थँक यू मौसी
परीक्षा अगदी तोंडावर येणं आणि तरीही
प्रकल्प आणि अभ्यास अपूर्ण असणं.. मग ऐनवेळी येणारं दडपण.. घाईघाईत सगळं
संपवण्याच्या नादात होणारी दगदग... त्यामुळे आपलीच आपल्यावर होणारी चीडचीड.. मग
परीक्षेच्या आधी देवाला “देवा, आत्ता मला मदत कर. पास कर नीट. मी पुढच्या वेळेस
असं नक्कीच करणार नाही.” अशी मनोभावे केलेली प्रार्थना.... की स्वतःच स्वतःला
मारलेली थाप! जवळपास आपण सगळेच यातून गेलो आहोत. अशाच एका वैतागलेल्या संध्याकाळी
मी साडे सातच्या सुमारास छत्रपती शिवाजी टमिर्नसवरून कल्याणच्या दिशेला जाणारी
ट्रेन धावत पळत पकडली. आत चढते न चढते तोच ट्रेन निघाली. कशीबशी बसायला जागा
मिळाली नशिबाने! कंटाळलेल्या मी एक सुस्कारा टाकला आणि आता काय काय करायचं राहिलं
आहे आणि सगळं काम संपवून अभ्यासाला सुरुवात कधी करायची अशा विचारात गुंतून गेले.
माझी विचार मालिका कर्कश
आवाजाने खंडीत झाली. भांडणं.. मुंबईत लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांना अगदी
नित्यनेमाची अशी गोष्ट. बऱ्याच महिलांसाठी तर हे एखादे शक्तीवर्धक औषध असावं असं
मला वाटतं. दिवसभराच्या कामाची, घरी पदर खोचून कामाला लागायची, मुलांचा अभ्यास
घेण्याची, सगळ्याची ताकद या भांडणातून त्यांना मिळत असावी. कोण म्हणतं शिव्या केवळ
पुरुषांनाच जास्त येतात. त्यांनी जरा गर्दीच्या वेळेस मुंबईची लोकलवारी आणि तीही खासकरून
दुसऱ्या वर्गाच्या डब्यातून करावी. महिला प्रत्येक क्षेत्रात कशा पुरुषांच्या
खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत याचे अद्भूत चित्रच आपल्या डोळ्यांसमोर साक्षात
प्रकट होते. खिडकीतून डोकावून पाहते तर दादर येत असल्याचं समजलं. आता अजून गर्दीचे
लोंढे आत शिरणार.. अजून आवाज.. अजून भांडणं.. मी विचार करूनच वैतागले. पण बसायला
निवांत जागा मिळाली म्हणून जरा बरं वाटलं. दादर आलं, गाडी थांबली. बरीच गर्दी सोबत
घेऊन गाडी स्थानकावरून निघाली. त्या भांडखोर काकूंना भांडणाचा जोर परत चढला.
त्यांचा टिपेला जाणारा फाटका आवाज ऐकून बऱ्याच जणी चुकचूकल्या. त्यांना शांत
करायला जाणाऱ्यांच्या अंगावरही काकू चवताळून येत होत्या. एवढ्यात अजून एक मोठ्ठा
आवाज आला... “क्या रे मेरी मीना कुमारी! क्यू तेरी जली? क्यू इतना चील्लाती रे
तू?” बऱ्याच जणींच्या माना त्या विचित्र अशा आवाजाकडे वळल्या आणि चमत्कारच झाला..
काकूंचा आवाज पूर्ण शांत झाला. काकूंना गप्प करुन तिने आता मोर्चा आत बसलेल्या
महिलांच्या दिशेने वळवला.
आकाशी निळ्या रंगाची साडी, पिवळा
ब्लाउज, कपाळावर मोठ्ठी लाल बिंदी, भांगेत गडद सिंदूर, तश्शीच गडद लिपस्टिक,
हातभार बांगड्या, गळ्यात डोरलं आणि ठसठशीत माळ आणि काळी कभिन्न ती.. मी बसले होते
तिथे आली.. “ ए मेरी दिपिका, मुझे देखके सोनेका नाटक करती क्या? बोल ना काजल तू उसकू..
ए माधुरी क्या स्माईल रे तेरा.. मै तो फिदाच होगई..” ती आली आणि पाहता पाहता
वैतागलेल्या, मरगळलेल्या त्या ट्रेनच्या डब्याला एक टवटवी आली. सगळीकडे हास्याची
कारंजी उसळली. मोठ्यांनी टाळ्या वाजवत ती माझ्यापाशी आली. मी तर केव्हापासून
कौतुकाने तिलाच पाहत होते. जादूची कांडी फिरवावी तसा तिने सगळ्यांच्या मनावर ताबा
मिळवला होता. सगळ्याचजणी तिच्याकडे आश्चर्याने पाहत होत्या. काही मात्र ती जवळ आली
तोंड फिरवत होत्या पण ही मात्र कशाचाच फरक पडून न देता सगळ्यांकडून पैसे मागत होती
आणि तेही त्यांची खेचत.. त्यांच्याशी मजामस्ती करत. “ये अमृता राव देखेगी क्या
मुझे सिर्फ? कुछ तो दे ना.. इतने मजे तो ले रही थी कबसे..” तिने मला आवाज दिला.
मलाही यावर मनापासून खळखळून हसू आलं आणि तिच्याचसाठी हातात काढून ठेवलेली नोट मी
तिच्या हातात दिली. जणू ती भीक नाहीच तर तुम्हाला दोन क्षण हसवत आहे आणि त्याचे तुम्हाला
वाटतील तेवढे पैसे तुमच्याकडून घेत आहे असंच वाटलं अगदी. संपूर्ण डब्यात अशीच
सगळ्यांची बारशी करत आणि पैसे जमवत ती फिरली.
ठाणे सोडल्यावर गर्दी जरा
ओसरली. कळव्याला गाडीमधून उतरण्या आधी लहान मुलासारखी “टाटा बाय” असंसुद्धा
सांगायला आली. ती जात होती.. सगळ्यांना क्षणात हसवणारी.. मनावरचा भार थोडा हलका
करणारी.. सगळ्यांना काहीबाही नावं देणारी.. पण... तिचं नाव काय असेल? मी तिचा हात
हातात घेतला आणि म्हणाले, “सबके नाम आपको पता है ना ! अपनाभी नाम जरा बताती जाओ !”
तिने विचित्र अशा पण आश्चर्यपूर्ण नजरेने माझ्याकडे पाहिलं. “मेरा नाम? बस मौसी बुलालो..
मौसीही हू मै |” तिच्या डोळ्यात पाणी आलं की मलाच असं जाणवलं? तिने झटकन आपला हात
माझ्या हातून सोडवून घेतला. गाडी कळव्याला थांबली. मीही तिच्या मागोमाग दारात
गेले. ती उतरली. तिने मागे वळून पहिले आणि मी जोरात ओरडले, “थँक यू मौसी.. फिर मिलते
है|” तिनेही निरोप द्यायला हवेत हात हलवला. मनावरचा ताण झटक्यात कमी केला होता
तिने. आजही ट्रेनने प्रवास करताना मी मौसीची वाट पाहते. परत कधी भेटेल ती मनावरचं
ओझं क्षणात हलकं करण्यासाठी..? तुम्हाला भेटली तर तुम्हीही आवर्जून म्हणा. “थँक यू
मौसी..”