सोमवार, २० जानेवारी, २०१४



भेटी लागी जिवा लागलीसे आस..!

          
          मनी वसे ते स्वप्नी दिसे असे लहानपणापासून ऐकले आहे. खरंच आहे की.. आपण सतत ज्या गोष्टीचा विचार करत असतो आपल्याला तेच दिसत असत. कधीकधी ही जिद्द एवढी शिगेला पोहोचते की अगदी जळी स्थळी काष्ठी पाषाणी आपल्याला तेवढेच दिसू लागते. त्याच गोष्टीचा विचार आपण सतत करू लागतो. निरंतर असा एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्याने आपोआप आपल्या आजूबाजूची परिस्थितीही आपली मनीषा पूर्ण करण्यासाठी अनुकूल होते. हळूहळू आपण आपल्या ध्येयाच्या अधिकाधिक जवळ पोहोचतो आणि अंतिमतः आपणास निश्चितच ती गोष्ट प्राप्त होते.
          कधीकधी मनाची एक विचित्र अवस्था होते. जवळ सगळंच असूनही एक पोकळी जाणवते. शांतपणे विचार केला की मनातील एक इच्छा तीव्रपणे जाणवते. देवाचं अस्तित्व ठायी ठायी जाणवतं खरं पण तरीही त्याचे सगुण, सदेह रूपातील दर्शन व्हावे असे राहून राहून वाटते. वाडी, पंढरपुर, द्वारका, सोमनाथ, अशा अनेक ठिकाणी जाण्याचा योग आला प्रत्येकवेळेस त्या मायबापाला डोळ्यात साठवताना तो उत्साह असा ओसंडून वाहत असतो की डोळ्यातून ते चैतन्य पाझरू लागते. विश्वाचा धनी तो.. माझ्या इवल्याशा डोळ्यात कसा साठणार! ओसंडून वाहणार हे स्वाभाविकच! काही वर्षांपूर्वी एक कानडी भजन ऐकलं होत. “कृष्णानी बेगने बारो.. बेगने बारो मुखवन्नी तोरो..” कानडी समजत नसल्याने पूर्ण अर्थबोध होत नव्हता पण तरीही ते ऐकताना वेगळाच सुख मिळत होतं. शेवटी त्याचा अर्थ शोधून काढला. “हे कृष्ण, तू त्वरित ये.. त्वरित येऊन तुझ्या मुखाचे दर्शन होऊ दे.” भाव समजायला भाषा समजणं गरजेचंच आहे असं नाही असा प्रत्यय आला.
          श्री गजानन महाराजांवरील पोथीचे पठण करत असता बाळापुरच्या बाळकृष्ण नावाच्या सद्गृहस्थांची एक कथा समजली. बाळकृष्ण मोठे समर्थ भक्त होते. नित्यनेमाने सज्जनगडावर जात असत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना एक वर्ष त्यांचा नेम चुकणार असे वाटत होते. पण बाळकृष्णांची एवढी अगाध श्रद्धा की स्वतः गजानन महाराज त्यांच्या घरी वेष बदलून गेले आणि त्यांना समर्थांच्या रूपात दर्शनही दिले. कथा वाचून झाली आणि मी विस्मयाने महाराजांच्या प्रतिमेकडे पाहू लागले. आपण किती क्षुल्लक आहोत आणि आपल्या मनात त्या विश्वनियन्त्याला भेटण्याची तळमळ एवढी शिगेला कधी पोहोचेल? कधी आपण त्यांचे दर्शन घेऊ शकू? असे विचार येऊ लागले. रात्री झोपताना परत मनाला समजावले. आपल्या आजूबाजूला अनेक व्यक्ती, घटना यातून देव आपल्याला भेटतच असतो. बरेचदा त्या दैवी अंशाची आपल्याला जाणीव होते.. केवढी भाग्याची आहे ही गोष्ट! पण तरीही याची देही याची डोळा पाहण्याची इच्छा काही मनातून जाईना. आजही बरेचदा असं अंतरद्वंद्व चालूच असत. अशा वेळेस किवा मनात निराशा निर्माण करणारे विचार आले की सरळ देवाचा धावा करते. थोडंसं रडू येत पण आपल्या पाठीशी “तो” भक्कम उभा आहे या जाणीवेने निश्चिंत होते. परिस्थिती बदलेल, प्रश्न सुटतील, तो दर्शन देईल असं वाटतं आणि मन शांत शांत होतं.
          २ वर्षांपूर्वी नगर जिल्ह्यातील प्रवरा नदी काठी असलेल्या देवगड या दत्तगुरूंच्या स्थानी जाण्याचा अचानक योग आला. संध्याकाळी आम्ही तेथे पोहोचलो. थंडीचे दिवस असल्याने आल्हाददायक असा गारवा हवेत जाणवत होता. आरतीची वेळ झाली होती. त्या आधी आमचे दर्शन झाले. आम्हाला पुढे मुम्बईमध्ये लवकर पोहोचणे आवश्यक होते त्यामुळे आरतीला थांबणे शक्य नव्हते. पण माझे मन काही तयार होईना. मी शेवटी सांगितलं, “मुख्यद्वारातून बाहेर येण्याआधी आरती सुरु झाली तर मी थांबणार. आरती सोडून कधीही जाऊ नये.” सगळे पटापट पाय उचलू लागले. मीदेखील पुढे अडचण नको म्हणून त्यांच्यासोबत चालू लागले. तरीही मनात हुरहूर लागली होतीच. कान आरतीच्या आवाजासाठी उत्सुक होते. मुख्यद्वार अवघ्या चार पावलांवर असताना शंखनाद झाला आणि आरतीला सुरुवात झाली. गुरुदेवांनी माझी इच्छा पूर्ण केली. क्षणात गहिवरून आलं. माझ्यासोबत आमचे एक सर आणि आणि काहीजण थांबले. मंदिरात आणि आमच्यात अंतर बरंच होत पण तिथून अस्पष्ट का होईना थेट दर्शन होत होतं. दत्तगुरूंच्या मूर्तीसमोर अनेक दिवे तेवत होते. गाभारा उजळून निघाला होता. आम्ही सर्व तल्लीन होऊन हे पाहत होतो. अचानक मी माझ्या सरांकडे वळले आणि जाणवलं की तेही माझ्याकडे पाहत आहेत. आम्ही एकमेकांना "काही दिसलं का?” असा प्रश्न विचारला आणि एकच प्रश्न आमच्या मुखातून कसा आला म्हणून अजून अचंबित झालो. सर म्हणाले, “मला मगापासून इथे दत्तगुरूंच्या मूर्तीऐवजी राम – लक्ष्मण – सीता दिसत आहेत. पहा जरा.” मी पाहिलं तर खरंच मला आता तसच दिसू लागलं. काही वेळ गेला आणि सरांनी मला काय दिसत होतं? ते विचारलं. मी म्हणाले, “मला बाप्पा दिसतोय. तुम्ही म्हणालात तेव्हा रामानेही दर्शन दिले. ” थोड्यावेळाने सर पुन्हा चकित झाले.. “अरेच्या खरंच! आता गणपती बाप्पाचं दर्शन होतंय.” ब्रह्मा, विष्णू, महेशाचे दर्शन होता होता आता सर्वच देवतांचे होऊ लागले. आरती झाली. दत्तगुरू हे माझं श्रद्धास्थान आहेच पण मी बाप्पालाही मनोभावे पुजते. दत्तगुरूंच्या या पावन स्थळी जाण्याचा योग आला म्हणून मन सुखावले होते पण एकाच ठिकाणी अन्य इष्ट देवतांचेही दर्शन गुरुदेवांनी घडवले या विचाराने मनोमन तृप्त झाले.

          अनेकदा असे अनुभव आपल्याला येत असतात किंवा नकळत कुणीतरी आपली अडचण न सांगताही समजून घेत असत, सोडवत असत, अचानक, अनपेक्षित घटना घडत असतात ज्यांमुळे एखादी कठीण गोष्ट सुकर होते. अशा प्रत्येक वेळेस मी हात जोडते आणि त्या त्या वेळेस देवाने पुन्हा एकदा प्रत्यय दिला हे जाणवत. लहानपणी बाबांनी एक भजन शिकवलं होत. त्यात “लोग कहते है भगवान आते नाही.. रुक्मनीकी तरह हम बुलाते नहीं.. द्रोपदिकी तरह धुन लगाते चलो..” अशा पंक्ती आहेत. खरंच.. तेवढी तळमळ कदाचित अजून उत्पन्न झालीच नाही. म्हणून आपण सामान्य आहोत असं जाणवत. पण त्याच भजनात पुढे आहे की, “वक्त आएगा ऐसा कभी ना कभी.. हमभी पायेंगे प्रभुको कभी ना कभी.. ऐसा विश्वास दिलमे जगाते चलो.. कृष्ण गोविन्द गोपाल गाते चलो..” एवढीच एक इच्छा मनात ठेऊन दर दिवशी नारायणाचे नाव घेते. तुम्हीही नाव घेत रहा. तो भेटेलच. तूर्तास राम राम.
- वैदेही सच्चिदानंद शुभांगी शेवडे. 

