सोमवार, २५ एप्रिल, २०१६

    नंदादिप

           "आलीस, रूपा! ये ये बाळ, बस." बऱ्याच वर्षांनी तो आवाज कानी आला. आता आवाजात थकवा होता पण तेच प्रेम, तोच आपलेपणा जाणवला! लग्नानंतर पहिल्यांदाच मी अनुजाच्या घरी गेले. पण काकूंनी पूर्वीसारखेच हसत स्वागत केले त्यामुळे मधली ८ वर्ष जणू गायबंच झाली असं वाटलं. 
          अनू माझी वर्ग मैत्रीण. अगदी बालवर्गापासून कॉलेजपर्यंत आम्ही दोघी एकत्रच होतो. दर काही दिवसांनी एकमेकींकडे येणं जाणं होत असे. पुढे लग्न होऊन मी यूएसला गेले आणि आमचा संपर्क कमी झाला.  आता यूएसला आमच्या जवळच अनुजा तिच्या नवऱ्यासोबत राहायला आल्यावर आमची भेट अधूनमधून होत असे. काकूंचे निर्मळ, तजेलदार डोळे सतत डोळ्यांसमोर येऊ लागले. जुन्या आठवणी ताज्या होऊ लागल्या तशा त्या एकेक करून उड्या मारून वर येऊन काकूंच्या भेटीची ओढ तीव्र लागल्या. तिच्या आईच्या हातच्या एकेक पदार्थांची आणि त्यांच्याकडील नंदादिप यांचीही आठवणही आली. परदेशात अशा आठवणी जास्तच डाचतात. अनू तिच्या आई वडिलांबद्दल फारशी काही बोलत नाही, हे आत्तापर्यंत माझ्या लक्षात आलं होतं. कदाचित त्यांच्याशी तिचं तेवढंसं बोलणंही होत नसावं!... माझा आपला एक अंदाज. एकदा तिला ओझरतं याबद्दल विचारूनही पाहिलं पण तिच्या उत्तरावरून आम्ही आता त्या पूर्वीसारख्या एकमेकींना सगळं सांगणाऱ्या मुली राहिलो नाहीत आणि वयासोबत बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत, हे लक्षात आलं. एव्हाना मला अनूचा भाऊ वेगळा राहतो आणि आता आई बाबा दोघंच घरी असतात असं समजलं होतं. यूएसला नवीननवीन होते तेव्हा इतरांशी ओळख होई तो एकटेपणा काय असतो याची कल्पना मला आली होती. त्यामुळे तिथे आपल्या दोन्ही मुलांची आठवण काढत अनूचे आईवडील आपल्याच देशातही आठवणींच्यासोबत परकेपणाने आपल्याच माणसात वावरत असतील, हे मी जोखले होते. त्यांना भेटायची इच्छा अधिक तीव्र झाली. परवाच भारतात आले आणि काल काकूंना फोन करून भेटायला येते असं कळवलं.
          काकू कशा असतील? पूर्वीप्रमाणेच आम्ही एकमेकींशी बोलू का? काय बोलावं? एवढ्या वर्षांनी आज मी कशी आले भेटायला, असं विचारलं तर उत्तर काय देऊ? मनात असंख्य विचार आणि हातात एक लहानशी भेट घेऊन मी त्यांच्या दारात उभी होते. पण, काकूंच्या पूर्वीसारख्या स्वागताने मनातलं मळभ दूर झालं. घरात पाऊल ठेवताच मटरच्या करंज्यांचा खमंग वास नाकात शिरला. "तुला आवडतात नं करंज्या! कालंच यांना सांगून बाजारातून मटार आणले." काकू मायेने डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. मला त्यांच्या एवढ्या प्रेमाने उगीचंच भरून आल्यासारखं झालं. सोबतच आपण एवढी वर्ष काकूंना भेटलो नाही, याबाबत अपराधी वाटू लागलं. 
          बराच वेळ गप्पा झाल्या. काका, काकूंनी बोलून दाखवलं नाही तरीही अनू आणि तिचा भाऊ इथे फारसे फिरकत नाहीत किंवा काही हवं नको पाहत नसावेत हा माझा समज अधिकाधिक घट्ट होऊ लागला. तडे गेलेल्या, पोपडे निघालेल्या भिंतींप्रमाणे नाती विद्रुप झाल्याचा मला भास होऊ लागला. कारण काय असेल हे मला माहित नाही आणि मला त्याच्याशी काही कर्तव्यही नाही. पण आपल्याच आई वडिलांशी कोणी एवढं फटकून कसं वागत असेल हे मला समजत नव्हतं. 
          अनू आता माझ्याजवळच राहते हे त्यांना माहित नव्हतं. किंबहुना ते युएसला आधी राहायचे तिथून दुसरीकडे शिफ्ट झाले हेच त्यांना माहित नव्हतं. काकूंनी नेहमीप्रमाणे सारवासारवी केली. पण, "मुलगी लग्न करून भारताबाहेर गेली, फोन वगैरे नसतोच तिचा आणि मुलगा इथे जवळच राहत असूनही बऱ्याच महिन्यांनी त्याच्या आईने अनेक निरोप पाठवले की अर्ध्या एका तासासाठी पाहुण्यासारखा येऊन जातो... एकूण काय पाखरं घराट्यातून उडून गेली की ती परत येतील ही आशा ठेवणंच चूक." काकांच्या एका वाक्याने माझा अंदाज खरा ठरला होता. काकूंनी शिताफीनं डोळ्यातलं पाणी लपवलं. 
          थोडा वेळ कोणीच कोणाशी बोललं नाही. मग काकू उठल्या, देवापाशी दिवा तेवत होता. काकूंनी वात सारखी केली आणि जरासे तेल घातले. काकूंकडे देवासमोर नेहमीच एक दिवा तेवत असतो. दर काही दिवसांनी एक दिवा नेमाने घासला जाई तेव्हा दुसरा घासलेला दिवा देवापाशी ऐटीत विराजमान होत असे. नेमाने स्वच्छ, लखलखीत केला जाणारा आणि बारा महिने, चोवीस तास अखंड तेवणारा तेजस्वी दिवा! आज मात्र तो काळवंडलेला दिसत होता. बरेच दिवस घासला गेला नसावा. मी आणि अनू लग्नाच्या वयाच्या झालो तेव्हा एकदा काकूंनी आम्हाला जवळ बसवलं. दिवा लख्ख चमकवताना त्या म्हणाल्या, "हा दिवा सासूबाईही असाच अखंड तेवत ठेवत. मी घरात आले तेव्हा मला त्या म्हणाल्या की ही आपली परंपरा आहे. यातून दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. या घरात आपण दिव्यासारख्या सतत प्रकाश देत राहायचं आणि ज्याने आपल्याला एवढं भरभरून सुख दिलं आहे, त्याच्या पायाशी अंधार होऊ द्यायचा नाही. तुम्ही पोरीही लग्न कराल तेव्हा हे लक्षात ठेवा की तुम्हाला दोन्ही घरं अशीच प्रकाशमान करायची आहेत आणि याबद्दल देवाचे नेहमी  ऋणी राहायचं." हातातील दिवा आमच्या डोळ्यांसमोर धरून पुढे त्या म्हणाल्या, "बरं, हा दिवाही अस्सा हवा. स्वच्छ आणि चमकदार. दिव्याला काजळी धरता कामा नये. आपलं घरही असंच हवं. कोणाच्या मनात एकमेकांबद्दल काही मळ नको." हे सांगताना त्या ज्योतीचे तेज असलेले काकूंचे चमकणारे डोळे आणि दिव्यासारखे स्वच्छ, लखलखीत असे काकूंचे अंतरंग मला आजही स्पष्ट आठवले. एकटेपणाचं दुःख पचवूनही कोणतीही तक्रार न करता त्या देवाकडे त्यांच्या दोन्ही मुलांसाठी सुख, भरभराट मागत होत्या, हे सांगायला तिथे कोणा अन्य व्यक्तीची गरज नव्हती. 
          त्यांचा प्रेमळ स्वभाव आणि होणारी घुसमट यामुळे मी गलबलून गेले. त्यांना भेटवस्तू दिल्या आणि निरोप घेतला. "पुन्हा ये गं वेळ असेल तेव्हा. किती बरं वाटलं आज आलीस ते. सुखी राहा. जे मनात आहे ते मिळो" मी पाया पडत असताना काकू म्हणाल्या. निघताना पुन्हा एकदा त्या दिव्याकडे नजर गेली. पूर्वीपेक्षा तो जरासा मिणमिणता झाल्यासारखा जाणवला. एवढी काजळी साचल्यावर असंच होणार म्हणा!

