सदर लेख “संत साहित्य”
विशेषांकात प्रकाशित झाला आहे.
विठ्ठलाचा छंद l वाचे गोविंद गोविंद ll
पिवळ्या रंगाच्या,
चकाकणाऱ्या कोणत्याही वस्तूला सोने म्हणता येत नाही. भट्टीतून तावून सुलाखून
निघाले की मगच सोन्याच्या शुद्धतेची, त्याच्या उत्कृष्ठतेची ओळख होते. अशा
सोन्यालाच आपण खरे सोने समजतो. अगदी तसेच आपल्या वडिलांनी अचानकपणे दुसऱ्याच्या
घरात सोडल्यामुळे आलेला पोरकेपणा, अनाथ, उपेक्षित असे एका मोलकरणीचे आयुष्य वाटेला
आलेली अशी ही जनाबाई.. कधी चोरीचा आळ तर कधी तिच्या विठूरायावरील श्रद्धेची समाजाने
केलेली हेटाळणी किंवा एका स्वच्छ, सुंदर, पवित्र अशा चारित्र्यावर उडवलेले
शिंतोडे, जीवनातील अशा अनंत कटू प्रसंगांना संयमाने ती तोंड देत राहिली. जन्माने
अतिशूद्र, त्यातून स्त्री, भरीस भर एकटेपणा आणि लोकांची सततची टीका, अश्या परिस्थितीत
कोणताही सामान्य माणूस कोलमडेल. परंतु अत्यंत कठीण अथवा सचोटीच्या क्षणीही ती
खंबीरपणे उभी राहिली. तिची विठ्ठलावरील भक्ती कधी तसूभरही कमी जास्त झाली नाही.
मुखी सतत विठुरायाचे नाम घेत आपल्या भक्तीरसात न्हायलेल्या अभंगांमधून देवाच्या
जवळ जाण्याचा नामसंकीर्तनासारखा सुलभ मार्ग सांगणाऱ्या संत जनाबाई या
महाराष्ट्राच्या संत परंपरेतील अस्सल बावनकशी सोनंच जणू.
चातुर्वर्ण्य व्यवस्थेतील
सर्वात खालच्या वर्णातील, तत्कालीन अतिशूद्र समजल्या जाणाऱ्या समाजातील, गरीब
घरातील एक लहानशी पोर.. आई वारल्यावर जेमतेम पाच सात वर्षांची असताना अचानक
वडिलांनी तिला पंढरपुरी दामाशेटींकडे आणून सोडली. येथे तिच्या स्वतःच्या घरापेक्षा
निश्चितच सुबत्ता होती. दामाजी आणि त्यांची बायको गोणाई दोहोंनी तिचे मनापासून
स्वागत केले. त्यांच्या घरातले आणि घरातील प्रत्येकाच्या मनात जनाबाईचे स्वतःचे, हक्काचे
असे स्थान होते. संत शिरोमणी नामदेवरायांची ही बालसखी. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान,
मुक्ताई, एकनाथ, तुकाराम, चोखामेळा, अशा अनेक संतांनी गौरवलेली संत जनाबाई. त्या
विठू माऊलीची लाडकी भक्त. अशी अनेक मानाची पिसे तुऱ्यात असूनही नामदेवांच्या
घरातील स्वतःची दासीची जागा तिने मनापासून जपली. वारकरी किंवा भागवत धर्माचा
अंगीकार करणारे जात-पात मानत नाहीत. असे असूनही समाजाच्या चौकटीचे भान ठेऊन जनाबाई
आचरण करीत. आज मराठी संत साहित्यात आवर्जून जनाबाईंचा उल्लेख शांत, मंद सुवासिक
अशा जाईच्या वेलीचे रूपक वापरून केला जातो. तरीही आयुष्याच्या शेवटच्या घटकेपर्यंत
जनाबाई मात्र स्वतःचा उल्लेख ‘दासी जनी’ अथवा ‘नामयाची दासी जनी’ असाच करून
समाधानी होत्या. आपल्या अभंगातून कित्येक वेळेस त्यांनी स्वतःला असे संबोधले
असल्याचे दिसते.
“जनी म्हणे जोड झाली जोड विठोबाची l दासी नामयाची म्हणोनिया
l”
ज्याप्रमाणे नदी लांब
अंतरावरील एखाद्या बिंदुपासून वाहत वाहत, सर्वांना तृप्त करीत सागराला येऊन मिळते तशीच
लहानशी जनी मराठवाड्यातील एका छोट्याशा खेड्यातून ईश्वरी संकेतानुसार पंढरपुरी
आली. नामदेवांसोबत राहून विठू सावळ्याची भक्ती करू लागली. स्वतःच अस्तित्व विसरली.
