भाऊबीज
आज दिवसभर ती भरपूर कामात होती.. एक काम झालं की दुसरं.. काम अगदी ठरवून
उपसून काढत होती! तसा तिचा दिवस उशीराच सुरु झाला. दिवाळीची सुट्टी.. त्यात शनिवार
, रविवार हे तर तिचे आराम करण्याचे हक्काचे दिवस. तसं असलं
तरी सणाच्या दिवशी ती पहाटे उठायची. मित्र मैत्रिण, नातालगांना
भेटायची. पण आज दुपारी १ वाजला तरीही ती पलंगावर लोळत होती. मग तिला त्याचाही
कंटाळा आला.. मग तिने जो कामात हात घातला.. थेट रात्री ११ वाजता पाठीला रग
लागल्याने ती थांबली.. दिवसभर अन्नाचा कणही तिने घेतला नव्हता.
स्वयंपाक खोलीत जाऊन तिने स्वतःसाठी कॉफ़ी केली. तिचा पहिलाच गरमा गरम घोट
घेतल्यावर, "अगदी त्याला आवडते तशी झाली आहे
कॉफ़ी!" असा विचार आलाच. ती बाल्कनीत उभी राहिली. आजुबाजुच्या घरांमधून अजुनही
हसण्या खिदळण्याचे आवाज येत होते.. पण तिचं घर शांत, रिकाम
होतं.. सर्वांच्या घराबाहेर पणत्या मंद मंद प्रकाशात तेवत होत्या.. पण तिने आज
अंधारात रहाणच पसंत केलं होतं. गल्लीमध्ये बरीच लहान मुलं फटाके फोड़त होते.. पण
तिचे कान आधीच बधीर झाले होते.. आणि मनही..
"दादा, तू ये ना सोबत.. मला भीती वाटते लवंगी माळ
लावायची!" एक आवाज तिने ऐकला आणि तिची तंद्री भंगली.. खाली फटाके फोड़णारी
बरीच मुलं होती त्यामुळे नेमकं कोण बोललं असावं तिला अंदाज येत नव्हता.. तेवढ्यात
तिला ते दोघं बहिण भाऊ दिसले! "अगं मने, तू एकटीने ती
माळ लावालीस तर मी तुला एक गम्मत देइन.. आणि मी आहेच की इथे.. तुला काही होऊ देणार
नाही मी." दादा मनीला समजावत होता.थोड्या वेळाने मनीने धीर एकवटून माळ लावली
आणि दादाकडे धाव घेतली. जेमतेम ७ वर्षांची मनी आणि ९ वर्षांचा तिचा दादा. आता
त्याच्या चेहऱ्यावर मनीने केवढं मोठं काम केलं, असे भाव
पसरले होते! मनीने गम्मत दे म्हटल्यावर त्याने एक इकलेयर चॉकलेट तिला दिले. "
माझ्या मित्राने दिले होते.. पण तू खा." तो कौतुकाने म्हणाला. "पण दादा,
हे आपल्या दोघांना आवडतं.. आणि आपण नेहमीच अर्ध अर्ध वाटुन घेतो ना..
तसच हे खायच!" एवढस ते चॉकलेट त्यांनी अर्ध अर्ध खाल्ल. तेवढ्यात एक फटाका
मनीच्या अगदी पायाजवळ फुटला.. "दादाss" अशी
किंचाळून ती दादाला बिलगली.. बाल्कनीत उभी असलेल्या तिच्या तोंडूनही एक अस्फुट
किंकाळी आली.. डोळे पाणावले.. तिने पुन्हा बाहेर पाहिले.. कुठे गेली ती दोघं??
खाली आता कोणीच फटाके फोड़त नव्हते.. मग आत्ता तिने पाहिली होती ती
भावा बहिणीची जोड़ी गेली कुठे?? भास.. भास?? की आठवण??
ती स्वतःच डोक गच्च पकडून खाली बसली.. बराच वेळ प्रयत्नपूर्वक थांबवलेले
विचार आता अचानकच असे विचित्रपद्धतीने आता स्वतःची वाट मोकळी करत होते..!!
कुठे आहे तिचा दादा?? तो का आला नाही?? त्याला दिवाळीमध्ये तरी बहिणीला भेटावंस वाटलं असेल! मग का आला नाही तो??
इथे भारतातच तर राहतो तो! किती वर्ष झाली त्यांनी फराळ एकत्र केला
नाही.. की फटाके उडवले नाहीत सोबत..! का?? तिचा भाऊ मात्र
तिला सोडून फटाके फोड़त असतो अधूनमधून.. इथे नाही.. आपल्याच देशात.. पण दूर..
आपल्या देशाच्या सीमेवर!
आपला दादा देशाचे रक्षण करतो आहे याचा तिला कोण अभिमान!! पण, जेव्हा त्यांच्या घरी त्याची गरज असते तेव्हा?? वडिलांनंतर
तोच तर आहे आता घराचे रक्षण करणारा! ती शिकून आपल्या पायावर उभी आहे. घर सांभाळते.
पैशांची कमतरता नाही घरी.. दादाच्या कामाचे स्वरुपही तिला माहित आहे.. पण कधीकधी
आठवणी आणि भावना यांचा लगाम आपसुक सुटतो आणि कोंडून ठेवलेल्या त्या आठवणींनी ती
घुसमटते..
तिने डोळे पुसले आणि आतल्या खोलीमध्ये आली. आज घरभर अंधार केला असला तरी
भारत मातेच्या तसबिरीसमोर दिवा तेवत होता. वातीवरची काजळी तिने दूर केली.. दिवा
पुन्हा नव्या उमेदीने प्रकाश देऊ लागला. तिने घडयाळात पाहिले.. खुपच उशीर झाला
होता. पलंगावर पडल्या पडल्या तिला झोप लागली.
अशा बेफाम सुटलेल्या आठवणी अनावर होण
तिला नवीन नव्हतं.. उद्या सकाळी पुन्हा ती हसत जागी होणार होती!!!
© वैदेही
सच्चिदानंद शुभांगी शेवडे
apratim.............
उत्तर द्याहटवाNivval Apratim!!!
उत्तर द्याहटवामस्तच !!
उत्तर द्याहटवाsundar!! speechless zale vachun..
उत्तर द्याहटवा"खुप छान"
उत्तर द्याहटवामस्त लिहिलंय, :)
उत्तर द्याहटवाअप्रतिम सुंदर.
उत्तर द्याहटवा