सोमवार, १५ डिसेंबर, २०१४


भाऊबीज



          आज दिवसभर ती भरपूर कामात होती.. एक काम झालं की दुसरं.. काम अगदी ठरवून उपसून काढत होती! तसा तिचा दिवस उशीराच सुरु झाला. दिवाळीची सुट्टी.. त्यात शनिवार , रविवार हे तर तिचे आराम करण्याचे हक्काचे दिवस. तसं असलं तरी सणाच्या दिवशी ती पहाटे उठायची. मित्र मैत्रिण, नातालगांना भेटायची. पण आज दुपारी १ वाजला तरीही ती पलंगावर लोळत होती. मग तिला त्याचाही कंटाळा आला.. मग तिने जो कामात हात घातला.. थेट रात्री ११ वाजता पाठीला रग लागल्याने ती थांबली.. दिवसभर अन्नाचा कणही तिने घेतला नव्हता. 
          स्वयंपाक खोलीत जाऊन तिने स्वतःसाठी कॉफ़ी केली. तिचा पहिलाच गरमा गरम घोट घेतल्यावर, "अगदी त्याला आवडते तशी झाली आहे कॉफ़ी!" असा विचार आलाच. ती बाल्कनीत उभी राहिली. आजुबाजुच्या घरांमधून अजुनही हसण्या खिदळण्याचे आवाज येत होते.. पण तिचं घर शांत, रिकाम होतं.. सर्वांच्या घराबाहेर पणत्या मंद मंद प्रकाशात तेवत होत्या.. पण तिने आज अंधारात रहाणच पसंत केलं होतं. गल्लीमध्ये बरीच लहान मुलं फटाके फोड़त होते.. पण तिचे कान आधीच बधीर झाले होते.. आणि मनही..
          "दादा, तू ये ना सोबत.. मला भीती वाटते लवंगी माळ लावायची!" एक आवाज तिने ऐकला आणि तिची तंद्री भंगली.. खाली फटाके फोड़णारी बरीच मुलं होती त्यामुळे नेमकं कोण बोललं असावं तिला अंदाज येत नव्हता.. तेवढ्यात तिला ते दोघं बहिण भाऊ दिसले! "अगं मने, तू एकटीने ती माळ लावालीस तर मी तुला एक गम्मत देइन.. आणि मी आहेच की इथे.. तुला काही होऊ देणार नाही मी." दादा मनीला समजावत होता.थोड्या वेळाने मनीने धीर एकवटून माळ लावली आणि दादाकडे धाव घेतली. जेमतेम ७ वर्षांची मनी आणि ९ वर्षांचा तिचा दादा. आता त्याच्या चेहऱ्यावर मनीने केवढं मोठं काम केलं, असे भाव पसरले होते! मनीने गम्मत दे म्हटल्यावर त्याने एक इकलेयर चॉकलेट तिला दिले. " माझ्या मित्राने दिले होते.. पण तू खा." तो कौतुकाने म्हणाला. "पण दादा, हे आपल्या दोघांना आवडतं.. आणि आपण नेहमीच अर्ध अर्ध वाटुन घेतो ना.. तसच हे खायच!" एवढस ते चॉकलेट त्यांनी अर्ध अर्ध खाल्ल. तेवढ्यात एक फटाका मनीच्या अगदी पायाजवळ फुटला.. "दादाss" अशी किंचाळून ती दादाला बिलगली.. बाल्कनीत उभी असलेल्या तिच्या तोंडूनही एक अस्फुट किंकाळी आली.. डोळे पाणावले.. तिने पुन्हा बाहेर पाहिले.. कुठे गेली ती दोघं?? खाली आता कोणीच फटाके फोड़त नव्हते.. मग आत्ता तिने पाहिली होती ती भावा बहिणीची जोड़ी गेली कुठे?? भास.. भास?? की आठवण??
          ती स्वतःच डोक गच्च पकडून खाली बसली.. बराच वेळ प्रयत्नपूर्वक थांबवलेले विचार आता अचानकच असे विचित्रपद्धतीने आता स्वतःची वाट मोकळी करत होते..!! 
          कुठे आहे तिचा दादा?? तो का आला नाही?? त्याला दिवाळीमध्ये तरी बहिणीला भेटावंस वाटलं असेल! मग का आला नाही तो?? इथे भारतातच तर राहतो तो! किती वर्ष झाली त्यांनी फराळ एकत्र केला नाही.. की फटाके उडवले नाहीत सोबत..! का?? तिचा भाऊ मात्र तिला सोडून फटाके फोड़त असतो अधूनमधून.. इथे नाही.. आपल्याच देशात.. पण दूर.. आपल्या देशाच्या सीमेवर! 
          आपला दादा देशाचे रक्षण करतो आहे याचा तिला कोण अभिमान!! पण, जेव्हा त्यांच्या घरी त्याची गरज असते तेव्हा?? वडिलांनंतर तोच तर आहे आता घराचे रक्षण करणारा! ती शिकून आपल्या पायावर उभी आहे. घर सांभाळते. पैशांची कमतरता नाही घरी.. दादाच्या कामाचे स्वरुपही तिला माहित आहे.. पण कधीकधी आठवणी आणि भावना यांचा लगाम आपसुक सुटतो आणि कोंडून ठेवलेल्या त्या आठवणींनी ती घुसमटते.. 
          तिने डोळे पुसले आणि आतल्या खोलीमध्ये आली. आज घरभर अंधार केला असला तरी भारत मातेच्या तसबिरीसमोर दिवा तेवत होता. वातीवरची काजळी तिने दूर केली.. दिवा पुन्हा नव्या उमेदीने प्रकाश देऊ लागला. तिने घडयाळात पाहिले.. खुपच उशीर झाला होता. पलंगावर पडल्या पडल्या तिला झोप लागली. 
          अशा बेफाम सुटलेल्या आठवणी अनावर होण तिला नवीन नव्हतं.. उद्या सकाळी पुन्हा ती हसत जागी होणार होती!!!