या सागर सरितेच्या संगमाचा शेवट हा विश्वनियंत्या परमेश्वराच्या पायाशी विलीन
होण्यात किंबहुन त्याच्याशी एकरूप होण्यात झाला नसता तरच नवल होते!
दमा आणि कुरुंड हे गंगाखेड येथे
गावाबाहेर राहणारे अतिशूद्र जातीतील एक दाम्पत्य. घरामध्ये अठरा विश्वे दारिद्र्य
पण मनामध्ये विठोबाच्या भक्तीची श्रीमंती. दमा नित्यनेमाने वारीला जात असे. दररोज
मिळेल ते काम करून दोघं आपला चरितार्थ चालवीत होते. मीठभाकरीमध्येही सुखी होते.
आयुष्यात त्यांच्या दृष्टीने त्यांना एकंच मोठा सल होता. लग्न होऊनही कुरुन्डेची कूस
उजवत नव्हती. एक दिवस त्या दोघांनी हे गाऱ्हाणे विठ्ठलासमोर मांडायचे ठरवले.
दोघेही ठरल्याप्रमाणे वारीला निघाले. मुल व्हावे म्हणून विठोबाला साकडे घातले. आणि
काय आश्चर्य.. विठू माऊलीने त्यांना दृष्टांत दिला! “तुमच्या कुळाचा उद्धार करणारी
आणि माझा अंश असलेली कन्यारत्न तुमच्या पोटी येईल. माझा अखंड सहवास तिला लाभेल.”
आणि खरंच काही काळाने कुरुन्डेला दिवस गेले. देवाच्या आशीर्वादाचे बीज तिच्या पोटी
रुजले होते. त्यामुळे एक आगळेच तेज तिच्या चेहऱ्यावर पसरले होते. दिवस भरत आल्यावर
तिने एका गुटगुटीत कन्येला जन्म दिला. दमा आणि कुरुंड दोहोंच्या आनंदाला पारावर
उरला नाही. जना असे तिचे नाव ठेवण्यात आले. परंतु, त्यासोबतच विठोबाचे शब्दही
त्यांना पूर्ण लक्षात होते. त्यांच्या कुळाचा उद्धार करणारी अशी देवाच्या
आशीर्वादाने झालेली लेक त्यांच्या कुशीत होती. पण तिचा सहवास त्यांना फारकाळ
लाभणार नव्हता. तिला पंढरपुरात दामाशेटीकडे सोडण्याचा देवाचा आदेश त्यांना पाळावाच
लागणार होता. पाच सात वर्ष त्यांच्या अंगणात ते पाखरू मनसोक्त बागडले. दमा आणि कुरुंड दोहोंचा जीव त्यांच्या
या लाडक्या लेकीत अडकला होता. तिच्या बाललीला त्यांना मोहात पाडत होत्या. पण तरीही
लवकरच ती आपल्यापासून दूर होणार ही भावनाही त्यांना बोचत होती. त्यातच कसल्याशा
आजाराचं निमित्त होऊन जनीची आई देवाघरी गेली. दमा या धक्क्याने खचला. एवढ्या लहान
मुलीला आता आपण एकटे कसे सांभाळणार हा प्रश्न त्याला पडला. तेवढ्यात त्याला
विठोबाचे शब्द पुन्हा आठवले. छोट्याशा जनीला दमाने, “काळ्या देवाला भेटायला जाऊया का?”
असे विचारताच जनीने आनंदाने मान डोलावली. एवढंसं आपलं पोर..! आपल्याविना कसं राहू
शकेल? दामाजींच्या घरी तिला कोण सांभाळेल? अशा हजार चिंतांनी जनीच्या बापाचे हृदय
पोखरत होते पण जनी मात्र वेगळ्याच आनंदात होती. विठोबाच आता तिच्या आयुष्याचं चांगल
वाईट पाहणार आहे; हे जणू तिला आधीच समजले होते. तिचा नामया तेथे तिची वाट पाहत
होता. पुढे नामदेवांच्याच सानिध्यात राहून तिला तिचा विठू भेटणार होता. पण, जनीच्या
आयुष्याच्या दोऱ्या विठोबाच्या हातात सोपवल्या असल्याने आपण निश्चिंत व्हावे हे
एका बापाच्या मनाला नीटसे पटत नव्हते. इथे जनी मात्र आपल्या खऱ्या घरी जाण्यासाठी
आतुर होती. मजल दरमजल करीत दमा आणि जनी दामाजींकडे पोहोचले. त्यांच्याकडे जनीला
सोडून जड अंतःकरणाने दमाने निरोप घेतला. त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या
क्षणापर्यंत त्याची आणि जनीची भेट कधी झालीच नाही.