बुधवार, ७ ऑगस्ट, २०१३

तो आणि ती
          
          एका सोशल नेटवर्कींग साईटवरच्या ग्रुपमधून त्यांची ओळख झाली. पुढे त्या ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं. एकमेकांपासून दूर असूनही, एकमेकांना न भेटूनही केवळ फोनवर आवाज ऐकून ते एकमेकांच्या मनातलं समजू लागले. आता तो आणि ती यांचं सूत जुळलं आणि त्याचं लग्न झालं एवढीही टिपिकल स्टोरी नाही आपली. तर हे तो आणि ती मैत्री होऊनही ४ वर्ष एकमेकांना कधी ते भेटूच शकले नाहीत. फोन, फेसबुक, व्हॉटस् अॅप यामुळे कधी भेटीची उणीवही भासली नाही.
          ती गोरीपान अशी मुंबईकडची तर हा काळासावळा नगरचा गडी. कोणीही पाहताच क्षणी प्रेमात पाडावं अशी ती.. तर मोकळ्या, प्रामाणिक मतांवर कोणतीही मुलगी फिदा होईल असा तो. दोघांनी एकमेकांना अनेकवेळा सुखदुःखात साथ दिली. अगदी त्यांच्या प्रियकर-प्रेयासीलाही त्यांची ही वेडी मैत्री चांगलीच माहिती आहे. आता तिचं प्रियकरासोबत लग्न ठरलं आहे. त्याचंही ठरेलच इतक्यात. काही कामनिमित्त त्याला मुंबईला येण्याची आणि तिला भेटण्याची संधी मिळाली म्हणून दोघेही खुशीत आहेत.
          त्याला स्टेशनवरून तिने थेट मरीन ड्राईव्हला नेलं. समुद्राकडे कितीतरी वेळ तो एकटक पाहत होता. भेटल्यावर तो एवढा गप्प का? तिला अवघडल्यासारखं झालं. त्याच्याही ते लक्षात आलं. उगीच काहीतरी बोलावं म्हणून त्याने विचारलं, “सकाळी असा मेसेज का केलास? ये लम्हा फिलहाल जी लेने दे? आणि व्हॉटस् अॅपवर स्टेटसही असंच आहे तुझं. काही झालंय का?” “नाही रे.. ते गाणं ऐकत होते एवढंच.” तिचं उत्तर. तिने इकडचे तिकडचे विषय काढून त्याला बोलतं करायचा प्रयत्न केला. पण, तो अगदीच शांत होता. पहिल्यांदाच भेटलो आहोत म्हणून असेल कदाचित.. तिने विचार केला. थोड्यावेळाने मात्र तो थेट मुद्द्यावर आला. “आता तुझं लग्न होईल मग आपल्याला आतासारखं नाही बोलता येणार सतत.” त्याची घुसमट पाहून तिने “तर?” एवढाच प्रश्न केला. “मग आपण कमी बोलायची सवय केली पाहिजे.” ती गप्पच. या मुलीला समजतंय तरी का? आपण किती विचार करत आहोत तिच्या दूर जाण्याचा? त्याची मनातल्यामनात घालमेल. तेवढ्यात पाऊस कोसळू लागला. ती उभी राहिली, लहान मुलांसारखी हात पसरून गोल गिरक्या घेत, “कित्ती मोठ्ठा पाऊस!” म्हणून ओरडली. तिचं पावसाचं वेड आणि बालिशपणा त्याला नवा नाही. पण लगेच छत्री उघडून ती शांतपणे त्याच्यापाशी बसली. “मला आवडतं भिजायला पण..” “अगं, आवडत मग भिजावं खुशाल.” तो. “नको, काही महिन्यांनी पाऊस बंद होईल. मग कुठे येणार अशी मजा! त्यामुळे सवय करायला हवी.” आता तो वैतागला, “तू काहीही कुठेही जोडत्येस. पाऊस दरवर्षी येतो पण आपलं नातं नेहमीसाठी बदलणार आहे.” ती खळखळून हसून म्हणाली, “मग आत्ता जेवढे महिने पाऊस आहे तेवढं भिजावं की पुढचा विचार करून सगळे दिवस संपवायचे?” त्याला तिचा मुद्दा पटला. दोघांनी छत्री बंद केली आणि पावसामध्ये चिंबचिंब भिजले. निरोप घेताना ती म्हणाली, “आपण प्रयत्न करू ना लग्नानंतरही एकमेकांसाठी वेळ काढायचा.” तिने खूप प्रयत्न करून अडवलेलं डोळ्यातलं पाणी त्याला दिसलंच. गाडी सुरु झाली आणि तिचा विचार मनात घोळत असतानाच त्याला सकाळच्या तिच्या मेसेजच्या ओळींचा अर्थही समजला. त्यानेही व्हॉटस् अॅपवर लगेच स्टेटस अपडेट केलं... ये लम्हा फिलहाल जी लेने दे..
-      वैदेही सच्चिदानंद शेवडे.


गुरुवार, ६ जून, २०१३

“... तरी मला वाटलंच होतं!”
        
