शुक्रवार, १५ जून, २०१२


मृदगंध 

यंदा नेहमीपेक्षा पावसाने जरा उशीराच हजेरी लावली. आधीच महागाईनं त्रासलेले आम्ही मुंबईकर उकाड्यानी अधिकच त्रस्त झालो होतो. हवामानखात्यानी जरी पाऊस उशिरा येण्याची वेगवेगळी कारणं सांगितली असली तरी याचं एक मुख्य कारण फेसबुक असावं असं वाटतं.. काय आहे.. एवढ्या लोकांच्या पावसासंबंधीच्या पोस्टला हजेरी देऊन मग त्याला उशीर होणं स्वाभाविकच आहे ना..!!

पण एका तप्त रात्रीनंतर अगदी सकाळ उजाडताच पावसाने रिमझीम रिमझीम करत मन तृप्त केलं. पहिला पाऊस... वाह..!! कितीही मोठी झाले तरी काही गोष्टींचं वेड कसं जराही कमी होत नाही..!!  म्हणजे.. रस्त्यावरची पाणीपूरी, लहान मुलांच्या बोबड्या बोलण्यातली गम्मत, मोगऱ्याचा गजरा, आपल्या प्रिय व्यक्तीच्या मिठीतली ऊब, समुद्राच्या लाटांशी हितगुज आणि अर्थात पावसात मनसोक्त भिजणं आणि मंद मंद दरवळणारा मृदगंध भरभरून घेणं.....! कितीही वेळा या गोष्टी केल्या - अनुभवल्या तरी याचं वेड, ओढ, गम्मत, मजा, नशा, मुळीच कमी होत नाही, उलट क्षणाक्षणाला वाढतंच असते. त्या सकाळीही पावसासोबत मृदगंध वातावरण उल्हासित करत होता. एक वेगळाच उत्साह, चैतन्य आपल्यासोबत घेऊन आला होता. गरमागरम ब्लॅक कॉफीचा मग हातात घेऊन मी खिडकीत बसले. मधेच हात बाहेर काढून ते इवले इवलेसे मोती हातावर घेत होते. झाडांच्या वर वरच्या पानांवर क्षण दोन क्षण विसावलेले ते थेंब हळूच ओघळून खालच्या पानांवर उतरत होते आणि मग मातीशी एकरूप होत होते. जणू एवढ्यासाठीच ते जन्मले होते....

लहानपणापासून असे किती पावसाळे आले आणि गेले. पण प्रत्येक पाऊस वेगवेगळ्या आठवणींना नकळत उजाळा देत गेला.. एवढेच नाही तर कित्येक नवनवीन आणि मोलाच्या आठवणी देतही गेला. आठवणींचा पेटारा सतत समृद्ध करत राहिला. मनाला आलेली मरगळ झटकत, नवीन उमेद देत गेला. मला वाटतं या मृदगंधामध्येच याचं काहीतरी गुपित लपलं असावं. का बरं सगळ्यांना पावसाएवढाच हा गंधही वेड लावतो? कोणतंही अत्तर यापुढे फिकंच पडेल नाही? कोणीतरी या मातीच्या सुवासाचे अत्तरही बनवले आहे म्हणे.. मोकळेपणाची मजा या सुवासाची खरी खासियत आहे. मग नैसर्गिकरीत्या आणि अशा खास वातावरणात सहज, मनसोक्त घेता येणारा हा गंध खरंच असा बाटलीत बंद करता येईल?