    © वैदेही सच्चिदानंद शुभांगी शेवडे

सोमवार, २० ऑक्टोबर, २०१४

महावस्त्र
          
          सियाच्या मैत्रिणीच आज लग्न होतं. सगळे मित्र मैत्रिणी बऱ्याच वर्षांनी एकत्र भेटले. खूप मजा मस्ती धम्माल केली. गप्पांच्या रंगलेल्या मैफिलीमुळे सियाचं घड्याळाकडे लक्ष राहिलं नाही. रात्रीचे ९ वाजून गेले होते. भायखळ्याहून ठाण्याला आणि तिथून घरी पोहोचण्यासाठी आता खूपच उशीर झाला आहे हे तिच्या लक्षात आले. तरीही सगळ्यांचा निरोप घेऊन बाहेर येण्यामध्ये अर्धा तास गेलाच. सोबत एक मैत्रीण ठाण्यापर्यंत असणार होती म्हणून सिया तशी निश्चिंत होती पण ऐनवेळी तिच्या मैत्रिणीने तिथून जवळच राहणाऱ्या तिच्या नातलगांकडे राहायला जाण्याचे ठरविले. त्यामुळे आता सियाला एकटीलाच प्रवास करावा लागणार होता. कामानिमित्त उशिरापर्यंत घराबाहेर राहणं हे तिलाच काय पण शहरात राहणाऱ्या महिलांसाठी नवीन गोष्ट नाही. पण आज का कुणास ठाऊक सियाला काहीतरी विचित्र वाटत होतं.
          लांब केस, नाजूक बांधा, केवड्याच्या वर्णाची काया असलेली सिया आज लाल साडीमध्ये अजूनच सुंदर दिसत होती. घराबाहेर पडताना तिच्या आजीने कौतुकाने तिच्या चेहऱ्यावरून बोटं फिरवली आणि कडाकड आपल्या डोक्यावर मोडली. तरीसुद्धा काजळाचं एक बोट सियाच्या कानामागे लावूनच आजीने तिला घराबाहेर पडू दिलं. लग्नाच्या हॉलमधून निघताना सियाने आपले लांब केस घट्ट वर बांधले. गळ्यातला हार काढून रोजच्या वापरातली बारीकशी साखळी घातली. हातातल्या बाकी बांगड्या काढून एकच जाड पण खोटा कंगण ठेवला आणि मगच ती घराच्या दिशेने निघाली.
          या वर्षी थंडी जरा जास्तच आहे. सियाचा हा अतिशय आवडता ऋतू. आई ओरडल्याशिवाय पोरगी अगदी नागपुरातही डिसेंबरमध्ये शाल, स्वेटरशिवायच फिरायची. पण आज मात्र तिला चक्क मुंबईमध्ये गारवा जाणवत होता. अंगात जराशी कणकण जाणवत होती. ट्रेनमध्ये खिडकीजवळ बसल्यावर गार वारा तिच्याशी अजूनच लगट करू लागला. तिच्या आईने साडीवर शोभून दिसेल अशी शाल तिच्यासोबत हट्टाने पाठविली होती. ती पिशवीतून घेण्यासाठी सियाने तिच्याजवळच्या सामानाकडे नजर टाकली. पर्स, रिटर्न गिफ्टची पिशवी तिला दिसली. पण, शाल कुठे राहिली? तिने गिफ्टच्या पिशवीत पुन्हा एकदा पहिले. सिया शाल कुठेतरी विसरली होती. तिने साडीचा पदर दुसऱ्या खांद्यावरून ओढून घेतला. पण तिच्या डिझायनर, झिरझिरीत साडीतून वार सहज आत शिरत होता. कशीबशी अंग आक्रसून सिया बसली. थोड्यावेळाने तिला कसलीशी ऊब जाणवली. तिने डोळे किलकिले केले. “थंड लाग राही है ना! गरम कपडा रखनेका अपनेसाथ|” एक अनोळखी स्त्री प्रेमाने तिच्या अंगावर शाल पांघरत म्हणाली. “नही.. नही.. मै ठीक हू!” सिया ग्लानीतच बोलत होती. “ठीक क्या? चेहरा देख अपना|” असं म्हणत त्या अनोळखी स्त्रीने तिच्या कपाळाला हात लावला. “तुझे तो बुखार है| गोली दु क्या बुखारवाली? कहा जा रही है तू? अकेली है क्या? बिमार है तो घर कैसे जायेगी?” एकापाठोपाठ एक एवढे प्रश्न ऐकून सिया पूर्ण जागी झाली. “मै जाऊंगी अकेले.. नजदीक है घर मेरा|” असं खोटच सांगून सिया तिला शाल परत करू लागली. “रख अपनेपास.. मैने देखा है तुझे थाना स्टेशनपे..| अच्छी दिखती है, तो ध्यानमे है चेहरा तेरा| मैभी वही उतरनेवाली हू| उतरनेके बाद दे| चलेगा मुझे|”
          सिया आभार म्हणून कसंनुस हसली. ही कोण कुठची बाई? आपल्याला स्टेशनवर पाहिलंय म्हणते आहे! विचित्रच भाषेत बोलते आहे! पण किती मायेने शाल पांघरली तिने! ताप चढत असल्याने सिया विचार करता करता पुन्हा ग्लानीत गेली. थोड्या वेळाने त्या स्त्रीने तिला हलवले. ठाणे स्टेशन आले हे तिला नजरेनेच सांगितले. सिया उठली. त्या स्त्रीच्या तोंडात पान असल्याचे तिने पाहिले. ट्रेन तशी रिकामी होती. तरीही आता ती स्त्री सियाच्या जवळून उठली आणि लांबच्या दारात जाऊन उभी राहिली. गाडी थांबली. दोघी उतरल्या. ती स्त्री सियाकडे लक्ष न देता पटापट पावल उचलीत चालू लागली. आत्तापर्यंत एवढ बोलणारी ही आता अशी का वागते आहे? सिया गोंधळली. “जाऊ दे! आपल्याला काय!” असं विचार करून आपल्या दिशेने चालू लागली. तेवढ्यात त्या स्त्रिची शाल आपल्याकडेच राहिल्याचं तिच्या लक्षात आलं. सिया मागे वळली. त्या स्त्रीला “दीदी..दीदी..” म्हणून हाक मारू लागली. पण तापामुळे आवाज फारसा निघत नव्हता.. ती कशीबशी त्या स्त्रीच्या मागे मागे जाऊ लागली. स्कायवॉकपाशी ती स्त्री घुटमळली. तिच्या मागे झपाझप पावलं टाकून जाताना सियाच घामट निघालं होतं. ती स्त्री आपल्याकडे पाहते आहे असं वाटून सिया तिला हातवारे करून बोलावू लागली. ते पाहून ती स्त्री मुद्दाम पाठमोरी उभी राहिली आणि मोबाईलवर बोलू लागली. सिया थकली होती. तिला दम लागला होता. ती जरा वेळ धापा टाकत तिथेच उभी राहिली. एवढ्यात तिच्या खांद्यावर कुणाचातरी हात आला. तिने मागे वळून पहिले. एक जाडा, बुटकासा माणूस उभा होता. त्याच्या जवळपास सर्व बोटांत सोन्याच्या अंगठ्या होत्या आणि गळ्यातही सोन्याच्या जाडजूड साखळ्या.. तिला पाहून तो  विचित्रपद्धतीने “खिस्स..” असं आवाज करत आणि आपले घाणेरडे दात दाखवत हसला. सोबत एक उग्र दर्प.. बहुतेक दारूचा.. सियाला किळस आली. तो सियाच्या अजून जवळ येणार एवढ्यात सियाला मागून धक्का बसला. त्या स्त्रीने पुढे येत त्या विचित्र माणसाचा हात पकडला. सियाला काहीच समजत नव्हते. एवढ्यात एका रिक्षेचा हॉर्न वाजला. “किधर जाना है?” असं रिक्षेवाला ओरडून विचारू लागला. हा तर राजू भैयाचा आवाज.. आपली भाची यांच्याच रिक्षेतून जाते. परिचित आवाजामुळे सियाला हायसे वाटले. “हम इधरीच है| इसको पुछ|” असं बोलून ती स्त्री त्या विचित्र माणसाला आपल्या जवळ ओढू लागली. तरीही त्या माणसाची  नजर सियावर खिळून होती. हे काहीतरी विचित्र आहे असं लक्षात येऊन सिया रिक्षेत बसली. “क्या ताई? तुम इधर?” राजू भैय्याचा लगेच सवाल.. मग सियाने सर्व कथा कशीबशी त्याला सांगितली. “अच्छा है आप यहा थे|” सिया म्हणाली. “मेरेको शीला दीदी का फोन आया, तो में इधर चला आया| लेकीन वो वही रुकी और आपके तरफ इशारा करके आपको पुछनेको कहा|” राजू भैय्या पटकन म्हणाला. पण नंतर “कोण शीला दीदी?, तिने का बोलावलं?” असं खोदून खोदून विचारल्यावरही राजू भैय्या उत्तर देईना. ताप चढत होता त्यामुळे सियाला जास्त बोलताही येत नव्हतं. ती घरी आली आणि तिला लगेच झोप लागली.
          दुसऱ्या दिवशी उठल्यावर, कणकण गेल्यावर तिला कालच्या गोष्टींचा अर्थ उमगू लागला. एका विचित्र घटनेमधून आपल्याला त्या कोणा अनोळखी ‘शीला दीदीने’ वाचवले, म्हणून तिने देवाचे आभार मानले. तिची शाल स्वच्छ धुवून काढली. राजू भैयाला ती परत करायला सांगितली तर “दीदी काम जो करती है वो मजबुरी है| पर दिलकी अच्छी है| आपने उसकी चीज लोटादी तो उसे बुरा लगेगा|” असं म्हणून त्याने शाल घेण्यास नकार दिला. सिया ऑफिसला जाताना ठाणे स्टेशनवरून जात असे. शीला दीदीने तिला तिथे पहिले होते, असं दीदी म्हणाल्याचे तिच्या लक्षात आले. मग ऑफिसला जाताना सिया रोज ती शाल आपल्या सोबत ठेऊ लागली. कधीतरी शीला दीदीला ती देऊन आभार मानावे असं तिच्या मनात होतं. पण शीला दीदी काही सियाला दिसली नाही.
          काही दिवसांनी ऑफिसमध्ये काम करत असताना सियाचे बॉस तिच्या केबिनमध्ये एका जोडप्याला घेऊन आले. अचानक सगळे आपल्या केबिनमध्ये आले म्हणून सिया गडबडीत उठली.. त्यामुळे डेस्कवरील काही सामानही खाली पडले. “सिया, बस.. बस.. हे कांताशेठ. आपले खूप जुने कस्टमर. नेहमी आपल्याकडूनच सर्व परिवारासोबत ट्रीपला जातात. आत्तासुद्धा आपली पत्नी, तीन मुले आणि आई, वडील यांच्यासोबत त्यांना ट्रीप करायची आहे. मला जरा वेळ नाही आहे. तू सांभाळ.” असं म्हणून बॉस निघून गेले. सियाने नेहमीप्रमाणे स्मित हास्य करत त्यांना कुठे जायला आवडेल हे पाहण्यासाठी नेहमीसारख्या गप्पा सुरु केल्या. शेठ्जींची बायको त्यांच्यापेक्षा फारच लहान वाटत होती आणि तिने अंगावर भरजरी कपडे आणि ठसठशीत दागिने घातले होते. त्यामुळे सियाचे लक्ष तिच्याचकडे होते. “ये ना बडे वो है| तो माँ बापुजीको मंदिर वगेरा होना.. और इनको अच्छा सिनरी होना..|” असं ती लाजत लाजत म्हणाली. यावर कांताशेठ हसले. “खिस्स..” त्या आवाजामुळे सियाने पटकन त्यांच्याकडे पहिले. बायकोने केलेल्या कौतुकाने खुश होऊन कांताशेठ आपल्या दाही बोटातल्या अंगठ्यांनी काचेवर ताल धरून आपले घाणेरडे दात दाखवत हसत होते. अंधारातला तो किळसवाणा चेहरा या कांताशेठचाच होता हे तिच्या लक्षात आले. तरीही चेहऱ्यावर तसे काही भाव न आणत तिने त्यांना हवी तशी एक टूर करून दिली. ते दोघे आनंदात तिथून निघाले. जाता जाता “थेंकू हा|” असं म्हणत कांताशेठ तसेच हसले तेव्हा सियाच्या अंगावर पुन्हा एकदा सरसरून काटा आला. ती त्याच विचारात खाली वाकली आणि डेस्कवर पुन्हा समान ठेऊ लागली. तिच्यासमोर आत्ता तो किळसवाणा माणूस बसला होता. त्याला बायको आहे, मुलं आहेत, आई वडिलांनाही सोबत घेऊन, त्यांची मर्जी राखत हा माणूस एकीकडे वागतो आणि दुसरीकडे रात्री.. शीsss.. विचार करावा तेवढी किळस सियाला वाटू लागली. डेस्कवरून पडलेले पेन घेण्यासाठी कांताशेठ बसला होता त्या खुर्चीपाशी ती आली. तिथेच खाली शीला दीदीची शालही मागाशी गडबडीत उठण्याच्या नादात पडल्याचे तिला दिसले. तिने शाल उचलंली. सियाने धुवून स्वच्छ केलेल्या त्या शालीवर आत्ताही कांताशेठच्या घाणेरड्या चपलांचे ठसे उमटले होते...!!