          
              “ तरी मला वाटलंच  होतं...”  एक ओळखीचा आवाज आला आणि त्या पाठोपाठ दारावर ठकठक ऐकू आली. तशी मी आणि नेहाने एकमेकींकडे सूचक नजरेनं पहिलं. मोठमोठ्यांनी हसत आमच्या अवाढव्य विजू काकू आत शिरल्या. “अग्गो बाईss, जागेच आहात का तुम्ही राजे? आज्जी भेटायला येणार हे समजलं होतं वाटतं तुम्हाला!” नेहाच्या बाळाला पाहायला आलेल्या आमच्या लाडक्या विजू काकूंनी त्यांच्या आवाजानी पूर्ण खोली दुमदुमून टाकली. “हो ना! आमच्या पिल्लुलापण आधीच वाटलं होतं तुम्ही येणार म्हणून. त्यामुळेच तर कधी नव्हे तो पोटोबा भरूनही झोपला नाही तो अजून.” मी काकूंना मारलेला टोला ऐकून नेहा तिथेच फिसकन हसली आणि आमच्या मातोश्रींनी आमच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकला. काकूंना मात्र मी बोलले ते समजलंच नाही किंवा मला पामराला त्यांनी मनावर घेतलं नाही आणि नेहमीप्रमाणे समोरचा हसला तर आपणही हसावे म्हणून त्याही हसल्या. नेहाची आई तोपर्यंत सगळ्यांसाठी चहा घेऊन आली. चहाचा भुरका मारत काकूंनी आपली बडबड गाडी पुन्हा सुरु केली. “मला वाटलंच होतं तुला मुलगा होणार. म्हणून आधीच मी निळं झबलं घेऊन ठेवलं होतं पहा.” त्यांनी नेहाला झबलं दिलं. ते देताना त्यातून पावती पडली ती नेमकी माझ्याच पुढ्यात. मी पण अशी संधी सोडणार होते का? सरळ पावती उघडली आणि त्यांना “खरेदीची तारीख तर आजची दिसते आहे!” असं सांगितलं. आता मात्र आई माझ्याजवळ आली आणि मला अस्सा चिमटा काढला की मी पार कळवळले पण एवढ्या लोकात ओरडणार कशी? आणि ओरडले असते.. सांगितलं असतं माझ्या ओरडण्याचं खरं कारण मग तर मातोश्रींनी घरी जाऊन नुसती कणिक तिम्बवली असती माझ्या पाठीची. तसंही तिने माझ्यावर हात साफ करून खूप वर्ष झाली आहेत आणि म्हणूनच मी कशी शेफारले आहे असं ती परवाच बाबांना सांगत होती. तेव्हा किमान आई असेपर्यंत तरी मला गप्प राहणं भाग होतं हे मला समजलं. काकू समोर बसल्या आहेत आणि मला आता त्यांची खेचण्याचा आनंद मिळणार नाही म्हणून मी चरफडत होते. पण, तेवढ्यात आईला दादानी हाक मारली म्हणून ती आमच्या घरी निघून गेली. जाताना नेहाच्या आईलाही ती बाळासाठी तिनी बनवलेली दुपटी पाहायला घेऊन गेली. या शेजार शेजारच्या साळकया माळकया विजू काकू जाईपर्यंत तरी परत या घरी येणार नाहीत हे माझ्या लक्षात आलं. काकूंनी पण मी आहे ना तुमचं चालू दे असं त्या दोघींना सांगितलं.
          तसं पाहायला गेलं तर माझा आणि काकूंचा छत्तीसचा आकडा वगैरे नाही. आम्ही एकमेकींना अगदीच पाण्यात पाहतो किवा आमच्यातून विस्तवही जात नाही असं देखील नाही. उलट त्या आल्या की त्यांच्या गप्पा ऐकायला आणि नंतर त्यांची नक्कल करायला मीच पुढे असते. त्यांची खेचायला तर मला भारीच आवडतं. पुढे नेहाच्या बाळालाही ते शिकवण्याचा माझा विचार आहे. काकू सगळंच हसण्यावारी नेतात. लहानपणापासून मी त्यांना कधीच कोणाशी भांडताना पाहिलं नाही की ओरडताना ऐकलं नाही. सात मजली हास्याचा गडगडाट आणि “...तरी मला वाटलंच होतं.” या दोनच गोष्टी आम्ही त्यांच्या मुखातून ऐकत ऐकत मोठे झालो. लहानपणी मला खूप आश्चर्य वाटायचं. काकूंना बरं सगळं आधीच माहिती असतं..! आधीच सगळं कसं वाटून जातं..!! देवाला कौल लावण्यापेक्षा सगळे विजू काकुंनाच का नाही प्रश्न विचारत! असं नेहमी वाटायचं. अशी सर्वज्ञानी काकू आहे आमच्या इमारतीमध्ये याचं कसलं कौतुक होतं मला! पण हळूहळू माझ्या एक लक्षात आलं. सगळ्या गोष्टी झाल्यावर बऱ्या यांना आधीच वाटल्या होत्या असं सांगत फिरतात. मी कधी त्यांनी कसलं भाकीत केल्याचं आणि नंतर तसंच झाल्याचं ऐकलंही नव्हतं. बरं, असं झालं असतं तर कोणीतरी सांगितलं असतं. पण नाहीच. उलट इमारतीतीलंच नाही तर त्यांना ओळखणारे सगळे त्यांच्यामागून त्यांच्या या सवयीची खिल्ली उडवतात हे समजलं आणि माझं बालमन खट्टू झालं. मग आता मी अशी भरपूर त्रास देते त्यांना. पण तरीही त्या कधी मला रागवल्या नाहीत की आईला कधी चाहाडी केली नाही त्यांनी माझी. अर्थात मी मागून बोलणारी नसल्याने त्यांना समोरासमोर बोलत असे. बाकी सगळे त्या गेल्यावर खिसफीस करत राहत. एकूण काय! विजू काकू या सगळ्यांच्याच चेष्टेचा विषय बनल्या होत्या ते त्यांच्या “...तरी मला वाटलंच होतं.” या लाडक्या वाक्यामुळे. तरी आज आधी मातोश्रींकडून प्रसाद मिळाल्यामुळे माझं आता त्या कितीवेळा ‘त्या’ वाक्याचा जप करीत होत्या ते मोजायचं राहिलं. नाहीतर आम्ही मैत्रिणी त्या समोर दिसल्या की आधीच पैज लावत असू आणि मी सहसा जिंकत असे. माझा बिचारा हात त्या चिमट्यामुळे पाहता पाहता लाल झाला होता आणि तो भाग टरारून वर आला होता. मी हात चोळण्यात गुंग होते तेवढ्यात काकूंच्या हासण्याने माझी तंद्री भंग झाली.
          “तुला सांगते राणी..” त्यांनी माझ्याकडे पहिलं. “ही नेहा मला एकदा पेंडसे नगरला दिसली तेव्हाच मला वाटलं होतं की ही लग्न करून सोनावण्यांकडेच जाणार.” आता मात्र हद्द झाली. आमचं पिल्लू झोपलं होतं. नेहादेखिल पेंगुळली होती आणि ह्या बाई बसून काहीही पुड्या सोडत होत्या. त्यांचं हे वाक्य ऐकून मात्र कधी काही न बोलणारी नेहाही, “आता जरा जास्त होतंय हो काकू!” असं वैतागून म्हणाली. खरंच होतं नेहाचं.. उलट लहानपणापासून माझं आणि तिचं सोनावण्यांचा संकेत दिसला की डोकं फिरायचं. त्यात तो सगळ्यात हुशार म्हणून नेहाची आई सतत तिला तो बघ कसा..! असं सांगून अक्षरशः कान किटवीत असे आणि जेव्हा या काकूंनी तिला पहिली होती तेव्हा आम्ही तिथे संकेतचं प्रेमपत्र दुसऱ्याच एका मुलीला देण्यासाठी गेलो होतो. म्हणजे त्याला आम्ही पत्र पोहोचवतो असं सांगून तिला तो कसा तिच्यासाठी योग्य नाही असं मधल्यामध्ये सांगायला गेलो होतो. पुढे या दोघांचच लग्न घरच्यांनी लावून दिलं पण अगदी लग्नाच्या आधीपर्यंत आम्ही दोघी मिळून त्याच्या नावाने खडे फोडीत असू. आता हे सगळं आठवलं की जेवढी गम्मत वाटते तेवढीच आत्ता काकूंचं ऐकून वाटली कारण ज्या गोष्टीची खुद्द नेहालाच कल्पना नव्हती तेही काकूंना आधी वाटलं! नेहाही वैतागली आहे हे पाहून मी परत फॉर्मात आले. त्यांना म्हणाले, “काकू, सगळंच बरं तुम्हाला आधीच वाटून जातं! नाही म्हणजे खूप कौतुक आहे तुमच्या या गुणाबद्दल पण..” माझ्या डोक्यात कसल्यातरी विचारला चुरचुरीत फोडणी घातली गेली आहे हे नेहाच्या एव्हाना लक्षात आलं होतं. ती सरसावून थोडी पुढे झुकून मी आता काय बोलते आहे याकडे नीट लक्ष देऊ लागली. “पण काय?” काकूंना काहीच समजलं नसल्याने त्यांनी गोंधळून मला प्रश्न विचारला आणि इथेच मी अर्धी बाजी मारली म्हणून स्वतःवर खुश झाले. “पण काय आहे.. बरेच जण म्हणतात की तुम्हाला काही वाटत वगैरे नसतं तुम्ही आपल्या उगाचचं..” बोलता बोलता माझं नेहाकडे लक्ष गेलं ती माझ्या या वाक्यामुळे पार आ वासून पाहत होती. एवढा आ केला होता तिने की माझ्या मिनी मांजरीचं छोटं पिल्लुपण आत गेलं असतं तिथून. काकू कधी नव्हे त्या जरा अवघडल्यासारख्या झाल्या. पण स्वतःला सावरत म्हणाल्या, “हूह.. बोलणाऱ्यांच काय गं..! एवढे केस पांढरे झाले ते उगीच नव्हे हो. साधना आहे माझी ती. मला कळतं बाई सगळं. कोणी काही बोलू दे. आता हेच पहा ना नेहाचं लग्न, तिला मुलगा होणार हे पण मला वाटलं तसंच तर झालं. असंच असतं ते. मला वाटलं की तसं होतंच.” त्या थोडसं स्वतःशी पुटपुटत.. थोडं आम्हाला ठामपणे सांगत होत्या. त्या स्वतःलाच त्यांची थाप पटवून देत होत्या असंच वाटलं मला तरी. त्यांनी मोठ्या आशेने नेहाकडून सकारात्मक प्रतिसादासाठी पाहिलं. तिला जराही वेळ लागत नाही कुणाची कणव येण्यासाठी. त्या सांगत आहेत त्यात काही तथ्य नाही हे माहिती असूनही ती कसंनुसं हो म्हणाली. आता खरं पाहता मी त्यांच्या डोक्याला एवढं खाद्य पुरवून देऊन थांबायला हवं होतं. पण मगाचा आईचा चिमटा अजून ठुसठुसत होता ना. “तुम्ही त्या सगळ्याचं तोंड का नाही गप्प करत?” इति मी. त्या भांबावून माझ्याकडे पाहू लागल्या. “म्हणजे कसं आहे! तुम्ही एखाद वेळेस पहिलेच सांगून टाका ना काय होईल ते. मग तसं झालं की मी एकेकाचं तोंड कशी बंद करते पहा!” काकूंनी पाटल्यासारखी मान डोलावली. पण आता भाकीत कशावर करायला हवं त्यांनी? मी तर हा विचार केलाच नव्हता. मग मी उगाच अजून नको त्यांना त्रास म्हणून माझे पुढचे दिवस कसे जातील सांगा बरं असं म्हणाले. मी अंदमान यात्रेला निघाले होते. स्वतःच नेत असलेली माझी पहिली यात्रा. तेव्हा काय होईल यात्रेत ते सांगा. आता फक्त सगळं छानछान नाही, खरंखरं तुम्हाला काय वाटत आहे ते सांगा. अशीही पुढे पुस्ती जोडली. काकू थोड्यावेळ शांत बसल्या आणि मग अगदी दोन चार अशा गोष्टी त्यांनी सांगितल्या की त्या कोणीही.. अगदी नेहाचं बाळही सांगू शकलं असतं. मी त्यांना परत “फक्त छानछान नाही, खरंखरं” याची आठवण करून दिली. मग म्हणाल्या, “सांभाळून गो पोरी. कोणीतरी महाभाग मोठ्ठा गोंधळ उडवणार आहे आणि तेही पहिल्या काही दिवसातच. मग सगळ्यांचा मूड खराब असेल.” मला वाटलं होतं काकू सपशेल हार स्वीकारतील पण या तर खरंच भाकीत करायला निघाल्या होत्या. मी अजून थोडी मस्करी करण्याच्या इच्छेत होते पण आईने हाक मारली. उद्या माझ्यासोबत यात्रेवर असणारे मला भेटण्यासाठी आले होते. तेव्हा काकू आणि नेहाचा निरोप घेऊन मी निघाले. मग संपूर्ण दिवस एकेक काम संपवून यात्रेच्या तयारीमध्ये गेला आणि काकूंच्या भाकीताबाबत मी पार विसरले. सकाळी लवकर घरातून निघायचं होतं आणि खूप थकले असल्याने पाठ टेकल्यावर लगेच डोळा लागला.
          सकाळी सगळी कामं आटोपून निघताना मी नेहाला भेटले. तेव्हा ती वेडी खूप काळजीत दिसली. माझा हात घट्ट पकडत म्हणाली, “काळजी घे. मला भीती वाटते आहे काल काकू ते बोलल्यापासून.” मी तर एवढं विसरले होते की मला आधी काही कळेच ना. मग तिला “हत् वेडी!” असं म्हणून निघाले. चेन्नईला आल्यावर सगळ्यांना एकत्र जमा करून मी अंदमानला जाण्यासाठी विमान तासाभराने आहे हे सांगून तिकीट नीट जवळ ठेवा हे पुन्हा पुन्हा सांगितलं. विमानतळावर जाण्यासाठी निघत असतानाच मला पाटील काकांचा ओरडण्याचा आवाज आला. त्यांना अगदी पहिल्या बैठकीपासून सगळ्यातच प्रश्न होते आणि सतत वाकडं तोंड करून ते असत. आता नवीन काय झालं? मी विचारायला गेले. “ही मुर्ख बाई, तिकीट सांभाळून ठेव म्हणालो तरी आता सापडत नाही म्हणते आहे.” सगळे आवाक झाले. मी बाकीच्यांना पुढे जाऊ दिले आणि शांतपणे त्यांना माझ्याजवळ मी एक कॉपी नेहमी ठेवते तेव्हा आता जाऊ दे असं सांगितलं. माझ्याजवळ असलेली प्रिंट मी त्यांना दाखवली. पाटील काकूंचा उद्धार करीत असलेले काका, गरीब बिचाऱ्या काकू आणि मी असे आम्ही पुढे निघालो. विमानात बसले आणि सहज मनात येऊन गेलं.. हाच का तो महाभाग? काय गोंधळ होणार अजून? आपण सगळं नक्की सांभाळू शकतो ना? मी काकूंच्या बोलण्याचा विचार करू लागले आहे..! माझं मलाच आश्चर्य वाटलं. सगळे विचार काढून मी खिडकीबाहेर डोकावू लागले. विमान वर जात असताना रात्रीच्या वेळेस असंख्य दिवे टीमटीमताना पाहायला मला खूप आवडतं. थोड्यावेळाने कसला तरी जोरदार आवाज आला. मी गोंधळून इथे तिथे पाहू लागले. एयर होस्टेसची धावपळ चालू होती. त्यांचा आवाज मला काहीसा विचित्र वाटला. विमानाला मोठ्ठा धक्का बसला. जोराने ते वर खाली झालं. आता मात्र मला काही सुचेनासं झालं. माझ्या मैत्रिणीची ड्युटी याचं विमानात आहे हे आठवून मी तिला बोलावलं. तीदेखील खूप घाबरलेली वाटत होती. तिने जे सांगितलं ते ऐकून माझी बोबडी वळली. आमचा वैमानिक म्हणे दारू पिऊन झोपला होता. आणि दुसरा विमान उडवायला आज घाबरत होता. असं कसं चालेल? आमचं काय होणार आता? मला काहीच सुचेनासं झालं. मी कशीबशी पुढे गेले. धडकन दार उघडून वैमानिक बसतात तिथे आत शिरले आणि बघते तर काय समोर एक चिम्पांझी माकड बसलं होतं. आता मात्र माझं डोकं सुन्न झालं होतं. मला काही समजत नव्हतं. एव्हाना पाटील काका ओरडत आत शिरले. विमान खाली हेलकावत जात आहे आणि आता ते माझ्यामुळे मारणार असं ते मला सांगत होते आणि त्याही परिस्थितीत ‘प्राणी प्रेमी’ मला तो चीम्पाझी खूप गोड वाटत होता आणि मी हसून त्याला पाहत होते. “अगं हसतेस काय मुर्ख मुली!” ते डाफरले आणि मला गदागदा हलवू लागले. काकांकडे माझं जराही लक्ष नाही हे समजल्यावर त्यांनी चिडून जवळच असलेलं धारदार असं काहीतरी जोरात माझ्या दंडात खुपसलं. मी कळवळले आणि त्यांच्याकडे पाहिलं. तर मला माझ्या शेजारी बसलेली छोटी प्रिया खिडकीत बसू दे ना असं सांगताना दिसली! आता मात्र मी गोंधळले आणि सभोवार नजर टाकली.. सगळं शांत निवांत होतं. माझी एयर होस्टेस मैत्रीण माझ्याकडे पाहून नेहमीप्रमाणे हसत जात होती. पाटील काका त्यांच्या बायकोवर करवादत होते. आणि मग ते सगळं?? आणि ते लोभस चिम्पांझी?? प्रियाने परत माझ्या दंडामध्ये आपलं इवलसं बोट खुपसलं. तिच्याकडे नजर गेली तशी तिच्या हातातली चिम्पांझीची फरची बॅग मला दिसली. “ओह.. सगळं स्वप्नंच होतं तर!” मी स्वतःशीच हसले. संपूर्ण यात्रा खूप चांगली झाली. पाटील काका मधून मधून कटकट करत होते पण शेवटच्या दिवशी माझ्या डोक्यावर हात ठेऊन यात्रा छान झाली आणि मी त्यांना किती आवडले! हे त्यांनी सांगितलं आणि मला हायसं वाटलं.
               घरी परत आले तर नेहा, बाळ आणि विजू काकू आमच्याचकडे बसल्या होत्या. मी आल्या आल्या यात्रा कित्ती छान झाली ते सांगितलं. तर विजू काकू लगेच म्हणतात कशा..! “तरी मला वाटलं होतंच की पोरीला काही त्रास होणार नाही आणि सगळ्यांना कशी खुश करून परतेल.” मी आणि नेहा एकमेकींकडे पाहत हसत सुटलो आणि दोघीही “तरी मला वाटलं होतंच.. यात्रा छान झाल्यावर विजू काकू असंच बोलणार...” असं जोरात एका सुरात ओरडलो. आईला काही समजलं नाही पण कधी नव्हे ते विजू काकू मात्र लगबगीने निघून गेल्या.