- © वैदेही सच्चिदानंद शुभांगी शेवडे.

मंगळवार, १ मार्च, २०१६

चिऊ काऊची गोष्ट

          ते दिवस अजबच होते! मन्तरलेले! काऊ आणि चिऊ नुकतेच एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दिवसभर फोन, व्हॉट्सअॅपवर गप्पा आणि तरीही रोज संध्याकाळी भेटण्यासाठी नवनवे बहाणे.... बाईकवर बसून चिऊ आणि काऊ दूर दूर फिरायला जायचे. मागे बसलेल्या चिऊचा चिवचिवाट काऊ बाईक चालावता चालवता ऐकत असे. जात्याच् सुन्दर असलेली चिऊ गप्पा मारू लागली की आणिक मोहक दिसायची. काऊला चिऊकडे एकटक पाहण्याची खोड... फिरत असताना तिचा चेहरा तो सतत बाईकच्या आरशातून पाहत असे. चिऊच्या ते लक्षात आलं की ती लाजत असे. लटकासा राग आणि भरपूर काळजी डोळ्यात आणून ती त्याला ओरडत असे. काही दिवसांनी चिऊ काऊचे लग्न झाले आणि दिवस पलटू लागले. अनेक गोष्टी बदलू लागल्या.

           आता एकमेकांशी फोनवरुन सतत बोलणे होत नव्हते, कुठे बाहेर फिरायला जाणे राहिले नव्हते. आपलं घरटं अधिकाधिक सुरक्षित करण्यासाठी दिवस रात्र कष्ट करत काऊ त्याच्या कामात व्यस्त... चिऊदेखील मन लावून तिच्या नव्या जबाबदारी पार पाडण्यात मग्न. पण तरी पूर्वीच्या दिवसांसारखी मजा आता राहिली नाही हा साल तिच्या मनाला पोखरत होता. आता ते चिऊ काऊ नव्हतेच जणू! या गोड नावांऐवजी आता त्यांच्या खऱ्या नावाने ते एकमेकांना संबोधू लागले. रोजच संध्याकाळी फिरायला जाणारी ही जोडी आता फक्त केवळ काही लग्न समारंभासाठी बाहेर पडू लागली. काऊचा वाढदिवस, काऊची पदोन्नती, पगारवाढ, त्या दोघांच्या पहिल्या भेटीचा, मागणी घातल्याचा दिवस,... असे कितीतरी दिवस चिऊने कुठेतरी बाहेर जाऊन साजरे करण्याबद्दल काऊला सुचवलेही पण कामाच्या गडबडीत त्याला वेळ मिळत नव्हता. हॉटेलमधून काहीतरी घरी मागवण्यापलीकडे आता काही फारसा उत्साह त्यांच्यात राहिला नव्हता. काऊचे आपल्यावर पूर्वीसरखे प्रेम उरले नाही या विचाराने चिऊ पछाडली होती. काऊला मात्र याची कल्पनाही नाही. आता चिऊनेही स्वतःला घर आणि पुढील शिक्षणामध्ये गुंतवून घेतले होते. तरीही तिच्या मनात काऊचे आपल्यावर आता प्रेम नाही ही भीती होतीच. असेच काही दिवस गेले. चिऊच्या परीक्षेचा निकाल लागला. ती उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली. काऊला फोन करायला गेली तर नेहमीप्रमाणे फोन कट! तिचा आंनद लगेच ओसरला. तिने मेसेज पाठवून निकाल कळवला. बराच वेळ काऊने तो वाचलाही नसल्याचे तिला दिसत होते. चिऊ हिरमुसली, तिला भरुन आलं. जुन्या आठवणी डोळ्यांसमोरुन झरझर जाऊ लागल्या. रडता रडता केव्हातरी चिऊला डोळा लागला.

          संध्याकाळी तिला जाग आली तीच काऊच्या आवाजामुळे..."चिऊ, ऊठ. मी बघ चित्रपटाची तिकीट आणली आहेत. गेल्या आठवड्यात सांगत होतीस न् पहायचा आहे तुला तो चित्रपट. चल, आवर आता लवकर." चिऊला हे स्वप्नच वाटत होतं. शेवटी काऊने तिला हलवलं तेव्हा तिच्या लक्षात आलं. ती काही न बोलता उठली. दोघे बाहेर गेले. चित्रपट पाहिला. आज काऊ जास्तच आनंदात दिसत होता. चिऊला मात्र या बदलाचं कारण समजंत नव्हतं. चित्रपटानंतर पूर्वीप्रमाणे आवडत्या ठिकाणी त्यांनी मनसोक्त पाणीपुरी आणि मग आईसक्रीम खाल्ले. चिऊला अजूनही काहीच आकलन होत नव्हते. बाईकवरुन घरी जाताना काऊने चिऊचे हात पुढे ओढुन त्याच्या कमरेभोवती कडे तयार केले. "चिऊ, बोल ना ग काहीतरी... गप्प का? मी आज खूप आनंदात आहे. कसं काय घर आणि सगळं सांभाळून अभ्यास केलास गं!" कितीतरी वेळ तो चिऊचं भरभरुन कौतुक करत होता आणि पूर्वीसारखंच सतत आरश्यामधून चिऊकडे पाहत होता. कितीतरी दिवसांनी तिला पूर्वीचा काऊ प्रत्यक्षात दिसत होता. काऊ बोलतंच होता. त्याचे आनंदाचे क्षण साजरे करायला त्याच्याकडे वेळही नव्हता आणि आज आपल्यासाठी तो आपल्यापेक्षा जास्तच आनंदात आहे. एवढे दिवस तो आपल्यावर प्रेम नाही म्हणून कामात व्यस्त नव्हता तर आपल्या सुखासाठीच धडपडत होता, हे चिऊच्या लक्षात येत होते. आज मात्र चिऊ काही बोलत नव्हती. तीदेखिल आरश्यामधून एक टक काऊकडे बघत होती. बोलत असताना काऊ जास्तच सुन्दर दिसतो असं तिला आजंच समजलं होतं!
   © वैदेही सच्चिदानंद शुभांगी शेवडे

गुरुवार, २ जुलै, २०१५

शुभ्राची दैनंदिनी
११ जून २०१५
          
          आज बऱ्याच दिवसांनी जरा वेळ मिळाला आहे. मिळाला कसला! काढलाच.. मुद्दाम! अगदी ठरवून..! आता असेच सारे दिवस भरपूर कामाचे.. तारेवरची कसरत करायचे..! पुन्हा लिहायला वेळ कधी मिळेल ठाऊक नाही. तशी दैनंदिनीला अधूनमधून बुट्टी मारणे मला नवीन नाही. पण, किमान काही महत्त्वाच्या नोंदी, आठवणी जपून ठेवायलाच हव्या म्हणून हा खटाटोप.

