रविवार, २३ सप्टेंबर, २०१२


थँक यू मौसी

          परीक्षा अगदी तोंडावर येणं आणि तरीही प्रकल्प आणि अभ्यास अपूर्ण असणं.. मग ऐनवेळी येणारं दडपण.. घाईघाईत सगळं संपवण्याच्या नादात होणारी दगदग... त्यामुळे आपलीच आपल्यावर होणारी चीडचीड.. मग परीक्षेच्या आधी देवाला “देवा, आत्ता मला मदत कर. पास कर नीट. मी पुढच्या वेळेस असं नक्कीच करणार नाही.” अशी मनोभावे केलेली प्रार्थना.... की स्वतःच स्वतःला मारलेली थाप! जवळपास आपण सगळेच यातून गेलो आहोत. अशाच एका वैतागलेल्या संध्याकाळी मी साडे सातच्या सुमारास छत्रपती शिवाजी टमिर्नसवरून कल्याणच्या दिशेला जाणारी ट्रेन धावत पळत पकडली. आत चढते न चढते तोच ट्रेन निघाली. कशीबशी बसायला जागा मिळाली नशिबाने! कंटाळलेल्या मी एक सुस्कारा टाकला आणि आता काय काय करायचं राहिलं आहे आणि सगळं काम संपवून अभ्यासाला सुरुवात कधी करायची अशा विचारात गुंतून गेले.

          माझी विचार मालिका कर्कश आवाजाने खंडीत झाली. भांडणं.. मुंबईत लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांना अगदी नित्यनेमाची अशी गोष्ट. बऱ्याच महिलांसाठी तर हे एखादे शक्तीवर्धक औषध असावं असं मला वाटतं. दिवसभराच्या कामाची, घरी पदर खोचून कामाला लागायची, मुलांचा अभ्यास घेण्याची, सगळ्याची ताकद या भांडणातून त्यांना मिळत असावी. कोण म्हणतं शिव्या केवळ पुरुषांनाच जास्त येतात. त्यांनी जरा गर्दीच्या वेळेस मुंबईची लोकलवारी आणि तीही खासकरून दुसऱ्या वर्गाच्या डब्यातून करावी. महिला प्रत्येक क्षेत्रात कशा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत याचे अद्भूत चित्रच आपल्या डोळ्यांसमोर साक्षात प्रकट होते. खिडकीतून डोकावून पाहते तर दादर येत असल्याचं समजलं. आता अजून गर्दीचे लोंढे आत शिरणार.. अजून आवाज.. अजून भांडणं.. मी विचार करूनच वैतागले. पण बसायला निवांत जागा मिळाली म्हणून जरा बरं वाटलं. दादर आलं, गाडी थांबली. बरीच गर्दी सोबत घेऊन गाडी स्थानकावरून निघाली. त्या भांडखोर काकूंना भांडणाचा जोर परत चढला. त्यांचा टिपेला जाणारा फाटका आवाज ऐकून बऱ्याच जणी चुकचूकल्या. त्यांना शांत करायला जाणाऱ्यांच्या अंगावरही काकू चवताळून येत होत्या. एवढ्यात अजून एक मोठ्ठा आवाज आला... “क्या रे मेरी मीना कुमारी! क्यू तेरी जली? क्यू इतना चील्लाती रे तू?” बऱ्याच जणींच्या माना त्या विचित्र अशा आवाजाकडे वळल्या आणि चमत्कारच झाला.. काकूंचा आवाज पूर्ण शांत झाला. काकूंना गप्प करुन तिने आता मोर्चा आत बसलेल्या महिलांच्या दिशेने वळवला.