-      वैदेही शेवडे.

गुरुवार, १३ डिसेंबर, २०१२


सुख ??

           सकाळी सहा वाजता गजर झाला. वीणाने नेहमीप्रमाणे बंद डोळ्यांनी झोपेतच चाचपडत तो बंद केला. गजराच्या आवाजाने बाळ उठलं तर सकाळची कोणतीच कामं आपल्याला वेळेवर पूर्ण करता येणार नाहीत. नाताळच्या सुट्टीचा आजचा शेवटचा दिवस, उद्यापासून महाविद्यालय सुरु होणार आणि परत सगळी धावपळ सुरु.. तेव्हा आज काय काय तयारी करून ठेवायची याची चक्र वीणाच्या डोक्यात चालू झाली. पेंगुळलेल्या डोळ्यांनी तिने अंगावरची दुलई बाजूला सारली. बाळ आणि बाबा दोघेही शांतपणे झोपले होते. बऱ्याच महिन्यांनी सुरेशनी रजा घेतल्यामुळे आठवडा कसा गेला समजलंच नाही. “ झोपू दे अजून दोघांनाही.. आपण आपलं सगळं काम उरकून घेऊ. ” तिने विचार केला. प्रेमाने दोघांच्याही गालावरून हात फिरवून अलगद चुंबन घेतले.

          थोड्याच वेळात वीणा आंघोळ करून केस पुसत बाहेर आली.  सुरेशची चुळबूळ पाहून आता थोड्याच वेळात साहेब उठतील आणि चहा मागतील हे तिला समजले. एकीकडे नाश्त्याची तयारी करत तिने चहाचे आधण गॅसवर ठेवले. बैठकीच्या खोलीत येऊन वर्तमानपत्र हातात घेईपर्यंत सुरेश उठलेच. चहा, उपमा आणि बातम्या अशा तीन गरमागरम गोष्टी घेऊन ती आत गेली. वीणाच्या लांबसडक केसातून अजूनही पाण्याचे थेंब खाली ओघळत होते. मुळातच असलेली नाजूक आणि गौर कांती थंडीमुळे किंचितशी गुलाबी झाली होती. पिवळसर रंगाच्या साडीवर लाल रंगाची फुले असलेली साधीच, घरात नेसायची साडी असली तरी वीणा त्यातही अगदी अगदी टापटीप आणि मोहक दिसत होती. झाडावर उमललेली ताजी गुलाबाची फुलं जास्त टवटवीत दिसत होती की वीणा हेच लक्षात येऊ नये अशी ती लोभसवाणी वाटत होती. सुरेशनी चहा बाजूला ठेवून तिला जवळ ओढले. “तुझे गाल पुण्याच्या थंडीमुळे असे गुलाबी झाले आहेत, की काल रात्री मी.. ” त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच ती नव्या नवरीप्रमाणे लाजली आणि अजून बिलगली. नाश्ता होईपर्यंत आर्या उठली. मग त्या बाहुलीला न्हाऊ माखू घालण्यात वीणा गुंग झाली. आर्या आता आई, बाब्बा, आज्जी असे बोबडे बोल बोलू लागली होती. तिच्या तोंडून असं ऐकून, तिची दिवसागणिक होणारी प्रगती पाहून ती सुखावून जात असे.

          आर्याला खेळामध्ये रमवून ती दुपारच्या स्वयंपाकाची तयारी करू लागली. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. “सुरेश, पाहता का कोण आलं आहे दारावर? मी इथे बाळाला सांभाळते आहे आणि काम करते आहे. ” बेल परत परत वाजत होती. आता मात्र वीणा वैतागली. ती दार उघडण्यासाठी वळते न् वळते तोच तिच्या लक्षात आलं की सुरेश तर आपल्याला सांगूनच आई अण्णांना आणायला गाडी घेऊन स्टेशनवर गेले आहेत. “ किती ग वेंधळी मी..! आताशा असं रोजंच होऊ लागलं आहे आपलं. सुरेश म्हणतात तसं खरंच मी एवढ्यातच म्हातारी झाले आहे.. ” पुटपुटत वीणाने दार उघडलं. शेजारच्या रमा काकू कसलासा प्रसाद घेऊन आल्या होत्या. वीणाच्या हातात प्रसाद देत त्या म्हणाल्या, “ हा प्रसाद घे म्हणजे यंदा पेढा मिळणार पहा आम्हाला.. ” त्यांचं बोलणं ऐकून वीणाच्या कपाळावरची शीर तडकली. कसनुसं हसून तिने तो प्रसाद निमुटपणे गिळला आणि दरवाजा लावून घेतला. “ केवढा चोंबडेपणा हा.. काय करायचं असतं यांना इतरांच्या आयुष्यात सतत डोकावून देव जाणे..!! जे आहे.. जसं आहे त्यात मी सुखी आहे हे कळत कसं नाही या लोकांना? ” तेवढ्यात तिचं लक्ष मिश्किलपणे हसणाऱ्या त्या पिल्लाकडे गेलं. “राणी, आपल्याला काही कमी आहे का? आहे की नाही सगळं आपल्याकडे? कशाला हवं अजून काही? ” आईचं बोलणं जणू समजल्यासारखं राणी हुंकार देत होती. त्या प्रतिक्रियेने वीणाच्या चेहऱ्यावर परत हसू फुललं.