          ५ जून २०१५, डॉक्टरांनी दिलेल्या तारखेच्या चांगले २० दिवस आधी अचानक आगमन करून आमच्या बाळ राजेंनी सर्वांचीच धांदल उडवली. नेमक्या त्याच दिवशी सासूबाई निलूच्या लग्नासाठी ४ दिवस काढून सुरतेस गेल्या होत्या. माझी तब्येत, काही हवं / नको, सर्व व्यवस्था पाहून, मला चार चार वेळेस विचारून गेल्या त्या. आता या बाळोबाला सर्वांना चकित करायची आणि वेळेआधीच जग पहायची एवढी घाई झाली असेल, असं कोणाला माहित होतं! मला कळा सुरु झाल्या.. कसबसं स्वतःला सावरत सचिनला फोन केला.. ऑफिसला जाण्यासाठी अर्ध्या वाटेपर्यंत पोहोचलेले बाळाचे बाबा माघारी फिरले.. येताना आमच्या जवळच राहणाऱ्या त्याच्या शैला मावशीला मदतीसाठी घेऊन आला.. आमची ही पहिलीच वेळ आणि त्यात घरी मोठं कोणीच नाही.. तेव्हा शैला मावशीची खूप मदत झाली. कारमधून त्वरित मला हॉस्पिटलमध्ये आणलं. सकाळपासून कळा देऊन देऊनही रात्री ११ वाजता माझी सुटका झाली. एवढ्या कळा, सर्वांची धावपळ, हॉस्पिटलचं कुबट वातावरण.. बाळ आता लवकरच आपल्या कुशीत असेल याची हुरहूर..! पण या सगळ्यातही माझ्या डोक्यात एक वेगळंच द्वंद्व चालू होतं..! हो.. मी चक्क भांडत होते.. कोणाशी? स्वतःशी.. नशिबाशी.. परिस्थितीशी.. देवाशी.. की आईशी??

          ही चिडचीड, असा त्रागा, याचा काय फायदा? उलट स्वतःलाच त्रास.. आणि आता बाळालाही.. गरोदर असताना अनेकदा स्वतःला असं समजावून पाहिलं. पण, मनाचं असंच असावं. जे विचार नको असतात म्हणून मनाला गच्च आवळायला जावं, तेवढंच उसळी मारून ते वर येतात.. बोचत राहतात! त्यात हे हार्मोनल चेंजेस म्हणजे भावनांचा झोपळाच.. मस्त वर वर जाणारा.. पोटात खड्डा पाडत खाली येणारा!

          तशी मी आईची बरेचदा आठवण काढत असते. बरेचदा नशिबाला दोष देत असे. पण, बाळ होते वेळीही तीच फक्त माझ्या मनात आंतर्बाह्य व्यापली होती. “ती आज इथे असती तर मी “जा” म्हणाले असते तरीही गेली नसती कुठे बाहेर.” वाक्य पूर्ण होईपर्यंत, “पण, गेली तर खरी निघून..” दुसरं वाक्य हजर.. “पण, ते तिच्या हातात नव्हतं.” “पण, त्रास तर झालाच नं.. तुला आणि सगळ्यांनाच!” बापरे.. किती हे विचार! अनेस्थेशियापेक्षा विचारांनीच बधीर झाल्यासारखं झालं.

          आई हे जग सोडून गेली तेव्हा खूप लहान होते मी. शाळकरी पोर! ईशान तर माझ्याहून लहान.. काही दिवस घरातील गडबड पाहून गोंधळले. सर्वजण नानापरी, “आई कुठे आहे?” या प्रश्नावर उत्तर देत होते. तात्पुरतं मन त्या थापांत रमत होतं. पण, दिवसपाणी झाले आणि सर्वजण आपापल्या घरी निघून गेले. मग मात्र हे काहीतरी विचित्र आहे, हे जाणवलं. घरभर शोधलं आईला, रडरड रडले, चिडले, फेकाफेक केली. शेवटी बाबांनी जवळ घेऊन थोपटलं. “आई आता कधीच दिसणार नाही.” असं मला म्हणाले. ते रडणं माझं शेवटचं होतं. मग सर्वांसमोर कधीच रडले नाही मी. एकट्यात रडत, राग काढत, मोठी झाले. मित्र मैत्रिणींच्या आईमध्ये, कधी कुणा ओळखी तर कधी अनोळखी स्त्रीमध्ये आई शोधात.. कधी तिची कल्पना करत, दिवस काढत राहिले. मोठी झाले, वयात आले, तेव्हा जगातील एवढी मोठी गोष्ट सांगायला, समजवायला, आईच नव्हती जवळ! सर्व मैत्रिणी त्यांच्या आईनी काय सांगितलं याबद्दल? काय काळजी घ्यावी? पहिल्या नाहाण्यानंतर कशी ओवाळून भेटवस्तू दिली! असं सांगत असत. मी एकटी आतल्या आत धुसफुसत पण आतुरल्या कानांनी त्यांचे क्षण साठवत असे. मग मात्र आईची आठवण म्हणजे रागच येई मनात. देवाचाही आणि तिचाही.. केवळ तिरस्कार..! वेडेपणाच होता तो.. आता समजतंय! पण ते मोठे होत असतानाचे दिवसही असे विचित्रच असतात. अजून वय वाढलं. महाविद्यालयात जाऊ लागले.. कोडकौतुकाची सवयच नुरली होती. आता महाविद्यालयात जाण्याआधी आणि  आल्यावर घरातले सर्व काम आणि ईशानचा अभ्यास ही वेगळी जबाबदारी अंगावर आली. आपल्याला इतरांसारखी मजामस्ती करायला वेळच नाही. आपल्याकडे आई नाही आपल्याला काय हवं आहे हे सर्व समजून घेण्यासाठी...  हळूहळू मनाविरुद्ध, झगडत का होईना परिस्थिती मान्य करावीच लागते.. तशी केली. आजवर आई गेल्यामुळे काय काय नाही करता आलं आणि ती कसं आपल्याला काहीच न देता गेली.. त्यामुळे तिला/ देवाला दोष देत आले. आपलं आपण सगळं शिकलो.. जबाबदार झालो.. एकटे राहू शकतो.. असा किमान इतांना दाखवता येण्याजोगा एक वेगळंच दृष्टीकोन आला. अधूनमधून नातेवाईक, “शकुसारखी/ आईसारखी दिसतेस हो अगदी.. सुंदर!” किंवा “शकूसारखी सगळ्यांची काळजी घेणारी आणि लाघवी पोरं आहे!” म्हणतात. बाबा मी केलेल्या स्वयंपाकाचं कौतुक डोळे भरल्या नजरेने करून, “अगदी तुझ्या आईसारखी सुगरण आहेस!” म्हणत, तेव्हा त्याचा आनंद होत नव्हता. काहीच वाटेना झालं होतं! माझ्या लग्नात बाबाच काय पण आईची फारशी आठवण असणे शक्यच नसलेला ईशानही, “आई आत्ता हवी होती.” म्हणून रडला तेव्हाही मी मात्र कोरडीच होते. “काहीच दिलं नाही आईनी आपल्याला आणि पोरकं करून निघून गेली.” माझा हा एकंच तोरा!

          तुझी तिथी कधी मी लक्षात ठेवली नाही की कधी देवाला किंवा तुला फुलं वाहिली नाहीत!  पण, बाळाला हातात घेतलं आणि कसं कोण जाणे अचानक लक्षात आलं.. तू गेलीस ती हीच तारीख! तू गेलीस तेव्हापासूनच स्वतःच्या कोशात, भ्रमात असलेल्या या ‘स्वयंभू शुभ्रेचा’ जन्म झाला होता. पण नाही..! खरा जन्म आता झाला आहे.. बाळाची अंघोळ, बाळाला न्हाऊ माखू घाला, त्याला सांभाळ आणि सोबतच घरातल्या सर्वांच करा.. ईशानच्या वेळेस तुझी ही अशी धावपळ मी पहिली होती. तुझ्या माहेरी  तूदेखील फार लहान वयात घराची जबाबदारी उचलली होतीस असं मामा नेहमी सांगतो. त्यामुळेच माझ्यातही हा गुण आला. तू देखणी होतीस म्हणून मी आहे. सुगरण होतीस म्हणून मी आहे. काळजी घेणारी, मायाळू होतीस म्हणून मी आहे. एवढी वर्ष तू नाहीस म्हणून तुला शोधत, स्वतःशी भांडत राहिले. पण, आता समजलं.. तू कुठेही गेली नाहीस मला सोडून.. माझ्यातच होतीस तू.. आणि राहशील.

