने दैनंदिनी तशीच ठेवली आणि आर्याला जोजवायला आत निघून गेली...

बुधवार, १० ऑक्टोबर, २०१२


चूक 


 “ आई, किती वेळा सांगू तुला.... मला नाही बोलायचंय या विषयावर आता काही.”
“ अग सोनल, पण जरा......”
 “ आम्ही निर्णय घेतला आहे आणि मला खरंच वेळ नाहीये बोलायलाही तुझ्याशी. पाहतेस ना, एकमेकांशी निवांतपणे बोलण्यासाठीही वेळ नाहीये इकडे आम्हाला आणि त्यात मुलाची जबाबदारी....!! मुळीच शक्य नाही. हा आठवडा भरपूर काम आहे ऑफिसमध्ये, त्यामुळे पुढच्या आठवड्यात हॉस्पिटलमध्ये दाखल होईन.”
“ तुम्ही दोघे घरी या. आपण निवांतपणे बोलू यावर. मग पाहू. चालेल?”
“ आई, मलाही हे करताना काही फार चांगलं वाटत नाहीये. पण एक मुल सांभाळणं म्हणजे किती त्रास सहन करावे लागतात माहित्ये का तुला?”
“ तू मला विचारते आहेस? अग, आई आहे मी तुझी. तुला मोठं केलंच आहे की मी.”
“ तेच... अगदी तेच म्हणते मी. मला बाळाला सांभाळायचं आहे. फक्त मोठं नाही करायचंय.”
“ म्हणजे?? काय म्हणायचं आहे तुला?”
“ जाऊ दे ना आई. कशाला जुन्या गोष्टी काढायच्या परत परत...! मला खूप काम आहे इकडे. एक महत्त्वाची मिटींग सुरु होईलच इतक्यात. मला जायला हवं.”

          फोन समोरून ठेवण्यात आला. पण सोनलच्या आईच्या डोळ्यात मात्र पाणी साचलं होतं. डोळ्यातलं पाणी गालांवर ओघळलं तेव्हा नकळतच सुमेधा ताईंच्या मनात अजून एक विचार आला... किती वर्षांनी रडू आलं असेल आपल्याला? मनातली घालमेल दूर करण्यासाठी त्यांनी काहीतरी काम करायचं ठरवलं. पण खरंच.. काय काम करणार? सगळी कामं तर यशोदा बाई करून गेल्यात. मग उगाचंच आवरलेलं कपाट परत आवरायला घेतलं. त्यात त्यांना बऱ्याच जुन्या आठवणी सापडल्या. कपाटात अगदी खालच्या कप्प्यात कशातरी कोंबलेल्या. अगदी मनातही त्या अशाच होत्या.... खोल दाबून ठेवलेल्या,अस्ताव्यस्त.... एक अर्धा विणलेला पाय मोजा... काय झाला बाई नंतर त्याचं? का पूर्ण नाही करता आला मला? अरे हो.... मार्च महिना होता, ईयर एंडिंगची कामं होती. मग नाहीच जमलं पुढे काही. हे डोहाळजेवणाच्या वेळेचे फोटो. शिशिर आलेच नाहीत वेळेवर. सगळा कार्यक्रम झाल्यावर साहेब आले आणि तेही थकून लगेच झोपून गेले. साधं विचारलंही नाही पेढा सापडला की बर्फी. खूप राग आला होता तेव्हा. मी जरा बोलले यावर तर म्हणे बायकांचा कार्यक्रम तर होता. मी कशाला हवा होतो तिकडे? नाही म्हणजे खरंच पुरुष मंडळींचा काही खास सहभाग नसतो तिथे. पण, बाळ तर दोघांचं असतं ना? बाळाच्या बाबांनाच काही विशेष कौतुक नव्हतं तर आईनीच का म्हणून सगळं कौतुक आणि इतर जबाबदारी याचा पसारा सांभाळावा? असे अनेक विचार तेव्हा आले मनात. खरंच ऑफिस सांभाळून ही जबाबदारी पेलणं खूप कठीण. का हे असं आपल्या अंगावर पडलं? कंटाळवाणं वाटायचं. आपल्या मनाशीच स्पष्ट बोलतानाही आज मात्र का कुणास ठाऊक पण त्या चरकल्या. अल्बमची पुढची पानं जणू एक एक आठवण पुन्हा ताजी करत होती. सोनलचा जन्म... तिने रंगायला लागणं... चालण्यासाठी उचललेलं पाहिलं पाउल.... शाळेचा पहिला दिवस.... किती वर्षांनी आज परत त्या त्यांच्या छकुलीला मनमोकळं हसताना पाहत होत्या. एका फोटोत शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी नटलेली त्यांची ठकी पाहून त्यांनाही हसू फुटलं. पण पुढच्याच फोटोत ती नटलेली चिमुरडी दोन्ही हात पसरून रडत होती. काय झालं होतं तेव्हा?  बरोबर..... तिच्यासोबत कार्यक्रमाला जाता येणार नव्हतं म्हणून तिला रडू आलं होतं. किती रडलं होतं बाळ माझं तेव्हा. मिटींगदेखील महत्त्वाची होती. रात्री तिच्यासाठी एक बहुली आणली होती. पण घरी येईपर्यंत एवढा उशीर झाला होता की सोनल यशोदा बाईंच्या कुशीत झोपूनही गेली होती. तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला असता ती झोपेतच “आईला वेळच नसतो माझ्यासाठी...” असंच काहिसं बडबडत होती.