          आज बऱ्याच दिवसांनी अण्णांना आवडते तशी काळ्या वाटण्याची उसळ छान जमली होती. आईंनीही कौतुक केलं. आपल्या बायकोचं कौतुक होतंय त्यामुळे सुरेशच आपल्यापेक्षा अधिक आनंदात होते. चार दिवस नातेवाईकांकडे जाऊन आल्यामुळे आई अण्णा मस्त ताजे होऊन आले होते आणि खरंतर सुट्ट्या आहेत हे पाहून आपल्याला एकांत मिळेल म्हणूनच ते काही कारण नसताना नाशिकला गेले हे तिला पक्कं ठाऊक होतं. लग्न झाल्यापासून सासू सासरे सोबतच राहत असल्यानं तिला त्यांची अगदीच सवय होती त्यामुळे हव्या हव्याशा एकांतातही एकटेपणा जाणवत होता. पण दोन दिवस माहेरचे आले असल्यामुळे घरात परत वडीलधाऱ्यांचा वावर झाल्यानं तिला बरं वाटलं. सगळं कसं दृष्टं लागण्याएवढं सुंदर.. सुरळीत.. स्वतःशीच विचार करत ती झोपलेल्या सुरेशना गुड नाईट किस देत आर्याशेजारी झोपली.

          आठवडाभराच्या सुट्टीनंतर पुन्हा सकाळी उठून सगळं आवरून कामावर जाण्याचा कंटाळाच आला होता. तरीही सुरेशचा कंटाळा जावा म्हणून त्यांना लाडीगोडीनं उठवत तिने भराभर आपलं आवरलं, डब्बा भरला आणि स्कुटीवरून कर्वे नगरला तिच्या महाविद्यालयात पोहोचली. बऱ्याच दिवसांनी विद्यार्थांचे घोळके, त्यांचा गलका ऐकून तिला बरं वाटलं. मगाशी घर सोडवत नव्हतं आणि आता आपण इतके दिवस या गर्दी, गोंधळ, आवाजाशिवाय कसे राहिलो असं वाटतंय..! वीणा गालातल्या गालात एकटीच हसली. सुट्टीनंतरचा पहिलाच दिवस असल्याने आज काहीही न शिकवता सगळ्या विद्यार्थ्यांसोबत गप्पागोष्टी करण्यातच वेळ गेला. वीणा प्रसन्न व्यक्तीमत्वाची, आकर्षक, बोलकी आणि प्रेमळ अशी.. केवळ तरुणच नाही त्यातही उंची जरा कमी आणि सततची मजा मस्ती, यामुळे लहानशी वाटत असे. ती सगळ्या विद्यार्थ्यांची लाडकी शिक्षिका तर होतीच पण गोल्ड मेडलिस्ट असल्याने विषयातले सखोल ज्ञान आणि अभ्यासाच्या वेळेस कडक शिस्तीत अभ्यासंच या नियमाने वागणारी.. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच सहकारी आणि वरिष्ठही तिच्याशी अदबीनं वागत. त्यादिवशी मितालीने डब्बा आणला नसल्याने त्या दोघींनी अन्नपुर्णामध्ये जाण्याचं ठरवलं. मिताली ही वीणाची लहानपणापासूनची जिवाभावाची मैत्रीण. आयुष्यामधील प्रत्येक बरे वाईट क्षण दोघींनी एकमेकींसोबत वाटून घेतले होते. कोणताही आडपडदा न ठेवता प्रामाणिकपणे त्यांनी हे नातं जपलं होतं.

          गेली अनेक वर्ष त्या दोघी अन्नपूर्णा हॉटेलमध्ये येऊन त्यांच्या आवडीच्या चीझ पावभाजीवर मनसोक्त ताव मारत. अगदी हॉटेलचे मालक कामथ काकाही त्यांना जवळून ओळखू लागले होते. बरेचदा गप्पांच्या ओघात दोघी ऑर्डर देण्यास विसरल्या की स्वतः काका त्यांची फर्माईश घेऊन हजर असंत. काकांसोबत गप्पा मारून झाल्यावर दोघी आत बसल्या. इकडचं तिकडचं बोलून होईपर्यंत पावभाजी आली. “ मला जरा तुझ्याशी काही बोलायचं आहे.. खूप महत्त्वाचं आहे.. आणि यावेळी तरी टाळू नकोस. प्लीझ.. ” पहिला घास तोंडात घेत मितालीने सांगितलं. वीणाच्या हातातला घास मात्र तसाच हातात राहिला. आता पुढे कोणता विषय निघेल याची तिला पूर्ण कल्पना होती आणि म्हणूनच ती वैतागली. तिचा वैताग.. चिडचीड सगळं मितालीपर्यंत पोहोचत होतं. तिने शांतपणे वीणाचा हात हाती घेऊन घट्ट दाबला आणि तिला शांत करण्याचा एक विफल प्रयत्न केला. वीणाच्या चेहऱ्यावर स्पष्ट नापसंती दिसत असूनही मितालीने तो विषय निश्चयपूर्वक काढलाच.

          “ लग्न कधी करणार आहेस राणी? अगं यावर्षी बत्तीस वर्ष पूर्ण होतील ना..! ” राणी.. किती वर्षांनी मितालीने अशी हाक मारली ..! आई बाबा लहानपणी प्रेमाने हाक मारायचे मला अशी.  वीणा स्वतःच्याच विचारांमध्ये.. “ उशीर झालाच आहे पण अजून वेळ गेली नाही. तू सुंदर आहेस, सुशिक्षित आहेस. उत्तम नोकरी आहे. मग काय हरकत आहे? आपल्यासोबातच्या सगळ्या मैत्रिणीची लग्न झाली आता. माझंपण पहा.. लग्नाला नको.. नको.. करता करता अविनाश भेटला आणि मी खरंच खूप सुखात आहे आता. अगदी आत्ता आत्तापर्यंत मलाही वाटायचं.. जाऊ दे तुला नाही करायचं ना लग्न नको करू.. काय बिघडणार आहे? पण खरं सांगू? अव्या, त्याचे आई बाबा, बाकी नातेवाईक यांच्यासोबत असले ना की खूप जाणवतं की तू उगाच या सगळ्यांना पारखी झाली आहेस आणि तेही स्वतः ठरवून. खरं म्हणजे आयुषीच्या जन्मानंतर मला जास्त जाणीव झाली तुझ्या एकटेपणाची..! ” वीणा अजूनही स्वतःतच अडकलेली... जणू मिताली तिथे दुसऱ्याच कोणाशीतरी बोलते आहे.. वीणा स्वतःच्याच कोषात... वेगळ्याच जगात हरवलेली.. तिच्या डोळ्यातील ते अलिप्त आणि हरवल्यासारखे भाव पाहून मितालीने तिला अक्षरशः हलवलं. जरा भानावर येईपर्यंत डोळ्यातून ते भाव टपाटप ओघळू लागले. जरासं थोपटल्यावर ती शांत झाल्यासारखी वाटली.. तोच परत “ तुझे आई वडील घटस्फोट घेऊन वेगळे झाले. दोघांपैकी कोणीच किंवा इतरही नातेवाईकांनी तुला मायेने वाढवलं नाही हे खरंच दुर्दैवी आहे. तुझी होणारी घुसमट.. तो त्रास.. तुझ्यावर होणारा अन्याय पाहायला मी नेहमीच तुझ्यासोबत होते. आयुष्यातल्या तुझ्या हातात नसलेल्या पण तुझ्या पदरी पडलेल्या सर्व अपयाशांना तू तुझ्या शिक्षणाने आणि जे तुला सोडून गेले त्यांनाही सतत हसतमुखाने मदत करून मात केलंस. आठवतंय.. आपण लग्न आणि पुढच्या आयुष्याच्या किती गप्पा मारायचो.. मला कधीच या कशाबद्दल आवड नव्हती, पण तू नेहमीच भरभरून बोलत असायची. माझ्या मुलीला मी असं शिकवेन.. नवऱ्यासाठी हे करेन.. आमचं घर... घरातली माणसं.. थकायची नाहीस असं बोलून.. बोलून.. मग आत्ता का असं वागतेस?? राहुलसोबत इतकी वर्ष असलेलं तुझं प्रेम नाही झालं यशस्वी.. तुला कधी समजलंच नाही तो तुझा केवळ फायदा घेत होता. जरा समजावलं तरी तुला मीच वेडी वाटले. यातून सावरून तुझ्या काकांनी पाहिलेल्या स्थळाला होकार दिलास.. पण साखरपुड्यानंतर लग्न मोडलं त्याने. त्यातही तुझी काहीच चूक नव्हती. अगं, बऱ्याच जणांच्या आयुष्यात असे चढ उतार येत राहतात पण म्हणून त्यांनी पुढचा रस्ता कसा असेल या भीतीने तिथेच थांबावं का? ” बोलता बोलता मितालीच आवाज चढला होता आणि वीणा लालबुंद होऊन.. हमसून हमसून रडत होती. तिला हे सगळं असहाय्य झालं होतं. आता एकाही क्षण इथे थांबणं शक्य नाही हे समजल्यावर सगळा जीव एकवटून “ मी माझ्या आयुष्यात खरंच सुखी आहे आणि मला अजून कोणाचीही गरज नाही.. ” असं सांगून ती एकटीच धावत हॉटेल बाहेर पडली. स्कुटी घेऊन थेट घरचा रस्ता धरला. वाटेत दिसणाऱ्या प्रत्येकाच्या नजरा जणू तिला.. ही बाई दिसते तर बरी.. पण एकटी का आहे अजून?? असंच विचारात आहेत अशा वाटत होत्या.. बोचत होत्या. घराखाली स्कुटी लावत असताना रमा काकू तिच्याच बाजूने येताना तिला दिसल्या. घाईगडबडीत इमारतीत शिरेपर्यंत त्यांनी कितीतरी हाका मारल्या होत्या. “ हा मुलगा कसा वाटतो पहा.. तो पहा.. काय बाई..! मी इतकी स्थळं आणते पण तुला एकही पटत नाही. यंदाच्या वर्षी तरी लग्नाचा पेढा मिळू दे हो.. ” असं टुमणं वाजवत बसतील या विचाराने वीणा लिफ्टमध्ये शिरली.

