चूक
“ आई, किती वेळा सांगू तुला.... मला
नाही बोलायचंय या विषयावर आता काही.”
“ अग सोनल, पण जरा......”
“ आम्ही निर्णय घेतला आहे आणि मला खरंच वेळ नाहीये बोलायलाही तुझ्याशी. पाहतेस
ना, एकमेकांशी निवांतपणे बोलण्यासाठीही वेळ नाहीये इकडे आम्हाला आणि त्यात मुलाची
जबाबदारी....!! मुळीच शक्य नाही. हा आठवडा भरपूर काम आहे ऑफिसमध्ये, त्यामुळे
पुढच्या आठवड्यात हॉस्पिटलमध्ये दाखल होईन.”
“ तुम्ही दोघे घरी या. आपण निवांतपणे बोलू यावर. मग पाहू. चालेल?”
“ आई, मलाही हे करताना काही फार चांगलं वाटत नाहीये. पण एक मुल सांभाळणं म्हणजे
किती त्रास सहन करावे लागतात माहित्ये का तुला?”
“ तू मला विचारते आहेस? अग, आई आहे मी तुझी. तुला मोठं केलंच आहे की मी.”
“ तेच... अगदी तेच म्हणते मी. मला बाळाला सांभाळायचं आहे. फक्त मोठं नाही
करायचंय.”
“ म्हणजे?? काय म्हणायचं आहे तुला?”
“ जाऊ दे ना आई. कशाला जुन्या गोष्टी काढायच्या परत परत...! मला खूप काम आहे
इकडे. एक महत्त्वाची मिटींग सुरु होईलच इतक्यात. मला जायला हवं.”
फोन समोरून
ठेवण्यात आला. पण सोनलच्या आईच्या डोळ्यात मात्र
पाणी साचलं होतं. डोळ्यातलं पाणी गालांवर ओघळलं तेव्हा नकळतच सुमेधा ताईंच्या मनात
अजून एक विचार आला... किती वर्षांनी रडू आलं असेल आपल्याला? मनातली घालमेल दूर
करण्यासाठी त्यांनी काहीतरी काम करायचं ठरवलं. पण खरंच.. काय काम करणार? सगळी कामं
तर यशोदा बाई करून गेल्यात. मग उगाचंच आवरलेलं कपाट परत आवरायला घेतलं. त्यात
त्यांना बऱ्याच जुन्या आठवणी सापडल्या. कपाटात अगदी खालच्या कप्प्यात कशातरी
कोंबलेल्या. अगदी मनातही त्या अशाच होत्या.... खोल दाबून
ठेवलेल्या,अस्ताव्यस्त.... एक अर्धा विणलेला पाय मोजा... काय झाला बाई नंतर
त्याचं? का पूर्ण नाही करता आला मला? अरे हो.... मार्च महिना होता, ईयर एंडिंगची
कामं होती. मग नाहीच जमलं पुढे काही. हे डोहाळजेवणाच्या वेळेचे फोटो. शिशिर आलेच
नाहीत वेळेवर. सगळा कार्यक्रम झाल्यावर साहेब आले आणि तेही थकून लगेच झोपून गेले.
साधं विचारलंही नाही पेढा सापडला की बर्फी. खूप राग आला होता तेव्हा. मी जरा बोलले
यावर तर म्हणे बायकांचा कार्यक्रम तर होता. मी कशाला हवा होतो तिकडे? नाही म्हणजे
खरंच पुरुष मंडळींचा काही खास सहभाग नसतो तिथे. पण, बाळ तर दोघांचं असतं ना?
बाळाच्या बाबांनाच काही विशेष कौतुक नव्हतं तर आईनीच का म्हणून सगळं कौतुक आणि इतर
जबाबदारी याचा पसारा सांभाळावा? असे अनेक विचार तेव्हा आले मनात. खरंच ऑफिस
सांभाळून ही जबाबदारी पेलणं खूप कठीण. का हे असं आपल्या अंगावर पडलं? कंटाळवाणं
वाटायचं. आपल्या मनाशीच स्पष्ट बोलतानाही आज मात्र का कुणास ठाऊक पण त्या चरकल्या.
