गुरुवार, १३ डिसेंबर, २०१२


सुख ??

           सकाळी सहा वाजता गजर झाला. वीणाने नेहमीप्रमाणे बंद डोळ्यांनी झोपेतच चाचपडत तो बंद केला. गजराच्या आवाजाने बाळ उठलं तर सकाळची कोणतीच कामं आपल्याला वेळेवर पूर्ण करता येणार नाहीत. नाताळच्या सुट्टीचा आजचा शेवटचा दिवस, उद्यापासून महाविद्यालय सुरु होणार आणि परत सगळी धावपळ सुरु.. तेव्हा आज काय काय तयारी करून ठेवायची याची चक्र वीणाच्या डोक्यात चालू झाली. पेंगुळलेल्या डोळ्यांनी तिने अंगावरची दुलई बाजूला सारली. बाळ आणि बाबा दोघेही शांतपणे झोपले होते. बऱ्याच महिन्यांनी सुरेशनी रजा घेतल्यामुळे आठवडा कसा गेला समजलंच नाही. “ झोपू दे अजून दोघांनाही.. आपण आपलं सगळं काम उरकून घेऊ. ” तिने विचार केला. प्रेमाने दोघांच्याही गालावरून हात फिरवून अलगद चुंबन घेतले.

          थोड्याच वेळात वीणा आंघोळ करून केस पुसत बाहेर आली.  सुरेशची चुळबूळ पाहून आता थोड्याच वेळात साहेब उठतील आणि चहा मागतील हे तिला समजले. एकीकडे नाश्त्याची तयारी करत तिने चहाचे आधण गॅसवर ठेवले. बैठकीच्या खोलीत येऊन वर्तमानपत्र हातात घेईपर्यंत सुरेश उठलेच. चहा, उपमा आणि बातम्या अशा तीन गरमागरम गोष्टी घेऊन ती आत गेली. वीणाच्या लांबसडक केसातून अजूनही पाण्याचे थेंब खाली ओघळत होते. मुळातच असलेली नाजूक आणि गौर कांती थंडीमुळे किंचितशी गुलाबी झाली होती. पिवळसर रंगाच्या साडीवर लाल रंगाची फुले असलेली साधीच, घरात नेसायची साडी असली तरी वीणा त्यातही अगदी अगदी टापटीप आणि मोहक दिसत होती. झाडावर उमललेली ताजी गुलाबाची फुलं जास्त टवटवीत दिसत होती की वीणा हेच लक्षात येऊ नये अशी ती लोभसवाणी वाटत होती. सुरेशनी चहा बाजूला ठेवून तिला जवळ ओढले. “तुझे गाल पुण्याच्या थंडीमुळे असे गुलाबी झाले आहेत, की काल रात्री मी.. ” त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच ती नव्या नवरीप्रमाणे लाजली आणि अजून बिलगली. नाश्ता होईपर्यंत आर्या उठली. मग त्या बाहुलीला न्हाऊ माखू घालण्यात वीणा गुंग झाली. आर्या आता आई, बाब्बा, आज्जी असे बोबडे बोल बोलू लागली होती. तिच्या तोंडून असं ऐकून, तिची दिवसागणिक होणारी प्रगती पाहून ती सुखावून जात असे.

          आर्याला खेळामध्ये रमवून ती दुपारच्या स्वयंपाकाची तयारी करू लागली. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. “सुरेश, पाहता का कोण आलं आहे दारावर? मी इथे बाळाला सांभाळते आहे आणि काम करते आहे. ” बेल परत परत वाजत होती. आता मात्र वीणा वैतागली. ती दार उघडण्यासाठी वळते न् वळते तोच तिच्या लक्षात आलं की सुरेश तर आपल्याला सांगूनच आई अण्णांना आणायला गाडी घेऊन स्टेशनवर गेले आहेत. “ किती ग वेंधळी मी..! आताशा असं रोजंच होऊ लागलं आहे आपलं. सुरेश म्हणतात तसं खरंच मी एवढ्यातच म्हातारी झाले आहे.. ” पुटपुटत वीणाने दार उघडलं. शेजारच्या रमा काकू कसलासा प्रसाद घेऊन आल्या होत्या. वीणाच्या हातात प्रसाद देत त्या म्हणाल्या, “ हा प्रसाद घे म्हणजे यंदा पेढा मिळणार पहा आम्हाला.. ” त्यांचं बोलणं ऐकून वीणाच्या कपाळावरची शीर तडकली. कसनुसं हसून तिने तो प्रसाद निमुटपणे गिळला आणि दरवाजा लावून घेतला. “ केवढा चोंबडेपणा हा.. काय करायचं असतं यांना इतरांच्या आयुष्यात सतत डोकावून देव जाणे..!! जे आहे.. जसं आहे त्यात मी सुखी आहे हे कळत कसं नाही या लोकांना? ” तेवढ्यात तिचं लक्ष मिश्किलपणे हसणाऱ्या त्या पिल्लाकडे गेलं. “राणी, आपल्याला काही कमी आहे का? आहे की नाही सगळं आपल्याकडे? कशाला हवं अजून काही? ” आईचं बोलणं जणू समजल्यासारखं राणी हुंकार देत होती. त्या प्रतिक्रियेने वीणाच्या चेहऱ्यावर परत हसू फुललं.