          आकाशी निळ्या रंगाची साडी, पिवळा ब्लाउज, कपाळावर मोठ्ठी लाल बिंदी, भांगेत गडद सिंदूर, तश्शीच गडद लिपस्टिक, हातभार बांगड्या, गळ्यात डोरलं आणि ठसठशीत माळ आणि काळी कभिन्न ती.. मी बसले होते तिथे आली.. “ ए मेरी दिपिका, मुझे देखके सोनेका नाटक करती क्या? बोल ना काजल तू उसकू.. ए माधुरी क्या स्माईल रे तेरा.. मै तो फिदाच होगई..” ती आली आणि पाहता पाहता वैतागलेल्या, मरगळलेल्या त्या ट्रेनच्या डब्याला एक टवटवी आली. सगळीकडे हास्याची कारंजी उसळली. मोठ्यांनी टाळ्या वाजवत ती माझ्यापाशी आली. मी तर केव्हापासून कौतुकाने तिलाच पाहत होते. जादूची कांडी फिरवावी तसा तिने सगळ्यांच्या मनावर ताबा मिळवला होता. सगळ्याचजणी तिच्याकडे आश्चर्याने पाहत होत्या. काही मात्र ती जवळ आली तोंड फिरवत होत्या पण ही मात्र कशाचाच फरक पडून न देता सगळ्यांकडून पैसे मागत होती आणि तेही त्यांची खेचत.. त्यांच्याशी मजामस्ती करत. “ये अमृता राव देखेगी क्या मुझे सिर्फ? कुछ तो दे ना.. इतने मजे तो ले रही थी कबसे..” तिने मला आवाज दिला. मलाही यावर मनापासून खळखळून हसू आलं आणि तिच्याचसाठी हातात काढून ठेवलेली नोट मी तिच्या हातात दिली. जणू ती भीक नाहीच तर तुम्हाला दोन क्षण हसवत आहे आणि त्याचे तुम्हाला वाटतील तेवढे पैसे तुमच्याकडून घेत आहे असंच वाटलं अगदी. संपूर्ण डब्यात अशीच सगळ्यांची बारशी करत आणि पैसे जमवत ती फिरली.

          ठाणे सोडल्यावर गर्दी जरा ओसरली. कळव्याला गाडीमधून उतरण्या आधी लहान मुलासारखी “टाटा बाय” असंसुद्धा सांगायला आली. ती जात होती.. सगळ्यांना क्षणात हसवणारी.. मनावरचा भार थोडा हलका करणारी.. सगळ्यांना काहीबाही नावं देणारी.. पण... तिचं नाव काय असेल? मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणाले, “सबके नाम आपको पता है ना ! अपनाभी नाम जरा बताती जाओ !” तिने विचित्र अशा पण आश्चर्यपूर्ण नजरेने माझ्याकडे पाहिलं. “मेरा नाम? बस मौसी बुलालो.. मौसीही हू मै |” तिच्या डोळ्यात पाणी आलं की मलाच असं जाणवलं? तिने झटकन आपला हात माझ्या हातून सोडवून घेतला. गाडी कळव्याला थांबली. मीही तिच्या मागोमाग दारात गेले. ती उतरली. तिने मागे वळून पहिले आणि मी जोरात ओरडले, “थँक यू मौसी.. फिर मिलते है|” तिनेही निरोप द्यायला हवेत हात हलवला. मनावरचा ताण झटक्यात कमी केला होता तिने. आजही ट्रेनने प्रवास करताना मी मौसीची वाट पाहते. परत कधी भेटेल ती मनावरचं ओझं क्षणात हलकं करण्यासाठी..? तुम्हाला भेटली तर तुम्हीही आवर्जून म्हणा. “थँक यू मौसी..”