          घरी येऊन थंड पाण्याने तिने खसाखस तोंड पुसले.. जणू त्या असावांसोबतच्या सर्व आठवणीही ती साफ करत होती. बऱ्याच दिवसांनी घरात एकटेपणा तिला जाणवत होता. बऱ्याच दिवसांनी.. कारण इतके दिवस तर आपण.. मनातल्या मनातही ते वाक्य ती पूर्ण करू शकली नाही. सुन्नपणे तिने दैनंदिनी उघडली. त्यात सुरुवातीच्या पानांवर होता तिचा एकटेपणा.. आणि नंतर तिने तिच्या मनाच्या खेळांनी त्यावर केलेली मात.. कोणालाही खरंच एखाद्या विवाहितेची वही वाचत असू असेच वाटेल. वाचता वाचता काही क्षण सुरेश, आई, अण्णा, आर्या, सगळी सगळी आपल्या मनाचीच पात्र असल्याचं तिला जाणवत होतं.. पण ते जग खोटं आहे हे मानण्याची मात्र तिची मुळीच तयारी नव्हती. शेवटी तिने नवे पान उघडले आणि त्यावर लिहिले.. मला ठाऊक आहे हे सगळे माझ्या मनाचे खेळ आहेत.. आणि यामुळे एक दिवस ठार वेडी होईन मी. पण खरंतर एवढं सगळं पाहून अजून वेडी कशी झाले नाही तेच माझं मला समजत नाही. बाहेरच्या जगापेक्षा हे जग खरंच खूप चांगलं, सुरक्षित आहे. इथे मला कोणीही सोडून जात नाही आणि वेडी झाले तरी हे सर्व माझ्यासोबतच रहातील याची मला खात्री आहे. मी खूप सुखात राहते त्यांच्यासोबत.. खूप सुखात. ” तेवढ्यात तिला सुरेशनी हाक मारली. आर्या उठली असेल.. तिने दैनंदिनी तशीच ठेवली आणि आर्याला जोजवायला आत निघून गेली...

बुधवार, १० ऑक्टोबर, २०१२


चूक 


 “ आई, किती वेळा सांगू तुला.... मला नाही बोलायचंय या विषयावर आता काही.”
“ अग सोनल, पण जरा......”
 “ आम्ही निर्णय घेतला आहे आणि मला खरंच वेळ नाहीये बोलायलाही तुझ्याशी. पाहतेस ना, एकमेकांशी निवांतपणे बोलण्यासाठीही वेळ नाहीये इकडे आम्हाला आणि त्यात मुलाची जबाबदारी....!! मुळीच शक्य नाही. हा आठवडा भरपूर काम आहे ऑफिसमध्ये, त्यामुळे पुढच्या आठवड्यात हॉस्पिटलमध्ये दाखल होईन.”
“ तुम्ही दोघे घरी या. आपण निवांतपणे बोलू यावर. मग पाहू. चालेल?”
“ आई, मलाही हे करताना काही फार चांगलं वाटत नाहीये. पण एक मुल सांभाळणं म्हणजे किती त्रास सहन करावे लागतात माहित्ये का तुला?”
“ तू मला विचारते आहेस? अग, आई आहे मी तुझी. तुला मोठं केलंच आहे की मी.”
“ तेच... अगदी तेच म्हणते मी. मला बाळाला सांभाळायचं आहे. फक्त मोठं नाही करायचंय.”
“ म्हणजे?? काय म्हणायचं आहे तुला?”
“ जाऊ दे ना आई. कशाला जुन्या गोष्टी काढायच्या परत परत...! मला खूप काम आहे इकडे. एक महत्त्वाची मिटींग सुरु होईलच इतक्यात. मला जायला हवं.”

          फोन समोरून ठेवण्यात आला. पण सोनलच्या आईच्या डोळ्यात मात्र पाणी साचलं होतं. डोळ्यातलं पाणी गालांवर ओघळलं तेव्हा नकळतच सुमेधा ताईंच्या मनात अजून एक विचार आला... किती वर्षांनी रडू आलं असेल आपल्याला? मनातली घालमेल दूर करण्यासाठी त्यांनी काहीतरी काम करायचं ठरवलं. पण खरंच.. काय काम करणार? सगळी कामं तर यशोदा बाई करून गेल्यात. मग उगाचंच आवरलेलं कपाट परत आवरायला घेतलं. त्यात त्यांना बऱ्याच जुन्या आठवणी सापडल्या. कपाटात अगदी खालच्या कप्प्यात कशातरी कोंबलेल्या. अगदी मनातही त्या अशाच होत्या.... खोल दाबून ठेवलेल्या,अस्ताव्यस्त.... एक अर्धा विणलेला पाय मोजा... काय झाला बाई नंतर त्याचं? का पूर्ण नाही करता आला मला? अरे हो.... मार्च महिना होता, ईयर एंडिंगची कामं होती. मग नाहीच जमलं पुढे काही. हे डोहाळजेवणाच्या वेळेचे फोटो. शिशिर आलेच नाहीत वेळेवर. सगळा कार्यक्रम झाल्यावर साहेब आले आणि तेही थकून लगेच झोपून गेले. साधं विचारलंही नाही पेढा सापडला की बर्फी. खूप राग आला होता तेव्हा. मी जरा बोलले यावर तर म्हणे बायकांचा कार्यक्रम तर होता. मी कशाला हवा होतो तिकडे? नाही म्हणजे खरंच पुरुष मंडळींचा काही खास सहभाग नसतो तिथे. पण, बाळ तर दोघांचं असतं ना? बाळाच्या बाबांनाच काही विशेष कौतुक नव्हतं तर आईनीच का म्हणून सगळं कौतुक आणि इतर जबाबदारी याचा पसारा सांभाळावा? असे अनेक विचार तेव्हा आले मनात. खरंच ऑफिस सांभाळून ही जबाबदारी पेलणं खूप कठीण. का हे असं आपल्या अंगावर पडलं? कंटाळवाणं वाटायचं. आपल्या मनाशीच स्पष्ट बोलतानाही आज मात्र का कुणास ठाऊक पण त्या चरकल्या. अल्बमची पुढची पानं जणू एक एक आठवण पुन्हा ताजी करत होती. सोनलचा जन्म... तिने रंगायला लागणं... चालण्यासाठी उचललेलं पाहिलं पाउल.... शाळेचा पहिला दिवस.... किती वर्षांनी आज परत त्या त्यांच्या छकुलीला मनमोकळं हसताना पाहत होत्या. एका फोटोत शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी नटलेली त्यांची ठकी पाहून त्यांनाही हसू फुटलं. पण पुढच्याच फोटोत ती नटलेली चिमुरडी दोन्ही हात पसरून रडत होती. काय झालं होतं तेव्हा?  बरोबर..... तिच्यासोबत कार्यक्रमाला जाता येणार नव्हतं म्हणून तिला रडू आलं होतं. किती रडलं होतं बाळ माझं तेव्हा. मिटींगदेखील महत्त्वाची होती. रात्री तिच्यासाठी एक बहुली आणली होती. पण घरी येईपर्यंत एवढा उशीर झाला होता की सोनल यशोदा बाईंच्या कुशीत झोपूनही गेली होती. तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला असता ती झोपेतच “आईला वेळच नसतो माझ्यासाठी...” असंच काहिसं बडबडत होती.

          सुमेधा ताईंचे डोळे आता परत पाण्यानी डबडबले. पुढच्या फोटोंमध्ये त्यांच्या जागी यशोदा बाईच दिसत होत्या. नंतर मित्र मैत्रिणी.... आणि मग आशुतोष.... सोनलचा नवरा. सोनलचं त्याच्यावर असलेलं प्रेमही घरी पहिल्यांदा यशोदा बाईंनांच तर तिने सांगितलं होतं. असं का झालं असेल? का आपल्या मुलीला आपल्यापेक्षा कोणी परकी व्यक्ती जवळची वाटली? कुठे गणितं चुकली असतील? कदाचित माझं आणि शिशिरचं कामानिमित्तानं सतत बाहेर राहणं.....?? नाही... नाही... यात काय चूक? हे सगळं तर आपण सोनलसाठीच केलं. त्या स्वतःचीच समजूत घालत होत्या. स्वतःचं वागणं स्वतःला पटवून देण्याचा प्रयत्न करत होत्या. पण काहीतरी चुकल्याची आज प्रकर्षाने त्यांना जाणीव होत होती. सहन करण्याच्या पलीकडे गेल्यावर मात्र त्यांनी परत सगळं कसंबसं कपाटात बंद केलं. ते कपाट तर बंद झालं पण मनाच्या कपाटात बऱ्याच विचारांची उलथापालथ होत होती आणि ते कसंतरी आवरून टाकणं किंवा बंद करणं शक्यच नव्हतं. मनाला जरा तरतरी यावी म्हणून त्यांनी गरम गरम कॉफी करून घेतली आणि वृत्तपत्रात तोंड खुपसलं. पण लक्ष मात्र कशातच लागत नव्हतं. आपल्या विचारांना पूर्णविराम मिळावा म्हणून त्यांनी घराबाहेर फेरफटका मारायला जाण्याचं ठरवलं. हातानेच केस सारखे करून आहेत त्या कपड्यानिशी त्या घराबाहेर पडल्या. काही विचार न करता वाट फुटेल तसं चालत राहायचा विचार त्यांनी केला. ‘लोकमान्य टिळक म्युन्सिपल जनरल हॉस्पिटल’..  त्याचं लक्ष त्या पाटीकडे गेलं आणि बरीच वर्ष जुनी एक आठवण ताजी झाली.