© वैदेही शेवडे.

सोमवार, ११ ऑगस्ट, २०१४

सदर लेख “संत साहित्य” विशेषांकात प्रकाशित झाला आहे.

विठ्ठलाचा छंद l वाचे गोविंद गोविंद ll
         
          पिवळ्या रंगाच्या, चकाकणाऱ्या कोणत्याही वस्तूला सोने म्हणता येत नाही. भट्टीतून तावून सुलाखून निघाले की मगच सोन्याच्या शुद्धतेची, त्याच्या उत्कृष्ठतेची ओळख होते. अशा सोन्यालाच आपण खरे सोने समजतो. अगदी तसेच आपल्या वडिलांनी अचानकपणे दुसऱ्याच्या घरात सोडल्यामुळे आलेला पोरकेपणा, अनाथ, उपेक्षित असे एका मोलकरणीचे आयुष्य वाटेला आलेली अशी ही जनाबाई.. कधी चोरीचा आळ तर कधी तिच्या विठूरायावरील श्रद्धेची समाजाने केलेली हेटाळणी किंवा एका स्वच्छ, सुंदर, पवित्र अशा चारित्र्यावर उडवलेले शिंतोडे, जीवनातील अशा अनंत कटू प्रसंगांना संयमाने ती तोंड देत राहिली. जन्माने अतिशूद्र, त्यातून स्त्री, भरीस भर एकटेपणा आणि लोकांची सततची टीका, अश्या परिस्थितीत कोणताही सामान्य माणूस कोलमडेल. परंतु अत्यंत कठीण अथवा सचोटीच्या क्षणीही ती खंबीरपणे उभी राहिली. तिची विठ्ठलावरील भक्ती कधी तसूभरही कमी जास्त झाली नाही. मुखी सतत विठुरायाचे नाम घेत आपल्या भक्तीरसात न्हायलेल्या अभंगांमधून देवाच्या जवळ जाण्याचा नामसंकीर्तनासारखा सुलभ मार्ग सांगणाऱ्या संत जनाबाई या महाराष्ट्राच्या संत परंपरेतील अस्सल बावनकशी सोनंच जणू.
          चातुर्वर्ण्य व्यवस्थेतील सर्वात खालच्या वर्णातील, तत्कालीन अतिशूद्र समजल्या जाणाऱ्या समाजातील, गरीब घरातील एक लहानशी पोर.. आई वारल्यावर जेमतेम पाच सात वर्षांची असताना अचानक वडिलांनी तिला पंढरपुरी दामाशेटींकडे आणून सोडली. येथे तिच्या स्वतःच्या घरापेक्षा निश्चितच सुबत्ता होती. दामाजी आणि त्यांची बायको गोणाई दोहोंनी तिचे मनापासून स्वागत केले. त्यांच्या घरातले आणि घरातील प्रत्येकाच्या मनात जनाबाईचे स्वतःचे, हक्काचे असे स्थान होते. संत शिरोमणी नामदेवरायांची ही बालसखी. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, एकनाथ, तुकाराम, चोखामेळा, अशा अनेक संतांनी गौरवलेली संत जनाबाई. त्या विठू माऊलीची लाडकी भक्त. अशी अनेक मानाची पिसे तुऱ्यात असूनही नामदेवांच्या घरातील स्वतःची दासीची जागा तिने मनापासून जपली. वारकरी किंवा भागवत धर्माचा अंगीकार करणारे जात-पात मानत नाहीत. असे असूनही समाजाच्या चौकटीचे भान ठेऊन जनाबाई आचरण करीत. आज मराठी संत साहित्यात आवर्जून जनाबाईंचा उल्लेख शांत, मंद सुवासिक अशा जाईच्या वेलीचे रूपक वापरून केला जातो. तरीही आयुष्याच्या शेवटच्या घटकेपर्यंत जनाबाई मात्र स्वतःचा उल्लेख ‘दासी जनी’ अथवा ‘नामयाची दासी जनी’ असाच करून समाधानी होत्या. आपल्या अभंगातून कित्येक वेळेस त्यांनी स्वतःला असे संबोधले असल्याचे दिसते.
“जनी म्हणे जोड झाली जोड विठोबाची l दासी नामयाची म्हणोनिया l”
          ज्याप्रमाणे नदी लांब अंतरावरील एखाद्या बिंदुपासून वाहत वाहत, सर्वांना तृप्त करीत सागराला येऊन मिळते तशीच लहानशी जनी मराठवाड्यातील एका छोट्याशा खेड्यातून ईश्वरी संकेतानुसार पंढरपुरी आली. नामदेवांसोबत राहून विठू सावळ्याची भक्ती करू लागली. स्वतःच अस्तित्व विसरली. या सागर सरितेच्या संगमाचा शेवट हा विश्वनियंत्या परमेश्वराच्या पायाशी विलीन होण्यात किंबहुन त्याच्याशी एकरूप होण्यात झाला नसता तरच नवल होते!
          दमा आणि कुरुंड हे गंगाखेड येथे गावाबाहेर राहणारे अतिशूद्र जातीतील एक दाम्पत्य. घरामध्ये अठरा विश्वे दारिद्र्य पण मनामध्ये विठोबाच्या भक्तीची श्रीमंती. दमा नित्यनेमाने वारीला जात असे. दररोज मिळेल ते काम करून दोघं आपला चरितार्थ चालवीत होते. मीठभाकरीमध्येही सुखी होते. आयुष्यात त्यांच्या दृष्टीने त्यांना एकंच मोठा सल होता. लग्न होऊनही कुरुन्डेची कूस उजवत नव्हती. एक दिवस त्या दोघांनी हे गाऱ्हाणे विठ्ठलासमोर मांडायचे ठरवले. दोघेही ठरल्याप्रमाणे वारीला निघाले. मुल व्हावे म्हणून विठोबाला साकडे घातले. आणि काय आश्चर्य.. विठू माऊलीने त्यांना दृष्टांत दिला! “तुमच्या कुळाचा उद्धार करणारी आणि माझा अंश असलेली कन्यारत्न तुमच्या पोटी येईल. माझा अखंड सहवास तिला लाभेल.” आणि खरंच काही काळाने कुरुन्डेला दिवस गेले. देवाच्या आशीर्वादाचे बीज तिच्या पोटी रुजले होते. त्यामुळे एक आगळेच तेज तिच्या चेहऱ्यावर पसरले होते. दिवस भरत आल्यावर तिने एका गुटगुटीत कन्येला जन्म दिला. दमा आणि कुरुंड दोहोंच्या आनंदाला पारावर उरला नाही. जना असे तिचे नाव ठेवण्यात आले. परंतु, त्यासोबतच विठोबाचे शब्दही त्यांना पूर्ण लक्षात होते. त्यांच्या कुळाचा उद्धार करणारी अशी देवाच्या आशीर्वादाने झालेली लेक त्यांच्या कुशीत होती. पण तिचा सहवास त्यांना फारकाळ लाभणार नव्हता. तिला पंढरपुरात दामाशेटीकडे सोडण्याचा देवाचा आदेश त्यांना पाळावाच लागणार होता. पाच सात वर्ष त्यांच्या अंगणात ते पाखरू मनसोक्त  बागडले. दमा आणि कुरुंड दोहोंचा जीव त्यांच्या या लाडक्या लेकीत अडकला होता. तिच्या बाललीला त्यांना मोहात पाडत होत्या. पण तरीही लवकरच ती आपल्यापासून दूर होणार ही भावनाही त्यांना बोचत होती. त्यातच कसल्याशा आजाराचं निमित्त होऊन जनीची आई देवाघरी गेली. दमा या धक्क्याने खचला. एवढ्या लहान मुलीला आता आपण एकटे कसे सांभाळणार हा प्रश्न त्याला पडला. तेवढ्यात त्याला विठोबाचे शब्द पुन्हा आठवले. छोट्याशा जनीला दमाने, “काळ्या देवाला भेटायला जाऊया का?” असे विचारताच जनीने आनंदाने मान डोलावली. एवढंसं आपलं पोर..! आपल्याविना कसं राहू शकेल? दामाजींच्या घरी तिला कोण सांभाळेल? अशा हजार चिंतांनी जनीच्या बापाचे हृदय पोखरत होते पण जनी मात्र वेगळ्याच आनंदात होती. विठोबाच आता तिच्या आयुष्याचं चांगल वाईट पाहणार आहे; हे जणू तिला आधीच समजले होते. तिचा नामया तेथे तिची वाट पाहत होता. पुढे नामदेवांच्याच सानिध्यात राहून तिला तिचा विठू भेटणार होता. पण, जनीच्या आयुष्याच्या दोऱ्या विठोबाच्या हातात सोपवल्या असल्याने आपण निश्चिंत व्हावे हे एका बापाच्या मनाला नीटसे पटत नव्हते. इथे जनी मात्र आपल्या खऱ्या घरी जाण्यासाठी आतुर होती. मजल दरमजल करीत दमा आणि जनी दामाजींकडे पोहोचले. त्यांच्याकडे जनीला सोडून जड अंतःकरणाने दमाने निरोप घेतला. त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याची आणि जनीची भेट कधी झालीच नाही.
          लोकांच्या दृष्टीने जनी ही आई बापाने टाकलेली पोर होती. दामाजींच्या घरातील एक मोलकरीण होती. कुणाही सामान्य व्यक्तीला जनी अत्यंत एकटी, परावलंबी वाटेल. कुणालाही तिच्या या परिस्थितीवर कीव यावी. पण, जनी मात्र आपलं सर्वस्व विठोबाला समजू लागली. आई, वडील दुरावल्याचे दुःख कोणालाही होईल. जनीही यास अपवाद नाही. पण या यातना सहन करतानाही ती देवाला आळवते;
“माय गेली बाप मेला l आतां सांभाळी विठ्ठला ll
मी तुझे गा लेकरू l नको मजशी अव्हेरू ll
मतिमंद तुझी दासी l ठाव द्यावा पायापाशी ll