          सुमेधा ताईंचे डोळे आता परत पाण्यानी डबडबले. पुढच्या फोटोंमध्ये त्यांच्या जागी यशोदा बाईच दिसत होत्या. नंतर मित्र मैत्रिणी.... आणि मग आशुतोष.... सोनलचा नवरा. सोनलचं त्याच्यावर असलेलं प्रेमही घरी पहिल्यांदा यशोदा बाईंनांच तर तिने सांगितलं होतं. असं का झालं असेल? का आपल्या मुलीला आपल्यापेक्षा कोणी परकी व्यक्ती जवळची वाटली? कुठे गणितं चुकली असतील? कदाचित माझं आणि शिशिरचं कामानिमित्तानं सतत बाहेर राहणं.....?? नाही... नाही... यात काय चूक? हे सगळं तर आपण सोनलसाठीच केलं. त्या स्वतःचीच समजूत घालत होत्या. स्वतःचं वागणं स्वतःला पटवून देण्याचा प्रयत्न करत होत्या. पण काहीतरी चुकल्याची आज प्रकर्षाने त्यांना जाणीव होत होती. सहन करण्याच्या पलीकडे गेल्यावर मात्र त्यांनी परत सगळं कसंबसं कपाटात बंद केलं. ते कपाट तर बंद झालं पण मनाच्या कपाटात बऱ्याच विचारांची उलथापालथ होत होती आणि ते कसंतरी आवरून टाकणं किंवा बंद करणं शक्यच नव्हतं. मनाला जरा तरतरी यावी म्हणून त्यांनी गरम गरम कॉफी करून घेतली आणि वृत्तपत्रात तोंड खुपसलं. पण लक्ष मात्र कशातच लागत नव्हतं. आपल्या विचारांना पूर्णविराम मिळावा म्हणून त्यांनी घराबाहेर फेरफटका मारायला जाण्याचं ठरवलं. हातानेच केस सारखे करून आहेत त्या कपड्यानिशी त्या घराबाहेर पडल्या. काही विचार न करता वाट फुटेल तसं चालत राहायचा विचार त्यांनी केला. ‘लोकमान्य टिळक म्युन्सिपल जनरल हॉस्पिटल’..  त्याचं लक्ष त्या पाटीकडे गेलं आणि बरीच वर्ष जुनी एक आठवण ताजी झाली.

          सुमेधा ताईंना लग्नानंतर जेमतेम दोन महिन्यात दिवस गेले आणि वय अवघं अठरा वर्षांचं.. पण या बातमीने त्या मोहरून गेल्या. घरच्यांचा विरोध पत्करून लग्न केल्यामुळे दरदिवशी काहीतरी विचार मनात येऊन एकटं वाटायचं. दोघांनी परस्पर संमतीने पूर्ण विचार करुन लग्नाचा निर्णय घेतला होता तरी आप्तांच्या वियोगाचं दुःख दोहोंच्या मनात सारखंच सलंत होतं. आता या बातमीमुळे तरी सगळं मळभ दूर होईल असं त्यांना वाटत होतं. शिशिर कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यावेळी कुठे होते मोबाईल फोन! त्यांनी लगबगीनं आपल्या माहेरचा रस्ता गाठला... मग सासरचा.. पण पदरी निराशाच आली. शिशिर परत येईपर्यंत काहीच सुचत नव्हतं. दोन दिवसांनी ते आले तेव्हा त्यांना ही गोड बातमी सांगितली. त्यांच्या चेहऱ्यावरही आनंदाचा लवलेश नव्हता. “आत्ता आपल्याकडे पैसे नाहीत. मला आपल्या मुलांसोबत असं चाळीत, पै न् पै चा हिशोब करत नाही रहायचं. त्यामुळे आत्ता हे शक्य नाही.” त्यांच्या बर्फासारख्या थंड आणि नकारात्मक प्रतिसादामुळे सुमेधा ताई पार कोलमडल्या. त्यांनी तरीही शिशिरना समजवायचा आटोकाट प्रयत्न केला. पण ते ठाम होते. दोन दिवसांनी दोघांनी हॉस्पिटल गाठलं. प्रकृती नाजूक असल्याने डॉक्टरांनीही लगेच बाळंतपण नको असा सल्ला दिला. शरीराचे घाव भरले तरी मनातले घाव सतत ठुसठुसत होते. स्वतःचं घर, गाडी, दोघांचे गलेलठ्ठ पगार यासाठी पुढे जवळपास सहा वर्ष लागली. सततची धावपळ, त्यात शिशिरचा अलिप्त स्वभाव त्यामुळे वाटणारा एकटेपणा.. सगळ्यांची परिणीती म्हणून सुमेधा ताईंच्यामागे आजारपणं लागली. आता दोघेही बाळाच्या आगमनासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले खरे.. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोनालची चिमुकली पाऊले त्यांच्या अंगणात उतरायला डॉक्टर, औषधं, नवस, गंडे-दोरे, असं करत करत पुढची सात वर्षें गेली. साहजिकच जे सहजासहजी मिळत होतं ते आपल्याच हाताने गमावल्यावर यंत्रवत अशा धावपळीच्या आयुष्याची आणि सातच्या स्पर्धेची सवय लागल्यावर कधीतरी स्वतःलाच हवहवसं वाटणारं आईपण आता त्यांना नकोसं झालं होतं. तेरा वर्षांपूर्वी जे सुख त्यांनी गमावलं होतं ते आता पदरात पडूनही त्यांना त्यात स्वारस्य उरलं नव्हतं. त्यांना पुढे घ्याव्या लागणाऱ्या सुट्ट्या, त्याचा त्यांच्या कामावर होणारा परिणाम, पदोन्नतीसाठी काही काळ थांबावं लागणार, असेच विचार आता सतावत होते. घरीही ओल्या बाळंतीणचे कोडकौतुक करणारे कोणीही नव्हते. यशोदा बाई याचं काळात भेटल्या. मग घर आणि पोर विश्वासाने त्यांच्यावर टाकून सुमेधा ताई आपल्या कामात पार गुरफटल्या. पोरीसाठी खेळ, कपडालत्ता, चांगल्या शाळा कॉलेजमध्ये प्रवेश, तिचे क्लासेस कशातच त्यांनी काही कमी पडू दिलं नाही. पण हे करता करता त्या लेकराकडे चार क्षण मायेने पाहण्याचं राहूनच गेलं.