          आज बऱ्याच दिवसांनी अण्णांना आवडते तशी काळ्या वाटण्याची उसळ छान जमली होती. आईंनीही कौतुक केलं. आपल्या बायकोचं कौतुक होतंय त्यामुळे सुरेशच आपल्यापेक्षा अधिक आनंदात होते. चार दिवस नातेवाईकांकडे जाऊन आल्यामुळे आई अण्णा मस्त ताजे होऊन आले होते आणि खरंतर सुट्ट्या आहेत हे पाहून आपल्याला एकांत मिळेल म्हणूनच ते काही कारण नसताना नाशिकला गेले हे तिला पक्कं ठाऊक होतं. लग्न झाल्यापासून सासू सासरे सोबतच राहत असल्यानं तिला त्यांची अगदीच सवय होती त्यामुळे हव्या हव्याशा एकांतातही एकटेपणा जाणवत होता. पण दोन दिवस माहेरचे आले असल्यामुळे घरात परत वडीलधाऱ्यांचा वावर झाल्यानं तिला बरं वाटलं. सगळं कसं दृष्टं लागण्याएवढं सुंदर.. सुरळीत.. स्वतःशीच विचार करत ती झोपलेल्या सुरेशना गुड नाईट किस देत आर्याशेजारी झोपली.

          आठवडाभराच्या सुट्टीनंतर पुन्हा सकाळी उठून सगळं आवरून कामावर जाण्याचा कंटाळाच आला होता. तरीही सुरेशचा कंटाळा जावा म्हणून त्यांना लाडीगोडीनं उठवत तिने भराभर आपलं आवरलं, डब्बा भरला आणि स्कुटीवरून कर्वे नगरला तिच्या महाविद्यालयात पोहोचली. बऱ्याच दिवसांनी विद्यार्थांचे घोळके, त्यांचा गलका ऐकून तिला बरं वाटलं. मगाशी घर सोडवत नव्हतं आणि आता आपण इतके दिवस या गर्दी, गोंधळ, आवाजाशिवाय कसे राहिलो असं वाटतंय..! वीणा गालातल्या गालात एकटीच हसली. सुट्टीनंतरचा पहिलाच दिवस असल्याने आज काहीही न शिकवता सगळ्या विद्यार्थ्यांसोबत गप्पागोष्टी करण्यातच वेळ गेला. वीणा प्रसन्न व्यक्तीमत्वाची, आकर्षक, बोलकी आणि प्रेमळ अशी.. केवळ तरुणच नाही त्यातही उंची जरा कमी आणि सततची मजा मस्ती, यामुळे लहानशी वाटत असे. ती सगळ्या विद्यार्थ्यांची लाडकी शिक्षिका तर होतीच पण गोल्ड मेडलिस्ट असल्याने विषयातले सखोल ज्ञान आणि अभ्यासाच्या वेळेस कडक शिस्तीत अभ्यासंच या नियमाने वागणारी.. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच सहकारी आणि वरिष्ठही तिच्याशी अदबीनं वागत. त्यादिवशी मितालीने डब्बा आणला नसल्याने त्या दोघींनी अन्नपुर्णामध्ये जाण्याचं ठरवलं. मिताली ही वीणाची लहानपणापासूनची जिवाभावाची मैत्रीण. आयुष्यामधील प्रत्येक बरे वाईट क्षण दोघींनी एकमेकींसोबत वाटून घेतले होते. कोणताही आडपडदा न ठेवता प्रामाणिकपणे त्यांनी हे नातं जपलं होतं.