तुजविण सखे कोण l माझे करील संरक्षण ll
अंत किती पाहासी देवा l थोर श्रम झाला जीवा ll
सकल जीवाच्या जीवना l जनी म्हणे नारायणा ll”
          अत्यंत सध्या शब्दात पण आर्त विनवणी जनी करते. तिच्या शब्दाशब्दातून तिचे अंतर्मन उलगडत जाते. कधी देवाला ती माय बाप म्हणते तर कधी सखा मानते. कधी लहान मुलासारखा हट्ट करते तर कधी रुसून बसते. राग आला तर कधी “अरे विठ्या अरे अरे विठ्या l मूळ मायेच्या कारट्या ll” असे चार खडे बोलही सुनावते. विठुरायाच्या चरणांवर आपले आयुष्य वाहते. एवढेच नव्हे तर कोण कुठच्या टोकाच्या गावाहून आलेली ही पोर चंद्रभागेच्या तीरी उभे असलेल्या विठुरायावर अगदी सहजच आपला हक्क असल्याचे सांगते. पंढरपूर हे तिचे माहेर असून येथे आलेल्या प्रत्येकाला मोक्ष प्राप्त होतो असे ठामपणे सांगते.
“बाप रखुमाबाई वर l माझे निजाचे माहेर ll
ते हे जाणा पंढरपूर l जग मुक्तीचे माहेर ll
तेथे मुक्ती नाही म्हणे l जनी न पाहे त्याचे वदन ll”
          एखाद्या अशिक्षित, समाजाने मागास ठरवलेल्या वर्गातील, मोलकरीण असलेल्या स्त्रिला मोक्षाचे विचार करता यावे हे नवल नाही का! नामदेवांच्यासोबत राहून जनीला लहानपणी थोडीफार शब्द ओळख झाली. त्याकाळी महिलांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी होते. तरीही नामदेवांने आग्रहाने जनीकडून अक्षरे गिरवून घेतली. ते कधी स्वतः तिचे अभंग लिहून काढत तर कधी जनाबाईच ते उतरवून ठेवत असत.  कोणतेच साचेबद्ध शिक्षण न घेताही जनाबाईंच्या अभंगात एक गोडवा जाणवतो. आज अभंगादी काव्य प्रकारांचे शालेय जीवनात पाठ शिकवले जातात. त्यातील रचना, विविध वृत्त यांचा अभ्यास केला जातो. शिक्षणाचा भाग असूनही अशा रचना आता सहसा कुणाला जमत नाहीत. असे रसाळ अभंग करणे हे वेड्या गबाळ्याचे काम नव्हे. तेथे एक अडाणी जना बोलता बोलता, अगदीच उत्स्फुर्तपणे अभंग रचत असे. तिची रोजची कामे, आजूबाजूच्या लोकांचा स्वभाव, विठोबावरील तिचे प्रेम असे अगदी साधारण विषय त्यांच्या अभंगातून आपल्याला दिसतात.
          आज जवळपास प्रत्येक कामासाठी आपण विविध यंत्रांवर अवलंबून असतो. पूर्वीच्या काळी महिला वर्गाला ही सूट नव्हती. सडा सारवणे, निवड पाखडणे, जात्यावर दळणे, अशी असंख्य अंग मेहनतीची कामे जनी एकटीच मन लावून करीत असे. तिच्या कामाचा वेगही चांगला होता. कोणत्याही कामात चालढकलपणा नाही. भरपूर काम करूनही, एका क्षणाची विश्रांती न घेताही, ती सतत उत्साही असे. काय असेल या मागचे गुपित? सतत काम करण्याचा उत्साह कुठून येत असेल तिच्यामध्ये? यावर जनी म्हणते,
“झाडलोट करी जनी l केर भरी चक्रपाणि ll
पाटी घेउनी डोईवरी l नेऊनिया टाकी दुरी ll
ऐसा भक्तीसी भुलला l नीच कामे करू लागला ll
जनी म्हणे बा विठ्ठला l काय उतराई होऊ तुला ll”
          जनीच्या प्रत्येक कामात तिचा विठोबा तिची साथ देत असे. आपले प्रत्येक काम तोच करतो ही तिची दृढ श्रद्धा. आपण सामान्य माणसं.. त्यातून स्वतःला विज्ञाननिष्ठ अथवा बुद्धिप्रामाण्यवादी, अशी विशेषणं स्वतःच लावतो. अशा चष्म्यातून पाहिल्यास कुणाला हे सर्व एकटेपणात पिचलेल्या एका अबलेचे मानसिक खेळ वाटतील. पण हा चष्मा उतरवून स्वच्छ विचार केल्यास जनीचे विठूवरील प्रेम तिला कसे सबळ करते ते समजते. देव आपल्यावरील प्रेमाखातर आपली सगळी कामं वाटून घेत आहे, याचे जनीला कौतुक वाटते. आपल्यासाठी तो एवढी हलकी कामं करीत आहे या भावनेने सुखावणाऱ्या जनीला देवाचे उच्च स्थान लक्षात येते आणि तो केवळ आपल्यासाठी अशी कामं करीत आहे; त्यामुळे लोक त्याला नावं ठेवतील अशी अपराधीपणाची भावना तिच्या मनात येते. एवढा जगातील सर्व घटनांचा करता करवीता आज आपल्यासाठी कष्ट उपसत आहे, राबत आहे, या भावनेने सुखावत असतानाच जनीला आता या ऋणातून कसे मुक्त व्हावे? असा निष्पाप विचारही येतो. सोहम अथवा अद्वैताचे तत्त्व एकदा समजले की देव प्रत्येक कामात मदत कशी करतो हे कोडे अलगद उकलते. अगदी नेमक्या शब्दात हे तत्त्वही जनाबाई उलगडतात.
“जोड जाली रे शिवासी l भ्रांत फिटली रे जिवाची ll
आनंदची आनंदला l आनंद बोधची बोधला ll
एकपण जेथे पाही l तेथे विज्ञप्ति उरिली नाही ll
ऐसी सद्गुरूची करणी l दासी जनी विठ्ठल चरणी ll”
          भगवंत आणि भक्त दोन्ही एकच अथवा भक्त हा भगवंताशी एवढा एकरूप होतो की त्याच्यामध्ये आणि भगवंतामध्ये काही अंतरच राहत नाही. जेथे नर आणि नारायण दोन्ही एकमेकांमध्ये विलीन होतात त्यास ‘अद्वैत’ असे म्हणतात. भक्त आणि भगवंत हे दोन अथवा भिन्न असे मानले जाते ते ‘द्वैत’. तर दोन स्वतंत्र अस्तित्व नसलेले किंवा एकमेकांपासून भिन्न नसलेले ते ‘अद्वैत’. त्यामुळेच भक्त आणि भगवंताचे, आत्मा आणि परमात्म्याचे मिलन म्हणजे अद्वैत होय. जेव्हा मीठाची बाहुली समुद्रतळ शोधायला समुद्रात उडी घेऊ पाहील तेव्हा तिचे स्वतंत्र अस्तित्व राहू शकेल का? ती त्या पाण्यात पूर्णपणे विरघळून जाईल. तसेच स्वतःचा शोध घेताना, आपल्या अविनाशी आत्म्याचा ठाव घेताना, मी म्हणजे कोण? या प्रश्नापाशी येऊन अडकायला होते. तेव्हा त्या परब्रह्मरुपास आपण एकरूप झालो की “अहं ब्रह्मास्मि” हे मूळ सूत्र समजते. एकदा आपल्यातील देवत्वाची ओळख आपल्याला पटली की कुकर्मांपासून आपण सहज दूर होतो. मानवी देहाला या लौकिक जगातील ज्या दुःखांचे ओझे वाटते ते जीवा शिवाच्या मैत्रीने दूर होते. या अद्वैताच्या अथवा सोहम तत्त्वाच्या अंगिकारामुळे जनाबाईचे पोरकेपण दूर झाले. श्रमांमुळे देहाला होणारे कष्ट आणि मानसिक यातनाही तेथेच थंडावल्या. आपल्यासोबत सतत विठोबा आहे; आपले दोहोंचे अस्तित्व एकच आहे त्यामुळे तो आपल्याला प्रत्येक कामात साथ देतो हे जनाबाईंचे विचार यातून आपल्याला समजतात. जेथे लहानसहान कुरबूरी, हेवेदावे संपले तेथे आनंदची आनंद झाला असे त्या सांगतात. “देह भाव सर्व जाय l तेव्हा विदेही सुख होय ll” अशी त्यांची अवस्था होते. मी-तू पणाची बोळवण झाल्यावर आता देवाला आपण आपल्या हृदयात पक्के अडकविल्याचा जनाबाईंना साक्षात्कार होतो. त्याला आपल्यापासून कोणीच हिरावून नेऊ शकत नाही, असा दृढ विश्वास त्यांच्या मनी उत्पन्न होतो.
“धरिला पंढरीचा चोर l गळा बांधोनिया दोर ll
हृदय बंदिखाना केला l आत विठ्ठल कोंडला ll”
          एखाद्या द्वाड, अल्लड, बदमाश लेकरास आईने पकडून ठेवावे एवढ्या सहजतेने ती विठ्ठलाला हृदयात बंद केल्याचे सांगते. ती आणि तो एक याच भावनेतून तिच्या कामांमध्ये तिला मदत करण्यासाठी स्वतः चक्रपाणी आल्याचे तिला जाणवते. जनीला मदतीला कुणी माणूस येत असावा असे काही जणांना वाटते. तसे जरी मान्य केले तरी अडीनडीला आपल्यासाठी धावून आलेल्या प्रत्येकात आपल्याला ईश्वरच सापडत असतो हे विसरू नये.