    © वैदेही सच्चिदानंद शुभांगी शेवडे

गुरुवार, २६ फेब्रुवारी, २०१५

चक्र

           “अग कुमुद, ये ये.. अशी दारातच काय उभी! सोनं द्यायला आलीस ना? मग लाजायचं काय एवढं त्यात?” वैद्य काकूंनी कुमुदचा हात धरला आणि तिला पलंगावर बसवलं. “प्रेम करताना लाजत नाहीत; आता कसली आली आहे एवढी लाज?” वाती वळता वळता काकूंच्या सासूने होणाऱ्या नात सुनेला टोमणा मारला. “असू द्या हो आई.. आजकालची मुलं ठरवतात आपलं आपण.. आणि कुमुदला तर आपण लहान असल्यापासून पाहत आहोत. आपल्या डोळ्यासमोरच मोठी झाली ही पोर. आता चार खोल्या सोडून इथे येणार राहायला एवढाच काय तो फरक. मुलगी शिकलेली आहे, गुणी आहे, आपल्या किशोरला आवडते. दोघ सुखाचा संसार करतील बघा.” एवढ्यात किशोर आतून बाहेर आला. “अरे वाह! आज साडीत!” कुमुद अजूनच लाजून, खाली मान घालून बसते. “आता चारचौघात कौतुकंपण करा हो.. आपण ठरवलेल्या बायकोची..” असं म्हणत वैद्य आजी आत निघून गेल्या. काकूंनी कुमुदचा हात दाबला आणि मुक्यानेच तिला मनाला लावून घेऊ नको असं सांगितलं. “आजीचं मनावर घेऊ नकोस.. ती अशीच. जरा प्रेमाने बोलणार नाही तोंडावर. पण परवाच धाकट्या मामीला कौतुकाने सांगत होती, आमची नात सून लाखात एक आहे. सुंदर तर आहेच पण हुशारही आहे. एम ए झाली आता. पुरण पोळ्याही अगदी पटापट करते हो!” असं म्हणत किशोरनेही तिची समजूत घातली. आपल्या कौतुकाने सुखावून कुमुद खुदकन हसली. किशोर सोनं देऊन आईच्या पाया पडला. कुमुदही सोनं देऊन लगेच नमस्कार करण्यासाठी वाकली. काकूंनी तिला मायेनं जवळ घेतलं आणि गालावरून हात फिरवून चुंबन घेतलं. वडिलांनी एकट्याने वाढवलेल्या कुमुदच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. ते लक्षात येताच किशोरने काहीसे विनोदी बोलून वातावण हलक केलं. या त्रिकुटाच्या गप्पा सुरु झाल्या.

          एवढ्यात आजूबाजूची चार पाच लहान पोरं हातात आपट्याची पानं घेऊन आली. कुमुदने त्यांना आपट्याची पान वाटण्या मागची गोष्ट सांगितली. मग काकूंनी त्या प्रत्येकाच्या हातावर घरी बनवलेली खोबऱ्याची वडी दिली. ती खाऊन झाल्यावर ही वानरसेना पुढच्या घरी निघाली. ती जात आहेत तोवर चाळीतील वरच्या मजल्यावरच्या कदम वहिनी आपल्या दिपाला घेऊन आल्या. वडी तोंडात टाकत म्हणाल्या; “आमच्या बयेला पातळ नेसायची हौस. पण मला सातवा महिना आहे ना.. वाकता येत नाहीये आणि पलंगावर उभी केली तरी हिची वळवळ फार. जरा तुमच्या पद्धतीच लुगडं नेसवा ना काकी.” पूर्ण चाळीत कजाग म्हणून प्रसिद्ध असलेली ही कदम वहिनी. पण वैद्य काकूंच्या प्रेमळ स्वभावामुळे त्यांच्याशी नेहमीच आदराने बोलत असे. काकूंनी दिपाला सुंदर नटवली आणि कदम वहिनींच्या हातात तिच्यासाठी केलेले लाडू दिले. कदम वाहिनीने घरी जाऊन “तुमच्यापेक्षा त्या काकींना बघा माझी किती काळजी!” असे सासूला सुनावले.

          वैद्य काकू आपला मुलगा आणि होणाऱ्या सुनेसोबत गप्पा मारीत होत्या. अधुनमधून चाळीतली लहान पोरं, नवीन लग्न झालेली जोडपी, अन्य चाळकरी, किशोरचे मित्र, जवळचे नातेवाईक, यांची ये जा चालूच होती. तशीही निमकरांची चाळ नेहमी गजबजलेली असायची. सुखदुःखात हे चाळकरी एकमेकांच्या सोबत असायचे. चाळीत सर्वांची दार नेहमीच बिनधास्त उघडी असायची. पाटणकरांचं एकंच, नवीन लग्न झालेल्या आणि घरात दोघंच राहत असलेलं असं घर होत. नाहीतर बाकी सर्व घरात २ – ३ पिढ्या एकत्र आनंदात नांदत होत्या. दोघे नवरा बायको कामावर जाताना दाराला कुलूप लावून जायचे. पण किल्ली शेजारच्यांकडे असायचीच. चाळीत कोणाकडेही पाहुणे आले की लहानश्या खोल्यांमध्ये गर्दी होत असे. तेव्हा पाहुण्यांच्या आंघोळीसाठी आणि दुपारी वामकुक्षीसाठी चाळकरी खुशाल पाटणकरांची खोली वापरत असत. कदम वहिनी स्वतःच्या आणि जावेच्या पोरांसह चाळीतल्या बाकी पोरांनाही दंगा केल्यावर खुशाल रट्टे देत. कधी जेवायला, कधी पत्ते, कॅरम खेळायला एका घरी बाकी काही चाळकरी जमायचे तेव्हा ते अगदी नात्यातले असावे एवढे एकाच रंगत न्हायलेले दिसायचे.

          चाळीच्या फाटकासमोर एक मोटारगाडी थांबली. चाळीच्या मालकीणबाई न चुकता सणासुदीला सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी येत असत. पण गेलं वर्षभर त्या इथे फारशा आल्या नव्हत्या. त्या आत आल्यावर चाळकरी त्यांच्या भोवती जमले. सर्वांची त्यांनी आस्थेने चौकशी केली. “मागच्या वर्षी आमच्या अरविंदाचे अपघाती निधन झाले तेव्हा तुम्ही गणेशोत्सव साजरा केला नाहीत ते समजले.” मालकीणबाई बोलत होत्या. “अहो लीला ताई, तुमच्या अरविंदाला आम्ही लहान्या असल्यापासून खेळवला होता. आमच्या पोरांसोबत त्यालाही कधी खाऊ दिला होता. तुम्ही कधी परक्यासारख्या वागल्या नाहीत आमच्याशी. घरात काही अप्रिय घटना घडली तर कसला आलाय सण!” गोडसे काका त्यांना म्हणाले. लीला ताईंनी नम्रपणे हात जोडले आणि यापुढे पुन्हा सर्व सण साजरे करूया, असं म्हणाल्या. थोड्यावेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि त्या निघून गेल्या.

          वैद्य काकू काही कामासाठी आत निघून गेल्या. किशोर आणि कुमुद पाय मोकळे करण्यासाठी खाली उतरले. “जोडा कसा शोभून दिसतोय!” असं सर्वांनी त्यांना सांगितलं. समवयस्कांनी चेष्टा केली. चाळीसमोरच्या बागेतील बाकड्यावर जाऊन दोघं बसले. दोघांना लग्न अगदी साधसं हवं होतं. “हीच वेळ आहे पैसे कमावण्याची आणि जमवण्याची. आत्ता लग्नात वगैरे खर्च करण्यापेक्षा आपण हे पैसे जपून ठेऊ. आज इथे लहानश्या चाळीत आपण भाड्याने राहतो. घरी पाहुणा आला की आमची रवानगी बाहेर होते झोपायला. खूप अडचण होते. हेच आयुष्य मला आपल्या मुलांसाठी नकोय. थोडं मोठ आणि आपलं स्वतःच घर हवंय मला.” चाळीतल्या काही जणांनी एवढ्यात आजूबाजूच्या चाळींमध्ये किंवा गावाबाहेर घरं घेतली होती आणि आपलं बस्तान हलवलं होतं. तरीही प्रत्येक सणाला ते निमकर चाळीत हजेरी लावत होते. किशोरलाही असेच वेध लागले होते. पण, त्याच्या आणि वडिलांच्या नोकरीची जागा या घरापासून जवळ होती. इथे आसपास आता इमारती होत असल्याने आणि नवनवीन उद्योगांच्या कचेऱ्या येत असल्याने जागांचे भाव वाढले होते. त्यामुळे इथेच जागा घेणे किंवा ही जागा सोडणे यापैकी काहीच सध्या शक्य नव्हते. किशोरची यामुळे होणारी चिडचीड, घुसमट लक्षात घेऊन कुमुद मात्र त्याला काही वर्षांनी नक्की जवळच जागा घेता येईल असं समजावत नेहमी आधार देत होती.