          आता सोनलच्या बोलण्याचा अर्थ त्यांना उमगला होता. तिच्या निर्णयाला आपणच कारणीभूत आहोत या विचाराने त्यांना रस्त्यातच रडू फुटलं. टॅक्सी घेऊन त्या घराकडे वळल्या. सोनलला हे सगळं कसं समजवायचं? आपण चूक केली. पण तिने करू नये. बाळाला सांभाळायला, दोघांची काळजी घ्यायला आपण आहोत हे तिला कसं सांगायचं? या विचारात त्यांनी नेहमीप्रमाणे यशोदा ताईंना फोन लावला. नाही.. आपण परत तेच करत आहोत.. त्यांनी फोन बंद केला. आपल्या मुलीला आपण स्वतः समजू शकतो. आपली चूक तिच्यासमोर मान्य करण्यात कसला कमीपणा? त्यांनी मनाशी ठरवलं. घरी पोहोचेपर्यंत त्यांनी बरेचदा सोनालशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तिने एकदाही फोन उचलला नाही. लहानपणी सोनलला काही हवं असलं किंवा काही सांगायचं असलं की ती घरी चिट्ठी ठेवून देत असे. मग ते मान्य झाल्यावर लाडाने दोन्ही हात पसरत असे. मिठी मारून गोड पापा देत असे. त्यांना आठवलं. आज त्यांना तिला हट्ट सोड असं सांगायचं होतं आणि खरंतर माफी मागायची होती. त्या लगेच तिला चिट्ठी लिहायला बसल्या. बराच वेळ.. स्वतःशीच हसत.. स्वतःशीच रडत होत्या. पण आता त्यांना खूप हलकं वाटत होतं. त्यांनी ते पत्र सोनलच्या डबेवाल्या काकांकडे सोपवलं. “ताईला सांगा मी रात्री जेवायला वाट पाहते.” त्यांनी काकांकडे निरोप दिला.

          सुमेधा ताईंची घालमेल आता वाढत होती. आशुतोषचाही फोन सोनल उचलत नव्हती. दोघेही आठ वाजल्यापासून अस्वस्थपणे तिची वाट पाहत होते. साडे दहाच्या सुमारास दाराची कडी वाजली. सोनलच असणार.. लहानपणी अगदी अशीच कडी वाजवायची ती.. स्वतःशीच पुटपुटत त्या उठल्या. दार उघडलं तर पाहतात काय.. सोनल.. डोळ्यातून घळघळा अश्रू वाहत होते आणि दोन्ही हात पसरून ती दारात उभी होती. त्यांनी तिला घट्ट मिठी मारली. सोनलच्या हातात पत्र ते पत्र होतं. “आई, तू सगळं माझ्यासाठीच करत होतीस आणि तुझा अशा वागण्यामागे काहीतरी कारण असेल हे मी समजूच शकले नाही गं.. मला माफ कर.. मी चुकले.. चुकले...” सोनल बोलतच होती. तिला आत घेऊन ताईंनी पाणी दिलं. तिचा हात हातात घेऊन त्या म्हणाल्या, “चूक माझी होती.. आणि ती मला समजली आहे. तू फक्त तिची शिक्षा या बाळाला नको देऊस. मला वचन दे तू या बाळाला जन्म देशील. ” सोनललाही खरंतर बाल हवं होतं. पण लहानपणीच्या कटू आठवणी घर करुन होत्या. आता मात्र तिला सगळं समजलं होतं. आईबद्दल असलेल्या सगळ्या तक्रारी एका क्षणात दूर झाल्या होत्या. तिने वाचन दिलं आणि लवकरच दोघी मायलेकी नव्या पाहुण्याच्या स्वागताच्या तयारीमध्ये गुंतल्या.