       देवाच्या उपासनेचा आणि त्यायोगे मोक्ष मिळवण्याचा साधा सरळ मार्ग म्हणजे नामस्मरण. देवाचे नाव सतत मुखात असल्याने राग, लोभ, अविवेकी विचार, अशा सर्व दुर्गुणांचा निचरा होतो. शांत, समाधानी वृत्तीचा, सगुण रूपाचा आपल्यात शिरकाव होतो, असे त्या म्हणतात. “मूळ गेले हो क्रोधाचे l ठाणे केले विवेकाचे ll” असे त्या सहज सांगतात. जनाबाई आणि नामसंकीर्तन हे समीकरणच जगावेगळे वाटावे असे आहे. “मला लागो हाची धंदा l रामकृष्णहरिगोविंदा ll” अशी कामना त्या व्यक्त करतात. आपण जी कामं दररोज करतो त्याचा आपल्याला कधी ना कधी कंटाळा येत असतो. मग कामात चालढकल कळत नकळतपणे होत असते. परंतु, जनाबाई नामस्मरणात एवढ्या गुंग होत की त्यांच्या प्रत्येक कामात त्यांना देवाचे अस्तित्व जाणवू लागले. मग कामातून पळवाट का शोधावीशी वाटेल कुणाला? एखाद्यावर जीव ओवाळून टाकणे किंवा समरस होऊन जाणे म्हणजे काय हे पुढील पंक्तींवरून सहज लक्षात येते.
“देव खाते देव पिते l देवावरी मी निजते ll
देव देते देव घेते l देवासवे व्यवहारीते ll
देव येथे देव तेथे l देवाविणे नाही रितें ll
जनी म्हणे विठाबाई l भरुनी उरलें अंतरबाही ll”
          आपल्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक गोष्टीत, चराचरात जनीला देव सापडत होता. एका वेगळ्याच पातळीवरील अलौकीक प्रेम आणि विश्वासाची प्रचीती यातून होते. आपल्याला आई, वडील, भाऊ, बहिण, नवरा, बायको, आदी सर्व नात्यांमध्ये ती व्यक्ती सदेह रुपात दिसत असते. त्यांच्यावर आपले मनापासून प्रेम असते परंतु, “भरुनी उरले अंतरबाही” एवढे समर्पण प्रत्येकाला खरंच अनुभवता येते का? येथे तर जनी चारचौघांना न दिसणाऱ्या, केवळ तिच्या मनःचक्षूंसमोर असलेल्या एका प्रचंड विशाल शक्तीकडे अगदी सहज, डोळे मीटून स्वतःला सोपवीत आहे. हे कुणा सामान्याला जमणे केवळ अशक्य! म्हणूनच या कठीण अश्या भक्तिमार्गाचे वर्णन “भक्ती ते कठीण इंगळाची खायी l” असे ती करते.
          देवाला कधी आईच्या मायेने, लाडाने हाक मारणारी जनी, कधी आपल्या मित्राला हाक मारावी एवढ्या सहज त्याला मनातील गुज सांगणारी जनी, असे जनाबाईंचे अनेक रंग आपल्याला त्यांच्या अभंगातून दिसून येतात. पण सर्वात महत्त्वाचे आणि देवाला स्वतःपाशी कायमचे बांधून ठेवणारे जनीचे रूप म्हणजे तिच्या मनाची अत्यंत व्याकूळ अशी अवस्था. विठ्ठलाला मायबाप समजणारी जनी त्याच्या भेटीच्या ओढीने हट्ट करते. ती विठोबाचे आधी कौतुक करते.
“रूप सावळे सुंदर l कानी कुंडले मकराकारll
गळा वैजयंती माळा l तो हा मदनाचा पुतळा ll ”
          कौतुकाला विठू भुलला नाही तर लाडीगोडीने बोलाविते. “ये ग माझे विठाबाईl ” अशी हाक मारते. तरीही विठूराया आला नाही तर मात्र हिरमुसून जाते. आणि “का ग न येसी विठ्ठला l ऐसा कोण दोष मला ll” असे विचारते. कधीकधी मात्र या भौतिक जगात रमणे अशक्य होत असल्याने ती अजूनच कळकळीने हाक मारते.
“का गे निष्ठुर झालीसी l मुक्या बाळाते सांडिसी ll
तुज वाचोनिया माये l जीव माझा जावो पाहे ll
प्राण वारीयले कंठी l जनी म्हणे देई भेटी ll”
          अशा आर्त हाकेकडे कानाडोळा करणे देवाला जमणे कठीणच. लहान बाळ आपल्या आईला बोलावते आहे जणू तशी जनी विठोबाला आळविते. मग तो पंढरीचा राजा सगळी कामं बाजूला सारून जनीला भेट देत असे. तिला मायेने जवळ घेत असे. कुशीत घेऊन शांत करीत असे. मग जनी पुन्हा हसतमुखाने येईल त्या प्रसंगांना सामोरे जायला तयार होत असे. त्या भेटीमुळेच तिच्या अंगात अतिशय उत्साह आणि ताकद येत असे.
          जनाबाईंच्या अभंगातून केवळ त्यांचे विठू माऊली आणि नामदेवांप्रती असलेले प्रेमच व्यक्त होत नाही तर निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताबाई, चोखामेळा, आदी संतांविषयी तिच्या मनात असलेला आदरभावही व्यक्त होतो. वयाचे अंतर पाहता जनाबाई ज्ञानेश्वरांपेक्षा मोठ्या पण ज्ञानदेवांची आध्यात्मिक खोली, त्यांचा अभ्यास त्या जाणून होत्या. वेदशास्त्रांच्या अभ्यासातील चारही भावंडांची समज त्यांना माहिती होती. त्यांच्या अनेक अभंगातून ज्ञानेश्वरांविषयीचे त्यांचे प्रेम व्यक्त होते. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि आदिशक्ती अशाप्रकारे जनाबाई या भावंडांचा उल्लेख करतात.  
“सदाशिवाचा अवतार l स्वामी निवृत्ती दातार ll
महाविष्णूचा अवतार l सखा माझा ज्ञानेश्वर ll
ब्रह्मा सोपान जाला l भक्ता आनंद वर्तला ll
आदि शक्ति मुक्ताबाई l दासी जनी लागे पायी ll”
          जेमतेम अक्षर ओळख असलेल्या, घरकाम करणाऱ्या, चाकोरीबद्ध आयुष्य जगणाऱ्या जनाबाईंचे हटयोग, इडा, पिंगळा, सुषुम्ना, अश्या कुंडलिनी जागृत करणाऱ्या ब्रह्मनाड्यांवरील ज्ञानही चकित करणारे असेच होते. भल्या भल्यांना कित्येक वर्ष साधना करूनही यातील बोध होत नाही. पण या विश्वाचा कारभार सांभाळणाराच तिचा सखा होता. त्यामुळे तिला कोणी काही न शिकवताही आपोआपच हे ज्ञान मिळत होते. “रक्त वर्ण त्रिकूटस्थान l श्री हाट पाहे श्वेतवर्ण ll” ही हटयोगावरील त्यांची रचना थक्क करणारी आहे. शुद्ध पण साध्या भाषेत त्यांनी यात हटयोग उलगडून दाखवला आहे. त्यांच्या आध्यात्मिक अभ्यासाबाबत, उत्स्फूर्त अभंगांच्या कौशल्याबाबत त्या “बाई मी लिहिणे शिकले सद्गुरुरायापाशी ” असे एवढेच नम्रपणे म्हणत.
          एवढे विविध विषयांवरील ज्ञान एकवटले असलेल्या जनाबाई कधी जात्यावरच्या ओव्याही रचत असत. “दळीता कांडिता l तुज गाईन अनंतll” असे त्यांच्या मुखातून सहज येत असे. जात्याचे आणि त्यातून दळून बाहेर पडणाऱ्या पीठाचे रूपक योजून त्या “प्रपंच दळण दळीले पीठ भरिले l सत्त्वाचे आधण ठेविले पुण्य वैरिले l पाप ते उतू गेले l” असे गात असत. तर घरातील लहान मुल रडत असताना त्याला कडेवर घेऊन मायेने “माझे अचडे बचडे l छकुडे गे राधेचे रुपडे l” असे लाड करीत जोजवत असत. अशुद्ध भाषेत बोबडे बोल बोलणारी, आई, वडिलांविना पोरकी झालेली, नामयाची दासी जनी, ते कथाकीर्तन करून तत्कालिन पुरुष संतांमध्ये आपला वेगळा ठसा उमटवलेली ‘संत जनाबाई’ हा प्रवास कोणालाही अचंबित करणारा असाच आहे. नामदेवांच्या घरी काम करणारी एक मोलकरीण विठोबाची लाडकी सखी झाली. नामदेवांच्या सहवासात, विठुरायाच्या कृपेने तिला दिव्य ज्ञान प्राप्त झाले. आज जनाबाईंचे सुमारे साडे तीनशे अभंग उपलब्ध आहेत. याशिवाय थालीपाक आख्यान, कृष्णजन्म, बालक्रीडा, काला, अशी अनेक आख्यान काव्यांची निर्मितीही त्यांनी केली. पाळणा, नवलकाव्य, कूट, विविध संतांच्या आयुष्यातील प्रसंग, दशावतार, असे विविध विषय त्यांनी काव्यातून हाताळले. असे असले तरीही अन्य संतांपेक्षा जनाबाईंचे साहित्य अत्यल्प उपलब्ध आहे. परंतु, त्यांच्या प्रत्येक रचनेतून त्यांची आध्यात्मिक, वैचारिक बैठक, प्रगल्भ प्रतिभा सतत जाणवते. नामदेवांच्या चरित्रातून आपणास जनाबाईंची ओळख होते. त्यांच्या अभंगादी काव्यांमधून त्यांचे अंतरंग उलगडत जाते. त्यांचे स्वतंत्र चरित्र सांगणारे साहित्य अत्यल्प आहे; हे दुर्दैवच मानावे लागेल. तरीही त्यांच्या अभंगाच्या वेलीवरील फुले टिपत, त्यातील मंद मंद गंध आणि मधुकणांची मेजवानी आपल्याला चाखता यावी यासाठी हा केलेली ही धडपड..!