का बरं हे वातावरण, हा सुवास अनेक आठवणीसोबत आणतो? का नवीन गोष्टीही देऊन जातो? उगाचच मला हे प्रश्न त्रास देत होते. मग आठवणींनी अलगद मला कवेत घेतलं. एखाद्या चित्रपटासारख्या त्या झरझर डोळ्यांसमोर येऊ लागल्या. सकाळी धावपळ करत मला बालवर्गात सोडणारे माझे बाबा, अभ्यासाचा कंटाळा करायचे म्हणून माझ्या मागेमागे फिरून तो करायला लावणारी माझी आई, कोणीतरी एक बिस्कीट दिलं तर त्याचं अर्ध माझ्यासाठी काढून ठेवणारा माझा दादा, माझी शाळा, ती सुटल्यावर पावसाळ्यात बेडूक पकडायला येणारी मज्जा आणि मग आईचा ओरडा, रस्त्यावरच्या कुत्रा – मांजरीच्या पिल्लांना हात लावण्यासाठी पळत सुटणारी मी, कथ्थकचा रियाझ, नाटकाची तालीम, चित्रकलेचा वर्ग, कॉलेजच्या मित्रमैत्रिणींसोबत केलेली टवाळकी, लगाम सुटलेल्या घोड्याप्रमाणे या आठवणी येतंच होत्या. धडाम् असा मोठ्ठा आवाज झाला आणि माझी तंद्री तुटली. वीजेचा गडगडाट.... इथे रिमझिमत असला तरी कुठेतरी जोरात पडत असावा. पण त्या आवाजांनी माझी स्मृती मालिका केवळ खंडितच झाली नाही तर आजच्या बदललेल्या परिस्थितीची बोचरी जाणीवही झाली. काळाच्या ओघात किती गोष्टी बदलल्या.. निसटल्या.. मागे सुटल्या... नकळत डोळ्यातूनही अश्रू अलगद गालांवर बरसले.. शाळा संपली, आता कोण सोडायला किंवा घरी घेऊन जायला येणार? अभ्यास आपला आपण करता येऊ लागला, आता आई कौतुकानं माझी प्रगती पाहते. पण तिचा ओरडा..? तेव्हा नकोसा वाटायचा तेवढाच आता हवा हवासा वाटत होता. दादा तर शिकायला गेली ७ वर्ष घराबाहेर आहे. मग आता कसली वाटावाटी? लटके राग आणि भांडणं.. क्वचित कधीतरी अगदी उरावर बसून केलेली मारामारी.. आई बाबांचं कोण जास्त लाडकं यावरून घातलेले वाद... हरवलंच कुठेतरी सगळं.. कथ्थकचा, चित्रकलेचा वर्ग, नाटकाच्या तालीमी सगळ्यांवर पडदा पडला. कॉलेज संपलं आणि सगळेच आपापल्या कामात व्यस्त झाले. अचानक खूपच एकटेपणाची भावना तीक्ष्ण अशी जाणवली. पाऊस थांबून मळभ दाटलं होतं. आतही... बाहेरही... विचित्र बेचैनी जाणवत होती... थोडा वेळ असाच गेला.. सुन्न.. स्तब्ध.. एकाकी... 


अचानक पावसाने जोरदार कोसळायला सुरुवात केली. मातीचा सुगंध वाढला. पावसाचे शिंतोडे माझ्या अंगावर आले. थोडंस बरं वाटू लागलं. तेवढ्यात आई झाडांना पाणी घालायला आली. म्हणाली, “एवढ्या गरमीमुळे माझ्या गुलाबाच्या रोपट्यांना त्रास होत होता. वाटलं पावसापर्यंत तग धरतील की नाही.. पण आता मस्त पालवी फुटेल. छान फुलं येतील.” हे ऐकलं आणि माझ्या डोक्यात विचारांची वीज कडाडली, प्रकाश पडला... खरंच... एकामागून एक असं ऋतुचक्र आपलंही बदलत असतंच. आशा निराशेचा शिवा शिवीचा खेळ अगदी या अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरींसाराखाच जणू... आई बाबांनी एवढ्या खस्ता खाऊन शिकवलं, मोठं केलं. एक चक्र पूर्ण झालं. आता त्यांचा आनंद आणि समाधान महत्त्वाचं. खेळताना डॉक्टर होणारा दादा आता खरंच डॉक्टर झाला. आयुष्यभर एकाच जागी राहूनच केवळ सोबत करता येते का? मनाने तर आम्ही नेहमीच जवळ असतो. कॉलेज संपलं आता स्वतःच्या अस्तित्वाची नवीन ओळख करून देण्याची वेळ सुरु झाली. जुने छंद मागे पडले पण नवीन आवडीही निर्माण झाल्याचं की...