लोकांच्या दृष्टीने जनी ही
आई बापाने टाकलेली पोर होती. दामाजींच्या घरातील एक मोलकरीण होती. कुणाही सामान्य
व्यक्तीला जनी अत्यंत एकटी, परावलंबी वाटेल. कुणालाही तिच्या या परिस्थितीवर कीव
यावी. पण, जनी मात्र आपलं सर्वस्व विठोबाला समजू लागली. आई, वडील दुरावल्याचे दुःख
कोणालाही होईल. जनीही यास अपवाद नाही. पण या यातना सहन करतानाही ती देवाला आळवते;
“माय गेली बाप मेला l आतां सांभाळी विठ्ठला ll
मी तुझे गा लेकरू l नको मजशी अव्हेरू ll
मतिमंद तुझी दासी l ठाव द्यावा पायापाशी ll
तुजविण सखे कोण l माझे करील संरक्षण ll
अंत किती पाहासी देवा l थोर श्रम झाला जीवा ll
सकल जीवाच्या जीवना l जनी म्हणे नारायणा ll”
अत्यंत सध्या शब्दात पण आर्त
विनवणी जनी करते. तिच्या शब्दाशब्दातून तिचे अंतर्मन उलगडत जाते. कधी देवाला ती
माय बाप म्हणते तर कधी सखा मानते. कधी लहान मुलासारखा हट्ट करते तर कधी रुसून
बसते. राग आला तर कधी “अरे विठ्या अरे अरे विठ्या l मूळ मायेच्या कारट्या ll” असे चार
खडे बोलही सुनावते. विठुरायाच्या चरणांवर आपले आयुष्य वाहते. एवढेच नव्हे तर कोण
कुठच्या टोकाच्या गावाहून आलेली ही पोर चंद्रभागेच्या तीरी उभे असलेल्या विठुरायावर
अगदी सहजच आपला हक्क असल्याचे सांगते. पंढरपूर हे तिचे माहेर असून येथे आलेल्या
प्रत्येकाला मोक्ष प्राप्त होतो असे ठामपणे सांगते.
“बाप रखुमाबाई वर l माझे निजाचे माहेर ll
ते हे जाणा पंढरपूर l जग मुक्तीचे माहेर ll
तेथे मुक्ती नाही म्हणे l जनी न पाहे त्याचे वदन ll”
एखाद्या अशिक्षित, समाजाने
मागास ठरवलेल्या वर्गातील, मोलकरीण असलेल्या स्त्रिला मोक्षाचे विचार करता यावे हे
नवल नाही का! नामदेवांच्यासोबत राहून जनीला लहानपणी थोडीफार शब्द ओळख झाली. त्याकाळी
महिलांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी होते. तरीही नामदेवांने आग्रहाने जनीकडून अक्षरे
गिरवून घेतली. ते कधी स्वतः तिचे अभंग लिहून काढत तर कधी जनाबाईच ते उतरवून ठेवत
असत. कोणतेच साचेबद्ध शिक्षण न घेताही
जनाबाईंच्या अभंगात एक गोडवा जाणवतो. आज अभंगादी काव्य प्रकारांचे शालेय जीवनात
पाठ शिकवले जातात. त्यातील रचना, विविध वृत्त यांचा अभ्यास केला जातो. शिक्षणाचा
भाग असूनही अशा रचना आता सहसा कुणाला जमत नाहीत. असे रसाळ अभंग करणे हे वेड्या
गबाळ्याचे काम नव्हे. तेथे एक अडाणी जना बोलता बोलता, अगदीच उत्स्फुर्तपणे अभंग रचत
असे. तिची रोजची कामे, आजूबाजूच्या लोकांचा स्वभाव, विठोबावरील तिचे प्रेम असे
अगदी साधारण विषय त्यांच्या अभंगातून आपल्याला दिसतात.