          अशीच बरीच वर्ष गेली. निमकरांची चाळ अशी जुनी ओळख जाऊन त्या जागेला पार्क व्ह्यू असे नाव मिळाले. मोठा टॉवर उभा राहिला. प्रत्येक मजल्यावरची दार आता बंद असतात. चाळीतील सार्वजनिक गणेशोत्सवाचे चाळीसोबातच विसर्जन झाले. पार्क व्ह्यूमध्ये सातव्या मजल्यावर राहणाऱ्या पटवर्धनांच्या नीताने आज पहिल्यांदाच त्यांच्या शेजारी राहणाऱ्या अरोरा आंटीच्या घराची बेल वाजवली. आपल्या आजारी भावाला शेजारच्या घरातून येणाऱ्या कर्कश आवाजाचा त्रास होतो आहे म्हणून वैतागून नीता त्यांच्याकडे गेली होती. ५ – ६ वेळा बेल वाजवल्यावर आंटीने दार उघडले. “घंटी तो चालू हे.. लेकीन आवाजही नाही सुना.. क्या हुआ?” असं तिने नीताला विचारलं. नीताने आवाज कमी करण्याची विनंती केली. त्यावर “अरे डियर डोन्ट से आंटी.. अँड वो नौ दिन कुछ खाया पिया नाही ना ताकदवाला.. तो आज दशेहरा पार्टी है| नॉईस तो होगा ही ना! तुमलोग जरा अडजस्ट करो ना आज|” असं म्हणून दार लावून घेतलं. नीता फणफणत घरी आली. आजारी भावाकडेही तिने वैतागून पहिले. घरी कोणीच नव्हत आणि याच्या आजारपणामुळे तिला मित्रमैत्रिणींसोबत बाहेर जाता आलं नव्हत. इतक्यात तिची आजी आली. मुलाला बरं नाही म्हणून त्यांच्या सुनेनं धाकट्या जावेला फोन करून काही दिवस आधीच त्यांना बोलवून घेतले. एक महिना धाकट्या तर एक महिना मोठ्या मुलाकडे त्यांची सोय (?) केली असते. आजीने नातीच्या हातात आपट्याचं पान दिलं आणि डोक्यावरून हात फिरवून म्हणाली; “जा बाळ, मित्र मैत्रीण, इमारतीतील सगळे, यांच्याकडे सोनं देऊन ये. मी साडी नेसवू का तुला? की निषादच्या वाढदिवसाला घातलेला पंजाबी ड्रेस घालशील? तोंड कसं उतरलंय पहा! काही खायला करून देऊ का आधी?” नीता खूपच वैतागली, “व्हॉट रब्बीश आजी! हे असलं पान देऊन काय मिळतं तुम्हाला? उगीच झाडांना तोडून टाकता. मरतात ती तुमच्यामुळे... आणि प्लीज.. इथे कोणी असं घरोघरी जात नाही.. साडी नेस म्हणे! तू बस इथे. मी चालले फ्रेंड्ससोबत केएफसीला चिकन खायला. मम्माला सांग उशिरा येणारे घरी, उगीच फोन करू नकोस.” आजीला मात्र झाड कुठे कोणी तोडतंय आणि आपण झाड तोडतो असं म्हणणारी ही त्या कोंबडीची मान तोडून खाणार आहे या विचारानेच अंगावर शहारा आला. नेहमीप्रमाणे आजी गप्प बसली. शेजारून चित्र विचित्र गाण्यांचा आवाज होताच. नातवाला झोप लागली होती. घरात आता कोणीच नव्हतं. शेजारी कोणीच ओळखीचं नाही... त्यामुळे ती बसली टीव्ही लावून.

          पार्क व्ह्यू समोर एकाने आपली बाईक थांबवली. मागे बसलेल्या मुलीने काही विचारण्याआधी तो म्हणाला, “इथे आधी माझे आई बाबा राहायचे. या टॉवरमध्ये नाही.. चाळ होती इथे. बघ ना.. आता कसला मस्त टॉवर झालाय! आपला फ्लॅट केवढा लहान वाटतो! मलापण अश्या टॉवरमध्ये जागा घ्यायची आहे. जमेल?” मागे बसलेल्या तरुणीने त्याचा हात धरला आणि म्हणाली, “जमेल की.. तू इंजिनिअर आहेस, मी प्रोफेसर आहे. जमवू पैसे आणि घेऊ नवीन घर. वेळ लागेल पण अशक्य नाही अगदीच.” त्याने मागे वळून समाधानाने तिच्याकडे पहिले. “पण सध्या बाईक स्टार्ट करा मिस्टर अभिषेक किशोर वैद्य. आपल्याला इथून आपल्या घरी पोहोचायला किमान दीड तास तरी लागणार आहे. आई बाबा जेवायला थांबले असतील.” तो भानावर आला. बाईक सुरु करून भुर्र निघाला...!