अल्बमची पुढची पानं जणू एक एक आठवण पुन्हा ताजी करत होती. सोनलचा जन्म... तिने रंगायला
लागणं... चालण्यासाठी उचललेलं पाहिलं पाउल.... शाळेचा पहिला दिवस.... किती
वर्षांनी आज परत त्या त्यांच्या छकुलीला मनमोकळं हसताना पाहत होत्या. एका फोटोत
शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी नटलेली त्यांची ठकी पाहून त्यांनाही हसू फुटलं.
पण पुढच्याच फोटोत ती नटलेली चिमुरडी दोन्ही हात पसरून रडत होती. काय झालं होतं
तेव्हा? बरोबर..... तिच्यासोबत
कार्यक्रमाला जाता येणार नव्हतं म्हणून तिला रडू आलं होतं. किती रडलं होतं बाळ
माझं तेव्हा. मिटींगदेखील महत्त्वाची होती. रात्री तिच्यासाठी एक बहुली आणली होती.
पण घरी येईपर्यंत एवढा उशीर झाला होता की सोनल यशोदा बाईंच्या कुशीत झोपूनही गेली
होती. तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला असता ती झोपेतच “आईला वेळच नसतो
माझ्यासाठी...” असंच काहिसं बडबडत होती.
सुमेधा ताईंचे
डोळे आता परत पाण्यानी डबडबले. पुढच्या फोटोंमध्ये त्यांच्या जागी यशोदा बाईच दिसत
होत्या. नंतर मित्र मैत्रिणी.... आणि मग आशुतोष.... सोनलचा नवरा. सोनलचं
त्याच्यावर असलेलं प्रेमही घरी पहिल्यांदा यशोदा बाईंनांच तर तिने सांगितलं होतं. असं
का झालं असेल? का आपल्या मुलीला आपल्यापेक्षा कोणी परकी व्यक्ती जवळची वाटली? कुठे
गणितं चुकली असतील? कदाचित माझं आणि शिशिरचं कामानिमित्तानं सतत बाहेर
राहणं.....?? नाही... नाही... यात काय चूक? हे सगळं तर आपण सोनलसाठीच केलं. त्या
स्वतःचीच समजूत घालत होत्या. स्वतःचं वागणं स्वतःला पटवून देण्याचा प्रयत्न करत
होत्या. पण काहीतरी चुकल्याची आज प्रकर्षाने त्यांना जाणीव होत होती. सहन
करण्याच्या पलीकडे गेल्यावर मात्र त्यांनी परत सगळं कसंबसं कपाटात बंद केलं. ते
कपाट तर बंद झालं पण मनाच्या कपाटात बऱ्याच विचारांची उलथापालथ होत होती आणि ते
कसंतरी आवरून टाकणं किंवा बंद करणं शक्यच नव्हतं. मनाला जरा तरतरी यावी म्हणून त्यांनी
गरम गरम कॉफी करून घेतली आणि वृत्तपत्रात तोंड खुपसलं. पण लक्ष मात्र कशातच लागत
नव्हतं. आपल्या विचारांना पूर्णविराम मिळावा म्हणून त्यांनी घराबाहेर फेरफटका
मारायला जाण्याचं ठरवलं. हातानेच केस सारखे करून आहेत त्या कपड्यानिशी त्या
घराबाहेर पडल्या. काही विचार न करता वाट फुटेल तसं चालत राहायचा विचार त्यांनी
केला. ‘लोकमान्य टिळक म्युन्सिपल जनरल हॉस्पिटल’.. त्याचं लक्ष त्या पाटीकडे गेलं आणि बरीच वर्ष
जुनी एक आठवण ताजी झाली.