आता संपूर्णपणे समाधानाने मी श्वास भरभरून घेतला आणि अचानक त्या कोड्याचा उलगडाही झाला. मुदगंध हा पावसाची ग्वाहीच आपल्याला देत असतो. दूरवर कोसळणाऱ्या पावसाची खबर इथे तिथे पसरवतो आणि आपल्याला पाऊस येईल असा दिलासा देतो. रणरणत्या उन्हानी शुष्कं झालेली धरती आता परत हिरवी गार दिसणार, हवेत गारवा येणार, पिक पाणी व्यवस्थित मिळणार, कॉफी आणि कांदा भाजी असे बेत होणार, पाऊस खूपच झाला की कामावर दांडी मारता येणार, असे एक एक मनसुबे आपण आधीच आखत असतो आणि ही सारी कल्पनांच्या भरारीची किमया पावसाआधी हा मृदगंध घडवून आणत असतो. मग हा वेड लावणारंच ना..! वातावरणातील नैसर्गिक बदलांचा थेट परिणाम आपल्या मनावर होत असतो असं मानसशास्त्रज्ञ म्हणतात. अगदी खरंच तर आहे हे. तसंच काहीसं माझंही झालं होतं. धो धो बरसणाऱ्या पावसाने झाडांवरची माती जशी निघून पाने स्वच्छ होतात तसंच मनही आता स्वच्छ आणि टवटवीत झालं होतं. जुने विचार मागे टाकून नव्या विचारांचे कोंब अंकुरीत होत होते. मी परत कॉफीचा मग भरला आणि गरमागरम घोटासोबत नभातून तसंच “त्याच्या” नजरेतून, स्पर्शातून बरसणाऱ्या पावसात एकाच वेळी चिंब चिंब भिजताना कशी मजा येईल या विचारात गुरफटले...!!

शुक्रवार, ८ जून, २०१२


त्या टोकावर मी तुझीच वाट पाहत असेन... 


तू येशील जगाची सफर करून,
येशील चंद्र चांदण्यांना हात लावून,
येशील तुझ्या स्वप्नातलं जग जिंकून...
तू विसरलास जरी परतीचा रस्ता...
तरी त्या टोकावर मी तुझीच वाट पाहत असेन..
कितीही दूर गेलास तरी तसंच प्रेम करत असेन.....

माझ्यासोबत असतील तुझ्या आठवणी केवळ..
तू येशील तेव्हा त्यांची ओळख असेल का तुझ्याजवळ??
पण तुझा स्वप्नांची मी काळजी घेईन,
विस्कटलेला संसार नीट सांभाळीन,
आणि तरीही त्या टोकावर मी तुझीच वाट पाहत असेन..
कितीही दूर गेलास तरी तसंच प्रेम करत असेन.....

तू परत येशील तेव्हा खूप खूश असशील,
तुला हवं ते सगळं मिळवून आला असशील,
इथली मी मात्र तुला आता वेगळीच वाटेन...
सगळं तेच असलं तरी..मी त्या जुन्या तुझ्यावरच प्रेम करत असेन..
आणि म्हणूनच तू आलास तरी.. त्या टोकावर त्या जुन्या तुझीच वाट पाहत असेन...
कितीही दूर गेलास तरी तसंच प्रेम करत असेन.....


सोमवार, ५ मार्च, २०१२

आई



आई म्हणजे आपल्या अस्तित्वाची पहिली ओळख,
आपल्या आयुष्याची पहिली शिक्षक,
आपल्याला सुख मिळवं म्हणून सतत धडपडणारी मूर्ती,
आणि स्वतःची झोप विसरून आपल्या स्वप्नांची सतत करते पुर्ती.

सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१२

रे सख्या.....



सांजवेळी या ठिकाणी आठवांचे नभ कोसळती,
परतीचीही वाट हरवता उगा पाऊले भरकटती,
या अशा अस्वस्थ समयी वळूनी तू बघशील का?
रे सख्या माझिया मनाला साद तू देशील का?

एक रात्र खुललेली.........