-      वैदेही सच्चिदानंद शेवडे.

शुक्रवार, २३ मे, २०१४

Pamper Yourself

          बापरे..! साडे पाच वाजले! झोप लागतेच कुठे पहाटे चार वाजेपर्यंत? जेमतेम तासाभरात उठून, आवरून ६ वाजताच घरातून बाहेर पडायचं. मग पुढे लोकलवारी. दादरपर्यंत उभ्यानेच जा. एवढ्या सकाळीही क्वचितच फोर्थ सीट मिळते बसायला. त्यात पण काही बायका अशा काही पसरून बसतात की जागा असूनही आपल्याला बसता येत नाही. दादर ते अंधेरी जागा मिळते पण मग अंधेरी येईपर्यंत झोप येऊ लागते. मग तसेच पेंगुळले डोळे घेऊन कामाची सुरुवात करा. दररोज वाढणारा कामाचा व्याप, कामासोबतच मास्टर्सचा अभ्यास, रोज हा चार तासांचा ट्रेनचा प्रवास आणि घरी आले की घरातूनही करावी लागणारी काही लहानसहान कामे आणि घरात आणि बाहेर सतत होणाऱ्या लहानसहान कुरबुरी! विचार करूनच वैताग आला. वाटलं, घेऊया सुट्टी. जायचंच नाही कामावर. मस्त ताणून देऊ. खूप वेळ झोपू. मग लक्षात आलं की कालही आपल्याला उठल्या उठल्या असेच विचार मनात आले होते आणि परवाही.. कदाचित त्या आधीदेखील! तेवढ्यात आईचा आवाज आला, “आज जायचं आहे की नाही? रात्रभर जागते त्यामुळे माझी झोपमोड होते. पुन्हा सकाळी तुला उठवायचं आणि डबा करून द्यायचा म्हणून एवढ्या लवकर उठावं लागतं. एवढी मोठी झाली तरी स्वतःला गजर लावून उठता येत नाही! उठवायला, डबा करून द्यायला, सगळं सामान घेतलं ना याची आठवण करून द्यायला अजून आई लागते. लग्न झालं की कसं होणार देव जाणे..” आता मात्र झोपायची इच्छा झाली तरी झोप मिळणार नाही हे समजलं आणि नाईलाजाने मी उठले. कामावर पोहोचायला उशीर तर झालाच पण नेहमीची ट्रेन हुकली त्यामुळे अचाट गर्दीचा सामना करायला लागला. आधीच उठल्यापासून काही चांगले विचार मनात येत नव्हते त्यातून ट्रेनची गर्दी, प्रचंड उकाडा आणि कोणत्याही कारणांवरून भांडणाऱ्या बायकांचा आवाज ऐकून माझ्या निरुत्साही, वैतागलेल्या विचारांना खतपाणीच मिळालं.

          रोजच्यासारखी कामं चालू होती. आज मात्र त्यात काहीतरी यांत्रिकता आल्यासारखं वाटत राहिलं. रोज रोज तेच ते.. काहीच नवीन नाही. आजकाल तर सोमवार का येतो? असंच वाटतं आणि मंगळवारपासूनच शनिवार – रविवारच्या हक्काच्या सुट्टीचे वेध लागतात. तेवढ्यात मैत्रिणीने विचारलं, “सुट्टीचा काय प्लान आहे?” “सुट्टी? आज तर गुरुवार आहे. कसली सुट्टी?” मग लक्षात आलं की धुळवडीची सुट्टी आणि शनिवार, रविवार असे लागून आले आहेत. सुट्टी.. हेच तर हवं होतं आपल्याला. मग तरीही आनंद का नाही झाला? मी माझ्याच विचारात.. आणि इथे माझ्या मैत्रिणीचे ३ दिवसांचे काय काय प्लान आहेत याची वर्णन चालू होती. ती कुठेतरी बाहेर जाणार आहे एवढंच समजलं मला आणि आपण किती दिवसात बाहेर गेलोच नाही फिरायला हे आठवलं. एकूणच उदासीनतेचा पारा ‘वाढता वाढता वाढे’ असाच होत होता. संध्याकाळपासूनच मुंबईमध्ये ठिकठिकाणी लोकांच्या अंगावर फुगे मारा. उगीच घराखालून किंवा समोरून जाणाऱ्या माणसांच्या अंगावर रंग उडवा असले प्रताप सुरु होतात. त्यामुळे आज सगळ्या महिला वर्गाला कामावरून लवकर निघता येणार होतं. घरी जाऊन खूप झोपूया असा विचार मनात डोकावला. इतक्यात आईचा फोन आला. “भरून ठेवलेला डबा साधा पर्समध्ये घालायला पण लक्षात राहत नाही? तरीही मी अगदी तुझ्या पर्स जवळच ठेवते तो. आज जाताना विचारलं नाही ना सगळं ठेवलं आहेस ना सोबत? तर लग्गेच विसरलीस! आता काहीतरी खाऊन घे बाहेरच. आणि वेळेवर खाऊन घे. तशीच उपाशी राहू नको. जागरण झालंय आणि त्यात अजून उपास नको. गेल्यावेळेस ट्रेनमध्ये चक्कर आली होती, आठवतंय ना? जीवाला घोर उगीच आमच्या..” उफ्फ..!!! मला लहानपणापासून भूक सहन होत नाही. भुकेच्या वेळेस कोणी माझ्या भल्याचही सांगत असेल तरीही माझ्यापाशी ते ऐकण्याचा संयम नसतो. त्यात सकाळीच मातोश्रींनी आमच्या नावाने भूपाळी आरवली होती आणि आताही तेच. त्यातून पोटात कावळे ओरडत होते. मी काहीही विचार न करता आई बोलत असतानाच फोन बंद करून टाकला. खरंच, एवढी साधी एक गोष्ट आपल्या लक्षात राहू नये? बरीच कामं आपण अशीच नंतर करू म्हणून ढकलतो आणि विसरूनही जातो. आवडत्या ठिकाणी, आपल्याला आवडणार काम करत आहोत पण त्यातही उत्साह नाही. वैताग आला आहे सगळ्याचाच. कशीबशी कामं आटोपली आणि ४ वाजताच मी निघाले. आता भूकही लागली होतीच आणि आई आपल्याच काळजीपोटी आपल्याला बोलत होती याची जाणीवही तीव्र झाली होती. स्वतःवरचाच राग आपण आईचा फोन कट करून तिच्यावर काढला या भावनेने शरम वाटली. पण स्वभाव असा अडेलतट्टू की घरी जाऊन माफी मागू असंदेखील मन ऐकत नव्हतं.