रविवार, २३ सप्टेंबर, २०१२


थँक यू मौसी

          परीक्षा अगदी तोंडावर येणं आणि तरीही प्रकल्प आणि अभ्यास अपूर्ण असणं.. मग ऐनवेळी येणारं दडपण.. घाईघाईत सगळं संपवण्याच्या नादात होणारी दगदग... त्यामुळे आपलीच आपल्यावर होणारी चीडचीड.. मग परीक्षेच्या आधी देवाला “देवा, आत्ता मला मदत कर. पास कर नीट. मी पुढच्या वेळेस असं नक्कीच करणार नाही.” अशी मनोभावे केलेली प्रार्थना.... की स्वतःच स्वतःला मारलेली थाप! जवळपास आपण सगळेच यातून गेलो आहोत. अशाच एका वैतागलेल्या संध्याकाळी मी साडे सातच्या सुमारास छत्रपती शिवाजी टमिर्नसवरून कल्याणच्या दिशेला जाणारी ट्रेन धावत पळत पकडली. आत चढते न चढते तोच ट्रेन निघाली. कशीबशी बसायला जागा मिळाली नशिबाने! कंटाळलेल्या मी एक सुस्कारा टाकला आणि आता काय काय करायचं राहिलं आहे आणि सगळं काम संपवून अभ्यासाला सुरुवात कधी करायची अशा विचारात गुंतून गेले.

          माझी विचार मालिका कर्कश आवाजाने खंडीत झाली. भांडणं.. मुंबईत लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांना अगदी नित्यनेमाची अशी गोष्ट. बऱ्याच महिलांसाठी तर हे एखादे शक्तीवर्धक औषध असावं असं मला वाटतं. दिवसभराच्या कामाची, घरी पदर खोचून कामाला लागायची, मुलांचा अभ्यास घेण्याची, सगळ्याची ताकद या भांडणातून त्यांना मिळत असावी. कोण म्हणतं शिव्या केवळ पुरुषांनाच जास्त येतात. त्यांनी जरा गर्दीच्या वेळेस मुंबईची लोकलवारी आणि तीही खासकरून दुसऱ्या वर्गाच्या डब्यातून करावी. महिला प्रत्येक क्षेत्रात कशा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत याचे अद्भूत चित्रच आपल्या डोळ्यांसमोर साक्षात प्रकट होते. खिडकीतून डोकावून पाहते तर दादर येत असल्याचं समजलं. आता अजून गर्दीचे लोंढे आत शिरणार.. अजून आवाज.. अजून भांडणं.. मी विचार करूनच वैतागले. पण बसायला निवांत जागा मिळाली म्हणून जरा बरं वाटलं. दादर आलं, गाडी थांबली. बरीच गर्दी सोबत घेऊन गाडी स्थानकावरून निघाली. त्या भांडखोर काकूंना भांडणाचा जोर परत चढला. त्यांचा टिपेला जाणारा फाटका आवाज ऐकून बऱ्याच जणी चुकचूकल्या. त्यांना शांत करायला जाणाऱ्यांच्या अंगावरही काकू चवताळून येत होत्या. एवढ्यात अजून एक मोठ्ठा आवाज आला... “क्या रे मेरी मीना कुमारी! क्यू तेरी जली? क्यू इतना चील्लाती रे तू?” बऱ्याच जणींच्या माना त्या विचित्र अशा आवाजाकडे वळल्या आणि चमत्कारच झाला.. काकूंचा आवाज पूर्ण शांत झाला. काकूंना गप्प करुन तिने आता मोर्चा आत बसलेल्या महिलांच्या दिशेने वळवला.

          आकाशी निळ्या रंगाची साडी, पिवळा ब्लाउज, कपाळावर मोठ्ठी लाल बिंदी, भांगेत गडद सिंदूर, तश्शीच गडद लिपस्टिक, हातभार बांगड्या, गळ्यात डोरलं आणि ठसठशीत माळ आणि काळी कभिन्न ती.. मी बसले होते तिथे आली.. “ ए मेरी दिपिका, मुझे देखके सोनेका नाटक करती क्या? बोल ना काजल तू उसकू.. ए माधुरी क्या स्माईल रे तेरा.. मै तो फिदाच होगई..” ती आली आणि पाहता पाहता वैतागलेल्या, मरगळलेल्या त्या ट्रेनच्या डब्याला एक टवटवी आली. सगळीकडे हास्याची कारंजी उसळली. मोठ्यांनी टाळ्या वाजवत ती माझ्यापाशी आली. मी तर केव्हापासून कौतुकाने तिलाच पाहत होते. जादूची कांडी फिरवावी तसा तिने सगळ्यांच्या मनावर ताबा मिळवला होता. सगळ्याचजणी तिच्याकडे आश्चर्याने पाहत होत्या. काही मात्र ती जवळ आली तोंड फिरवत होत्या पण ही मात्र कशाचाच फरक पडून न देता सगळ्यांकडून पैसे मागत होती आणि तेही त्यांची खेचत.. त्यांच्याशी मजामस्ती करत. “ये अमृता राव देखेगी क्या मुझे सिर्फ? कुछ तो दे ना.. इतने मजे तो ले रही थी कबसे..” तिने मला आवाज दिला. मलाही यावर मनापासून खळखळून हसू आलं आणि तिच्याचसाठी हातात काढून ठेवलेली नोट मी तिच्या हातात दिली. जणू ती भीक नाहीच तर तुम्हाला दोन क्षण हसवत आहे आणि त्याचे तुम्हाला वाटतील तेवढे पैसे तुमच्याकडून घेत आहे असंच वाटलं अगदी. संपूर्ण डब्यात अशीच सगळ्यांची बारशी करत आणि पैसे जमवत ती फिरली.