सुमेधा ताईंना
लग्नानंतर जेमतेम दोन महिन्यात दिवस गेले आणि वय अवघं अठरा वर्षांचं.. पण या
बातमीने त्या मोहरून गेल्या. घरच्यांचा विरोध पत्करून लग्न केल्यामुळे दरदिवशी
काहीतरी विचार मनात येऊन एकटं वाटायचं. दोघांनी परस्पर संमतीने पूर्ण विचार करुन
लग्नाचा निर्णय घेतला होता तरी आप्तांच्या वियोगाचं दुःख दोहोंच्या मनात सारखंच
सलंत होतं. आता या बातमीमुळे तरी सगळं मळभ दूर होईल असं त्यांना वाटत होतं. शिशिर
कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यावेळी कुठे होते मोबाईल फोन! त्यांनी लगबगीनं
आपल्या माहेरचा रस्ता गाठला... मग सासरचा.. पण पदरी निराशाच आली. शिशिर परत
येईपर्यंत काहीच सुचत नव्हतं. दोन दिवसांनी ते आले तेव्हा त्यांना ही गोड बातमी
सांगितली. त्यांच्या चेहऱ्यावरही आनंदाचा लवलेश नव्हता. “आत्ता आपल्याकडे पैसे
नाहीत. मला आपल्या मुलांसोबत असं चाळीत, पै न् पै चा हिशोब करत नाही रहायचं.
त्यामुळे आत्ता हे शक्य नाही.” त्यांच्या बर्फासारख्या थंड आणि नकारात्मक
प्रतिसादामुळे सुमेधा ताई पार कोलमडल्या. त्यांनी तरीही शिशिरना समजवायचा आटोकाट
प्रयत्न केला. पण ते ठाम होते. दोन दिवसांनी दोघांनी हॉस्पिटल गाठलं. प्रकृती नाजूक
असल्याने डॉक्टरांनीही लगेच बाळंतपण नको असा सल्ला दिला. शरीराचे घाव भरले तरी
मनातले घाव सतत ठुसठुसत होते. स्वतःचं घर, गाडी, दोघांचे गलेलठ्ठ पगार यासाठी पुढे
जवळपास सहा वर्ष लागली. सततची धावपळ, त्यात शिशिरचा अलिप्त स्वभाव त्यामुळे
वाटणारा एकटेपणा.. सगळ्यांची परिणीती म्हणून सुमेधा ताईंच्यामागे आजारपणं लागली.
आता दोघेही बाळाच्या आगमनासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले खरे.. पण प्रकृती
अस्वास्थ्यामुळे सोनालची चिमुकली पाऊले त्यांच्या अंगणात उतरायला डॉक्टर, औषधं, नवस,
गंडे-दोरे, असं करत करत पुढची सात वर्षें गेली. साहजिकच जे सहजासहजी मिळत होतं ते
आपल्याच हाताने गमावल्यावर यंत्रवत अशा धावपळीच्या आयुष्याची आणि सातच्या
स्पर्धेची सवय लागल्यावर कधीतरी स्वतःलाच हवहवसं वाटणारं आईपण आता त्यांना नकोसं
झालं होतं. तेरा वर्षांपूर्वी जे सुख त्यांनी गमावलं होतं ते आता पदरात पडूनही
त्यांना त्यात स्वारस्य उरलं नव्हतं. त्यांना पुढे घ्याव्या लागणाऱ्या सुट्ट्या,
त्याचा त्यांच्या कामावर होणारा परिणाम, पदोन्नतीसाठी काही काळ थांबावं लागणार,
असेच विचार आता सतावत होते. घरीही ओल्या बाळंतीणचे कोडकौतुक करणारे कोणीही नव्हते.
यशोदा बाई याचं काळात भेटल्या. मग घर आणि पोर विश्वासाने त्यांच्यावर टाकून सुमेधा
ताई आपल्या कामात पार गुरफटल्या. पोरीसाठी खेळ, कपडालत्ता, चांगल्या शाळा
कॉलेजमध्ये प्रवेश, तिचे क्लासेस कशातच त्यांनी काही कमी पडू दिलं नाही. पण हे करता
करता त्या लेकराकडे चार क्षण मायेने पाहण्याचं राहूनच गेलं.