रविवार, १५ जुलै, २०१२


तमसो मा ज्योतिर्गमय

काही दिवसांपूर्वी गुरुपौर्णिमा होती. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. पण आजकाल भ्रमणध्वनी आणि महाजालामुळे गुरूंची थेट भेट न घेताही त्यांना शुभेच्छांचे संदेश पोहोचवता येतात. गुरु आशिर्वादही असेच पाठवतात. असे चित्र सर्रास दिसू लागले आहे. तसेच वर्षभर काहीच संभाषण अथवा भेटीगाठी होत नसतानाही केवळ या एकाच दिवशी बरेचजण आपल्या गुरुजनांना एक संदेश पाठवून परत वर्षभर त्यांना विसरून जातात. काही काम असेल किंवा पुढच्या गुरुपौर्णिमेला परत त्यांना आपल्या “गुरूंची” आठवण येते. त्यातही अनेकदा हे गुरु म्हणजे शाळा महाविद्यालय अथवा अन्यत्र ठराविक विषय शिकवणारे शिक्षक असतात. काही वेळेस काही अध्यात्मिक गुरुही असतात. आपल्या धर्मात सांगितल्याप्रमाणे काहीजण सतत योग्य मार्गावर चालण्यासाठी गुरूच्या शोधात असतात आणि यातच खरंतर वाट भरकटतात.
यासाठीच गुरु या शब्दाचा नेमका अर्थ आपण जाणून घेणे खूप आवश्यक आहे. गुरु या संस्कृत शब्दातील “गु” हे अक्षर मनातील अज्ञानरूपी अंधःकार दर्शवतं तर “रु” या अक्षराचा अर्थ ज्ञानरूपी प्रकाश असा आहे. असा अर्थ लक्षात घेतल्यावरच या शब्दाची नेमकी व्याप्ती समजते. याचाच अर्थ गुरु एकच असावा अथवा तो शिक्षकाच असावा असं काहीच नाही तर ज्या कोणी व्यक्ती आणि घटना आपल्याला काही बोध देतात त्या सर्वच आपल्या गुरु आहेत. एकनाथी भागवतामधल्या काही ओळी मला यासंदर्भात आठवतात;
जो जो जयाचा घेतला गुण
तो तो म्या गुरु केला जाण
गुरुसी आले अपारपण
जग संपूर्ण गुरु दिसे
हे कसे? याचे उत्तरही पुढे सापडते. संगीत ऐकू आल्यावर हरिणे लुब्ध होऊन त्या दिशेने धावत सुटतात आणि या मोहापायीच पारधी त्यांना पकडतो यातून असे अविचाराने वागू नये आणि मोहात अडकू नये हा बोध होतो तर वेश्या रोज नटून बसते, गिऱ्हाईकाची वाट पाहते आणि तो न मिळाल्यास हिरमुसली होते, भेटल्यास खुश होते. ती ज्या आतुरतेने वाट पाहत असते त्यातून भक्ती आणि व्याकुळता तसेच फलप्राप्तीचा आनंद शिकता आला म्हणून अगदी अशा वेश्येलाही त्यांनी गुरु मानले आहे. दत्तगुरुंचे अशा २४ सजीव निर्जीव घटकांकडून काय काय शिकले आणि ते त्यांच्या गुरुस्थानी कसे झाले हे अत्यंत खुबीने यात मांडण्यात आले आहे.
          खरंच.. प्रत्येक व्यक्ती, घटना आपल्याला काहीतरी शिकवून जातात. जे आहे तसंच  ते न पाहता त्यातून घेण्यासारखं काय काय आहे ते पाहिल्यास अवघे जगच आपले गुरु आहे याचं प्रत्यय येईल. गुरूच्या शोधात भरकटत राहण्यापेक्षा किंवा एखादी अप्रिय व्यक्ती आणि घटना यांना दोष देण्यापेक्षा त्यातूनही काही शिकता आले.. घेता आले.. तर आणि तरंच आयुष्य सुकर होईल. तेव्हा दर गुरुपौर्णिमेला अशा काही अनपेक्षित गुरुंचीही आठवण असू द्या  आणि महत्त्वाचे.. असे गुरु ओळखायला शिका तरच अंधारातून उजेडाकडे यशस्वी वाटचाल शक्य होईल.

शुक्रवार, १५ जून, २०१२


मृदगंध 

यंदा नेहमीपेक्षा पावसाने जरा उशीराच हजेरी लावली. आधीच महागाईनं त्रासलेले आम्ही मुंबईकर उकाड्यानी अधिकच त्रस्त झालो होतो. हवामानखात्यानी जरी पाऊस उशिरा येण्याची वेगवेगळी कारणं सांगितली असली तरी याचं एक मुख्य कारण फेसबुक असावं असं वाटतं.. काय आहे.. एवढ्या लोकांच्या पावसासंबंधीच्या पोस्टला हजेरी देऊन मग त्याला उशीर होणं स्वाभाविकच आहे ना..!!

