नंदादिप
"आलीस, रूपा! ये ये बाळ, बस." बऱ्याच वर्षांनी तो आवाज
कानी आला. आता आवाजात थकवा होता पण तेच प्रेम, तोच आपलेपणा
जाणवला! लग्नानंतर पहिल्यांदाच मी अनुजाच्या घरी गेले. पण काकूंनी पूर्वीसारखेच
हसत स्वागत केले त्यामुळे मधली ८ वर्ष जणू गायबंच झाली असं वाटलं.
अनू माझी वर्ग मैत्रीण. अगदी
बालवर्गापासून कॉलेजपर्यंत आम्ही दोघी एकत्रच होतो. दर काही दिवसांनी एकमेकींकडे
येणं जाणं होत असे. पुढे लग्न होऊन मी यूएसला गेले आणि आमचा संपर्क कमी झाला.
आता यूएसला आमच्या जवळच अनुजा तिच्या नवऱ्यासोबत राहायला आल्यावर आमची भेट
अधूनमधून होत असे. काकूंचे निर्मळ, तजेलदार डोळे सतत
डोळ्यांसमोर येऊ लागले. जुन्या आठवणी ताज्या होऊ लागल्या तशा त्या एकेक करून उड्या
मारून वर येऊन काकूंच्या भेटीची ओढ तीव्र लागल्या.
तिच्या आईच्या हातच्या एकेक पदार्थांची आणि
त्यांच्याकडील नंदादिप यांचीही आठवणही आली. परदेशात अशा आठवणी जास्तच डाचतात. अनू
तिच्या आई वडिलांबद्दल फारशी काही बोलत नाही, हे आत्तापर्यंत
माझ्या लक्षात आलं होतं. कदाचित त्यांच्याशी तिचं तेवढंसं बोलणंही होत नसावं!...
माझा आपला एक अंदाज. एकदा तिला ओझरतं याबद्दल विचारूनही पाहिलं पण तिच्या
उत्तरावरून आम्ही आता त्या पूर्वीसारख्या एकमेकींना सगळं सांगणाऱ्या मुली राहिलो
नाहीत आणि वयासोबत बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत, हे लक्षात
आलं. एव्हाना मला अनूचा भाऊ वेगळा राहतो आणि आता आई बाबा दोघंच घरी असतात असं
समजलं होतं. यूएसला नवीननवीन होते तेव्हा इतरांशी ओळख होई तो एकटेपणा काय असतो
याची कल्पना मला आली होती. त्यामुळे तिथे आपल्या दोन्ही मुलांची आठवण काढत अनूचे
आईवडील आपल्याच देशातही आठवणींच्यासोबत परकेपणाने आपल्याच माणसात वावरत असतील,
हे मी जोखले होते. त्यांना भेटायची इच्छा अधिक तीव्र झाली. परवाच
भारतात आले आणि काल काकूंना फोन करून भेटायला येते असं कळवलं.
काकू कशा असतील? पूर्वीप्रमाणेच
आम्ही एकमेकींशी बोलू का? काय बोलावं? एवढ्या
वर्षांनी आज मी कशी आले भेटायला, असं विचारलं तर उत्तर काय
देऊ? मनात असंख्य विचार आणि हातात एक लहानशी भेट घेऊन मी
त्यांच्या दारात उभी होते. पण, काकूंच्या पूर्वीसारख्या
स्वागताने मनातलं मळभ दूर झालं. घरात पाऊल ठेवताच मटरच्या करंज्यांचा खमंग वास
नाकात शिरला. "तुला आवडतात नं करंज्या! कालंच यांना सांगून बाजारातून मटार
आणले." काकू मायेने डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. मला त्यांच्या एवढ्या
प्रेमाने उगीचंच भरून आल्यासारखं झालं. सोबतच आपण एवढी वर्ष काकूंना भेटलो नाही,
याबाबत अपराधी वाटू लागलं.
बराच वेळ गप्पा झाल्या. काका, काकूंनी बोलून दाखवलं नाही तरीही अनू आणि तिचा भाऊ इथे फारसे फिरकत नाहीत
किंवा काही हवं नको पाहत नसावेत हा माझा समज अधिकाधिक घट्ट होऊ लागला. तडे
गेलेल्या, पोपडे निघालेल्या भिंतींप्रमाणे नाती विद्रुप
झाल्याचा मला भास होऊ लागला. कारण काय असेल हे मला माहित नाही आणि मला त्याच्याशी
काही कर्तव्यही नाही. पण आपल्याच आई वडिलांशी कोणी एवढं फटकून कसं वागत असेल हे
मला समजत नव्हतं.