एक रात्र खुललेली......... त्याच्या अन् तिच्या श्वासात गुंतलेली........ उलगडलेली......
स्वप्नही अशी डोळे झाकता पाहिलेली....... जगलेली........
अधरांची भाषा स्पर्शाची नशा..... त्यानी तिला दाखवलेली जगण्याची नवीन दिशा......
हाती हात घेताना भीती वाटत होती खरी...... पण विश्वासाची दुलई अंगभर लपेटलेली......
आता पुढे काय हे दोघानाही माहित नव्हते.... तरीही एकमेकांच्या कुशीतच राहायचे पक्के झाले होते....
एका रात्रीचे हे तिचे अन् त्याचे गुपित...... कितीही लपवले तरी सगळ्यांनाच कळले होते......
त्या रात्रीची हीच तर गम्मत होती...... एकमेकांशी नव्यानीच ओळख होत होती....
त्याचा खोडसाळपणा...... तिचा रुसवा...... स्वप्नांसोबत वेळही पुढे जात होती.....
आणि आलाच तो क्षण निरोपाचा..... जीवाला उगीच हुरहूर लावणारा.....
पण यावेळी निरोप घेण्यात वेगळीच मजा होती.... त्यात परत भेटण्याची आशा होती.....
आता तो अन् ती कामात पुरते बुडलेले..... पण मनाने एकमेकातच गुंतलेले....
बऱ्याच दिवसांनी परत भेटीचा योग आला... त्या रात्रीच्या आठवणी आज नव्यानी आल्या.....
जुन्या भेटीचा गंध मनामनात तसा ताजा होता...... पण....
कशी कोण जाणे एक किमया झाली.... त्याची भाषा नकळतच तिच्या ओठी रुळली....
विरहानन्तरच्या भेटीत अधिकच आतुरता होती...... म्हणूनच ही रात्रही तशीच खुलली होती.......
त्याच्या अन् तिच्या श्वासात गुंतलेली........ उलगडलेली होती.....

