मंगळवार, ३ मे, २०२२

हे ही दिवस जातील...

          उन्हाळा मला लहानपणापासून आवडत नाही. आवडत नाही म्हणजे झेपतच नाही. तान्ह्या बाळाला छानसं मऊसूत कापडात गुंडाळतात. मग, ती कशी छान झोपतात. अम्मा सांगते, मला कधी असं बांधून झोपवता आलंच नाही. पातळ सुती कापडाशिवाय अंगावर कसलेही कपडे चालायचे नाहीत. अजूनही जाड, सिंथेटिक कापडांपासून दूर असते मी. जरा गुंडाळल की लालेलाल होत असे म्हणे मी. डॉक्टरांनी तेव्हाच सांगीतल, अजिबात गुंडाळायच नाही. पातळ कपडेच घालायचे. नाहीतर पुरळ येत राहणार. बाळ चिडचीड, रडरड करणार.

          ही माझी उन्हाळ्याशी झालेली पहिली आणि अप्रिय ओळख. त्यात जन्मच उन्हाळ्यातला. साहजिकच इतर मुलांप्रमाणे माझ्या वाढदिवसाबाबत मी मात्र जराही उत्सुक नसे. एकतर एप्रिलचं भयंकर ऊन, त्यात शाळांना सुट्टी असल्याने मित्र मैत्रिणी गावाला... मग, कितीसा उत्साह वाटणार?

          आंबा डाळ, आंबा या दोनच गोष्टींमुळे मी उन्हाळा सहन करू शकते. हे १२ महिने उपलब्ध झालं तर कसलं भारी होईल! मला वाटतं, असं जन्मापासूनच न आवडत्या गोष्टींसोबत अपरिहार्य तडजोड आपसूक शिकत असतो आपण.

          काही दिवसांपूर्वीही कामासाठी भर दुपारी बाईकवरून प्रवास करत असताना, मी अशीच उन्हावर रागवून, वैतागून बसले होते. जराही ऊन लागलं की कितीही सनस्क्रीन लावा की चेहरा रुमालाने झाका की अजून काही उपाय करा. मी लगेच लालबुंद होते आणि मग त्वचेला दाह सतत जाणवत राहतो. त्यादिवशी उन्हावर रुसल्यानेही थोडी जास्त लाल झाले असावे. ऊन अजिबात सहन होत नव्हतं आणि अजून अर्धा / पाऊण तास असेच चटके सहन करायचे होते.

          या सगळ्या वैतागवाण्या विचारांत नजर मात्र रस्ताच्या आजूबाजूला नेहमीप्रमाणे भिरभिरत होती. आणि अचानक लाडका अमलताश अवचित डोळ्यांसमोर आला. “अरे वाह! बहावा फुलाला. पाऊस वेळेवर असावा यंदा.” तेवढाच दिलासा मिळाला. पुढे कुठे घरटी करणारे तर कुठे घरट बांधून होत आलेले कावळे दिसले. लवकरच पाऊस येणार याच्या खुणा पटत गेल्या. पण, आत्ता बसणाऱ्या चटक्यांच काय! जरा उभारी मिळत असलेलं मन पुन्हा खट्टू झालं. तेवढ्यात वेगवेगळ्या छटांची बोगन वेल दिसू लागली. मग, सोनमोहर, गुलमोहर, त्यात गुलमोहोराचे विविध रंग, कुठे पांगारा, मंद सुगंधाचा चाफा, नाजूक बकुळ, सध्या अचानक दिसू लागलेलं मोहक गुलाबी फुलांनी डवरलेली गुलाबी ट्रम्पेट, कुठे गुच्छांमध्ये आलेली हळद, कुंकू रंग ल्यालेली फुलं तर कुठे लव्हेंडर तुरे मन मोहून घेत होते. याच काळात फुलणारी शेवग्याची नाजूक पांढरी फुलंही किती सुंदर दिसतात! निसर्गानेच दिलेले उन्हाळ्याचे चटके सुसह्य करण्यासाठी निसर्गच किती प्रयत्न करतो! मी मात्र तोंड फुगवून एवढ्या सुंदर दृश्य मेजवानीकडे तोंड फिरवून होते! ते कोकिळेच गान (खरंतर बरेचदा किंचाळत असतो तो आणि समाजाने जास्तच डोक्यावर घेतलं आहे त्याला असं वाटतं मला!), हे सुंदर बहर, आंबा, फणस, काजुच आगमन, कावळ्याची घरटी, सरड्याचं लाल होणं, अगदी बाहेर कशाला जायला हवं? घरात सुरु होणारी मुंग्यांची लगबग, पूर्वी होत असणारी आयाबायांची वाळवण, पापड, फेण्या, चिकवड्या, लोणच्याची तयारी, हे सगळं कसला संदेश देत असतं बरं?

          हे रखरखीत दिवस सरणार आहेत. जीवाची तगमग लवकरच पावसाचे दिवस शांत करतील. पुढचा काळ सुसह्य असणार आहे. त्यामुळे, आत्ता बसणाऱ्या चटक्यांमुळे हताश होण्यात अर्थ नाही. अगदी हाच मंत्र आयुष्यालाही लागू होतो नाही का! बाबा नेहमी म्हणतात, “हे ही दिवस जातील.” प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर कधी सहन होणारा तर कधी वैशाख वणवा म्हणावा असा उन्हाळा येत असतो. पण, पुढे सुखाची बरसात होणार असेल आणि आपण मात्र आधीच शस्त्र टाकली तर कसं चालेल??? तेव्हा आपण सर्व लढवय्या जीवांनी या कठीण काळानंतर जो रम्य काळ येईल, त्याचा विचार मनात ठेवून चिकाटीनं दटून राहायला हवं! तुमच्या माझ्या सर्वांच्या आयुष्यात पुढील काळात सकारात्मक घटना घडाव्या, चटके देणारा काळ लवकर सरून सुखासमाधानाच्या बरसातीत जीव शांत करणारे दिवस यावे, ही प्रभू चरणी प्रार्थना!

-    © वैदेही शेवडे वैद्य.