आज जवळपास प्रत्येक कामासाठी
आपण विविध यंत्रांवर अवलंबून असतो. पूर्वीच्या काळी महिला वर्गाला ही सूट नव्हती. सडा
सारवणे, निवड पाखडणे, जात्यावर दळणे, अशी असंख्य अंग मेहनतीची कामे जनी एकटीच मन
लावून करीत असे. तिच्या कामाचा वेगही चांगला होता. कोणत्याही कामात चालढकलपणा
नाही. भरपूर काम करूनही, एका क्षणाची विश्रांती न घेताही, ती सतत उत्साही असे. काय
असेल या मागचे गुपित? सतत काम करण्याचा उत्साह कुठून येत असेल तिच्यामध्ये? यावर
जनी म्हणते,
“झाडलोट करी जनी l केर भरी चक्रपाणि ll
पाटी घेउनी डोईवरी l नेऊनिया टाकी दुरी ll
ऐसा भक्तीसी भुलला l नीच कामे करू लागला ll
जनी म्हणे बा विठ्ठला l काय उतराई होऊ तुला ll”
जनीच्या प्रत्येक कामात तिचा
विठोबा तिची साथ देत असे. आपले प्रत्येक काम तोच करतो ही तिची दृढ श्रद्धा. आपण
सामान्य माणसं.. त्यातून स्वतःला विज्ञाननिष्ठ अथवा बुद्धिप्रामाण्यवादी, अशी
विशेषणं स्वतःच लावतो. अशा चष्म्यातून पाहिल्यास कुणाला हे सर्व एकटेपणात
पिचलेल्या एका अबलेचे मानसिक खेळ वाटतील. पण हा चष्मा उतरवून स्वच्छ विचार केल्यास
जनीचे विठूवरील प्रेम तिला कसे सबळ करते ते समजते. देव आपल्यावरील प्रेमाखातर आपली
सगळी कामं वाटून घेत आहे, याचे जनीला कौतुक वाटते. आपल्यासाठी तो एवढी हलकी कामं
करीत आहे या भावनेने सुखावणाऱ्या जनीला देवाचे उच्च स्थान लक्षात येते आणि तो केवळ
आपल्यासाठी अशी कामं करीत आहे; त्यामुळे लोक त्याला नावं ठेवतील अशी अपराधीपणाची
भावना तिच्या मनात येते. एवढा जगातील सर्व घटनांचा करता करवीता आज आपल्यासाठी कष्ट
उपसत आहे, राबत आहे, या भावनेने सुखावत असतानाच जनीला आता या ऋणातून कसे मुक्त
व्हावे? असा निष्पाप विचारही येतो. सोहम अथवा अद्वैताचे तत्त्व एकदा समजले की देव
प्रत्येक कामात मदत कशी करतो हे कोडे अलगद उकलते. अगदी नेमक्या शब्दात हे तत्त्वही
जनाबाई उलगडतात.
“जोड जाली रे शिवासी l भ्रांत फिटली रे जिवाची ll
आनंदची आनंदला l आनंद बोधची बोधला ll
एकपण जेथे पाही l तेथे विज्ञप्ति उरिली नाही ll
ऐसी सद्गुरूची करणी l दासी जनी विठ्ठल चरणी ll”
भगवंत आणि भक्त दोन्ही एकच
अथवा भक्त हा भगवंताशी एवढा एकरूप होतो की त्याच्यामध्ये आणि भगवंतामध्ये काही
अंतरच राहत नाही. जेथे नर आणि नारायण दोन्ही एकमेकांमध्ये विलीन होतात त्यास ‘अद्वैत’
असे म्हणतात. भक्त आणि भगवंत हे दोन अथवा भिन्न असे मानले जाते ते ‘द्वैत’. तर दोन
स्वतंत्र अस्तित्व नसलेले किंवा एकमेकांपासून भिन्न नसलेले ते ‘अद्वैत’. त्यामुळेच
भक्त आणि भगवंताचे, आत्मा आणि परमात्म्याचे मिलन म्हणजे अद्वैत होय. जेव्हा मीठाची
बाहुली समुद्रतळ शोधायला समुद्रात उडी घेऊ पाहील तेव्हा तिचे स्वतंत्र अस्तित्व राहू
शकेल का? ती त्या पाण्यात पूर्णपणे विरघळून जाईल. तसेच स्वतःचा शोध घेताना, आपल्या
अविनाशी आत्म्याचा ठाव घेताना, मी म्हणजे कोण? या प्रश्नापाशी येऊन अडकायला होते.