    © वैदेही सच्चिदानंद शुभांगी शेवडे

सोमवार, १५ डिसेंबर, २०१४


भाऊबीज



          आज दिवसभर ती भरपूर कामात होती.. एक काम झालं की दुसरं.. काम अगदी ठरवून उपसून काढत होती! तसा तिचा दिवस उशीराच सुरु झाला. दिवाळीची सुट्टी.. त्यात शनिवार , रविवार हे तर तिचे आराम करण्याचे हक्काचे दिवस. तसं असलं तरी सणाच्या दिवशी ती पहाटे उठायची. मित्र मैत्रिण, नातालगांना भेटायची. पण आज दुपारी १ वाजला तरीही ती पलंगावर लोळत होती. मग तिला त्याचाही कंटाळा आला.. मग तिने जो कामात हात घातला.. थेट रात्री ११ वाजता पाठीला रग लागल्याने ती थांबली.. दिवसभर अन्नाचा कणही तिने घेतला नव्हता. 
          स्वयंपाक खोलीत जाऊन तिने स्वतःसाठी कॉफ़ी केली. तिचा पहिलाच गरमा गरम घोट घेतल्यावर, "अगदी त्याला आवडते तशी झाली आहे कॉफ़ी!" असा विचार आलाच. ती बाल्कनीत उभी राहिली. आजुबाजुच्या घरांमधून अजुनही हसण्या खिदळण्याचे आवाज येत होते.. पण तिचं घर शांत, रिकाम होतं.. सर्वांच्या घराबाहेर पणत्या मंद मंद प्रकाशात तेवत होत्या.. पण तिने आज अंधारात रहाणच पसंत केलं होतं. गल्लीमध्ये बरीच लहान मुलं फटाके फोड़त होते.. पण तिचे कान आधीच बधीर झाले होते.. आणि मनही..
          "दादा, तू ये ना सोबत.. मला भीती वाटते लवंगी माळ लावायची!" एक आवाज तिने ऐकला आणि तिची तंद्री भंगली.. खाली फटाके फोड़णारी बरीच मुलं होती त्यामुळे नेमकं कोण बोललं असावं तिला अंदाज येत नव्हता.. तेवढ्यात तिला ते दोघं बहिण भाऊ दिसले! "अगं मने, तू एकटीने ती माळ लावालीस तर मी तुला एक गम्मत देइन.. आणि मी आहेच की इथे.. तुला काही होऊ देणार नाही मी." दादा मनीला समजावत होता.थोड्या वेळाने मनीने धीर एकवटून माळ लावली आणि दादाकडे धाव घेतली. जेमतेम ७ वर्षांची मनी आणि ९ वर्षांचा तिचा दादा. आता त्याच्या चेहऱ्यावर मनीने केवढं मोठं काम केलं, असे भाव पसरले होते! मनीने गम्मत दे म्हटल्यावर त्याने एक इकलेयर चॉकलेट तिला दिले. " माझ्या मित्राने दिले होते.. पण तू खा." तो कौतुकाने म्हणाला. "पण दादा, हे आपल्या दोघांना आवडतं.. आणि आपण नेहमीच अर्ध अर्ध वाटुन घेतो ना.. तसच हे खायच!" एवढस ते चॉकलेट त्यांनी अर्ध अर्ध खाल्ल. तेवढ्यात एक फटाका मनीच्या अगदी पायाजवळ फुटला.. "दादाss" अशी किंचाळून ती दादाला बिलगली.. बाल्कनीत उभी असलेल्या तिच्या तोंडूनही एक अस्फुट किंकाळी आली.. डोळे पाणावले.. तिने पुन्हा बाहेर पाहिले.. कुठे गेली ती दोघं?? खाली आता कोणीच फटाके फोड़त नव्हते.. मग आत्ता तिने पाहिली होती ती भावा बहिणीची जोड़ी गेली कुठे?? भास.. भास?? की आठवण??
          ती स्वतःच डोक गच्च पकडून खाली बसली.. बराच वेळ प्रयत्नपूर्वक थांबवलेले विचार आता अचानकच असे विचित्रपद्धतीने आता स्वतःची वाट मोकळी करत होते..!! 
          कुठे आहे तिचा दादा?? तो का आला नाही?? त्याला दिवाळीमध्ये तरी बहिणीला भेटावंस वाटलं असेल! मग का आला नाही तो?? इथे भारतातच तर राहतो तो! किती वर्ष झाली त्यांनी फराळ एकत्र केला नाही.. की फटाके उडवले नाहीत सोबत..! का?? तिचा भाऊ मात्र तिला सोडून फटाके फोड़त असतो अधूनमधून.. इथे नाही.. आपल्याच देशात.. पण दूर.. आपल्या देशाच्या सीमेवर! 
          आपला दादा देशाचे रक्षण करतो आहे याचा तिला कोण अभिमान!! पण, जेव्हा त्यांच्या घरी त्याची गरज असते तेव्हा?? वडिलांनंतर तोच तर आहे आता घराचे रक्षण करणारा! ती शिकून आपल्या पायावर उभी आहे. घर सांभाळते. पैशांची कमतरता नाही घरी.. दादाच्या कामाचे स्वरुपही तिला माहित आहे.. पण कधीकधी आठवणी आणि भावना यांचा लगाम आपसुक सुटतो आणि कोंडून ठेवलेल्या त्या आठवणींनी ती घुसमटते.. 
          तिने डोळे पुसले आणि आतल्या खोलीमध्ये आली. आज घरभर अंधार केला असला तरी भारत मातेच्या तसबिरीसमोर दिवा तेवत होता. वातीवरची काजळी तिने दूर केली.. दिवा पुन्हा नव्या उमेदीने प्रकाश देऊ लागला. तिने घडयाळात पाहिले.. खुपच उशीर झाला होता. पलंगावर पडल्या पडल्या तिला झोप लागली. 
          अशा बेफाम सुटलेल्या आठवणी अनावर होण तिला नवीन नव्हतं.. उद्या सकाळी पुन्हा ती हसत जागी होणार होती!!!



