बुधवार, १० ऑक्टोबर, २०१८


आठवण
          अलकाच्या नवीन घरी जायचं होतं... नवीन म्हणजे ठिकाण तेच पण, आता जुनी घर पाडून नवीन कॉलोनी उभी केली आहे. तिच्या सुंदर आणि भव्य कमान असलेल्या कॉलोनीच्या दारातून आत जाताना का कुणास ठाऊक थोडंस परकं वाटलं! "वेगळं वाटतं नाही का आता इकडे!" अलकेने माझ्या मनातले की चेहऱ्यावरचे भाव लक्षात आल्याप्रमाणे टिप्पणी केली. थोड्यावेळ कॉलोनीच्याच बागेत बाकड्यावर बसून गप्पा झाल्या. दुतर्फा ड्युप्लेक्स घरांची ती सुंदर अशी कॉलोनी. अलकेचं बालपण इथेच गेलं. तेव्हा मी इथे बरेचदा येत असे. काही वर्षांपूर्वी अशी नव्हती ती जागा... आता बरंच काही बदललं आहे. तिच्याशी बोलताना मी अधूनमधून त्याच जुन्या जागेत आठवणींमधून जात होते. तसं इथे काहीच कमी नव्हतं. सगळ्या उत्तम सोयीसुविधांनी युक्त अशी कॉलोनी. पण, काहीतरी मला आठवत नव्हतं इथलं... काही वर्षांपूर्वीचं... चांगलं की वाईट तेही आठवेना... सगळ्या खाणाखुणा बदलल्या होत्या... नव्हे जुन्या सर्व खुणा पुसल्याच होत्या. पण काहीतरी आधी इथे होतं ते आता दिसत नव्हतं आणि तेच शोधत मन सैरावैरा भटकत होतं.
          अलकेचं घर भारी सुंदर... तिनं आणि विशालनं सजवलंही छान होतं... अगदी मनापासून. भरपूर गप्पा, खाऊ पिऊ, हम आपकें है कोन सिनेमा, मस्त धम्माल झाली. आता घरी जायचे वेध लागले. मैत्रिणीबरोबर दहा दिवसही घालवले तरी कमीच पडतात, नाही!
          आम्ही निघालो तोच कोणीतरी मागून आवाज दिला. "दिसलोच आपण ह्यांना!" अलका वैतागून म्हणाली. आम्ही मागे वळलो. दारातून एक वयस्कर आकृती आमच्याकडे हात हलवताना मला दिसली. "जायचं आहे का तुला त्यांच्याकडे?" अलकेचा हा प्रश्न खरंतर पूर्ण होण्याआधीच माझी पावलं तिथे वळली होती. 
          "अगं, किती वर्षांनी दिसत्ये ही! वैदेही ना? आजच आठवण आली होती तुझी!" त्या दारापाशी जाईपर्यंत मला काही ओळख पटत नव्हती... आता मात्र सगळं अगदी लख्ख आठवायला लागलं. अलकेच्या चेहऱ्यावर मात्र, "काहीही काय बडबडत आहे ही बाई! इतक्या वर्षांनी आजचं कशी आठवण काढली हिने? उगीच आपलं..." असे भाव स्पष्ट दिसत होते. दामले काकू दारातून पुढे आल्या. माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवून त्यांनी चुंबन घेतलं. मग पाठीवरून त्यांचा मऊसूत हात फिरु लागला. कित्ती मायाळू, मखमली, उबदार स्पर्श तो... एवढ्या वर्षांनीही अगदी तसाच! थोड्या जुजबी, इकडच्या तिकडच्या गप्पा आम्ही मारल्या तेवढ्यात आतून काकूंना कोणीतरी आवाज दिला. पूर्वी त्यांची सासू अशी हाक मारत असे तेव्हाही त्या गप्पा आटोपून लगबगीने आत वळत असत. हा आवाज वेगळा होता पण काकूंच्या चेहऱ्यावर तेच भाव. मालकांनं कामात अळमटळम करताना पकडल्यावर नोकराला जसं अपराधी वाटावं... अगदी तसंच! 