          गेली अनेक वर्ष त्या दोघी अन्नपूर्णा हॉटेलमध्ये येऊन त्यांच्या आवडीच्या चीझ पावभाजीवर मनसोक्त ताव मारत. अगदी हॉटेलचे मालक कामथ काकाही त्यांना जवळून ओळखू लागले होते. बरेचदा गप्पांच्या ओघात दोघी ऑर्डर देण्यास विसरल्या की स्वतः काका त्यांची फर्माईश घेऊन हजर असंत. काकांसोबत गप्पा मारून झाल्यावर दोघी आत बसल्या. इकडचं तिकडचं बोलून होईपर्यंत पावभाजी आली. “ मला जरा तुझ्याशी काही बोलायचं आहे.. खूप महत्त्वाचं आहे.. आणि यावेळी तरी टाळू नकोस. प्लीझ.. ” पहिला घास तोंडात घेत मितालीने सांगितलं. वीणाच्या हातातला घास मात्र तसाच हातात राहिला. आता पुढे कोणता विषय निघेल याची तिला पूर्ण कल्पना होती आणि म्हणूनच ती वैतागली. तिचा वैताग.. चिडचीड सगळं मितालीपर्यंत पोहोचत होतं. तिने शांतपणे वीणाचा हात हाती घेऊन घट्ट दाबला आणि तिला शांत करण्याचा एक विफल प्रयत्न केला. वीणाच्या चेहऱ्यावर स्पष्ट नापसंती दिसत असूनही मितालीने तो विषय निश्चयपूर्वक काढलाच.

          “ लग्न कधी करणार आहेस राणी? अगं यावर्षी बत्तीस वर्ष पूर्ण होतील ना..! ” राणी.. किती वर्षांनी मितालीने अशी हाक मारली ..! आई बाबा लहानपणी प्रेमाने हाक मारायचे मला अशी.  वीणा स्वतःच्याच विचारांमध्ये.. “ उशीर झालाच आहे पण अजून वेळ गेली नाही. तू सुंदर आहेस, सुशिक्षित आहेस. उत्तम नोकरी आहे. मग काय हरकत आहे? आपल्यासोबातच्या सगळ्या मैत्रिणीची लग्न झाली आता. माझंपण पहा.. लग्नाला नको.. नको.. करता करता अविनाश भेटला आणि मी खरंच खूप सुखात आहे आता. अगदी आत्ता आत्तापर्यंत मलाही वाटायचं.. जाऊ दे तुला नाही करायचं ना लग्न नको करू.. काय बिघडणार आहे? पण खरं सांगू? अव्या, त्याचे आई बाबा, बाकी नातेवाईक यांच्यासोबत असले ना की खूप जाणवतं की तू उगाच या सगळ्यांना पारखी झाली आहेस आणि तेही स्वतः ठरवून. खरं म्हणजे आयुषीच्या जन्मानंतर मला जास्त जाणीव झाली तुझ्या एकटेपणाची..! ” वीणा अजूनही स्वतःतच अडकलेली... जणू मिताली तिथे दुसऱ्याच कोणाशीतरी बोलते आहे.. वीणा स्वतःच्याच कोषात... वेगळ्याच जगात हरवलेली.. तिच्या डोळ्यातील ते अलिप्त आणि हरवल्यासारखे भाव पाहून मितालीने तिला अक्षरशः हलवलं. जरा भानावर येईपर्यंत डोळ्यातून ते भाव टपाटप ओघळू लागले. जरासं थोपटल्यावर ती शांत झाल्यासारखी वाटली.. तोच परत “ तुझे आई वडील घटस्फोट घेऊन वेगळे झाले. दोघांपैकी कोणीच किंवा इतरही नातेवाईकांनी तुला मायेने वाढवलं नाही हे खरंच दुर्दैवी आहे. तुझी होणारी घुसमट.. तो त्रास.. तुझ्यावर होणारा अन्याय पाहायला मी नेहमीच तुझ्यासोबत होते. आयुष्यातल्या तुझ्या हातात नसलेल्या पण तुझ्या पदरी पडलेल्या सर्व अपयाशांना तू तुझ्या शिक्षणाने आणि जे तुला सोडून गेले त्यांनाही सतत हसतमुखाने मदत करून मात केलंस. आठवतंय.. आपण लग्न आणि पुढच्या आयुष्याच्या किती गप्पा मारायचो.. मला कधीच या कशाबद्दल आवड नव्हती, पण तू नेहमीच भरभरून बोलत असायची. माझ्या मुलीला मी असं शिकवेन.. नवऱ्यासाठी हे करेन.. आमचं घर... घरातली माणसं.. थकायची नाहीस असं बोलून.. बोलून.. मग आत्ता का असं वागतेस?? राहुलसोबत इतकी वर्ष असलेलं तुझं प्रेम नाही झालं यशस्वी.. तुला कधी समजलंच नाही तो तुझा केवळ फायदा घेत होता. जरा समजावलं तरी तुला मीच वेडी वाटले. यातून सावरून तुझ्या काकांनी पाहिलेल्या स्थळाला होकार दिलास.. पण साखरपुड्यानंतर लग्न मोडलं त्याने. त्यातही तुझी काहीच चूक नव्हती. अगं, बऱ्याच जणांच्या आयुष्यात असे चढ उतार येत राहतात पण म्हणून त्यांनी पुढचा रस्ता कसा असेल या भीतीने तिथेच थांबावं का? ” बोलता बोलता मितालीच आवाज चढला होता आणि वीणा लालबुंद होऊन.. हमसून हमसून रडत होती. तिला हे सगळं असहाय्य झालं होतं. आता एकाही क्षण इथे थांबणं शक्य नाही हे समजल्यावर सगळा जीव एकवटून “ मी माझ्या आयुष्यात खरंच सुखी आहे आणि मला अजून कोणाचीही गरज नाही.. ” असं सांगून ती एकटीच धावत हॉटेल बाहेर पडली. स्कुटी घेऊन थेट घरचा रस्ता धरला. वाटेत दिसणाऱ्या प्रत्येकाच्या नजरा जणू तिला.. ही बाई दिसते तर बरी.. पण एकटी का आहे अजून?? असंच विचारात आहेत अशा वाटत होत्या.. बोचत होत्या. घराखाली स्कुटी लावत असताना रमा काकू तिच्याच बाजूने येताना तिला दिसल्या. घाईगडबडीत इमारतीत शिरेपर्यंत त्यांनी कितीतरी हाका मारल्या होत्या. “ हा मुलगा कसा वाटतो पहा.. तो पहा.. काय बाई..! मी इतकी स्थळं आणते पण तुला एकही पटत नाही. यंदाच्या वर्षी तरी लग्नाचा पेढा मिळू दे हो.. ” असं टुमणं वाजवत बसतील या विचाराने वीणा लिफ्टमध्ये शिरली.