आता सोनलच्या
बोलण्याचा अर्थ त्यांना उमगला होता. तिच्या निर्णयाला आपणच कारणीभूत आहोत या
विचाराने त्यांना रस्त्यातच रडू फुटलं. टॅक्सी घेऊन त्या घराकडे वळल्या. सोनलला हे
सगळं कसं समजवायचं? आपण चूक केली. पण तिने करू नये. बाळाला सांभाळायला, दोघांची
काळजी घ्यायला आपण आहोत हे तिला कसं सांगायचं? या विचारात त्यांनी नेहमीप्रमाणे
यशोदा ताईंना फोन लावला. नाही.. आपण परत तेच करत आहोत.. त्यांनी फोन बंद केला.
आपल्या मुलीला आपण स्वतः समजू शकतो. आपली चूक तिच्यासमोर मान्य करण्यात कसला
कमीपणा? त्यांनी मनाशी ठरवलं. घरी पोहोचेपर्यंत त्यांनी बरेचदा सोनालशी संपर्क
साधण्याचा प्रयत्न केला पण तिने एकदाही फोन उचलला नाही. लहानपणी सोनलला काही हवं
असलं किंवा काही सांगायचं असलं की ती घरी चिट्ठी ठेवून देत असे. मग ते मान्य
झाल्यावर लाडाने दोन्ही हात पसरत असे. मिठी मारून गोड पापा देत असे. त्यांना
आठवलं. आज त्यांना तिला हट्ट सोड असं सांगायचं होतं आणि खरंतर माफी मागायची होती.
त्या लगेच तिला चिट्ठी लिहायला बसल्या. बराच वेळ.. स्वतःशीच हसत.. स्वतःशीच रडत
होत्या. पण आता त्यांना खूप हलकं वाटत होतं. त्यांनी ते पत्र सोनलच्या डबेवाल्या
काकांकडे सोपवलं. “ताईला सांगा मी रात्री जेवायला वाट पाहते.” त्यांनी काकांकडे
निरोप दिला.
सुमेधा ताईंची
घालमेल आता वाढत होती. आशुतोषचाही फोन सोनल उचलत नव्हती. दोघेही आठ वाजल्यापासून
अस्वस्थपणे तिची वाट पाहत होते. साडे दहाच्या सुमारास दाराची कडी वाजली. सोनलच
असणार.. लहानपणी अगदी अशीच कडी वाजवायची ती.. स्वतःशीच पुटपुटत त्या उठल्या. दार
उघडलं तर पाहतात काय.. सोनल.. डोळ्यातून घळघळा अश्रू वाहत होते आणि दोन्ही हात
पसरून ती दारात उभी होती. त्यांनी तिला घट्ट मिठी मारली. सोनलच्या हातात पत्र ते
पत्र होतं. “आई, तू सगळं माझ्यासाठीच करत होतीस आणि तुझा अशा वागण्यामागे काहीतरी
कारण असेल हे मी समजूच शकले नाही गं.. मला माफ कर.. मी चुकले.. चुकले...” सोनल
बोलतच होती. तिला आत घेऊन ताईंनी पाणी दिलं. तिचा हात हातात घेऊन त्या म्हणाल्या,
“चूक माझी होती.. आणि ती मला समजली आहे. तू फक्त तिची शिक्षा या बाळाला नको देऊस.
मला वचन दे तू या बाळाला जन्म देशील. ” सोनललाही खरंतर बाल हवं होतं. पण
लहानपणीच्या कटू आठवणी घर करुन होत्या. आता मात्र तिला सगळं समजलं होतं. आईबद्दल
असलेल्या सगळ्या तक्रारी एका क्षणात दूर झाल्या होत्या. तिने वाचन दिलं आणि लवकरच
दोघी मायलेकी नव्या पाहुण्याच्या स्वागताच्या तयारीमध्ये गुंतल्या.