"बाप" माणूस 





           बाहेर धो धो पाऊस पडत होता. चिऊच्या बाबांनी तिच्यासाठी नवीन पावसाळी चपला घेतल्या होत्या. नुकतीच शाळेत जाऊ लागलेली चिऊ सकाळीच बाबांसोबत शाळेत जायला घराबाहेर पडली. चपला नवीन असल्याने त्या चिऊच्या इवल्याशा पायाला लागू लागल्या. चिऊने बाबांना सांगितले. बाबा म्हणाले, “नवीन चपला आहेत. थोड्याशा त्रास देणारच.” शाळेत पोहोचल्यावर बाबांनी चिऊच्या चपला काढल्या तर त्यांना पायाची सालं निघालेली दिसली. खरतर फारसं लागलं नव्हतंच पण बाबांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. वेळीच पाहिलं असतं तर पोरीला लागल नसतं, असं त्यांच्या मनात आलं. आजही हा प्रसंग कोणाला सांगताना बाबांचे डोळे पाणावतात. हे बाबा म्हणजे डॉ. सच्चिदानंद शेवडे आणि चिऊ म्हणजे त्यांची लाडकी कन्या वैदेही अर्थात मी. राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोहींबद्दल प्रचंड आक्रमक होणारे आमचे बाबा खासकरून मुलांबद्दल फारच हळवे आहेत. एक राष्ट्राभिमानी व्याख्याते म्हणून ते सर्वांच्याच परिचयाचे आहेत. त्यांच्या स्पष्ट आणि तीक्ष्ण वाणीमुळे बरेचदा लोकं त्यांना फारच कठोर समजतात. पण, नारळही वरून कठीण दिसतोच की तसेच आमचे बाबा जेवढे शिस्तशीर तेवढेच संवेदनशील आहेत.
          मला आठवतं, बाबांनी नोकरी सोडली तेव्हा मी आणि दादा जेमतेम पाचवी सहावीत होतो. पण गुरु आज्ञेनुसार बाबांनी संपूर्ण वेळ लेखनकार्य आणि राष्ट्रप्रबोधनासाठी देण्याचं ठरवलं. ऐन उमेदीच्या काळात नोकरी सोडल्यावर समोर येणारे आर्थिक प्रश्न वगैरे याची जाण आम्हा दोघांना असणं शक्यच नव्हतं. आमची आई सौ. शुभांगी शेवडे मात्र सतत बाबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. आर्थिक गणितांची कसरत आणि बाबांचे सततचे कार्यक्रमांचे दौरे सांभाळत तिनं आम्हाला काहीच कमी पडून दिलं नाही की कसली तक्रार केली नाही. त्यामुळे बाबांना लेखक आणि व्याख्याता म्हणून मिळालेल्या यशाची खरी शिलेदार आमची माऊली आहे असे तेही निःसंकोच सांगतात.
          बरेचदा इतरांना उपदेशाचे डोस पाजणारे स्वतः मात्र कोरडे पाषण असतात. पण, बाबा मात्र त्यांचे विचार केवळ मांडत नाहीत तर जगतात. आम्हा दोन्ही भावंडांवर त्यांनी कधीच त्यांचे विचार लादले नाहीत. त्यांनी सतत आपल्या आचरणातून आम्हाला चांगल्या वाईटाची ओळख करून दिली. प्रेम, विश्वास आणि संस्कार यांची कधीही न संपणारी शिदोरी त्यांनी आमच्या हाती ठेवली. आमच्या बाबांना मी गंमतीनं चालतं बोलतं विद्यापीठ म्हणते. खरच आहे. त्यांच्याशी कुठल्याही विषयावर गप्पा मारता येतात आणि त्यातून बरीच माहितीही मिळते. त्यांच्यासोबत प्रवास करताना एखाद्या ठिकाणचं ऐतिहासिक महत्त्वच नाही तर बाबा खवय्ये असल्यानं तिकडे खायला काय चांगलं मिळतं तेही ते सांगतात. एवढंच नाही तर बऱ्याच घरांमध्ये बाबांपेक्षा आई जवळची असते. पण, आमच्याकडे असं काहीच नाही. घरातल्या मोकळ्या वातावरणामुळे मी बरीच गुपितं बाबांना सांगते. बाबाही मित्रासारखे सर्व ऐकून त्यावर मस्करी करतात तर योग्य तिथे कानही पिळतात.
          आमचा चरितार्थ केवळ बाबांचे कार्यक्रम आणि पुस्तकांच्या लेखनावर चालतो. देव कृपेने कधी काही कमी पडलं नाही. पण बाबा सढळ हस्ते गरजूंना मदत करत आले आहेत. अधिकाधिक लोकांना पुस्तकं वाचायला मिळावीत म्हणून स्वतःची बरीच पुस्तकं ते सवलतीत उपलब्ध करतात. घरातील विविध खास प्रसंग किंवा स्वताःच्या तब्येतीच्या अडचणी काहीही असलं तरी बाबा कार्यक्रमांसाठी कसाही उलट सुलट प्रवास करून वेळेत मंचावर उपस्थित असतात. पूर्वी महाराष्ट्र आपल्या वाणीने चेतवणारे बाबा आता भारत भ्रमण करून तरुणांमध्ये राष्ट्रप्रेम वाढवत आहेत. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये भाषण देणारे ते पहिलेच वक्ते आहेत. गतवर्षी थेट मॉरिशसला कार्यक्रमाचा योग आला तर यंदा दुबई दौरा होईल. एकतीस पुस्तकं आणि जवळपास २८०० हून अधिक कार्यक्रम एवढी मोठी घोडदौड करणाऱ्या बाबांमध्ये जराही अहं नाही. काश्मीरवरील त्यांच्या प्रबंधास युनेस्कोशी संलग्न असलेल्या आंतरराष्ट्रीय मुक्त विद्यापीठातर्फे डॉक्टरेट बहाल करण्यात आली. यासाठी सलग वीस दिवस काश्मीरच्या कानाकोपऱ्यात बाबा पायी हिंडले. थेट अतिरेक्यांच्याही भेटी घेतल्या, विस्थापितांच्या शिबिरांमध्ये राहिले. महाराष्ट्र राज्यसेवा समिती आणि पद्मश्री मणीभाई मेहता प्रतिष्ठानचा समाजप्रबोधनासाठीचा “राष्ट्रसेवा पुरस्कार २००५”, क डों म पा चा “महापौर पुरस्कार २०१०”, पु. भा. भावे वक्तृत्व पुरस्कार २०१०, असे पुरस्कार पाहिले की बाबांच्या आत्तापर्यंतच्या कष्टाची कल्पना येते.
          असा हा “बाप” माणूस येत्या ९ नोव्हेंबरला वयाच्या ५१ व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यांना माझ्याकडून आणि देश विदेशातील असंख्य चाहत्यांकडून खूप शुभेच्छा. ( प्रत्यक्ष शुभेच्छा देण्यासाठी ९८९२३२१७०४ या क्रमांकावर संपर्क साधावा. )
-      वैदेही सच्चिदानंद शेवडे.
vaidehishevde@gmail.com