          ठाणे सोडल्यावर गर्दी जरा ओसरली. कळव्याला गाडीमधून उतरण्या आधी लहान मुलासारखी “टाटा बाय” असंसुद्धा सांगायला आली. ती जात होती.. सगळ्यांना क्षणात हसवणारी.. मनावरचा भार थोडा हलका करणारी.. सगळ्यांना काहीबाही नावं देणारी.. पण... तिचं नाव काय असेल? मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणाले, “सबके नाम आपको पता है ना ! अपनाभी नाम जरा बताती जाओ !” तिने विचित्र अशा पण आश्चर्यपूर्ण नजरेने माझ्याकडे पाहिलं. “मेरा नाम? बस मौसी बुलालो.. मौसीही हू मै |” तिच्या डोळ्यात पाणी आलं की मलाच असं जाणवलं? तिने झटकन आपला हात माझ्या हातून सोडवून घेतला. गाडी कळव्याला थांबली. मीही तिच्या मागोमाग दारात गेले. ती उतरली. तिने मागे वळून पहिले आणि मी जोरात ओरडले, “थँक यू मौसी.. फिर मिलते है|” तिनेही निरोप द्यायला हवेत हात हलवला. मनावरचा ताण झटक्यात कमी केला होता तिने. आजही ट्रेनने प्रवास करताना मी मौसीची वाट पाहते. परत कधी भेटेल ती मनावरचं ओझं क्षणात हलकं करण्यासाठी..? तुम्हाला भेटली तर तुम्हीही आवर्जून म्हणा. “थँक यू मौसी..”

रविवार, १५ जुलै, २०१२


तमसो मा ज्योतिर्गमय

काही दिवसांपूर्वी गुरुपौर्णिमा होती. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. पण आजकाल भ्रमणध्वनी आणि महाजालामुळे गुरूंची थेट भेट न घेताही त्यांना शुभेच्छांचे संदेश पोहोचवता येतात. गुरु आशिर्वादही असेच पाठवतात. असे चित्र सर्रास दिसू लागले आहे. तसेच वर्षभर काहीच संभाषण अथवा भेटीगाठी होत नसतानाही केवळ या एकाच दिवशी बरेचजण आपल्या गुरुजनांना एक संदेश पाठवून परत वर्षभर त्यांना विसरून जातात. काही काम असेल किंवा पुढच्या गुरुपौर्णिमेला परत त्यांना आपल्या “गुरूंची” आठवण येते. त्यातही अनेकदा हे गुरु म्हणजे शाळा महाविद्यालय अथवा अन्यत्र ठराविक विषय शिकवणारे शिक्षक असतात. काही वेळेस काही अध्यात्मिक गुरुही असतात. आपल्या धर्मात सांगितल्याप्रमाणे काहीजण सतत योग्य मार्गावर चालण्यासाठी गुरूच्या शोधात असतात आणि यातच खरंतर वाट भरकटतात.
यासाठीच गुरु या शब्दाचा नेमका अर्थ आपण जाणून घेणे खूप आवश्यक आहे. गुरु या संस्कृत शब्दातील “गु” हे अक्षर मनातील अज्ञानरूपी अंधःकार दर्शवतं तर “रु” या अक्षराचा अर्थ ज्ञानरूपी प्रकाश असा आहे. असा अर्थ लक्षात घेतल्यावरच या शब्दाची नेमकी व्याप्ती समजते. याचाच अर्थ गुरु एकच असावा अथवा तो शिक्षकाच असावा असं काहीच नाही तर ज्या कोणी व्यक्ती आणि घटना आपल्याला काही बोध देतात त्या सर्वच आपल्या गुरु आहेत. एकनाथी भागवतामधल्या काही ओळी मला यासंदर्भात आठवतात;
जो जो जयाचा घेतला गुण
तो तो म्या गुरु केला जाण
गुरुसी आले अपारपण
जग संपूर्ण गुरु दिसे
हे कसे? याचे उत्तरही पुढे सापडते. संगीत ऐकू आल्यावर हरिणे लुब्ध होऊन त्या दिशेने धावत सुटतात आणि या मोहापायीच पारधी त्यांना पकडतो यातून असे अविचाराने वागू नये आणि मोहात अडकू नये हा बोध होतो तर वेश्या रोज नटून बसते, गिऱ्हाईकाची वाट पाहते आणि तो न मिळाल्यास हिरमुसली होते, भेटल्यास खुश होते. ती ज्या आतुरतेने वाट पाहत असते त्यातून भक्ती आणि व्याकुळता तसेच फलप्राप्तीचा आनंद शिकता आला म्हणून अगदी अशा वेश्येलाही त्यांनी गुरु मानले आहे. दत्तगुरुंचे अशा २४ सजीव निर्जीव घटकांकडून काय काय शिकले आणि ते त्यांच्या गुरुस्थानी कसे झाले हे अत्यंत खुबीने यात मांडण्यात आले आहे.
          खरंच.. प्रत्येक व्यक्ती, घटना आपल्याला काहीतरी शिकवून जातात. जे आहे तसंच  ते न पाहता त्यातून घेण्यासारखं काय काय आहे ते पाहिल्यास अवघे जगच आपले गुरु आहे याचं प्रत्यय येईल. गुरूच्या शोधात भरकटत राहण्यापेक्षा किंवा एखादी अप्रिय व्यक्ती आणि घटना यांना दोष देण्यापेक्षा त्यातूनही काही शिकता आले.. घेता आले.. तर आणि तरंच आयुष्य सुकर होईल. तेव्हा दर गुरुपौर्णिमेला अशा काही अनपेक्षित गुरुंचीही आठवण असू द्या  आणि महत्त्वाचे.. असे गुरु ओळखायला शिका तरच अंधारातून उजेडाकडे यशस्वी वाटचाल शक्य होईल.