          त्यांनी मग लगेच त्यांचे पुढचे प्रश्न गुंडाळून मनाच्या कपाटात बंद केले. "थांब हं जरा." असं म्हणत त्या आत वळल्या. "कोणाशी बोलताय,आई? झाले का तांदूळ निवडून?" तो मगाचा आवाज पुन्हा आला. "ही सून बरं का काकूंची." अलकेने सांगितलं. "उगीच म्हणे आठवण आली वगैरे... एवढ्या वर्षांनी शेजारच्यांच्या मुलीच्या मैत्रिणीची कोणाला आठवण येते होय!" अलकेचं सुरू झालं... तिला काय बोलणार मी! मला माझ्या लहानपणी बघितलेल्या दामले काकू आता समोर दिसू लागल्या आणि अलकेच्या बोलण्याकडे आपसूक दुर्लक्ष झालं. काकू सर्वांशी प्रेमानं बोलत. आजूबाजूच्या मुलांना खाऊ दे, अभ्यासाचं विचार, कोणालाही मदत कर... काहींना त्यांचा हा निर्मळ स्वभावही खुपत असावा... स्वतः तसे नसल्याने असेल कदाचित... पण, काकू प्रेमाने वागतात तर ते खोटं खोटं आहे असं काही जणी म्हणत. कोणी म्हणत, "ही बाई बघावं तेव्हा दारात उभी असते, येणाऱ्या जाणाऱ्यांना प्रश्न विचारत... कामं असतात की नाही? मग सासूने आवाज दिला की कशी फजिती होते!" अलकेची आईही या गप्पांमधलीच... त्यामुळे दामले काकूंबाबत मुलीचेही विचार आपसूक गढूळ झाले होते. 
          मी मात्र काकूंना दारात उभं राहून, निवड पाखड करताना, दारात बसून काही विणताना, शिवताना, मसाले किंवा लोणची, कुरडया, वाळवण करताना पाहिलं आहे. आम्हा मुलांना त्यांनी स्वतः केलेला खाऊ त्या देत असत. या बायकांना ही त्यांची कामं कशी दिसत नसावी! 
          तरीही घरातील कोणतीही व्यक्ती त्यांच्याशी मायेने बोलताना कधी दिसली नव्हती. कधी नवा दागदागिना, भरजरी कपडे दिसले नाहीत. पण, काकूंच्या मागेन डोकावणारे घरातल्यांचे सदैव रंगीत चेहरे आणि काकूंना धाकात ठेवायची त्यांची नजर मात्र माझ्या नजरेतून कधी सुटली नाही. आता घरात अशी स्थिती असताना आणि बाहेर कुठे जायची सोय नसताना जीव असंच उंबऱ्यापाशीच घुटमळनार ना! चेहरा आजारी दिसला तरी त्या मात्र कामात आणि इतरांच्या देखभालीत असायच्या... मला एवढ्या कमी वेळात आणि कमी वयात जे दिसलं, समजलं ते अलकेला आजही समजू नये! असं का आणि काय झालं असावं काकूंच्या बाबतीत! असतं एकेकाचं नशीब... आजकाल मला अशा प्रश्नाचं हे एकंच उत्तर मिळतं. 
          "हे घे गं पट्कन! आजच केले आणि तुझ्याचसाठी केले असल्याप्रमाणे आलीस बघ बरोबर आजच!" त्यांनी एक डबा माझ्या हातात दिला. तो देताना आधी एक चोरटी नजर घरात फिरवली. आम्हा पोरांना एकदा खाऊ दिल्यावर काकूंची सासू त्यांना खूप ओरडली होती. खूप आवाज येत होता त्या सासूबाईंचा बराच वेळ... काकूंनी नंतरही आम्हाला खाऊ देणं बंद नाही केलं. पण, अशी अपराध्यासारखी आपल्याच घरात कोणी आपल्याला बघत नाही ना असं करताना याची त्या खात्री करत असत. एकंदर स्वतः सासू झाल्यावरही काकूंची स्थिती मात्र तशीच असल्याचं जाणवलं. "आई, झालं आहे का जेवण?" आतून पुन्हा आवाज आला. "चल बाळा! मी जरा आत जाते. तू येत जा. मोठी हो... विसरू नको हं मला!" पुन्हा तोच मऊ स्पर्श...! 
          "मोठी झालीस की विसरू नकोस हं..." मला लहानपणीही काहीतरी व्याकुळता या वाक्यात जाणवत असे. आजही तसंच काहीसं आतल्याआत गलबलून आलं. 
          अलकेच्या गाडीपर्यंत आम्ही आलो तरी माझं मन कुठेतरी दामले काकूंच्या त्या पायरीपाशी घुटमळत होतं. आम्ही गाडीत बसलो. मी डबा उघडला. मला आवडणारे रवा, खोबऱ्याचे लाडू! काकूंना खरंच माझ्या आवडीची एवढीशी गोष्ट एवढ्या वर्षांनीही लक्षात होती... काय संबंध खरंतर! हे कसले ऋणानुबंध! आपण तर आठवणींच्या गोतावळ्यात कुठेतरी दामले काकूंचा धागा असाच सोडला होता. पण, त्यांनी मात्र जपून ठेवला होता तो अजूनही... लाडूचा घास खाताना आता ती जागा पुन्हा ओळखीची वाटू लागली. काहीतरी हरवलेलं पुन्हा मिळालं होतं.

- © वैदेही सच्चिदानंद शुभांगी शेवडे.