          घरी येऊन थंड पाण्याने तिने खसाखस तोंड पुसले.. जणू त्या असावांसोबतच्या सर्व आठवणीही ती साफ करत होती. बऱ्याच दिवसांनी घरात एकटेपणा तिला जाणवत होता. बऱ्याच दिवसांनी.. कारण इतके दिवस तर आपण.. मनातल्या मनातही ते वाक्य ती पूर्ण करू शकली नाही. सुन्नपणे तिने दैनंदिनी उघडली. त्यात सुरुवातीच्या पानांवर होता तिचा एकटेपणा.. आणि नंतर तिने तिच्या मनाच्या खेळांनी त्यावर केलेली मात.. कोणालाही खरंच एखाद्या विवाहितेची वही वाचत असू असेच वाटेल. वाचता वाचता काही क्षण सुरेश, आई, अण्णा, आर्या, सगळी सगळी आपल्या मनाचीच पात्र असल्याचं तिला जाणवत होतं.. पण ते जग खोटं आहे हे मानण्याची मात्र तिची मुळीच तयारी नव्हती. शेवटी तिने नवे पान उघडले आणि त्यावर लिहिले.. मला ठाऊक आहे हे सगळे माझ्या मनाचे खेळ आहेत.. आणि यामुळे एक दिवस ठार वेडी होईन मी. पण खरंतर एवढं सगळं पाहून अजून वेडी कशी झाले नाही तेच माझं मला समजत नाही. बाहेरच्या जगापेक्षा हे जग खरंच खूप चांगलं, सुरक्षित आहे. इथे मला कोणीही सोडून जात नाही आणि वेडी झाले तरी हे सर्व माझ्यासोबतच रहातील याची मला खात्री आहे. मी खूप सुखात राहते त्यांच्यासोबत.. खूप सुखात. ” तेवढ्यात तिला सुरेशनी हाक मारली. आर्या उठली असेल.. तिने दैनंदिनी तशीच ठेवली आणि आर्याला जोजवायला आत निघून गेली...