पण एका तप्त रात्रीनंतर अगदी सकाळ उजाडताच पावसाने रिमझीम रिमझीम करत मन तृप्त केलं. पहिला पाऊस... वाह..!! कितीही मोठी झाले तरी काही गोष्टींचं वेड कसं जराही कमी होत नाही..!!  म्हणजे.. रस्त्यावरची पाणीपूरी, लहान मुलांच्या बोबड्या बोलण्यातली गम्मत, मोगऱ्याचा गजरा, आपल्या प्रिय व्यक्तीच्या मिठीतली ऊब, समुद्राच्या लाटांशी हितगुज आणि अर्थात पावसात मनसोक्त भिजणं आणि मंद मंद दरवळणारा मृदगंध भरभरून घेणं.....! कितीही वेळा या गोष्टी केल्या - अनुभवल्या तरी याचं वेड, ओढ, गम्मत, मजा, नशा, मुळीच कमी होत नाही, उलट क्षणाक्षणाला वाढतंच असते. त्या सकाळीही पावसासोबत मृदगंध वातावरण उल्हासित करत होता. एक वेगळाच उत्साह, चैतन्य आपल्यासोबत घेऊन आला होता. गरमागरम ब्लॅक कॉफीचा मग हातात घेऊन मी खिडकीत बसले. मधेच हात बाहेर काढून ते इवले इवलेसे मोती हातावर घेत होते. झाडांच्या वर वरच्या पानांवर क्षण दोन क्षण विसावलेले ते थेंब हळूच ओघळून खालच्या पानांवर उतरत होते आणि मग मातीशी एकरूप होत होते. जणू एवढ्यासाठीच ते जन्मले होते....

लहानपणापासून असे किती पावसाळे आले आणि गेले. पण प्रत्येक पाऊस वेगवेगळ्या आठवणींना नकळत उजाळा देत गेला.. एवढेच नाही तर कित्येक नवनवीन आणि मोलाच्या आठवणी देतही गेला. आठवणींचा पेटारा सतत समृद्ध करत राहिला. मनाला आलेली मरगळ झटकत, नवीन उमेद देत गेला. मला वाटतं या मृदगंधामध्येच याचं काहीतरी गुपित लपलं असावं. का बरं सगळ्यांना पावसाएवढाच हा गंधही वेड लावतो? कोणतंही अत्तर यापुढे फिकंच पडेल नाही? कोणीतरी या मातीच्या सुवासाचे अत्तरही बनवले आहे म्हणे.. मोकळेपणाची मजा या सुवासाची खरी खासियत आहे. मग नैसर्गिकरीत्या आणि अशा खास वातावरणात सहज, मनसोक्त घेता येणारा हा गंध खरंच असा बाटलीत बंद करता येईल?

का बरं हे वातावरण, हा सुवास अनेक आठवणीसोबत आणतो? का नवीन गोष्टीही देऊन जातो? उगाचच मला हे प्रश्न त्रास देत होते. मग आठवणींनी अलगद मला कवेत घेतलं. एखाद्या चित्रपटासारख्या त्या झरझर डोळ्यांसमोर येऊ लागल्या. सकाळी धावपळ करत मला बालवर्गात सोडणारे माझे बाबा, अभ्यासाचा कंटाळा करायचे म्हणून माझ्या मागेमागे फिरून तो करायला लावणारी माझी आई, कोणीतरी एक बिस्कीट दिलं तर त्याचं अर्ध माझ्यासाठी काढून ठेवणारा माझा दादा, माझी शाळा, ती सुटल्यावर पावसाळ्यात बेडूक पकडायला येणारी मज्जा आणि मग आईचा ओरडा, रस्त्यावरच्या कुत्रा – मांजरीच्या पिल्लांना हात लावण्यासाठी पळत सुटणारी मी, कथ्थकचा रियाझ, नाटकाची तालीम, चित्रकलेचा वर्ग, कॉलेजच्या मित्रमैत्रिणींसोबत केलेली टवाळकी, लगाम सुटलेल्या घोड्याप्रमाणे या आठवणी येतंच होत्या. धडाम् असा मोठ्ठा आवाज झाला आणि माझी तंद्री तुटली. वीजेचा गडगडाट.... इथे रिमझिमत असला तरी कुठेतरी जोरात पडत असावा. पण त्या आवाजांनी माझी स्मृती मालिका केवळ खंडितच झाली नाही तर आजच्या बदललेल्या परिस्थितीची बोचरी जाणीवही झाली. काळाच्या ओघात किती गोष्टी बदलल्या.. निसटल्या.. मागे सुटल्या... नकळत डोळ्यातूनही अश्रू अलगद गालांवर बरसले.. शाळा संपली, आता कोण सोडायला किंवा घरी घेऊन जायला येणार? अभ्यास आपला आपण करता येऊ लागला, आता आई कौतुकानं माझी प्रगती पाहते. पण तिचा ओरडा..? तेव्हा नकोसा वाटायचा तेवढाच आता हवा हवासा वाटत होता. दादा तर शिकायला गेली ७ वर्ष घराबाहेर आहे. मग आता कसली वाटावाटी? लटके राग आणि भांडणं.. क्वचित कधीतरी अगदी उरावर बसून केलेली मारामारी.. आई बाबांचं कोण जास्त लाडकं यावरून घातलेले वाद... हरवलंच कुठेतरी सगळं.. कथ्थकचा, चित्रकलेचा वर्ग, नाटकाच्या तालीमी सगळ्यांवर पडदा पडला. कॉलेज संपलं आणि सगळेच आपापल्या कामात व्यस्त झाले. अचानक खूपच एकटेपणाची भावना तीक्ष्ण अशी जाणवली. पाऊस थांबून मळभ दाटलं होतं. आतही... बाहेरही... विचित्र बेचैनी जाणवत होती... थोडा वेळ असाच गेला.. सुन्न.. स्तब्ध.. एकाकी... 