तेव्हा त्या परब्रह्मरुपास आपण एकरूप झालो की “अहं ब्रह्मास्मि” हे मूळ सूत्र
समजते. एकदा आपल्यातील देवत्वाची ओळख आपल्याला पटली की कुकर्मांपासून आपण सहज दूर
होतो. मानवी देहाला या लौकिक जगातील ज्या दुःखांचे ओझे वाटते ते जीवा शिवाच्या
मैत्रीने दूर होते. या अद्वैताच्या अथवा सोहम तत्त्वाच्या अंगिकारामुळे जनाबाईचे
पोरकेपण दूर झाले. श्रमांमुळे देहाला होणारे कष्ट आणि मानसिक यातनाही तेथेच
थंडावल्या. आपल्यासोबत सतत विठोबा आहे; आपले दोहोंचे अस्तित्व एकच आहे त्यामुळे तो
आपल्याला प्रत्येक कामात साथ देतो हे जनाबाईंचे विचार यातून आपल्याला समजतात. जेथे
लहानसहान कुरबूरी, हेवेदावे संपले तेथे आनंदची आनंद झाला असे त्या सांगतात. “देह
भाव सर्व जाय l तेव्हा विदेही सुख होय ll” अशी त्यांची अवस्था होते. मी-तू पणाची
बोळवण झाल्यावर आता देवाला आपण आपल्या हृदयात पक्के अडकविल्याचा जनाबाईंना साक्षात्कार
होतो. त्याला आपल्यापासून कोणीच हिरावून नेऊ शकत नाही, असा दृढ विश्वास त्यांच्या
मनी उत्पन्न होतो.
“धरिला पंढरीचा चोर l गळा बांधोनिया दोर ll
हृदय बंदिखाना केला l आत विठ्ठल कोंडला ll”
एखाद्या द्वाड, अल्लड, बदमाश
लेकरास आईने पकडून ठेवावे एवढ्या सहजतेने ती विठ्ठलाला हृदयात बंद केल्याचे
सांगते. ती आणि तो एक याच भावनेतून तिच्या कामांमध्ये तिला मदत करण्यासाठी स्वतः
चक्रपाणी आल्याचे तिला जाणवते. जनीला मदतीला कुणी माणूस येत असावा असे काही जणांना
वाटते. तसे जरी मान्य केले तरी अडीनडीला आपल्यासाठी धावून आलेल्या प्रत्येकात आपल्याला
ईश्वरच सापडत असतो हे विसरू नये.
देवाच्या उपासनेचा आणि त्यायोगे
मोक्ष मिळवण्याचा साधा सरळ मार्ग म्हणजे नामस्मरण. देवाचे नाव सतत मुखात असल्याने राग,
लोभ, अविवेकी विचार, अशा सर्व दुर्गुणांचा निचरा होतो. शांत, समाधानी वृत्तीचा,
सगुण रूपाचा आपल्यात शिरकाव होतो, असे त्या म्हणतात. “मूळ गेले हो क्रोधाचे l ठाणे
केले विवेकाचे ll” असे त्या सहज सांगतात. जनाबाई आणि नामसंकीर्तन हे समीकरणच
जगावेगळे वाटावे असे आहे. “मला लागो हाची धंदा l रामकृष्णहरिगोविंदा ll” अशी कामना
त्या व्यक्त करतात. आपण जी कामं दररोज करतो त्याचा आपल्याला कधी ना कधी कंटाळा येत
असतो. मग कामात चालढकल कळत नकळतपणे होत असते. परंतु, जनाबाई नामस्मरणात एवढ्या गुंग
होत की त्यांच्या प्रत्येक कामात त्यांना देवाचे अस्तित्व जाणवू लागले. मग कामातून
पळवाट का शोधावीशी वाटेल कुणाला? एखाद्यावर जीव ओवाळून टाकणे किंवा समरस होऊन जाणे
म्हणजे काय हे पुढील पंक्तींवरून सहज लक्षात येते.
