रविवार, १५ जुलै, २०१२


तमसो मा ज्योतिर्गमय

काही दिवसांपूर्वी गुरुपौर्णिमा होती. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. पण आजकाल भ्रमणध्वनी आणि महाजालामुळे गुरूंची थेट भेट न घेताही त्यांना शुभेच्छांचे संदेश पोहोचवता येतात. गुरु आशिर्वादही असेच पाठवतात. असे चित्र सर्रास दिसू लागले आहे. तसेच वर्षभर काहीच संभाषण अथवा भेटीगाठी होत नसतानाही केवळ या एकाच दिवशी बरेचजण आपल्या गुरुजनांना एक संदेश पाठवून परत वर्षभर त्यांना विसरून जातात. काही काम असेल किंवा पुढच्या गुरुपौर्णिमेला परत त्यांना आपल्या “गुरूंची” आठवण येते. त्यातही अनेकदा हे गुरु म्हणजे शाळा महाविद्यालय अथवा अन्यत्र ठराविक विषय शिकवणारे शिक्षक असतात. काही वेळेस काही अध्यात्मिक गुरुही असतात. आपल्या धर्मात सांगितल्याप्रमाणे काहीजण सतत योग्य मार्गावर चालण्यासाठी गुरूच्या शोधात असतात आणि यातच खरंतर वाट भरकटतात.
यासाठीच गुरु या शब्दाचा नेमका अर्थ आपण जाणून घेणे खूप आवश्यक आहे. गुरु या संस्कृत शब्दातील “गु” हे अक्षर मनातील अज्ञानरूपी अंधःकार दर्शवतं तर “रु” या अक्षराचा अर्थ ज्ञानरूपी प्रकाश असा आहे. असा अर्थ लक्षात घेतल्यावरच या शब्दाची नेमकी व्याप्ती समजते. याचाच अर्थ गुरु एकच असावा अथवा तो शिक्षकाच असावा असं काहीच नाही तर ज्या कोणी व्यक्ती आणि घटना आपल्याला काही बोध देतात त्या सर्वच आपल्या गुरु आहेत. एकनाथी भागवतामधल्या काही ओळी मला यासंदर्भात आठवतात;
जो जो जयाचा घेतला गुण
तो तो म्या गुरु केला जाण
गुरुसी आले अपारपण
जग संपूर्ण गुरु दिसे
हे कसे? याचे उत्तरही पुढे सापडते. संगीत ऐकू आल्यावर हरिणे लुब्ध होऊन त्या दिशेने धावत सुटतात आणि या मोहापायीच पारधी त्यांना पकडतो यातून असे अविचाराने वागू नये आणि मोहात अडकू नये हा बोध होतो तर वेश्या रोज नटून बसते, गिऱ्हाईकाची वाट पाहते आणि तो न मिळाल्यास हिरमुसली होते, भेटल्यास खुश होते. ती ज्या आतुरतेने वाट पाहत असते त्यातून भक्ती आणि व्याकुळता तसेच फलप्राप्तीचा आनंद शिकता आला म्हणून अगदी अशा वेश्येलाही त्यांनी गुरु मानले आहे. दत्तगुरुंचे अशा २४ सजीव निर्जीव घटकांकडून काय काय शिकले आणि ते त्यांच्या गुरुस्थानी कसे झाले हे अत्यंत खुबीने यात मांडण्यात आले आहे.
          खरंच.. प्रत्येक व्यक्ती, घटना आपल्याला काहीतरी शिकवून जातात. जे आहे तसंच  ते न पाहता त्यातून घेण्यासारखं काय काय आहे ते पाहिल्यास अवघे जगच आपले गुरु आहे याचं प्रत्यय येईल. गुरूच्या शोधात भरकटत राहण्यापेक्षा किंवा एखादी अप्रिय व्यक्ती आणि घटना यांना दोष देण्यापेक्षा त्यातूनही काही शिकता आले.. घेता आले.. तर आणि तरंच आयुष्य सुकर होईल. तेव्हा दर गुरुपौर्णिमेला अशा काही अनपेक्षित गुरुंचीही आठवण असू द्या  आणि महत्त्वाचे.. असे गुरु ओळखायला शिका तरच अंधारातून उजेडाकडे यशस्वी वाटचाल शक्य होईल.

३ टिप्पण्या:

  1. खूप खूप सुंदर....
    मोजकेच शब्द,पण अचूक वापरलेस...

    उत्तर द्याहटवा
  2. आद्य शंकराचार्यान्ना देवळाच्या दारात एक भिकारी भेटला.
    तेंव्हा शंकराचार्य त्याला म्हणाले
    " लाज नाही वाटत, हात पाय धड असताना भिका मागतोस?"
    त्यावर तो भिकारी शांतपणे म्हणाला
    " देवळात जाउन तुम्ही तरी दुसर काय करणार. हात पाय धड असताना भिकाच मागणार ना?"

    शंकराचार्यान्नी तत्क्षणी त्याचे पाय धरले
    त्याला गुरु केल.



    आपले डोळे उघडले तरी आपण मात्र एवढी लीनता दाखऊ शकतो का?

    उत्तर द्याहटवा