अनू आता माझ्याजवळच राहते हे त्यांना
माहित नव्हतं. किंबहुना ते युएसला आधी राहायचे तिथून दुसरीकडे शिफ्ट झाले हेच
त्यांना माहित नव्हतं. काकूंनी नेहमीप्रमाणे सारवासारवी केली. पण, "मुलगी लग्न करून भारताबाहेर गेली, फोन वगैरे नसतोच
तिचा आणि मुलगा इथे जवळच राहत असूनही बऱ्याच महिन्यांनी त्याच्या आईने अनेक निरोप
पाठवले की अर्ध्या एका तासासाठी पाहुण्यासारखा येऊन जातो... एकूण काय पाखरं
घराट्यातून उडून गेली की ती परत येतील ही आशा ठेवणंच चूक." काकांच्या एका
वाक्याने माझा अंदाज खरा ठरला होता. काकूंनी शिताफीनं डोळ्यातलं पाणी लपवलं.
थोडा वेळ कोणीच कोणाशी बोललं नाही. मग
काकू उठल्या, देवापाशी दिवा तेवत होता. काकूंनी वात सारखी
केली आणि जरासे तेल घातले. काकूंकडे देवासमोर नेहमीच एक दिवा तेवत असतो. दर काही
दिवसांनी एक दिवा नेमाने घासला जाई तेव्हा दुसरा घासलेला दिवा देवापाशी ऐटीत
विराजमान होत असे. नेमाने स्वच्छ, लखलखीत केला जाणारा आणि
बारा महिने, चोवीस तास अखंड तेवणारा तेजस्वी दिवा! आज मात्र
तो काळवंडलेला दिसत होता. बरेच दिवस घासला गेला नसावा. मी आणि अनू लग्नाच्या
वयाच्या झालो तेव्हा एकदा काकूंनी आम्हाला जवळ बसवलं. दिवा लख्ख चमकवताना त्या
म्हणाल्या, "हा दिवा सासूबाईही असाच अखंड तेवत ठेवत. मी
घरात आले तेव्हा मला त्या म्हणाल्या की ही आपली परंपरा आहे. यातून दोन गोष्टी
लक्षात ठेवायच्या. या घरात आपण दिव्यासारख्या सतत प्रकाश देत राहायचं आणि ज्याने
आपल्याला एवढं भरभरून सुख दिलं आहे, त्याच्या पायाशी अंधार
होऊ द्यायचा नाही. तुम्ही पोरीही लग्न कराल तेव्हा हे लक्षात ठेवा की तुम्हाला
दोन्ही घरं अशीच प्रकाशमान करायची आहेत आणि याबद्दल देवाचे नेहमी ऋणी
राहायचं." हातातील दिवा आमच्या डोळ्यांसमोर धरून पुढे त्या म्हणाल्या,
"बरं, हा दिवाही अस्सा हवा. स्वच्छ आणि
चमकदार. दिव्याला काजळी धरता कामा नये. आपलं घरही असंच हवं. कोणाच्या मनात
एकमेकांबद्दल काही मळ नको." हे सांगताना त्या ज्योतीचे तेज असलेले काकूंचे
चमकणारे डोळे आणि दिव्यासारखे स्वच्छ, लखलखीत असे काकूंचे अंतरंग
मला आजही स्पष्ट आठवले. एकटेपणाचं दुःख पचवूनही कोणतीही तक्रार न करता त्या
देवाकडे त्यांच्या दोन्ही मुलांसाठी सुख, भरभराट मागत होत्या,
हे सांगायला तिथे कोणा अन्य व्यक्तीची गरज नव्हती.
त्यांचा प्रेमळ स्वभाव आणि होणारी
घुसमट यामुळे मी गलबलून गेले. त्यांना भेटवस्तू दिल्या आणि निरोप घेतला.
"पुन्हा ये गं वेळ असेल तेव्हा. किती बरं वाटलं आज आलीस ते. सुखी राहा. जे
मनात आहे ते मिळो" मी पाया पडत असताना काकू म्हणाल्या. निघताना पुन्हा एकदा
त्या दिव्याकडे नजर गेली. पूर्वीपेक्षा तो जरासा मिणमिणता झाल्यासारखा जाणवला.
एवढी काजळी साचल्यावर असंच होणार म्हणा!
-
© वैदेही सच्चिदानंद शुभांगी शेवडे.