“देव खाते देव पिते l देवावरी मी निजते ll
देव देते देव घेते l देवासवे व्यवहारीते ll
देव येथे देव तेथे l देवाविणे नाही रितें ll
जनी म्हणे विठाबाई l भरुनी उरलें अंतरबाही ll”
आपल्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक
गोष्टीत, चराचरात जनीला देव सापडत होता. एका वेगळ्याच पातळीवरील अलौकीक प्रेम आणि
विश्वासाची प्रचीती यातून होते. आपल्याला आई, वडील, भाऊ, बहिण, नवरा, बायको, आदी
सर्व नात्यांमध्ये ती व्यक्ती सदेह रुपात दिसत असते. त्यांच्यावर आपले मनापासून
प्रेम असते परंतु, “भरुनी उरले अंतरबाही” एवढे समर्पण प्रत्येकाला खरंच अनुभवता
येते का? येथे तर जनी चारचौघांना न दिसणाऱ्या, केवळ तिच्या मनःचक्षूंसमोर असलेल्या
एका प्रचंड विशाल शक्तीकडे अगदी सहज, डोळे मीटून स्वतःला सोपवीत आहे. हे कुणा सामान्याला
जमणे केवळ अशक्य! म्हणूनच या कठीण अश्या भक्तिमार्गाचे वर्णन “भक्ती ते कठीण इंगळाची
खायी l” असे ती करते.
देवाला कधी आईच्या मायेने, लाडाने
हाक मारणारी जनी, कधी आपल्या मित्राला हाक मारावी एवढ्या सहज त्याला मनातील गुज
सांगणारी जनी, असे जनाबाईंचे अनेक रंग आपल्याला त्यांच्या अभंगातून दिसून येतात.
पण सर्वात महत्त्वाचे आणि देवाला स्वतःपाशी कायमचे बांधून ठेवणारे जनीचे रूप
म्हणजे तिच्या मनाची अत्यंत व्याकूळ अशी अवस्था. विठ्ठलाला मायबाप समजणारी जनी
त्याच्या भेटीच्या ओढीने हट्ट करते. ती विठोबाचे आधी कौतुक करते.
“रूप सावळे सुंदर l कानी कुंडले मकराकारll
गळा वैजयंती माळा l तो हा मदनाचा पुतळा ll ”
कौतुकाला विठू भुलला नाही तर
लाडीगोडीने बोलाविते. “ये ग माझे विठाबाईl ” अशी हाक मारते. तरीही विठूराया आला
नाही तर मात्र हिरमुसून जाते. आणि “का ग न येसी विठ्ठला l ऐसा कोण दोष मला ll” असे
विचारते. कधीकधी मात्र या भौतिक जगात रमणे अशक्य होत असल्याने ती अजूनच कळकळीने
हाक मारते.
“का गे निष्ठुर झालीसी l मुक्या बाळाते सांडिसी ll
तुज वाचोनिया माये l जीव माझा जावो पाहे ll
प्राण वारीयले कंठी l जनी म्हणे देई भेटी ll”
अशा आर्त हाकेकडे कानाडोळा
करणे देवाला जमणे कठीणच. लहान बाळ आपल्या आईला बोलावते आहे जणू तशी जनी विठोबाला
आळविते. मग तो पंढरीचा राजा सगळी कामं बाजूला सारून जनीला भेट देत असे. तिला
मायेने जवळ घेत असे. कुशीत घेऊन शांत करीत असे. मग जनी पुन्हा हसतमुखाने येईल त्या
प्रसंगांना सामोरे जायला तयार होत असे. त्या भेटीमुळेच तिच्या अंगात अतिशय उत्साह
आणि ताकद येत असे.
जनाबाईंच्या अभंगातून केवळ
त्यांचे विठू माऊली आणि नामदेवांप्रती असलेले प्रेमच व्यक्त होत नाही तर निवृत्तीनाथ,
ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताबाई, चोखामेळा, आदी संतांविषयी तिच्या मनात असलेला
आदरभावही व्यक्त होतो. वयाचे अंतर पाहता जनाबाई ज्ञानेश्वरांपेक्षा मोठ्या पण
ज्ञानदेवांची आध्यात्मिक खोली, त्यांचा अभ्यास त्या जाणून होत्या. वेदशास्त्रांच्या
अभ्यासातील चारही भावंडांची समज त्यांना माहिती होती. त्यांच्या अनेक अभंगातून
ज्ञानेश्वरांविषयीचे त्यांचे प्रेम व्यक्त होते. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि
आदिशक्ती अशाप्रकारे जनाबाई या भावंडांचा उल्लेख करतात.