शुक्रवार, १५ जून, २०१२


मृदगंध 

यंदा नेहमीपेक्षा पावसाने जरा उशीराच हजेरी लावली. आधीच महागाईनं त्रासलेले आम्ही मुंबईकर उकाड्यानी अधिकच त्रस्त झालो होतो. हवामानखात्यानी जरी पाऊस उशिरा येण्याची वेगवेगळी कारणं सांगितली असली तरी याचं एक मुख्य कारण फेसबुक असावं असं वाटतं.. काय आहे.. एवढ्या लोकांच्या पावसासंबंधीच्या पोस्टला हजेरी देऊन मग त्याला उशीर होणं स्वाभाविकच आहे ना..!!

पण एका तप्त रात्रीनंतर अगदी सकाळ उजाडताच पावसाने रिमझीम रिमझीम करत मन तृप्त केलं. पहिला पाऊस... वाह..!! कितीही मोठी झाले तरी काही गोष्टींचं वेड कसं जराही कमी होत नाही..!!  म्हणजे.. रस्त्यावरची पाणीपूरी, लहान मुलांच्या बोबड्या बोलण्यातली गम्मत, मोगऱ्याचा गजरा, आपल्या प्रिय व्यक्तीच्या मिठीतली ऊब, समुद्राच्या लाटांशी हितगुज आणि अर्थात पावसात मनसोक्त भिजणं आणि मंद मंद दरवळणारा मृदगंध भरभरून घेणं.....! कितीही वेळा या गोष्टी केल्या - अनुभवल्या तरी याचं वेड, ओढ, गम्मत, मजा, नशा, मुळीच कमी होत नाही, उलट क्षणाक्षणाला वाढतंच असते. त्या सकाळीही पावसासोबत मृदगंध वातावरण उल्हासित करत होता. एक वेगळाच उत्साह, चैतन्य आपल्यासोबत घेऊन आला होता. गरमागरम ब्लॅक कॉफीचा मग हातात घेऊन मी खिडकीत बसले. मधेच हात बाहेर काढून ते इवले इवलेसे मोती हातावर घेत होते. झाडांच्या वर वरच्या पानांवर क्षण दोन क्षण विसावलेले ते थेंब हळूच ओघळून खालच्या पानांवर उतरत होते आणि मग मातीशी एकरूप होत होते. जणू एवढ्यासाठीच ते जन्मले होते....

लहानपणापासून असे किती पावसाळे आले आणि गेले. पण प्रत्येक पाऊस वेगवेगळ्या आठवणींना नकळत उजाळा देत गेला.. एवढेच नाही तर कित्येक नवनवीन आणि मोलाच्या आठवणी देतही गेला. आठवणींचा पेटारा सतत समृद्ध करत राहिला. मनाला आलेली मरगळ झटकत, नवीन उमेद देत गेला. मला वाटतं या मृदगंधामध्येच याचं काहीतरी गुपित लपलं असावं. का बरं सगळ्यांना पावसाएवढाच हा गंधही वेड लावतो? कोणतंही अत्तर यापुढे फिकंच पडेल नाही? कोणीतरी या मातीच्या सुवासाचे अत्तरही बनवले आहे म्हणे.. मोकळेपणाची मजा या सुवासाची खरी खासियत आहे. मग नैसर्गिकरीत्या आणि अशा खास वातावरणात सहज, मनसोक्त घेता येणारा हा गंध खरंच असा बाटलीत बंद करता येईल?