    © वैदेही सच्चिदानंद शुभांगी शेवडे

सोमवार, २० ऑक्टोबर, २०१४

महावस्त्र
          
          सियाच्या मैत्रिणीच आज लग्न होतं. सगळे मित्र मैत्रिणी बऱ्याच वर्षांनी एकत्र भेटले. खूप मजा मस्ती धम्माल केली. गप्पांच्या रंगलेल्या मैफिलीमुळे सियाचं घड्याळाकडे लक्ष राहिलं नाही. रात्रीचे ९ वाजून गेले होते. भायखळ्याहून ठाण्याला आणि तिथून घरी पोहोचण्यासाठी आता खूपच उशीर झाला आहे हे तिच्या लक्षात आले. तरीही सगळ्यांचा निरोप घेऊन बाहेर येण्यामध्ये अर्धा तास गेलाच. सोबत एक मैत्रीण ठाण्यापर्यंत असणार होती म्हणून सिया तशी निश्चिंत होती पण ऐनवेळी तिच्या मैत्रिणीने तिथून जवळच राहणाऱ्या तिच्या नातलगांकडे राहायला जाण्याचे ठरविले. त्यामुळे आता सियाला एकटीलाच प्रवास करावा लागणार होता. कामानिमित्त उशिरापर्यंत घराबाहेर राहणं हे तिलाच काय पण शहरात राहणाऱ्या महिलांसाठी नवीन गोष्ट नाही. पण आज का कुणास ठाऊक सियाला काहीतरी विचित्र वाटत होतं.
          लांब केस, नाजूक बांधा, केवड्याच्या वर्णाची काया असलेली सिया आज लाल साडीमध्ये अजूनच सुंदर दिसत होती. घराबाहेर पडताना तिच्या आजीने कौतुकाने तिच्या चेहऱ्यावरून बोटं फिरवली आणि कडाकड आपल्या डोक्यावर मोडली. तरीसुद्धा काजळाचं एक बोट सियाच्या कानामागे लावूनच आजीने तिला घराबाहेर पडू दिलं. लग्नाच्या हॉलमधून निघताना सियाने आपले लांब केस घट्ट वर बांधले. गळ्यातला हार काढून रोजच्या वापरातली बारीकशी साखळी घातली. हातातल्या बाकी बांगड्या काढून एकच जाड पण खोटा कंगण ठेवला आणि मगच ती घराच्या दिशेने निघाली.
          या वर्षी थंडी जरा जास्तच आहे. सियाचा हा अतिशय आवडता ऋतू. आई ओरडल्याशिवाय पोरगी अगदी नागपुरातही डिसेंबरमध्ये शाल, स्वेटरशिवायच फिरायची. पण आज मात्र तिला चक्क मुंबईमध्ये गारवा जाणवत होता. अंगात जराशी कणकण जाणवत होती. ट्रेनमध्ये खिडकीजवळ बसल्यावर गार वारा तिच्याशी अजूनच लगट करू लागला. तिच्या आईने साडीवर शोभून दिसेल अशी शाल तिच्यासोबत हट्टाने पाठविली होती. ती पिशवीतून घेण्यासाठी सियाने तिच्याजवळच्या सामानाकडे नजर टाकली. पर्स, रिटर्न गिफ्टची पिशवी तिला दिसली. पण, शाल कुठे राहिली? तिने गिफ्टच्या पिशवीत पुन्हा एकदा पहिले. सिया शाल कुठेतरी विसरली होती. तिने साडीचा पदर दुसऱ्या खांद्यावरून ओढून घेतला. पण तिच्या डिझायनर, झिरझिरीत साडीतून वार सहज आत शिरत होता. कशीबशी अंग आक्रसून सिया बसली. थोड्यावेळाने तिला कसलीशी ऊब जाणवली. तिने डोळे किलकिले केले. “थंड लाग राही है ना! गरम कपडा रखनेका अपनेसाथ|” एक अनोळखी स्त्री प्रेमाने तिच्या अंगावर शाल पांघरत म्हणाली. “नही.. नही.. मै ठीक हू!” सिया ग्लानीतच बोलत होती. “ठीक क्या? चेहरा देख अपना|” असं म्हणत त्या अनोळखी स्त्रीने तिच्या कपाळाला हात लावला. “तुझे तो बुखार है| गोली दु क्या बुखारवाली? कहा जा रही है तू? अकेली है क्या? बिमार है तो घर कैसे जायेगी?” एकापाठोपाठ एक एवढे प्रश्न ऐकून सिया पूर्ण जागी झाली. “मै जाऊंगी अकेले.. नजदीक है घर मेरा|” असं खोटच सांगून सिया तिला शाल परत करू लागली. “रख अपनेपास.. मैने देखा है तुझे थाना स्टेशनपे..| अच्छी दिखती है, तो ध्यानमे है चेहरा तेरा| मैभी वही उतरनेवाली हू| उतरनेके बाद दे| चलेगा मुझे|”
          सिया आभार म्हणून कसंनुस हसली. ही कोण कुठची बाई? आपल्याला स्टेशनवर पाहिलंय म्हणते आहे! विचित्रच भाषेत बोलते आहे! पण किती मायेने शाल पांघरली तिने! ताप चढत असल्याने सिया विचार करता करता पुन्हा ग्लानीत गेली. थोड्या वेळाने त्या स्त्रीने तिला हलवले. ठाणे स्टेशन आले हे तिला नजरेनेच सांगितले. सिया उठली. त्या स्त्रीच्या तोंडात पान असल्याचे तिने पाहिले. ट्रेन तशी रिकामी होती. तरीही आता ती स्त्री सियाच्या जवळून उठली आणि लांबच्या दारात जाऊन उभी राहिली. गाडी थांबली. दोघी उतरल्या. ती स्त्री सियाकडे लक्ष न देता पटापट पावल उचलीत चालू लागली. आत्तापर्यंत एवढ बोलणारी ही आता अशी का वागते आहे? सिया गोंधळली. “जाऊ दे! आपल्याला काय!” असं विचार करून आपल्या दिशेने चालू लागली. तेवढ्यात त्या स्त्रिची शाल आपल्याकडेच राहिल्याचं तिच्या लक्षात आलं. सिया मागे वळली. त्या स्त्रीला “दीदी..दीदी..” म्हणून हाक मारू लागली. पण तापामुळे आवाज फारसा निघत नव्हता.. ती कशीबशी त्या स्त्रीच्या मागे मागे जाऊ लागली. स्कायवॉकपाशी ती स्त्री घुटमळली. तिच्या मागे झपाझप पावलं टाकून जाताना सियाच घामट निघालं होतं. ती स्त्री आपल्याकडे पाहते आहे असं वाटून सिया तिला हातवारे करून बोलावू लागली. ते पाहून ती स्त्री मुद्दाम पाठमोरी उभी राहिली आणि मोबाईलवर बोलू लागली. सिया थकली होती. तिला दम लागला होता. ती जरा वेळ धापा टाकत तिथेच उभी राहिली. एवढ्यात तिच्या खांद्यावर कुणाचातरी हात आला. तिने मागे वळून पहिले. एक जाडा, बुटकासा माणूस उभा होता. त्याच्या जवळपास सर्व बोटांत सोन्याच्या अंगठ्या होत्या आणि गळ्यातही सोन्याच्या जाडजूड साखळ्या.. तिला पाहून तो  विचित्रपद्धतीने “खिस्स..” असं आवाज करत आणि आपले घाणेरडे दात दाखवत हसला. सोबत एक उग्र दर्प.. बहुतेक दारूचा.. सियाला किळस आली. तो सियाच्या अजून जवळ येणार एवढ्यात सियाला मागून धक्का बसला. त्या स्त्रीने पुढे येत त्या विचित्र माणसाचा हात पकडला. सियाला काहीच समजत नव्हते. एवढ्यात एका रिक्षेचा हॉर्न वाजला. “किधर जाना है?” असं रिक्षेवाला ओरडून विचारू लागला. हा तर राजू भैयाचा आवाज.. आपली भाची यांच्याच रिक्षेतून जाते. परिचित आवाजामुळे सियाला हायसे वाटले. “हम इधरीच है| इसको पुछ|” असं बोलून ती स्त्री त्या विचित्र माणसाला आपल्या जवळ ओढू लागली. तरीही त्या माणसाची  नजर सियावर खिळून होती. हे काहीतरी विचित्र आहे असं लक्षात येऊन सिया रिक्षेत बसली. “क्या ताई? तुम इधर?” राजू भैय्याचा लगेच सवाल.. मग सियाने सर्व कथा कशीबशी त्याला सांगितली. “अच्छा है आप यहा थे|” सिया म्हणाली. “मेरेको शीला दीदी का फोन आया, तो में इधर चला आया| लेकीन वो वही रुकी और आपके तरफ इशारा करके आपको पुछनेको कहा|” राजू भैय्या पटकन म्हणाला. पण नंतर “कोण शीला दीदी?, तिने का बोलावलं?” असं खोदून खोदून विचारल्यावरही राजू भैय्या उत्तर देईना. ताप चढत होता त्यामुळे सियाला जास्त बोलताही येत नव्हतं. ती घरी आली आणि तिला लगेच झोप लागली.
          दुसऱ्या दिवशी उठल्यावर, कणकण गेल्यावर तिला कालच्या गोष्टींचा अर्थ उमगू लागला. एका विचित्र घटनेमधून आपल्याला त्या कोणा अनोळखी ‘शीला दीदीने’ वाचवले, म्हणून तिने देवाचे आभार मानले. तिची शाल स्वच्छ धुवून काढली. राजू भैयाला ती परत करायला सांगितली तर “दीदी काम जो करती है वो मजबुरी है| पर दिलकी अच्छी है| आपने उसकी चीज लोटादी तो उसे बुरा लगेगा|” असं म्हणून त्याने शाल घेण्यास नकार दिला. सिया ऑफिसला जाताना ठाणे स्टेशनवरून जात असे. शीला दीदीने तिला तिथे पहिले होते, असं दीदी म्हणाल्याचे तिच्या लक्षात आले. मग ऑफिसला जाताना सिया रोज ती शाल आपल्या सोबत ठेऊ लागली. कधीतरी शीला दीदीला ती देऊन आभार मानावे असं तिच्या मनात होतं. पण शीला दीदी काही सियाला दिसली नाही.
          काही दिवसांनी ऑफिसमध्ये काम करत असताना सियाचे बॉस तिच्या केबिनमध्ये एका जोडप्याला घेऊन आले. अचानक सगळे आपल्या केबिनमध्ये आले म्हणून सिया गडबडीत उठली.. त्यामुळे डेस्कवरील काही सामानही खाली पडले. “सिया, बस.. बस.. हे कांताशेठ. आपले खूप जुने कस्टमर. नेहमी आपल्याकडूनच सर्व परिवारासोबत ट्रीपला जातात. आत्तासुद्धा आपली पत्नी, तीन मुले आणि आई, वडील यांच्यासोबत त्यांना ट्रीप करायची आहे. मला जरा वेळ नाही आहे. तू सांभाळ.” असं म्हणून बॉस निघून गेले. सियाने नेहमीप्रमाणे स्मित हास्य करत त्यांना कुठे जायला आवडेल हे पाहण्यासाठी नेहमीसारख्या गप्पा सुरु केल्या. शेठ्जींची बायको त्यांच्यापेक्षा फारच लहान वाटत होती आणि तिने अंगावर भरजरी कपडे आणि ठसठशीत दागिने घातले होते. त्यामुळे सियाचे लक्ष तिच्याचकडे होते. “ये ना बडे वो है| तो माँ बापुजीको मंदिर वगेरा होना.. और इनको अच्छा सिनरी होना..|” असं ती लाजत लाजत म्हणाली. यावर कांताशेठ हसले. “खिस्स..” त्या आवाजामुळे सियाने पटकन त्यांच्याकडे पहिले. बायकोने केलेल्या कौतुकाने खुश होऊन कांताशेठ आपल्या दाही बोटातल्या अंगठ्यांनी काचेवर ताल धरून आपले घाणेरडे दात दाखवत हसत होते. अंधारातला तो किळसवाणा चेहरा या कांताशेठचाच होता हे तिच्या लक्षात आले. तरीही चेहऱ्यावर तसे काही भाव न आणत तिने त्यांना हवी तशी एक टूर करून दिली. ते दोघे आनंदात तिथून निघाले. जाता जाता “थेंकू हा|” असं म्हणत कांताशेठ तसेच हसले तेव्हा सियाच्या अंगावर पुन्हा एकदा सरसरून काटा आला. ती त्याच विचारात खाली वाकली आणि डेस्कवर पुन्हा समान ठेऊ लागली. तिच्यासमोर आत्ता तो किळसवाणा माणूस बसला होता. त्याला बायको आहे, मुलं आहेत, आई वडिलांनाही सोबत घेऊन, त्यांची मर्जी राखत हा माणूस एकीकडे वागतो आणि दुसरीकडे रात्री.. शीsss.. विचार करावा तेवढी किळस सियाला वाटू लागली. डेस्कवरून पडलेले पेन घेण्यासाठी कांताशेठ बसला होता त्या खुर्चीपाशी ती आली. तिथेच खाली शीला दीदीची शालही मागाशी गडबडीत उठण्याच्या नादात पडल्याचे तिला दिसले. तिने शाल उचलंली. सियाने धुवून स्वच्छ केलेल्या त्या शालीवर आत्ताही कांताशेठच्या घाणेरड्या चपलांचे ठसे उमटले होते...!!