अचानक पावसाने जोरदार कोसळायला सुरुवात केली. मातीचा सुगंध वाढला. पावसाचे शिंतोडे माझ्या अंगावर आले. थोडंस बरं वाटू लागलं. तेवढ्यात आई झाडांना पाणी घालायला आली. म्हणाली, “एवढ्या गरमीमुळे माझ्या गुलाबाच्या रोपट्यांना त्रास होत होता. वाटलं पावसापर्यंत तग धरतील की नाही.. पण आता मस्त पालवी फुटेल. छान फुलं येतील.” हे ऐकलं आणि माझ्या डोक्यात विचारांची वीज कडाडली, प्रकाश पडला... खरंच... एकामागून एक असं ऋतुचक्र आपलंही बदलत असतंच. आशा निराशेचा शिवा शिवीचा खेळ अगदी या अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरींसाराखाच जणू... आई बाबांनी एवढ्या खस्ता खाऊन शिकवलं, मोठं केलं. एक चक्र पूर्ण झालं. आता त्यांचा आनंद आणि समाधान महत्त्वाचं. खेळताना डॉक्टर होणारा दादा आता खरंच डॉक्टर झाला. आयुष्यभर एकाच जागी राहूनच केवळ सोबत करता येते का? मनाने तर आम्ही नेहमीच जवळ असतो. कॉलेज संपलं आता स्वतःच्या अस्तित्वाची नवीन ओळख करून देण्याची वेळ सुरु झाली. जुने छंद मागे पडले पण नवीन आवडीही निर्माण झाल्याचं की...

आता संपूर्णपणे समाधानाने मी श्वास भरभरून घेतला आणि अचानक त्या कोड्याचा उलगडाही झाला. मुदगंध हा पावसाची ग्वाहीच आपल्याला देत असतो. दूरवर कोसळणाऱ्या पावसाची खबर इथे तिथे पसरवतो आणि आपल्याला पाऊस येईल असा दिलासा देतो. रणरणत्या उन्हानी शुष्कं झालेली धरती आता परत हिरवी गार दिसणार, हवेत गारवा येणार, पिक पाणी व्यवस्थित मिळणार, कॉफी आणि कांदा भाजी असे बेत होणार, पाऊस खूपच झाला की कामावर दांडी मारता येणार, असे एक एक मनसुबे आपण आधीच आखत असतो आणि ही सारी कल्पनांच्या भरारीची किमया पावसाआधी हा मृदगंध घडवून आणत असतो. मग हा वेड लावणारंच ना..! वातावरणातील नैसर्गिक बदलांचा थेट परिणाम आपल्या मनावर होत असतो असं मानसशास्त्रज्ञ म्हणतात. अगदी खरंच तर आहे हे. तसंच काहीसं माझंही झालं होतं. धो धो बरसणाऱ्या पावसाने झाडांवरची माती जशी निघून पाने स्वच्छ होतात तसंच मनही आता स्वच्छ आणि टवटवीत झालं होतं. जुने विचार मागे टाकून नव्या विचारांचे कोंब अंकुरीत होत होते. मी परत कॉफीचा मग भरला आणि गरमागरम घोटासोबत नभातून तसंच “त्याच्या” नजरेतून, स्पर्शातून बरसणाऱ्या पावसात एकाच वेळी चिंब चिंब भिजताना कशी मजा येईल या विचारात गुरफटले...!!