का बरं हे वातावरण, हा सुवास अनेक आठवणीसोबत आणतो? का नवीन गोष्टीही देऊन जातो? उगाचच मला हे प्रश्न त्रास देत होते. मग आठवणींनी अलगद मला कवेत घेतलं. एखाद्या चित्रपटासारख्या त्या झरझर डोळ्यांसमोर येऊ लागल्या. सकाळी धावपळ करत मला बालवर्गात सोडणारे माझे बाबा, अभ्यासाचा कंटाळा करायचे म्हणून माझ्या मागेमागे फिरून तो करायला लावणारी माझी आई, कोणीतरी एक बिस्कीट दिलं तर त्याचं अर्ध माझ्यासाठी काढून ठेवणारा माझा दादा, माझी शाळा, ती सुटल्यावर पावसाळ्यात बेडूक पकडायला येणारी मज्जा आणि मग आईचा ओरडा, रस्त्यावरच्या कुत्रा – मांजरीच्या पिल्लांना हात लावण्यासाठी पळत सुटणारी मी, कथ्थकचा रियाझ, नाटकाची तालीम, चित्रकलेचा वर्ग, कॉलेजच्या मित्रमैत्रिणींसोबत केलेली टवाळकी, लगाम सुटलेल्या घोड्याप्रमाणे या आठवणी येतंच होत्या. धडाम् असा मोठ्ठा आवाज झाला आणि माझी तंद्री तुटली. वीजेचा गडगडाट.... इथे रिमझिमत असला तरी कुठेतरी जोरात पडत असावा. पण त्या आवाजांनी माझी स्मृती मालिका केवळ खंडितच झाली नाही तर आजच्या बदललेल्या परिस्थितीची बोचरी जाणीवही झाली. काळाच्या ओघात किती गोष्टी बदलल्या.. निसटल्या.. मागे सुटल्या... नकळत डोळ्यातूनही अश्रू अलगद गालांवर बरसले.. शाळा संपली, आता कोण सोडायला किंवा घरी घेऊन जायला येणार? अभ्यास आपला आपण करता येऊ लागला, आता आई कौतुकानं माझी प्रगती पाहते. पण तिचा ओरडा..? तेव्हा नकोसा वाटायचा तेवढाच आता हवा हवासा वाटत होता. दादा तर शिकायला गेली ७ वर्ष घराबाहेर आहे. मग आता कसली वाटावाटी? लटके राग आणि भांडणं.. क्वचित कधीतरी अगदी उरावर बसून केलेली मारामारी.. आई बाबांचं कोण जास्त लाडकं यावरून घातलेले वाद... हरवलंच कुठेतरी सगळं.. कथ्थकचा, चित्रकलेचा वर्ग, नाटकाच्या तालीमी सगळ्यांवर पडदा पडला. कॉलेज संपलं आणि सगळेच आपापल्या कामात व्यस्त झाले. अचानक खूपच एकटेपणाची भावना तीक्ष्ण अशी जाणवली. पाऊस थांबून मळभ दाटलं होतं. आतही... बाहेरही... विचित्र बेचैनी जाणवत होती... थोडा वेळ असाच गेला.. सुन्न.. स्तब्ध.. एकाकी... 


अचानक पावसाने जोरदार कोसळायला सुरुवात केली. मातीचा सुगंध वाढला. पावसाचे शिंतोडे माझ्या अंगावर आले. थोडंस बरं वाटू लागलं. तेवढ्यात आई झाडांना पाणी घालायला आली. म्हणाली, “एवढ्या गरमीमुळे माझ्या गुलाबाच्या रोपट्यांना त्रास होत होता. वाटलं पावसापर्यंत तग धरतील की नाही.. पण आता मस्त पालवी फुटेल. छान फुलं येतील.” हे ऐकलं आणि माझ्या डोक्यात विचारांची वीज कडाडली, प्रकाश पडला... खरंच... एकामागून एक असं ऋतुचक्र आपलंही बदलत असतंच. आशा निराशेचा शिवा शिवीचा खेळ अगदी या अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरींसाराखाच जणू... आई बाबांनी एवढ्या खस्ता खाऊन शिकवलं, मोठं केलं. एक चक्र पूर्ण झालं. आता त्यांचा आनंद आणि समाधान महत्त्वाचं. खेळताना डॉक्टर होणारा दादा आता खरंच डॉक्टर झाला. आयुष्यभर एकाच जागी राहूनच केवळ सोबत करता येते का? मनाने तर आम्ही नेहमीच जवळ असतो. कॉलेज संपलं आता स्वतःच्या अस्तित्वाची नवीन ओळख करून देण्याची वेळ सुरु झाली. जुने छंद मागे पडले पण नवीन आवडीही निर्माण झाल्याचं की...

