भेटी लागी जिवा लागलीसे आस..!
मनी वसे ते स्वप्नी दिसे असे
लहानपणापासून ऐकले आहे. खरंच आहे की.. आपण सतत ज्या गोष्टीचा विचार करत असतो
आपल्याला तेच दिसत असत. कधीकधी ही जिद्द एवढी शिगेला पोहोचते की अगदी जळी स्थळी काष्ठी
पाषाणी आपल्याला तेवढेच दिसू लागते. त्याच गोष्टीचा विचार आपण सतत करू लागतो. निरंतर
असा एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्याने आपोआप आपल्या आजूबाजूची परिस्थितीही आपली
मनीषा पूर्ण करण्यासाठी अनुकूल होते. हळूहळू आपण आपल्या ध्येयाच्या अधिकाधिक जवळ
पोहोचतो आणि अंतिमतः आपणास निश्चितच ती गोष्ट प्राप्त होते.
कधीकधी मनाची एक विचित्र
अवस्था होते. जवळ सगळंच असूनही एक पोकळी जाणवते. शांतपणे विचार केला की मनातील एक इच्छा
तीव्रपणे जाणवते. देवाचं अस्तित्व ठायी ठायी जाणवतं खरं पण तरीही त्याचे सगुण, सदेह
रूपातील दर्शन व्हावे असे राहून राहून वाटते. वाडी, पंढरपुर, द्वारका, सोमनाथ, अशा
अनेक ठिकाणी जाण्याचा योग आला प्रत्येकवेळेस त्या मायबापाला डोळ्यात साठवताना तो
उत्साह असा ओसंडून वाहत असतो की डोळ्यातून ते चैतन्य पाझरू लागते. विश्वाचा धनी
तो.. माझ्या इवल्याशा डोळ्यात कसा साठणार! ओसंडून वाहणार हे स्वाभाविकच! काही
वर्षांपूर्वी एक कानडी भजन ऐकलं होत. “कृष्णानी बेगने बारो.. बेगने बारो मुखवन्नी
तोरो..” कानडी समजत नसल्याने पूर्ण अर्थबोध होत नव्हता पण तरीही ते ऐकताना वेगळाच
सुख मिळत होतं. शेवटी त्याचा अर्थ शोधून काढला. “हे कृष्ण, तू त्वरित ये.. त्वरित
येऊन तुझ्या मुखाचे दर्शन होऊ दे.” भाव समजायला भाषा समजणं गरजेचंच आहे असं नाही
असा प्रत्यय आला.
श्री गजानन महाराजांवरील
पोथीचे पठण करत असता बाळापुरच्या बाळकृष्ण नावाच्या सद्गृहस्थांची एक कथा समजली.
बाळकृष्ण मोठे समर्थ भक्त होते. नित्यनेमाने सज्जनगडावर जात असत. प्रकृती
अस्वास्थ्यामुळे त्यांना एक वर्ष त्यांचा नेम चुकणार असे वाटत होते. पण बाळकृष्णांची
एवढी अगाध श्रद्धा की स्वतः गजानन महाराज त्यांच्या घरी वेष बदलून गेले आणि
त्यांना समर्थांच्या रूपात दर्शनही दिले. कथा वाचून झाली आणि मी विस्मयाने
महाराजांच्या प्रतिमेकडे पाहू लागले. आपण किती क्षुल्लक आहोत आणि आपल्या मनात त्या
विश्वनियन्त्याला भेटण्याची तळमळ एवढी शिगेला कधी पोहोचेल? कधी आपण त्यांचे दर्शन
घेऊ शकू? असे विचार येऊ लागले. रात्री झोपताना परत मनाला समजावले. आपल्या
आजूबाजूला अनेक व्यक्ती, घटना यातून देव आपल्याला भेटतच असतो. बरेचदा त्या दैवी
अंशाची आपल्याला जाणीव होते.. केवढी भाग्याची आहे ही गोष्ट! पण तरीही याची देही
याची डोळा पाहण्याची इच्छा काही मनातून जाईना. आजही बरेचदा असं अंतरद्वंद्व चालूच
असत. अशा वेळेस किवा मनात निराशा निर्माण करणारे विचार आले की सरळ देवाचा धावा
करते. थोडंसं रडू येत पण आपल्या पाठीशी “तो” भक्कम उभा आहे या जाणीवेने निश्चिंत
होते. परिस्थिती बदलेल, प्रश्न सुटतील, तो दर्शन देईल असं वाटतं आणि मन शांत शांत
होतं.