          सुमेधा ताईंना लग्नानंतर जेमतेम दोन महिन्यात दिवस गेले आणि वय अवघं अठरा वर्षांचं.. पण या बातमीने त्या मोहरून गेल्या. घरच्यांचा विरोध पत्करून लग्न केल्यामुळे दरदिवशी काहीतरी विचार मनात येऊन एकटं वाटायचं. दोघांनी परस्पर संमतीने पूर्ण विचार करुन लग्नाचा निर्णय घेतला होता तरी आप्तांच्या वियोगाचं दुःख दोहोंच्या मनात सारखंच सलंत होतं. आता या बातमीमुळे तरी सगळं मळभ दूर होईल असं त्यांना वाटत होतं. शिशिर कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यावेळी कुठे होते मोबाईल फोन! त्यांनी लगबगीनं आपल्या माहेरचा रस्ता गाठला... मग सासरचा.. पण पदरी निराशाच आली. शिशिर परत येईपर्यंत काहीच सुचत नव्हतं. दोन दिवसांनी ते आले तेव्हा त्यांना ही गोड बातमी सांगितली. त्यांच्या चेहऱ्यावरही आनंदाचा लवलेश नव्हता. “आत्ता आपल्याकडे पैसे नाहीत. मला आपल्या मुलांसोबत असं चाळीत, पै न् पै चा हिशोब करत नाही रहायचं. त्यामुळे आत्ता हे शक्य नाही.” त्यांच्या बर्फासारख्या थंड आणि नकारात्मक प्रतिसादामुळे सुमेधा ताई पार कोलमडल्या. त्यांनी तरीही शिशिरना समजवायचा आटोकाट प्रयत्न केला. पण ते ठाम होते. दोन दिवसांनी दोघांनी हॉस्पिटल गाठलं. प्रकृती नाजूक असल्याने डॉक्टरांनीही लगेच बाळंतपण नको असा सल्ला दिला. शरीराचे घाव भरले तरी मनातले घाव सतत ठुसठुसत होते. स्वतःचं घर, गाडी, दोघांचे गलेलठ्ठ पगार यासाठी पुढे जवळपास सहा वर्ष लागली. सततची धावपळ, त्यात शिशिरचा अलिप्त स्वभाव त्यामुळे वाटणारा एकटेपणा.. सगळ्यांची परिणीती म्हणून सुमेधा ताईंच्यामागे आजारपणं लागली. आता दोघेही बाळाच्या आगमनासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले खरे.. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोनालची चिमुकली पाऊले त्यांच्या अंगणात उतरायला डॉक्टर, औषधं, नवस, गंडे-दोरे, असं करत करत पुढची सात वर्षें गेली. साहजिकच जे सहजासहजी मिळत होतं ते आपल्याच हाताने गमावल्यावर यंत्रवत अशा धावपळीच्या आयुष्याची आणि सातच्या स्पर्धेची सवय लागल्यावर कधीतरी स्वतःलाच हवहवसं वाटणारं आईपण आता त्यांना नकोसं झालं होतं. तेरा वर्षांपूर्वी जे सुख त्यांनी गमावलं होतं ते आता पदरात पडूनही त्यांना त्यात स्वारस्य उरलं नव्हतं. त्यांना पुढे घ्याव्या लागणाऱ्या सुट्ट्या, त्याचा त्यांच्या कामावर होणारा परिणाम, पदोन्नतीसाठी काही काळ थांबावं लागणार, असेच विचार आता सतावत होते. घरीही ओल्या बाळंतीणचे कोडकौतुक करणारे कोणीही नव्हते. यशोदा बाई याचं काळात भेटल्या. मग घर आणि पोर विश्वासाने त्यांच्यावर टाकून सुमेधा ताई आपल्या कामात पार गुरफटल्या. पोरीसाठी खेळ, कपडालत्ता, चांगल्या शाळा कॉलेजमध्ये प्रवेश, तिचे क्लासेस कशातच त्यांनी काही कमी पडू दिलं नाही. पण हे करता करता त्या लेकराकडे चार क्षण मायेने पाहण्याचं राहूनच गेलं.

          आता सोनलच्या बोलण्याचा अर्थ त्यांना उमगला होता. तिच्या निर्णयाला आपणच कारणीभूत आहोत या विचाराने त्यांना रस्त्यातच रडू फुटलं. टॅक्सी घेऊन त्या घराकडे वळल्या. सोनलला हे सगळं कसं समजवायचं? आपण चूक केली. पण तिने करू नये. बाळाला सांभाळायला, दोघांची काळजी घ्यायला आपण आहोत हे तिला कसं सांगायचं? या विचारात त्यांनी नेहमीप्रमाणे यशोदा ताईंना फोन लावला. नाही.. आपण परत तेच करत आहोत.. त्यांनी फोन बंद केला. आपल्या मुलीला आपण स्वतः समजू शकतो. आपली चूक तिच्यासमोर मान्य करण्यात कसला कमीपणा? त्यांनी मनाशी ठरवलं. घरी पोहोचेपर्यंत त्यांनी बरेचदा सोनालशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तिने एकदाही फोन उचलला नाही. लहानपणी सोनलला काही हवं असलं किंवा काही सांगायचं असलं की ती घरी चिट्ठी ठेवून देत असे. मग ते मान्य झाल्यावर लाडाने दोन्ही हात पसरत असे. मिठी मारून गोड पापा देत असे. त्यांना आठवलं. आज त्यांना तिला हट्ट सोड असं सांगायचं होतं आणि खरंतर माफी मागायची होती. त्या लगेच तिला चिट्ठी लिहायला बसल्या. बराच वेळ.. स्वतःशीच हसत.. स्वतःशीच रडत होत्या. पण आता त्यांना खूप हलकं वाटत होतं. त्यांनी ते पत्र सोनलच्या डबेवाल्या काकांकडे सोपवलं. “ताईला सांगा मी रात्री जेवायला वाट पाहते.” त्यांनी काकांकडे निरोप दिला.

          सुमेधा ताईंची घालमेल आता वाढत होती. आशुतोषचाही फोन सोनल उचलत नव्हती. दोघेही आठ वाजल्यापासून अस्वस्थपणे तिची वाट पाहत होते. साडे दहाच्या सुमारास दाराची कडी वाजली. सोनलच असणार.. लहानपणी अगदी अशीच कडी वाजवायची ती.. स्वतःशीच पुटपुटत त्या उठल्या. दार उघडलं तर पाहतात काय.. सोनल.. डोळ्यातून घळघळा अश्रू वाहत होते आणि दोन्ही हात पसरून ती दारात उभी होती. त्यांनी तिला घट्ट मिठी मारली. सोनलच्या हातात पत्र ते पत्र होतं. “आई, तू सगळं माझ्यासाठीच करत होतीस आणि तुझा अशा वागण्यामागे काहीतरी कारण असेल हे मी समजूच शकले नाही गं.. मला माफ कर.. मी चुकले.. चुकले...” सोनल बोलतच होती. तिला आत घेऊन ताईंनी पाणी दिलं. तिचा हात हातात घेऊन त्या म्हणाल्या, “चूक माझी होती.. आणि ती मला समजली आहे. तू फक्त तिची शिक्षा या बाळाला नको देऊस. मला वचन दे तू या बाळाला जन्म देशील. ” सोनललाही खरंतर बाल हवं होतं. पण लहानपणीच्या कटू आठवणी घर करुन होत्या. आता मात्र तिला सगळं समजलं होतं. आईबद्दल असलेल्या सगळ्या तक्रारी एका क्षणात दूर झाल्या होत्या. तिने वाचन दिलं आणि लवकरच दोघी मायलेकी नव्या पाहुण्याच्या स्वागताच्या तयारीमध्ये गुंतल्या.

रविवार, २३ सप्टेंबर, २०१२


थँक यू मौसी

          परीक्षा अगदी तोंडावर येणं आणि तरीही प्रकल्प आणि अभ्यास अपूर्ण असणं.. मग ऐनवेळी येणारं दडपण.. घाईघाईत सगळं संपवण्याच्या नादात होणारी दगदग... त्यामुळे आपलीच आपल्यावर होणारी चीडचीड.. मग परीक्षेच्या आधी देवाला “देवा, आत्ता मला मदत कर. पास कर नीट. मी पुढच्या वेळेस असं नक्कीच करणार नाही.” अशी मनोभावे केलेली प्रार्थना.... की स्वतःच स्वतःला मारलेली थाप! जवळपास आपण सगळेच यातून गेलो आहोत. अशाच एका वैतागलेल्या संध्याकाळी मी साडे सातच्या सुमारास छत्रपती शिवाजी टमिर्नसवरून कल्याणच्या दिशेला जाणारी ट्रेन धावत पळत पकडली. आत चढते न चढते तोच ट्रेन निघाली. कशीबशी बसायला जागा मिळाली नशिबाने! कंटाळलेल्या मी एक सुस्कारा टाकला आणि आता काय काय करायचं राहिलं आहे आणि सगळं काम संपवून अभ्यासाला सुरुवात कधी करायची अशा विचारात गुंतून गेले.