आता संपूर्णपणे समाधानाने मी श्वास भरभरून घेतला आणि अचानक त्या कोड्याचा उलगडाही झाला. मुदगंध हा पावसाची ग्वाहीच आपल्याला देत असतो. दूरवर कोसळणाऱ्या पावसाची खबर इथे तिथे पसरवतो आणि आपल्याला पाऊस येईल असा दिलासा देतो. रणरणत्या उन्हानी शुष्कं झालेली धरती आता परत हिरवी गार दिसणार, हवेत गारवा येणार, पिक पाणी व्यवस्थित मिळणार, कॉफी आणि कांदा भाजी असे बेत होणार, पाऊस खूपच झाला की कामावर दांडी मारता येणार, असे एक एक मनसुबे आपण आधीच आखत असतो आणि ही सारी कल्पनांच्या भरारीची किमया पावसाआधी हा मृदगंध घडवून आणत असतो. मग हा वेड लावणारंच ना..! वातावरणातील नैसर्गिक बदलांचा थेट परिणाम आपल्या मनावर होत असतो असं मानसशास्त्रज्ञ म्हणतात. अगदी खरंच तर आहे हे. तसंच काहीसं माझंही झालं होतं. धो धो बरसणाऱ्या पावसाने झाडांवरची माती जशी निघून पाने स्वच्छ होतात तसंच मनही आता स्वच्छ आणि टवटवीत झालं होतं. जुने विचार मागे टाकून नव्या विचारांचे कोंब अंकुरीत होत होते. मी परत कॉफीचा मग भरला आणि गरमागरम घोटासोबत नभातून तसंच “त्याच्या” नजरेतून, स्पर्शातून बरसणाऱ्या पावसात एकाच वेळी चिंब चिंब भिजताना कशी मजा येईल या विचारात गुरफटले...!!

शुक्रवार, ८ जून, २०१२


त्या टोकावर मी तुझीच वाट पाहत असेन... 


तू येशील जगाची सफर करून,
येशील चंद्र चांदण्यांना हात लावून,
येशील तुझ्या स्वप्नातलं जग जिंकून...
तू विसरलास जरी परतीचा रस्ता...
तरी त्या टोकावर मी तुझीच वाट पाहत असेन..
कितीही दूर गेलास तरी तसंच प्रेम करत असेन.....

माझ्यासोबत असतील तुझ्या आठवणी केवळ..
तू येशील तेव्हा त्यांची ओळख असेल का तुझ्याजवळ??
पण तुझा स्वप्नांची मी काळजी घेईन,
विस्कटलेला संसार नीट सांभाळीन,
आणि तरीही त्या टोकावर मी तुझीच वाट पाहत असेन..
कितीही दूर गेलास तरी तसंच प्रेम करत असेन.....

तू परत येशील तेव्हा खूप खूश असशील,
तुला हवं ते सगळं मिळवून आला असशील,
इथली मी मात्र तुला आता वेगळीच वाटेन...
सगळं तेच असलं तरी..मी त्या जुन्या तुझ्यावरच प्रेम करत असेन..
आणि म्हणूनच तू आलास तरी.. त्या टोकावर त्या जुन्या तुझीच वाट पाहत असेन...
कितीही दूर गेलास तरी तसंच प्रेम करत असेन.....


सोमवार, ५ मार्च, २०१२

आई



आई म्हणजे आपल्या अस्तित्वाची पहिली ओळख,
आपल्या आयुष्याची पहिली शिक्षक,
आपल्याला सुख मिळवं म्हणून सतत धडपडणारी मूर्ती,
आणि स्वतःची झोप विसरून आपल्या स्वप्नांची सतत करते पुर्ती.

सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१२

रे सख्या.....



सांजवेळी या ठिकाणी आठवांचे नभ कोसळती,
परतीचीही वाट हरवता उगा पाऊले भरकटती,
या अशा अस्वस्थ समयी वळूनी तू बघशील का?
रे सख्या माझिया मनाला साद तू देशील का?

एक रात्र खुललेली.........





एक रात्र खुललेली......... त्याच्या अन् तिच्या श्वासात गुंतलेली........ उलगडलेली......
स्वप्नही अशी डोळे झाकता पाहिलेली....... जगलेली........
अधरांची भाषा स्पर्शाची नशा..... त्यानी तिला दाखवलेली जगण्याची नवीन दिशा......
हाती हात घेताना भीती वाटत होती खरी...... पण विश्वासाची दुलई अंगभर लपेटलेली......
आता पुढे काय हे दोघानाही माहित नव्हते.... तरीही एकमेकांच्या कुशीतच राहायचे पक्के झाले होते....
एका रात्रीचे हे तिचे अन् त्याचे गुपित...... कितीही लपवले तरी सगळ्यांनाच कळले होते......
त्या रात्रीची हीच तर गम्मत होती...... एकमेकांशी नव्यानीच ओळख होत होती....
त्याचा खोडसाळपणा...... तिचा रुसवा...... स्वप्नांसोबत वेळही पुढे जात होती.....
आणि आलाच तो क्षण निरोपाचा..... जीवाला उगीच हुरहूर लावणारा.....
पण यावेळी निरोप घेण्यात वेगळीच मजा होती.... त्यात परत भेटण्याची आशा होती.....
आता तो अन् ती कामात पुरते बुडलेले..... पण मनाने एकमेकातच गुंतलेले....
बऱ्याच दिवसांनी परत भेटीचा योग आला... त्या रात्रीच्या आठवणी आज नव्यानी आल्या.....
जुन्या भेटीचा गंध मनामनात तसा ताजा होता...... पण....
कशी कोण जाणे एक किमया झाली.... त्याची भाषा नकळतच तिच्या ओठी रुळली....
विरहानन्तरच्या भेटीत अधिकच आतुरता होती...... म्हणूनच ही रात्रही तशीच खुलली होती.......
त्याच्या अन् तिच्या श्वासात गुंतलेली........ उलगडलेली होती.....