शनिवार, २६ डिसेंबर, २०२०

चार साहिबजादे

 

चार साहिबजादे

          १७०५ सालातील पंजाबातील डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीचे दिवस होते. आनंदपूर साहिब येथे जवळपास सहा महिने युद्ध मुघलांचे आक्रमण, धर्मांतर, महिलांवर त्यांच्याद्वारे करण्यात येणारे अत्याचार, याला चोख उत्तर आता दशमेश गुरु गोबिंदसिंहजी देत होते. प्रत्येक ठिकाणी होणारा पराभव बघून औरंग्या अधिकाधिक चवताळत होता. जहांगीराने पंचमेश गुरु अर्जनसिंह यांची तर औरंग्याने दशमेश गुरूंचे पिता अर्थात गुरु तेगबहाद्दूरसिंह यांची हत्या केली. तरीही शीख तलवारींची धार जराही कमी झाली नव्हती. शस्त्राला शस्त्राने उत्तर आणि मुखी सदैव भगवंताचे नाव असा भक्ती आणि शक्तीचा सुंदर मिलाप म्हणजे शीख विचारधारा.

          बरेच महिने युद्ध चालू असल्याने आता दोन्हीकडे रसद यथातथाच उरली होती. मुघल्यांच्या तुलनेत शीख संख्येने कमी होते, पण त्यांची लढण्याची जिद्द मात्र अपार होती. यावर काहीतरी मार्ग लवकरात लवकर काढणं गरजेचं होतं. शेवटी, गुरुगोबिंदसिंहजींकडे सामंजस्याचा करार घेऊन मुघल आले. त्याप्रमाणे तह झाला. आनंदपूर साहिब शिखांना सोडून जावे लागणार होते. युद्ध किती काळ करणार? सैनिकांसोबत जखमी, आजारी, वृद्ध, बालके, स्त्रिया, अशा अनेकांची जबाबदारीही गुरुजींवर होती. ठरल्याप्रमाणे आपला लवाजमा घेऊन जड अंतःकरणाने आनंदपूर साहिब सोडण्यात आले.

          तहात ठरल्याप्रमाणे कुराणाची शपथ घेऊन शिखांना सुखरूप आणि सुरक्षितपणे बाहेर जाऊ देणे आणि त्यांच्यावर हल्ला न करण्याचे वचन दिले होते. पण, फसवणूक, कपट हीच मूळ वृत्ती असलेल्यांनी आधीच काही वेगळा बेत आखला होता. थोडं अंतर कापताच मुघलांनी मागून हल्ला केला. सिरसा नदीच्या तीरावर पुन्हा तुंबळ युद्ध झालं. लढत लढता ज्याला जशी वाट मिळाली तसे सिरसेच्या पाण्यातून आपल्या सोबतच्या समूहासोबत ते पुढे झाले. इथेच गुरुजींच्या कुटुंबाची ताटातूट झाली.

          गुरु गोबिन्दसिंहजींचे चार सुपुत्र ‘चार साहिबजादे’ नावाने ओळखले जात. त्यातील ज्येष्ठ दोघे अनुक्रमे अजितसिंह आणि झुजारसिंह, गुरुजींचे अत्यंत जवळचे असे पंज प्यारे आणि काही योद्धा चमकौर गढीस पोहोचले. पण, जोरावरसिंह आणि फतेहसिंह हे कनिष्ठ बंधू त्यांची आजी माता गुजरीसोबत राहिले. त्यांच्यासह आनंद्पुरात सेवेस असलेला एक सेवक गंगुही होता. मजल दरमजल करत गंगू या तिघांना आपल्या गावी घेऊन आला.

          इकडे मुघल अजूनही लढण्याच्या तयारीत सर्वांचा शोध घेत होते. लवकरच दशमेश गुरु चमकौर येथे अगदीच जेमतेम सैन्यासह असल्याची पक्की खबर त्यांना मिळाली. समोरचं सैन्यबळ अगदीच कमी आणि त्यातही युद्ध, प्रवास आणि उपासमारीने थकलेलं असूनही शिखांची लढवय्या वृत्ती माहित असल्याने मुघल, भरपूर सैन्य घेऊन आले. चमकौर गढीला त्यांनी वेढा घातला. पण, “सव्वा लाख से एक लडाऊ” या ब्रीदाचं अमृत प्राशन करून गढीवरील सर्व ४० जण समोर लाखांत असलेल्या शत्रूशी लढायला उभे ठाकले.

          लहान लहान तुकड्यांनी जाऊन लढायचं ठरलं. खरंतर लढायचं म्हणजे काय? परिणाम तर स्पष्ट दिसत होताच. एकदा समशेर हाती घेऊन घोड्याला टाच मारून गढीबाहेर आल्यावर वीरमरण एवढाच एक मार्ग होता. तरीही शस्त्र खाली न ठेवता शत्रूला शेवटच्या श्वासापर्यंत भिडायचं. मरायचं ते रणात शत्रूला मारूनच, हे मनाशी पक्क होतं.