          मी सरळ एकटीच मरीन ड्राईव्हला गेले. का? माहित नाही.. पण घरी जाण्याची इच्छा नव्हती. हे ठिकाण माझ्या खूप आवडीचं. कॉलेजमध्ये असताना तर दर काही दिवसांनी इथे दौरा ठरलेला. आता एकटीलाच त्या गोष्टी आठवत होत्या. शेवटची कधी आले होते मी इथे? धन्याचं लग्न ठरलं तेव्हा सगळे भेटलो होतो वाटत. अरेच्या! म्हणजे जवळपास वर्ष होत आलं. इथून घरी परत जात असताना सीएसटीहून आरामात बसायला जागा मिळते तेव्हा मी वाचत असे.माझ्या बॅगेमध्ये नेहमीच एखादं पुस्तक असे. फावल्या वेळेत वाचायचं किंवा भरपूर गाणी ऐकायची हा माझा आवडता कार्यक्रम. इतक्यात कोणतच पुस्तक नाही वाचलं की नवीन गाणीही माहित नाहीत. जुनी गाणीही ऐकून बराच वेळ झाला. काय होतंय हे सगळं? मीच आता मला अनोळखी वाटू लागले. आजूबाजूच्या अपरिचीत जगाचाच एक भाग असल्यागत मी स्वतःकडे पाहू लागले. मी वैतागून डोकं हलवलं. मार्च महिना, त्यात मुंबईचा उकाडा.. सूर्य निरोप घेत होता पण अजूनही गरम वाफा येत होत्या. त्यात सकाळपासून घराबाहेर.. जरा बरं वाटावं म्हणून मी पर्समधून वेट टीश्यू काढला आणि चेहरा खसाखसा पुसला. धूळ निघाली चेहऱ्यावरची... पण, या स्पर्धेच्या युगात तग धरून राहण्यासाठी रोज जी वेगवेगळी पुटं आपण चढवतो त्यांचं काय? ती अशी खसाखसा पुसून निघणारच होती जणू! चेहरा पुसल्यावर सवयीप्रमाणे आरसा हातात घेतला.  पण आज कसं कोणास ठाऊक पण आरश्यात स्वतःला बघून गुलजार साहेबांच्या ओळी आठवल्या. “हम नहीं थे आइनेमे, बाकी तीनों थे.. एक नोकर, एक रुतबा, एक वर्दी थी..” मला माझ्याच विचारांचा उबग येऊ लागला होता. तेवढ्यात एक मोठी लाट आली आणि तिने हलकेच काही शिंतोडे माझ्या तोंडावर उडवले. मी लगेच चेहरा पुसण्यासाठी हातात रुमाल घेतला. पुन्हा तेच.. समुद्राचं खारं वारं आणि पाणी पुन्हा माझ्या गालांवर आलं. ते पुसायला गेले पण, हात तसाच थांबला. आता मलाच माझं अनोळखी होण्याचं कोडं उलगडू लागलं. इथे तासंतास मी अशीच खारं वारं आणि पाणी अंगावर घेत बसायचे. आताही तेच हवंय मला खरंतर. लहान मुलाला भूक लागली तरी समजत नाही आणि ते ते चिडचीड करतं. मग आईलाच ते समजतं आणि ती त्याला लाडीगोडीने भरवते, तसंच मलाही नेमकं काय होतंय हे मला कळत नव्हतं. पण, ते समजलं ते या वारा आणि पाण्याच्या स्पर्शाने. स्वतःवरच रुसलेल्या या बाळाच्या गालांना स्पर्श करून ते पाणी गुदगुल्या करत होतं. दिवसभर उन्हात वणवण केलेल्या जीवाला फुंकर घालून वारा शांत करू पाहत होता. आता अचानक मला हवेत जरा प्रसन्न शीतलता आल्यासारखी वाटली. मी उभी राहिले. त्या कट्ट्यावरून चालू लागले. गच्च वर बांधलेले माझे लांब केस सोडले. वाऱ्यावर त्यांना मनसोक्त उडू दिलं. भरभरून तो खारा वारा आत साठवून घेतला. हेडफोन्स काढून मोबाईलवर माझी आवडती गाणी ऐकली. एक वेगळाच आनंद होत होता. तेवढ्यात घड्याळाकडे लक्ष गेलं. निघायला हवं. फोर्ट फेरीने सीएसटी स्टेशन गाठलं.

          मोबईलची बॅटरी उतरली होती. आईने अजून काळजी करू नये म्हणून तिला फोन करून दीड तासात पोहोचते असं कळवलं. फोन ठेवताना तिला जेवायला काही करू नकोस असंही सांगितलं. ट्रेन सुरु झाली. आता तासाभराने उतरायचं. हल्ली ट्रेनमध्ये बसायला पुरेशी जागा मिळाली की मला लगेच झोप लागते. आज मात्र तसं नाही झालं. एक उत्साह संचारला होता. माझ्या शेजारी एक बाई दोन लहान मुलांना घेऊन बसली होती. तिच्या मांडीत जेमतेम ६ महिन्यांचं तान्हुलं होतं तर पुढ्यात ४ वर्षांचं. त्या छोटुला मी माझी खिडकीची जागा दिली. ट्रेन सुरु झाली. छोटूसोबत गप्पा रंगल्या. त्याला गोष्टी सांगितल्या. थोड्या वेळाने त्याला भूक लागली तेव्हा तो आईपाशी भुणभुण करू लागला. तिला दोघांना सांभाळणं कठीण जात होतं मग मी लगेच तान्हुल्याचा ताबा घेतला. अगदी माझं स्टेशन येईपर्यंत ते माझ्या मांडीत होतं. जाताना त्याच्या आईने दोनदोनदा माझे आभार मानले. तेव्हा अवघडल्यासारखंच झालं. तिची मदत म्हणून मी कुठे काही केलं होतं? माझी आवड म्हणून केलं आणि त्या दोन्ही पिल्लांनी मला अजूनच उत्साह दिला. हे तिला कसं समजवू शकले असते मी?

          आईला माझे मोकळे केस आवडत नाहीत, वेणी आवडते. त्यामुळे ट्रेनमध्ये बसल्यावर मी वेणी घातली होती. ती पाहून मी घरी आल्यावर आईच्या चेहऱ्यावर मोठ्ठ प्रश्नचिन्ह उमटलं. पण सकाळपासून वैतागलेल्या मला आल्याआल्या प्रश्न विचारायला नको म्हणून ती काहीच बोलली नाही. अंघोळ करून मी बाहेर आले आणि स्वयंपाक घरात शिरले. थोड्या वेळाने आईला खिचडी तयार आहे असं सांगितलं. आईला खिचडी जेवढी आवडते तेवढीच मला नकोशी असते. लहानपणापासून तोंड वाकडं न करता मी कधी खिचडी खाल्ली नाही. आज मी स्वतः गाणी गुणगुणत खिचडी केली त्यामुळे आता मात्र आईला राहवलं नाही. “आज हे काय आक्रीत?” असं तिने पानं घेताना विचारलंच. मी हसले आणि आईसाठी आठवणीने आणलेली तिची आवडती चाफ्याची फुलं तिच्या हातात दिली. “जास्त चिडले ना उगीच.. चुकले गं.” असं म्हणाले. आई मनापासून हसली पण लिंबाच्या लोणच्याची बरणी काढता काढता तिने, “आत्ता म्हणालीस ठीक आहे. पण उद्यापासून पुन्हा सगळं असंच असणारे हे माहित आहे मला.” असा टोला लगावलाच. मग दोघी मायलेकींनी वाफाळत्या खिचडीवर ताव मारला. मातोश्री आज उगीच कौतुक करीत खिचडी खात होत्या. मग मला ती आवड नसूनही तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि कौतुक यामुळे दोन घास जास्तच गेले. रात्री आईने डोक्याला तेल लाऊन दिलं  आणि मग पाउलो कोएल्लोचं पुस्तक वाचता वाचता मला कधीतरी झोप लागली.

          सकाळी कोणीही न उठवता आणि सुट्टी असून लवकर जाग आली. मी लगेच घराबाहेर पडले. रंग विकत घेतले आणि गल्लीतल्या सगळ्या मित्र मैत्रिणींना जागं करून घरी जाऊन रंग लावला. बऱ्याच दिवसांनी सगळ्यांना भेटले. त्यांनीही गेली अनेक वर्ष रंग खेळले नसल्याचं आणि माझं असं अचानक घरी येऊन सरप्राईज करण्याने त्यांना छान वाटल्याचं कबुल केलं. मग सगळे तसेच रंगलेले चेहरे घेऊन आमच्या घरी आले. आमच्या मातोश्रींना सगळ्याच गोष्टी आधीच कश्या कळतात देव जाणे! तिने सगळ्यांसाठी दडपे पोहे करून ठेवले होते. गप्पा आणि पोहे यांचा पोटभर आस्वाद घेऊन सगळे निघाले. मीपण मस्त अंघोळ केली, एक चित्रपट पहिला आणि झोपी गेले. रविवारचा दिवसही आईसोबत शॉपिंग करण्यात आणि गप्पा मारण्यात घालवला. संध्याकाळ झाली आणि विचार आला की संपली सुट्टी. आता उद्या पुन्हा सगळं आधीसारखं. अभ्यासाची टिपण काढलेली डायरी मला दिसली आणि पुन्हा एकदा चिंतेची हलकीशी लकेर चेहऱ्यावर उमटली. नोकरीसोबत शिक्षण पूर्ण करणं खरंच जमणार आहे ना मला? डायरीखालची फाईल मी हातात घेतली. त्यात माझी शाळा, कॉलेजमधली आणि विद्यापीठात प्रथम  आल्याची वगैरे बरीच प्रमाणपत्रकं होती. ती पहिली. तेव्हाही परिस्थिती फारशी अनुकूल नव्हती हे आठवलं. तेव्हाही भीती वाटत होती पण जमवलंच की आपण! असा विचार आला आणि हुरूप आला. “हो, मी हे करणारंच!” असं स्वतःलाच मी बजावलं. आता कसलाच ताण जाणवत नव्हता. मग पुस्तक वाचायला घेतलं. रात्री झोपण्याआधी आठवणीने आठवणीने मी ते पर्समध्ये ठेवलं. 

          घड्याळाचा गजर लावताना आईने, “सुट्टी संपली. तेव्हा उद्या सकाळपासून वैताग आणि चिडणं सुरु ना?” विचारलं आणि दोघी हसत सुटलो. आता एक गोष्ट मला पक्की समजली होती. मोबाईलची बॅटरी जास्त डाऊन झाली की तो बंद करून आपण चार्ज करतो. तसंच, आपल्याला स्वतःची गणितं चुकत आहेत, काहीच बरोबर होत नाही आहे असं वाटायला लागलं की एक लहानसा ब्रेक घ्या. स्वतःला आवडत ते करा. स्वतःचेच लाड करा. कौतुक करा आणि मग बघा पुढच्या आव्हानांसाठी पुन्हा नव्या उमेदीने आपण कसे उभे राहतो!

