तो आणि ती
एका सोशल नेटवर्कींग साईटवरच्या
ग्रुपमधून त्यांची ओळख झाली. पुढे त्या ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं. एकमेकांपासून
दूर असूनही, एकमेकांना न भेटूनही केवळ फोनवर आवाज ऐकून ते एकमेकांच्या मनातलं समजू
लागले. आता तो आणि ती यांचं सूत जुळलं आणि त्याचं लग्न झालं एवढीही टिपिकल स्टोरी
नाही आपली. तर हे तो आणि ती मैत्री होऊनही ४ वर्ष एकमेकांना कधी ते भेटूच शकले
नाहीत. फोन, फेसबुक, व्हॉटस् अॅप यामुळे कधी भेटीची उणीवही भासली नाही.
ती गोरीपान अशी मुंबईकडची तर
हा काळासावळा नगरचा गडी. कोणीही पाहताच क्षणी प्रेमात पाडावं अशी ती.. तर मोकळ्या, प्रामाणिक मतांवर कोणतीही
मुलगी फिदा होईल असा तो. दोघांनी एकमेकांना अनेकवेळा सुखदुःखात साथ दिली. अगदी त्यांच्या
प्रियकर-प्रेयासीलाही त्यांची ही वेडी मैत्री चांगलीच माहिती आहे. आता तिचं
प्रियकरासोबत लग्न ठरलं आहे. त्याचंही ठरेलच इतक्यात. काही कामनिमित्त त्याला
मुंबईला येण्याची आणि तिला भेटण्याची संधी मिळाली म्हणून दोघेही खुशीत आहेत.
त्याला स्टेशनवरून तिने थेट
मरीन ड्राईव्हला नेलं. समुद्राकडे कितीतरी वेळ तो एकटक पाहत होता. भेटल्यावर तो
एवढा गप्प का? तिला अवघडल्यासारखं झालं. त्याच्याही ते लक्षात आलं. उगीच काहीतरी
बोलावं म्हणून त्याने विचारलं, “सकाळी असा मेसेज का केलास? ये लम्हा फिलहाल जी
लेने दे? आणि व्हॉटस् अॅपवर स्टेटसही असंच आहे तुझं. काही झालंय का?” “नाही रे.. ते
गाणं ऐकत होते एवढंच.” तिचं उत्तर. तिने इकडचे तिकडचे विषय काढून त्याला बोलतं
करायचा प्रयत्न केला. पण, तो अगदीच शांत होता. पहिल्यांदाच भेटलो आहोत म्हणून असेल
कदाचित.. तिने विचार केला. थोड्यावेळाने मात्र तो थेट मुद्द्यावर आला. “आता तुझं
लग्न होईल मग आपल्याला आतासारखं नाही बोलता येणार सतत.” त्याची घुसमट पाहून तिने “तर?”
एवढाच प्रश्न केला. “मग आपण कमी बोलायची सवय केली पाहिजे.” ती गप्पच. या मुलीला
समजतंय तरी का? आपण किती विचार करत आहोत तिच्या दूर जाण्याचा? त्याची मनातल्यामनात
घालमेल. तेवढ्यात पाऊस कोसळू लागला. ती उभी राहिली, लहान मुलांसारखी हात पसरून गोल
गिरक्या घेत, “कित्ती मोठ्ठा पाऊस!” म्हणून ओरडली. तिचं पावसाचं वेड आणि बालिशपणा
त्याला नवा नाही. पण लगेच छत्री उघडून ती शांतपणे त्याच्यापाशी बसली. “मला आवडतं
भिजायला पण..” “अगं, आवडत मग भिजावं खुशाल.” तो. “नको, काही महिन्यांनी पाऊस बंद
होईल. मग कुठे येणार अशी मजा! त्यामुळे सवय करायला हवी.” आता तो वैतागला, “तू काहीही
कुठेही जोडत्येस. पाऊस दरवर्षी येतो पण आपलं नातं नेहमीसाठी बदलणार आहे.” ती
खळखळून हसून म्हणाली, “मग आत्ता जेवढे महिने पाऊस आहे तेवढं भिजावं की पुढचा विचार
करून सगळे दिवस संपवायचे?” त्याला तिचा मुद्दा पटला. दोघांनी छत्री बंद केली आणि पावसामध्ये
चिंबचिंब भिजले. निरोप घेताना ती म्हणाली, “आपण प्रयत्न करू ना लग्नानंतरही
एकमेकांसाठी वेळ काढायचा.” तिने खूप प्रयत्न करून अडवलेलं डोळ्यातलं पाणी त्याला
दिसलंच. गाडी सुरु झाली आणि तिचा विचार मनात घोळत असतानाच त्याला सकाळच्या तिच्या
मेसेजच्या ओळींचा अर्थही समजला. त्यानेही व्हॉटस् अॅपवर लगेच स्टेटस अपडेट केलं...
ये लम्हा फिलहाल जी लेने दे..
-
वैदेही सच्चिदानंद शेवडे.
छान
उत्तर द्याहटवाSundarch...
उत्तर द्याहटवाअप्रतिम , सुंदर .
उत्तर द्याहटवाAWESOME!! :)
उत्तर द्याहटवाहळूवार ...खूप छान
उत्तर द्याहटवाखूप सुंदर
उत्तर द्याहटवासुंदर .......एकदम छान आहे...
उत्तर द्याहटवा