शुक्रवार, ८ जून, २०१२


त्या टोकावर मी तुझीच वाट पाहत असेन... 


तू येशील जगाची सफर करून,
येशील चंद्र चांदण्यांना हात लावून,
येशील तुझ्या स्वप्नातलं जग जिंकून...
तू विसरलास जरी परतीचा रस्ता...
तरी त्या टोकावर मी तुझीच वाट पाहत असेन..
कितीही दूर गेलास तरी तसंच प्रेम करत असेन.....

माझ्यासोबत असतील तुझ्या आठवणी केवळ..
तू येशील तेव्हा त्यांची ओळख असेल का तुझ्याजवळ??
पण तुझा स्वप्नांची मी काळजी घेईन,
विस्कटलेला संसार नीट सांभाळीन,
आणि तरीही त्या टोकावर मी तुझीच वाट पाहत असेन..
कितीही दूर गेलास तरी तसंच प्रेम करत असेन.....

तू परत येशील तेव्हा खूप खूश असशील,
तुला हवं ते सगळं मिळवून आला असशील,
इथली मी मात्र तुला आता वेगळीच वाटेन...
सगळं तेच असलं तरी..मी त्या जुन्या तुझ्यावरच प्रेम करत असेन..
आणि म्हणूनच तू आलास तरी.. त्या टोकावर त्या जुन्या तुझीच वाट पाहत असेन...
कितीही दूर गेलास तरी तसंच प्रेम करत असेन.....


सोमवार, ५ मार्च, २०१२

आई



आई म्हणजे आपल्या अस्तित्वाची पहिली ओळख,
आपल्या आयुष्याची पहिली शिक्षक,
आपल्याला सुख मिळवं म्हणून सतत धडपडणारी मूर्ती,
आणि स्वतःची झोप विसरून आपल्या स्वप्नांची सतत करते पुर्ती.

सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१२

रे सख्या.....



सांजवेळी या ठिकाणी आठवांचे नभ कोसळती,
परतीचीही वाट हरवता उगा पाऊले भरकटती,
या अशा अस्वस्थ समयी वळूनी तू बघशील का?
रे सख्या माझिया मनाला साद तू देशील का?

एक रात्र खुललेली.........





एक रात्र खुललेली......... त्याच्या अन् तिच्या श्वासात गुंतलेली........ उलगडलेली......
स्वप्नही अशी डोळे झाकता पाहिलेली....... जगलेली........
अधरांची भाषा स्पर्शाची नशा..... त्यानी तिला दाखवलेली जगण्याची नवीन दिशा......
हाती हात घेताना भीती वाटत होती खरी...... पण विश्वासाची दुलई अंगभर लपेटलेली......
आता पुढे काय हे दोघानाही माहित नव्हते.... तरीही एकमेकांच्या कुशीतच राहायचे पक्के झाले होते....
एका रात्रीचे हे तिचे अन् त्याचे गुपित...... कितीही लपवले तरी सगळ्यांनाच कळले होते......
त्या रात्रीची हीच तर गम्मत होती...... एकमेकांशी नव्यानीच ओळख होत होती....
त्याचा खोडसाळपणा...... तिचा रुसवा...... स्वप्नांसोबत वेळही पुढे जात होती.....
आणि आलाच तो क्षण निरोपाचा..... जीवाला उगीच हुरहूर लावणारा.....
पण यावेळी निरोप घेण्यात वेगळीच मजा होती.... त्यात परत भेटण्याची आशा होती.....
आता तो अन् ती कामात पुरते बुडलेले..... पण मनाने एकमेकातच गुंतलेले....
बऱ्याच दिवसांनी परत भेटीचा योग आला... त्या रात्रीच्या आठवणी आज नव्यानी आल्या.....
जुन्या भेटीचा गंध मनामनात तसा ताजा होता...... पण....
कशी कोण जाणे एक किमया झाली.... त्याची भाषा नकळतच तिच्या ओठी रुळली....
विरहानन्तरच्या भेटीत अधिकच आतुरता होती...... म्हणूनच ही रात्रही तशीच खुलली होती.......
त्याच्या अन् तिच्या श्वासात गुंतलेली........ उलगडलेली होती.....