-     वैदेही सच्चिदानंद शुभांगी शेवडे.

सोमवार, २० जानेवारी, २०१४



भेटी लागी जिवा लागलीसे आस..!

          
          मनी वसे ते स्वप्नी दिसे असे लहानपणापासून ऐकले आहे. खरंच आहे की.. आपण सतत ज्या गोष्टीचा विचार करत असतो आपल्याला तेच दिसत असत. कधीकधी ही जिद्द एवढी शिगेला पोहोचते की अगदी जळी स्थळी काष्ठी पाषाणी आपल्याला तेवढेच दिसू लागते. त्याच गोष्टीचा विचार आपण सतत करू लागतो. निरंतर असा एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्याने आपोआप आपल्या आजूबाजूची परिस्थितीही आपली मनीषा पूर्ण करण्यासाठी अनुकूल होते. हळूहळू आपण आपल्या ध्येयाच्या अधिकाधिक जवळ पोहोचतो आणि अंतिमतः आपणास निश्चितच ती गोष्ट प्राप्त होते.
          कधीकधी मनाची एक विचित्र अवस्था होते. जवळ सगळंच असूनही एक पोकळी जाणवते. शांतपणे विचार केला की मनातील एक इच्छा तीव्रपणे जाणवते. देवाचं अस्तित्व ठायी ठायी जाणवतं खरं पण तरीही त्याचे सगुण, सदेह रूपातील दर्शन व्हावे असे राहून राहून वाटते. वाडी, पंढरपुर, द्वारका, सोमनाथ, अशा अनेक ठिकाणी जाण्याचा योग आला प्रत्येकवेळेस त्या मायबापाला डोळ्यात साठवताना तो उत्साह असा ओसंडून वाहत असतो की डोळ्यातून ते चैतन्य पाझरू लागते. विश्वाचा धनी तो.. माझ्या इवल्याशा डोळ्यात कसा साठणार! ओसंडून वाहणार हे स्वाभाविकच! काही वर्षांपूर्वी एक कानडी भजन ऐकलं होत. “कृष्णानी बेगने बारो.. बेगने बारो मुखवन्नी तोरो..” कानडी समजत नसल्याने पूर्ण अर्थबोध होत नव्हता पण तरीही ते ऐकताना वेगळाच सुख मिळत होतं. शेवटी त्याचा अर्थ शोधून काढला. “हे कृष्ण, तू त्वरित ये.. त्वरित येऊन तुझ्या मुखाचे दर्शन होऊ दे.” भाव समजायला भाषा समजणं गरजेचंच आहे असं नाही असा प्रत्यय आला.
          श्री गजानन महाराजांवरील पोथीचे पठण करत असता बाळापुरच्या बाळकृष्ण नावाच्या सद्गृहस्थांची एक कथा समजली. बाळकृष्ण मोठे समर्थ भक्त होते. नित्यनेमाने सज्जनगडावर जात असत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना एक वर्ष त्यांचा नेम चुकणार असे वाटत होते. पण बाळकृष्णांची एवढी अगाध श्रद्धा की स्वतः गजानन महाराज त्यांच्या घरी वेष बदलून गेले आणि त्यांना समर्थांच्या रूपात दर्शनही दिले. कथा वाचून झाली आणि मी विस्मयाने महाराजांच्या प्रतिमेकडे पाहू लागले. आपण किती क्षुल्लक आहोत आणि आपल्या मनात त्या विश्वनियन्त्याला भेटण्याची तळमळ एवढी शिगेला कधी पोहोचेल? कधी आपण त्यांचे दर्शन घेऊ शकू? असे विचार येऊ लागले. रात्री झोपताना परत मनाला समजावले. आपल्या आजूबाजूला अनेक व्यक्ती, घटना यातून देव आपल्याला भेटतच असतो. बरेचदा त्या दैवी अंशाची आपल्याला जाणीव होते.. केवढी भाग्याची आहे ही गोष्ट! पण तरीही याची देही याची डोळा पाहण्याची इच्छा काही मनातून जाईना. आजही बरेचदा असं अंतरद्वंद्व चालूच असत. अशा वेळेस किवा मनात निराशा निर्माण करणारे विचार आले की सरळ देवाचा धावा करते. थोडंसं रडू येत पण आपल्या पाठीशी “तो” भक्कम उभा आहे या जाणीवेने निश्चिंत होते. परिस्थिती बदलेल, प्रश्न सुटतील, तो दर्शन देईल असं वाटतं आणि मन शांत शांत होतं.
          २ वर्षांपूर्वी नगर जिल्ह्यातील प्रवरा नदी काठी असलेल्या देवगड या दत्तगुरूंच्या स्थानी जाण्याचा अचानक योग आला. संध्याकाळी आम्ही तेथे पोहोचलो. थंडीचे दिवस असल्याने आल्हाददायक असा गारवा हवेत जाणवत होता. आरतीची वेळ झाली होती. त्या आधी आमचे दर्शन झाले. आम्हाला पुढे मुम्बईमध्ये लवकर पोहोचणे आवश्यक होते त्यामुळे आरतीला थांबणे शक्य नव्हते. पण माझे मन काही तयार होईना. मी शेवटी सांगितलं, “मुख्यद्वारातून बाहेर येण्याआधी आरती सुरु झाली तर मी थांबणार. आरती सोडून कधीही जाऊ नये.” सगळे पटापट पाय उचलू लागले. मीदेखील पुढे अडचण नको म्हणून त्यांच्यासोबत चालू लागले. तरीही मनात हुरहूर लागली होतीच. कान आरतीच्या आवाजासाठी उत्सुक होते. मुख्यद्वार अवघ्या चार पावलांवर असताना शंखनाद झाला आणि आरतीला सुरुवात झाली. गुरुदेवांनी माझी इच्छा पूर्ण केली. क्षणात गहिवरून आलं. माझ्यासोबत आमचे एक सर आणि आणि काहीजण थांबले. मंदिरात आणि आमच्यात अंतर बरंच होत पण तिथून अस्पष्ट का होईना थेट दर्शन होत होतं. दत्तगुरूंच्या मूर्तीसमोर अनेक दिवे तेवत होते. गाभारा उजळून निघाला होता. आम्ही सर्व तल्लीन होऊन हे पाहत होतो. अचानक मी माझ्या सरांकडे वळले आणि जाणवलं की तेही माझ्याकडे पाहत आहेत. आम्ही एकमेकांना "काही दिसलं का?” असा प्रश्न विचारला आणि एकच प्रश्न आमच्या मुखातून कसा आला म्हणून अजून अचंबित झालो. सर म्हणाले, “मला मगापासून इथे दत्तगुरूंच्या मूर्तीऐवजी राम – लक्ष्मण – सीता दिसत आहेत. पहा जरा.” मी पाहिलं तर खरंच मला आता तसच दिसू लागलं. काही वेळ गेला आणि सरांनी मला काय दिसत होतं? ते विचारलं. मी म्हणाले, “मला बाप्पा दिसतोय. तुम्ही म्हणालात तेव्हा रामानेही दर्शन दिले. ” थोड्यावेळाने सर पुन्हा चकित झाले.. “अरेच्या खरंच! आता गणपती बाप्पाचं दर्शन होतंय.” ब्रह्मा, विष्णू, महेशाचे दर्शन होता होता आता सर्वच देवतांचे होऊ लागले. आरती झाली. दत्तगुरू हे माझं श्रद्धास्थान आहेच पण मी बाप्पालाही मनोभावे पुजते. दत्तगुरूंच्या या पावन स्थळी जाण्याचा योग आला म्हणून मन सुखावले होते पण एकाच ठिकाणी अन्य इष्ट देवतांचेही दर्शन गुरुदेवांनी घडवले या विचाराने मनोमन तृप्त झाले.

          अनेकदा असे अनुभव आपल्याला येत असतात किंवा नकळत कुणीतरी आपली अडचण न सांगताही समजून घेत असत, सोडवत असत, अचानक, अनपेक्षित घटना घडत असतात ज्यांमुळे एखादी कठीण गोष्ट सुकर होते. अशा प्रत्येक वेळेस मी हात जोडते आणि त्या त्या वेळेस देवाने पुन्हा एकदा प्रत्यय दिला हे जाणवत. लहानपणी बाबांनी एक भजन शिकवलं होत. त्यात “लोग कहते है भगवान आते नाही.. रुक्मनीकी तरह हम बुलाते नहीं.. द्रोपदिकी तरह धुन लगाते चलो..” अशा पंक्ती आहेत. खरंच.. तेवढी तळमळ कदाचित अजून उत्पन्न झालीच नाही. म्हणून आपण सामान्य आहोत असं जाणवत. पण त्याच भजनात पुढे आहे की, “वक्त आएगा ऐसा कभी ना कभी.. हमभी पायेंगे प्रभुको कभी ना कभी.. ऐसा विश्वास दिलमे जगाते चलो.. कृष्ण गोविन्द गोपाल गाते चलो..” एवढीच एक इच्छा मनात ठेऊन दर दिवशी नारायणाचे नाव घेते. तुम्हीही नाव घेत रहा. तो भेटेलच. तूर्तास राम राम.
- वैदेही सच्चिदानंद शुभांगी शेवडे.