          मनुष्यबळ कमी असल्याने अजीतसिंहाने केवळ गढीवरून नेतृत्व न करता, रणांगणात उतरायचं ठरवलं. पंज प्यारे त्यांना समजावू लागले. पुढचे गुरु तुम्हीच असणार आहात. तेव्हा हे असं धाडस करू नये म्हणून विनवू लागले. अजितसिंहाने आपल्या पित्याकडे पाहिले. गुरुजींनी शांतपणे अनुमोदन दिले. टप टप टापा वाजत घोडे निघाले. सपासप तलवार चालत होती. शत्रूचा विळखा तीक्ष्ण तीरासारखा भेदत, वाटेल येईल त्यास यमसदनास धाडत शूर पुत्र बाजी मारत होता. बराच वेळ लढून शेवटी नको तेच घडले. पण, आपला ज्येष्ठ बंधू धारातीर्थी पडल्या पडल्या झुजारसिंह वीज चमकल्यागत उठले. आता मी जाणार, असं त्यांनी घोषित केलं. पंज प्यारे पुन्हा थांबवू लागले. धाकटे दोन्ही साहिबजादे कुठे असतील? कसे असतील? वाचले असतील कि नाही! कसलीच कल्पना नाही. पुढचं नेतृत्व म्हणून तुम्ही एकमेव आधार आणि आस आहात. असं करू नका. पंज प्याऱ्यांचे डोळे पाणावले. गुरु गोबिंदसिंहजी मात्र अजूनही शांत होते. झुजारसिंह अनुमती घेण्यासाठी त्यांच्यापाशी गेले. यावेळेसही गुरुजींनी प्रेमळपणे आपल्या पुत्राकडे पाहिले आणि त्याच्या हाती तलवार दिली. घोड्यावरून जाणारी ही पाठमोरी मूर्ती आता पुन्हा आपल्याला दिसणार नाही, याची पूर्ण कल्पना त्यांना आली होती.

          अनुक्रमे अवघं १८ आणि १४ वर्षाचं वय! पण, आपल्या वयापेक्षा अधिक शत्रूंचा नायनाट या दोहोंनी केला. तारुण्यात जेमतेम पदार्पण करणाऱ्या आपल्या पुत्रांना वीरगती प्राप्त झाल्याचं बघून गुरुजींचं मन अभिमानाने भरून गेलं. आपले अश्रू त्यांनी कसेबसे रोखले. हळूहळू गढी रिकामी होत आली. गुरुजी स्वतः लढायला उतरणार तेवढ्यात, पंज प्यारे “क्षमा करा. पण, आम्ही तुम्हाला हे करून देणार नाही, गुरुजी.” असं निकराने म्हणाले. बराच वेळ गुरुजींशी बोलून, त्यांना समजावून कसंबसं त्यांना गढी बाहेर रात्री लपून निसटण्याबाबत राजी करण्यात आले.

          इकडे माता गुजरी आणि धाकटे साहिब जादे गंगुच्या घरी पोहोचले. गावागावांमधून मुघल सैनिक गुरुजी, त्यांचे पुत्र, सैन्यातील अन्य कोणी कुठे आहे, याचा शोध घेत फिरत होतेच. त्यात गंगुची बुद्धी फिरली. त्याने सरहिंदचा नवाब वजीरखानासमोर माता गुजरी आणि साहिबजादे यांचा ठावठिकाणा सांगितला. मुघल सैनिक त्यांना पकडून सरहिंद येथे घेऊन गेले. वृद्ध गुरु माता आणि दोघे शिशु! पण, नराधम वजीऱ्याने किल्ल्यावरील एका उंच उघड्या बुरूजावर त्यांना बांधून ठेवले. गुरु गोबिंदसिंह अजूनही आपल्या हाती लागत नाहीत. हे दिवसरात्र मुघल्यांना डाचत होते. त्यांच्या दोन पुत्रांना ठार केल्याच्या कहाण्या रंगवून सांगताना मात्र विकृत आनंद त्यांना होत होता. आता गुरुजींना त्रास द्यायचा एकमेव मार्ग त्यांच्याकडे होता. तो म्हणजे या तिघांना पीडा देणे. आपल्याहून दुर्बल, वृद्ध, लहान मुलं यांना घाबरवायचा प्रयत्न करून, त्यांचे हाल करून मुघले आपली शूरता(?) दाखवत होते. कडाक्याच्या थंडीत लोखंडी साखळ्यांमध्ये अडकवून, अन्न पाण्याशिवाय, अंगावर पांघरायला काहीही नं देता या तिघांना ठेवले होते.