२ वर्षांपूर्वी नगर
जिल्ह्यातील प्रवरा नदी काठी असलेल्या देवगड या दत्तगुरूंच्या स्थानी जाण्याचा
अचानक योग आला. संध्याकाळी आम्ही तेथे पोहोचलो. थंडीचे दिवस असल्याने आल्हाददायक असा
गारवा हवेत जाणवत होता. आरतीची वेळ झाली होती. त्या आधी आमचे दर्शन झाले. आम्हाला
पुढे मुम्बईमध्ये लवकर पोहोचणे आवश्यक होते त्यामुळे आरतीला थांबणे शक्य नव्हते.
पण माझे मन काही तयार होईना. मी शेवटी सांगितलं, “मुख्यद्वारातून बाहेर येण्याआधी आरती
सुरु झाली तर मी थांबणार. आरती सोडून कधीही जाऊ नये.” सगळे पटापट पाय उचलू लागले.
मीदेखील पुढे अडचण नको म्हणून त्यांच्यासोबत चालू लागले. तरीही मनात हुरहूर लागली
होतीच. कान आरतीच्या आवाजासाठी उत्सुक होते. मुख्यद्वार अवघ्या चार पावलांवर
असताना शंखनाद झाला आणि आरतीला सुरुवात झाली. गुरुदेवांनी माझी इच्छा पूर्ण केली.
क्षणात गहिवरून आलं. माझ्यासोबत आमचे एक सर आणि आणि काहीजण थांबले. मंदिरात आणि
आमच्यात अंतर बरंच होत पण तिथून अस्पष्ट का होईना थेट दर्शन होत होतं.
दत्तगुरूंच्या मूर्तीसमोर अनेक दिवे तेवत होते. गाभारा उजळून निघाला होता. आम्ही
सर्व तल्लीन होऊन हे पाहत होतो. अचानक मी माझ्या सरांकडे वळले आणि जाणवलं की तेही
माझ्याकडे पाहत आहेत. आम्ही एकमेकांना "काही दिसलं का?” असा प्रश्न विचारला आणि एकच
प्रश्न आमच्या मुखातून कसा आला म्हणून अजून अचंबित झालो. सर म्हणाले, “मला
मगापासून इथे दत्तगुरूंच्या मूर्तीऐवजी राम – लक्ष्मण – सीता दिसत आहेत. पहा जरा.”
मी पाहिलं तर खरंच मला आता तसच दिसू लागलं. काही वेळ गेला आणि सरांनी मला काय दिसत
होतं? ते विचारलं. मी म्हणाले, “मला बाप्पा दिसतोय. तुम्ही म्हणालात तेव्हा
रामानेही दर्शन दिले. ” थोड्यावेळाने सर पुन्हा चकित झाले.. “अरेच्या खरंच! आता गणपती
बाप्पाचं दर्शन होतंय.” ब्रह्मा, विष्णू, महेशाचे दर्शन होता होता आता सर्वच
देवतांचे होऊ लागले. आरती झाली. दत्तगुरू हे माझं श्रद्धास्थान आहेच पण मी
बाप्पालाही मनोभावे पुजते. दत्तगुरूंच्या या पावन स्थळी जाण्याचा योग आला म्हणून
मन सुखावले होते पण एकाच ठिकाणी अन्य इष्ट देवतांचेही दर्शन गुरुदेवांनी घडवले या
विचाराने मनोमन तृप्त झाले.
अनेकदा असे अनुभव आपल्याला येत असतात किंवा नकळत कुणीतरी आपली अडचण न सांगताही
समजून घेत असत, सोडवत असत, अचानक, अनपेक्षित घटना घडत असतात ज्यांमुळे एखादी कठीण
गोष्ट सुकर होते. अशा प्रत्येक वेळेस मी हात जोडते आणि त्या त्या वेळेस देवाने पुन्हा
एकदा प्रत्यय दिला हे जाणवत. लहानपणी बाबांनी एक भजन शिकवलं होत. त्यात “लोग कहते है भगवान आते नाही.. रुक्मनीकी
तरह हम बुलाते नहीं.. द्रोपदिकी तरह धुन लगाते चलो..” अशा पंक्ती आहेत. खरंच..
तेवढी तळमळ कदाचित अजून उत्पन्न झालीच नाही. म्हणून आपण सामान्य आहोत असं जाणवत.
पण त्याच भजनात पुढे आहे की, “वक्त आएगा ऐसा कभी ना कभी.. हमभी पायेंगे प्रभुको
कभी ना कभी.. ऐसा विश्वास दिलमे जगाते चलो.. कृष्ण गोविन्द गोपाल गाते चलो..” एवढीच एक इच्छा मनात
ठेऊन दर दिवशी नारायणाचे नाव घेते. तुम्हीही नाव घेत रहा. तो भेटेलच. तूर्तास राम
राम.
- वैदेही सच्चिदानंद शुभांगी शेवडे.