          माझी विचार मालिका कर्कश आवाजाने खंडीत झाली. भांडणं.. मुंबईत लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांना अगदी नित्यनेमाची अशी गोष्ट. बऱ्याच महिलांसाठी तर हे एखादे शक्तीवर्धक औषध असावं असं मला वाटतं. दिवसभराच्या कामाची, घरी पदर खोचून कामाला लागायची, मुलांचा अभ्यास घेण्याची, सगळ्याची ताकद या भांडणातून त्यांना मिळत असावी. कोण म्हणतं शिव्या केवळ पुरुषांनाच जास्त येतात. त्यांनी जरा गर्दीच्या वेळेस मुंबईची लोकलवारी आणि तीही खासकरून दुसऱ्या वर्गाच्या डब्यातून करावी. महिला प्रत्येक क्षेत्रात कशा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत याचे अद्भूत चित्रच आपल्या डोळ्यांसमोर साक्षात प्रकट होते. खिडकीतून डोकावून पाहते तर दादर येत असल्याचं समजलं. आता अजून गर्दीचे लोंढे आत शिरणार.. अजून आवाज.. अजून भांडणं.. मी विचार करूनच वैतागले. पण बसायला निवांत जागा मिळाली म्हणून जरा बरं वाटलं. दादर आलं, गाडी थांबली. बरीच गर्दी सोबत घेऊन गाडी स्थानकावरून निघाली. त्या भांडखोर काकूंना भांडणाचा जोर परत चढला. त्यांचा टिपेला जाणारा फाटका आवाज ऐकून बऱ्याच जणी चुकचूकल्या. त्यांना शांत करायला जाणाऱ्यांच्या अंगावरही काकू चवताळून येत होत्या. एवढ्यात अजून एक मोठ्ठा आवाज आला... “क्या रे मेरी मीना कुमारी! क्यू तेरी जली? क्यू इतना चील्लाती रे तू?” बऱ्याच जणींच्या माना त्या विचित्र अशा आवाजाकडे वळल्या आणि चमत्कारच झाला.. काकूंचा आवाज पूर्ण शांत झाला. काकूंना गप्प करुन तिने आता मोर्चा आत बसलेल्या महिलांच्या दिशेने वळवला.

          आकाशी निळ्या रंगाची साडी, पिवळा ब्लाउज, कपाळावर मोठ्ठी लाल बिंदी, भांगेत गडद सिंदूर, तश्शीच गडद लिपस्टिक, हातभार बांगड्या, गळ्यात डोरलं आणि ठसठशीत माळ आणि काळी कभिन्न ती.. मी बसले होते तिथे आली.. “ ए मेरी दिपिका, मुझे देखके सोनेका नाटक करती क्या? बोल ना काजल तू उसकू.. ए माधुरी क्या स्माईल रे तेरा.. मै तो फिदाच होगई..” ती आली आणि पाहता पाहता वैतागलेल्या, मरगळलेल्या त्या ट्रेनच्या डब्याला एक टवटवी आली. सगळीकडे हास्याची कारंजी उसळली. मोठ्यांनी टाळ्या वाजवत ती माझ्यापाशी आली. मी तर केव्हापासून कौतुकाने तिलाच पाहत होते. जादूची कांडी फिरवावी तसा तिने सगळ्यांच्या मनावर ताबा मिळवला होता. सगळ्याचजणी तिच्याकडे आश्चर्याने पाहत होत्या. काही मात्र ती जवळ आली तोंड फिरवत होत्या पण ही मात्र कशाचाच फरक पडून न देता सगळ्यांकडून पैसे मागत होती आणि तेही त्यांची खेचत.. त्यांच्याशी मजामस्ती करत. “ये अमृता राव देखेगी क्या मुझे सिर्फ? कुछ तो दे ना.. इतने मजे तो ले रही थी कबसे..” तिने मला आवाज दिला. मलाही यावर मनापासून खळखळून हसू आलं आणि तिच्याचसाठी हातात काढून ठेवलेली नोट मी तिच्या हातात दिली. जणू ती भीक नाहीच तर तुम्हाला दोन क्षण हसवत आहे आणि त्याचे तुम्हाला वाटतील तेवढे पैसे तुमच्याकडून घेत आहे असंच वाटलं अगदी. संपूर्ण डब्यात अशीच सगळ्यांची बारशी करत आणि पैसे जमवत ती फिरली.

          ठाणे सोडल्यावर गर्दी जरा ओसरली. कळव्याला गाडीमधून उतरण्या आधी लहान मुलासारखी “टाटा बाय” असंसुद्धा सांगायला आली. ती जात होती.. सगळ्यांना क्षणात हसवणारी.. मनावरचा भार थोडा हलका करणारी.. सगळ्यांना काहीबाही नावं देणारी.. पण... तिचं नाव काय असेल? मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणाले, “सबके नाम आपको पता है ना ! अपनाभी नाम जरा बताती जाओ !” तिने विचित्र अशा पण आश्चर्यपूर्ण नजरेने माझ्याकडे पाहिलं. “मेरा नाम? बस मौसी बुलालो.. मौसीही हू मै |” तिच्या डोळ्यात पाणी आलं की मलाच असं जाणवलं? तिने झटकन आपला हात माझ्या हातून सोडवून घेतला. गाडी कळव्याला थांबली. मीही तिच्या मागोमाग दारात गेले. ती उतरली. तिने मागे वळून पहिले आणि मी जोरात ओरडले, “थँक यू मौसी.. फिर मिलते है|” तिनेही निरोप द्यायला हवेत हात हलवला. मनावरचा ताण झटक्यात कमी केला होता तिने. आजही ट्रेनने प्रवास करताना मी मौसीची वाट पाहते. परत कधी भेटेल ती मनावरचं ओझं क्षणात हलकं करण्यासाठी..? तुम्हाला भेटली तर तुम्हीही आवर्जून म्हणा. “थँक यू मौसी..”

रविवार, १५ जुलै, २०१२


तमसो मा ज्योतिर्गमय

काही दिवसांपूर्वी गुरुपौर्णिमा होती. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. पण आजकाल भ्रमणध्वनी आणि महाजालामुळे गुरूंची थेट भेट न घेताही त्यांना शुभेच्छांचे संदेश पोहोचवता येतात. गुरु आशिर्वादही असेच पाठवतात. असे चित्र सर्रास दिसू लागले आहे. तसेच वर्षभर काहीच संभाषण अथवा भेटीगाठी होत नसतानाही केवळ या एकाच दिवशी बरेचजण आपल्या गुरुजनांना एक संदेश पाठवून परत वर्षभर त्यांना विसरून जातात. काही काम असेल किंवा पुढच्या गुरुपौर्णिमेला परत त्यांना आपल्या “गुरूंची” आठवण येते. त्यातही अनेकदा हे गुरु म्हणजे शाळा महाविद्यालय अथवा अन्यत्र ठराविक विषय शिकवणारे शिक्षक असतात. काही वेळेस काही अध्यात्मिक गुरुही असतात. आपल्या धर्मात सांगितल्याप्रमाणे काहीजण सतत योग्य मार्गावर चालण्यासाठी गुरूच्या शोधात असतात आणि यातच खरंतर वाट भरकटतात.
यासाठीच गुरु या शब्दाचा नेमका अर्थ आपण जाणून घेणे खूप आवश्यक आहे. गुरु या संस्कृत शब्दातील “गु” हे अक्षर मनातील अज्ञानरूपी अंधःकार दर्शवतं तर “रु” या अक्षराचा अर्थ ज्ञानरूपी प्रकाश असा आहे. असा अर्थ लक्षात घेतल्यावरच या शब्दाची नेमकी व्याप्ती समजते. याचाच अर्थ गुरु एकच असावा अथवा तो शिक्षकाच असावा असं काहीच नाही तर ज्या कोणी व्यक्ती आणि घटना आपल्याला काही बोध देतात त्या सर्वच आपल्या गुरु आहेत. एकनाथी भागवतामधल्या काही ओळी मला यासंदर्भात आठवतात;
जो जो जयाचा घेतला गुण
तो तो म्या गुरु केला जाण
गुरुसी आले अपारपण
जग संपूर्ण गुरु दिसे
हे कसे? याचे उत्तरही पुढे सापडते. संगीत ऐकू आल्यावर हरिणे लुब्ध होऊन त्या दिशेने धावत सुटतात आणि या मोहापायीच पारधी त्यांना पकडतो यातून असे अविचाराने वागू नये आणि मोहात अडकू नये हा बोध होतो तर वेश्या रोज नटून बसते, गिऱ्हाईकाची वाट पाहते आणि तो न मिळाल्यास हिरमुसली होते, भेटल्यास खुश होते. ती ज्या आतुरतेने वाट पाहत असते त्यातून भक्ती आणि व्याकुळता तसेच फलप्राप्तीचा आनंद शिकता आला म्हणून अगदी अशा वेश्येलाही त्यांनी गुरु मानले आहे. दत्तगुरुंचे अशा २४ सजीव निर्जीव घटकांकडून काय काय शिकले आणि ते त्यांच्या गुरुस्थानी कसे झाले हे अत्यंत खुबीने यात मांडण्यात आले आहे.
          खरंच.. प्रत्येक व्यक्ती, घटना आपल्याला काहीतरी शिकवून जातात. जे आहे तसंच  ते न पाहता त्यातून घेण्यासारखं काय काय आहे ते पाहिल्यास अवघे जगच आपले गुरु आहे याचं प्रत्यय येईल. गुरूच्या शोधात भरकटत राहण्यापेक्षा किंवा एखादी अप्रिय व्यक्ती आणि घटना यांना दोष देण्यापेक्षा त्यातूनही काही शिकता आले.. घेता आले.. तर आणि तरंच आयुष्य सुकर होईल. तेव्हा दर गुरुपौर्णिमेला अशा काही अनपेक्षित गुरुंचीही आठवण असू द्या  आणि महत्त्वाचे.. असे गुरु ओळखायला शिका तरच अंधारातून उजेडाकडे यशस्वी वाटचाल शक्य होईल.