          साखळदंडात बांधलेली ती जणू नाजूक, नुकतीच उमलणारी गोरी गुलाबी फुलं... पण, नवाबाने “इस्लाम कबूल केलात आणि आमच्यासोबत राहिलात तर तुम्हाला सोडू.” असं सांगताच, “जे अत्याचार आणि धर्मांतर रोखण्यासाठी आमच्या आजोबांनी प्राण पणाला लावले. आमचे पिताश्री सदैव ज्यांच्या विरुद्ध लढले, ज्यांनी आमच्या ज्येष्ठ बंधुसहीत अनेकांची हत्या केली. आमच्या माता, भगिनींना छळले, त्यांना आम्ही सामील होऊ, असा विचार केलातच कसा?” असं ठाम उत्तर जोरावरसिंहाने दिले. “तुमच्या बंधूंप्रमाणे आम्ही तुम्हालाही मारून टाकू, याची भीती नाही वाटत?” एकाने भर दरबारात विचारले. “आम्हीही त्यांच्याप्रमाणेच निर्भीड आहोत. उलट आम्ही इथून सुटलोच तर तुमची खैर नाही. आम्ही पुन्हा सैन्य तयार करून तुम्हाला नेस्तनाबूत करू.” त्याच्याकडे धारदार नजर टाकून धाकटा फतेहसिंह म्हणाला. “घाबरले तर तुम्ही आहात म्हणून आम्ही शस्त्रहीन असूनही आम्हाला असे बांधून ठेवले आहे.” सिंहांच्या दोन्ही बछड्यांनी जोरदार डरकाळी फोडून नवाबाचा खरपूस समाचार घेतला होता. बोटभर पोरांचा या वयातील अभिमान आणि निष्ठा बघून नवाब घाबरला. यांना सोडून देणं आपल्याच जीवावर बेतणार याची त्याला खात्री झाली होती. त्यामुळे या दोघांना जिवंतपणे भिंतीत गाडण्याचा आदेश तातडीने देण्यात आला.

        दोघांच्या बाजूने भिंत बांधण्यास सुरुवात झाली. दोघेही निडरपणे उभे होते. हात जोडून जपजी पाठ त्यांनी सुरु केला. वृद्ध गुरुमाता गुजरी हे दुरून भरल्या डोळ्यांनी बघत होत्या. भिंत बांधून झाली तर आतूनच “वाहे गुरुजी दा खालसा, वाहे गुरूजी दी फतेह” ची ललकारी आली. हळूहळू आवाज क्षीण झाला. आवाज पूर्णपणे थांबल्यावर भिंत फोडून दोघांचे प्राण गेल्याची खात्री करण्यास नवाबाने सांगितलं. अजूनही त्या इवल्या इवल्या कुडीत प्राण होता. पण, नवाबाच्या मनात जरब एवढी बसली होती की त्याने तातडीने दोघांचा गळा चिरण्याचा आदेश दिला. वय वर्ष ९ आणि ७ असलेले दोन कोवळे जीव परमात्म्यात विलीन झाले.

            ती तारीख होती २६ डिसेम्बर १७०५. ३१५ वर्षांपूर्वी घडलेले हे प्रसंग डोळ्यासमोर आले की आजही अंगावर काटा येतो. हे सगळं इथे थांबलं नाही... तर पुढे ५ वर्षांत या दोन्ही वीर बालकांच्या हत्येचा बदला बंदासिंह बहाद्दुराने सरहिंदवर आक्रमण करून घेतला. त्यांच्या सोबत असलेल्या फतेहसिंहाने वजीरखानाचे मुंडके छाटले. बंदासिंहाने दोन्ही बालकाना जिथे पुरलं होता ती जागा शोधून काढली. वर उल्लेख केलेल्या सर्व ठिकाणांवर गुरुद्वारे उभारण्यात आली आहेत. ही आपली राष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहेत. तिथे जाऊन नतमस्तक होणं, आपला इतिहास हा पराभवाचा नाही तर असा पराक्रमाचा आहे आणि तो समजून घेणे, सर्वांसमोर आणणे आवश्यक आहे.

          हा इतिहास आपल्याला शिकवला गेला का? येता जाता बॉलीवूडच्या किंवा अशाच काही बिनडोक बातम्या, फुटकळ फोरवर्डस, याच्या गर्दीत आपला महान इतिहास कुठेतरी हरवतो आहे का? बाहेरून येऊन इथे आक्रमण, लूट, छळ करणाऱ्यांची नाव अजूनही शहरांना, रस्त्यांना आहेत. ती बदलण्यास मूर्ख विरोध होतो! आपला देश, संस्कृती कसलाही संबंध नसलेल्यांचे दिवस मात्र इकडे साजरे होतात. मात्र आपल्यासाठी आयुष्य पणाला लावलं त्यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून कोणता दिवस आपण पाळतो? काय करतो? असे प्रश्न पडतात. अशावेळी काही वर्ष आधी या चार साहिबजाद्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या हुतात्मा दिनाच्या वेळेस बाल दिन साजरा करावा अशी मागणी करण्यात आली होती, ती अगदीच रास्त वाटते. 

-    © वैदेही शेवडे वैद्य.