“सदाशिवाचा अवतार l स्वामी निवृत्ती दातार ll
महाविष्णूचा अवतार l सखा माझा ज्ञानेश्वर ll
ब्रह्मा सोपान जाला l भक्ता आनंद वर्तला ll
आदि शक्ति मुक्ताबाई l दासी जनी लागे पायी ll”
जेमतेम अक्षर ओळख असलेल्या,
घरकाम करणाऱ्या, चाकोरीबद्ध आयुष्य जगणाऱ्या जनाबाईंचे हटयोग, इडा, पिंगळा, सुषुम्ना,
अश्या कुंडलिनी जागृत करणाऱ्या ब्रह्मनाड्यांवरील ज्ञानही चकित करणारे असेच होते.
भल्या भल्यांना कित्येक वर्ष साधना करूनही यातील बोध होत नाही. पण या विश्वाचा कारभार
सांभाळणाराच तिचा सखा होता. त्यामुळे तिला कोणी काही न शिकवताही आपोआपच हे ज्ञान
मिळत होते. “रक्त वर्ण त्रिकूटस्थान l श्री हाट पाहे श्वेतवर्ण ll” ही हटयोगावरील
त्यांची रचना थक्क करणारी आहे. शुद्ध पण साध्या भाषेत त्यांनी यात हटयोग उलगडून
दाखवला आहे. त्यांच्या आध्यात्मिक अभ्यासाबाबत, उत्स्फूर्त अभंगांच्या कौशल्याबाबत
त्या “बाई मी लिहिणे शिकले सद्गुरुरायापाशी ” असे एवढेच नम्रपणे म्हणत.
एवढे विविध विषयांवरील ज्ञान
एकवटले असलेल्या जनाबाई कधी जात्यावरच्या ओव्याही रचत असत. “दळीता कांडिता l तुज
गाईन अनंतll” असे त्यांच्या मुखातून सहज येत असे. जात्याचे आणि त्यातून दळून बाहेर
पडणाऱ्या पीठाचे रूपक योजून त्या “प्रपंच दळण दळीले पीठ भरिले l सत्त्वाचे आधण
ठेविले पुण्य वैरिले l पाप ते उतू गेले l” असे गात असत. तर घरातील लहान मुल रडत
असताना त्याला कडेवर घेऊन मायेने “माझे अचडे बचडे l छकुडे गे राधेचे रुपडे l” असे
लाड करीत जोजवत असत. अशुद्ध भाषेत बोबडे बोल बोलणारी, आई, वडिलांविना पोरकी
झालेली, नामयाची दासी जनी, ते कथाकीर्तन करून तत्कालिन पुरुष संतांमध्ये आपला
वेगळा ठसा उमटवलेली ‘संत जनाबाई’ हा प्रवास कोणालाही अचंबित करणारा असाच आहे.
नामदेवांच्या घरी काम करणारी एक मोलकरीण विठोबाची लाडकी सखी झाली. नामदेवांच्या
सहवासात, विठुरायाच्या कृपेने तिला दिव्य ज्ञान प्राप्त झाले. आज जनाबाईंचे सुमारे
साडे तीनशे अभंग उपलब्ध आहेत. याशिवाय थालीपाक आख्यान, कृष्णजन्म, बालक्रीडा, काला,
अशी अनेक आख्यान काव्यांची निर्मितीही त्यांनी केली. पाळणा, नवलकाव्य, कूट, विविध
संतांच्या आयुष्यातील प्रसंग, दशावतार, असे विविध विषय त्यांनी काव्यातून हाताळले.
असे असले तरीही अन्य संतांपेक्षा जनाबाईंचे साहित्य अत्यल्प उपलब्ध आहे. परंतु,
त्यांच्या प्रत्येक रचनेतून त्यांची आध्यात्मिक, वैचारिक बैठक, प्रगल्भ प्रतिभा
सतत जाणवते. नामदेवांच्या चरित्रातून आपणास जनाबाईंची ओळख होते. त्यांच्या अभंगादी
काव्यांमधून त्यांचे अंतरंग उलगडत जाते. त्यांचे स्वतंत्र चरित्र सांगणारे साहित्य
अत्यल्प आहे; हे दुर्दैवच मानावे लागेल. तरीही त्यांच्या अभंगाच्या वेलीवरील फुले
टिपत, त्यातील मंद मंद गंध आणि मधुकणांची मेजवानी आपल्याला चाखता यावी यासाठी हा केलेली
ही धडपड..!
-
वैदेही सच्चिदानंद शेवडे.
अप्रतिम !!!
उत्तर द्याहटवा