© वैदेही शेवडे.

सोमवार, ११ ऑगस्ट, २०१४

सदर लेख “संत साहित्य” विशेषांकात प्रकाशित झाला आहे.

विठ्ठलाचा छंद l वाचे गोविंद गोविंद ll
         
          पिवळ्या रंगाच्या, चकाकणाऱ्या कोणत्याही वस्तूला सोने म्हणता येत नाही. भट्टीतून तावून सुलाखून निघाले की मगच सोन्याच्या शुद्धतेची, त्याच्या उत्कृष्ठतेची ओळख होते. अशा सोन्यालाच आपण खरे सोने समजतो. अगदी तसेच आपल्या वडिलांनी अचानकपणे दुसऱ्याच्या घरात सोडल्यामुळे आलेला पोरकेपणा, अनाथ, उपेक्षित असे एका मोलकरणीचे आयुष्य वाटेला आलेली अशी ही जनाबाई.. कधी चोरीचा आळ तर कधी तिच्या विठूरायावरील श्रद्धेची समाजाने केलेली हेटाळणी किंवा एका स्वच्छ, सुंदर, पवित्र अशा चारित्र्यावर उडवलेले शिंतोडे, जीवनातील अशा अनंत कटू प्रसंगांना संयमाने ती तोंड देत राहिली. जन्माने अतिशूद्र, त्यातून स्त्री, भरीस भर एकटेपणा आणि लोकांची सततची टीका, अश्या परिस्थितीत कोणताही सामान्य माणूस कोलमडेल. परंतु अत्यंत कठीण अथवा सचोटीच्या क्षणीही ती खंबीरपणे उभी राहिली. तिची विठ्ठलावरील भक्ती कधी तसूभरही कमी जास्त झाली नाही. मुखी सतत विठुरायाचे नाम घेत आपल्या भक्तीरसात न्हायलेल्या अभंगांमधून देवाच्या जवळ जाण्याचा नामसंकीर्तनासारखा सुलभ मार्ग सांगणाऱ्या संत जनाबाई या महाराष्ट्राच्या संत परंपरेतील अस्सल बावनकशी सोनंच जणू.
          चातुर्वर्ण्य व्यवस्थेतील सर्वात खालच्या वर्णातील, तत्कालीन अतिशूद्र समजल्या जाणाऱ्या समाजातील, गरीब घरातील एक लहानशी पोर.. आई वारल्यावर जेमतेम पाच सात वर्षांची असताना अचानक वडिलांनी तिला पंढरपुरी दामाशेटींकडे आणून सोडली. येथे तिच्या स्वतःच्या घरापेक्षा निश्चितच सुबत्ता होती. दामाजी आणि त्यांची बायको गोणाई दोहोंनी तिचे मनापासून स्वागत केले. त्यांच्या घरातले आणि घरातील प्रत्येकाच्या मनात जनाबाईचे स्वतःचे, हक्काचे असे स्थान होते. संत शिरोमणी नामदेवरायांची ही बालसखी. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, एकनाथ, तुकाराम, चोखामेळा, अशा अनेक संतांनी गौरवलेली संत जनाबाई. त्या विठू माऊलीची लाडकी भक्त. अशी अनेक मानाची पिसे तुऱ्यात असूनही नामदेवांच्या घरातील स्वतःची दासीची जागा तिने मनापासून जपली. वारकरी किंवा भागवत धर्माचा अंगीकार करणारे जात-पात मानत नाहीत. असे असूनही समाजाच्या चौकटीचे भान ठेऊन जनाबाई आचरण करीत. आज मराठी संत साहित्यात आवर्जून जनाबाईंचा उल्लेख शांत, मंद सुवासिक अशा जाईच्या वेलीचे रूपक वापरून केला जातो. तरीही आयुष्याच्या शेवटच्या घटकेपर्यंत जनाबाई मात्र स्वतःचा उल्लेख ‘दासी जनी’ अथवा ‘नामयाची दासी जनी’ असाच करून समाधानी होत्या. आपल्या अभंगातून कित्येक वेळेस त्यांनी स्वतःला असे संबोधले असल्याचे दिसते.
“जनी म्हणे जोड झाली जोड विठोबाची l दासी नामयाची म्हणोनिया l”
          ज्याप्रमाणे नदी लांब अंतरावरील एखाद्या बिंदुपासून वाहत वाहत, सर्वांना तृप्त करीत सागराला येऊन मिळते तशीच लहानशी जनी मराठवाड्यातील एका छोट्याशा खेड्यातून ईश्वरी संकेतानुसार पंढरपुरी आली. नामदेवांसोबत राहून विठू सावळ्याची भक्ती करू लागली. स्वतःच अस्तित्व विसरली. या सागर सरितेच्या संगमाचा शेवट हा विश्वनियंत्या परमेश्वराच्या पायाशी विलीन होण्यात किंबहुन त्याच्याशी एकरूप होण्यात झाला नसता तरच नवल होते!
          दमा आणि कुरुंड हे गंगाखेड येथे गावाबाहेर राहणारे अतिशूद्र जातीतील एक दाम्पत्य. घरामध्ये अठरा विश्वे दारिद्र्य पण मनामध्ये विठोबाच्या भक्तीची श्रीमंती. दमा नित्यनेमाने वारीला जात असे. दररोज मिळेल ते काम करून दोघं आपला चरितार्थ चालवीत होते. मीठभाकरीमध्येही सुखी होते. आयुष्यात त्यांच्या दृष्टीने त्यांना एकंच मोठा सल होता. लग्न होऊनही कुरुन्डेची कूस उजवत नव्हती. एक दिवस त्या दोघांनी हे गाऱ्हाणे विठ्ठलासमोर मांडायचे ठरवले. दोघेही ठरल्याप्रमाणे वारीला निघाले. मुल व्हावे म्हणून विठोबाला साकडे घातले. आणि काय आश्चर्य.. विठू माऊलीने त्यांना दृष्टांत दिला! “तुमच्या कुळाचा उद्धार करणारी आणि माझा अंश असलेली कन्यारत्न तुमच्या पोटी येईल. माझा अखंड सहवास तिला लाभेल.” आणि खरंच काही काळाने कुरुन्डेला दिवस गेले. देवाच्या आशीर्वादाचे बीज तिच्या पोटी रुजले होते. त्यामुळे एक आगळेच तेज तिच्या चेहऱ्यावर पसरले होते. दिवस भरत आल्यावर तिने एका गुटगुटीत कन्येला जन्म दिला. दमा आणि कुरुंड दोहोंच्या आनंदाला पारावर उरला नाही. जना असे तिचे नाव ठेवण्यात आले. परंतु, त्यासोबतच विठोबाचे शब्दही त्यांना पूर्ण लक्षात होते. त्यांच्या कुळाचा उद्धार करणारी अशी देवाच्या आशीर्वादाने झालेली लेक त्यांच्या कुशीत होती. पण तिचा सहवास त्यांना फारकाळ लाभणार नव्हता. तिला पंढरपुरात दामाशेटीकडे सोडण्याचा देवाचा आदेश त्यांना पाळावाच लागणार होता. पाच सात वर्ष त्यांच्या अंगणात ते पाखरू मनसोक्त  बागडले. दमा आणि कुरुंड दोहोंचा जीव त्यांच्या या लाडक्या लेकीत अडकला होता. तिच्या बाललीला त्यांना मोहात पाडत होत्या. पण तरीही लवकरच ती आपल्यापासून दूर होणार ही भावनाही त्यांना बोचत होती. त्यातच कसल्याशा आजाराचं निमित्त होऊन जनीची आई देवाघरी गेली. दमा या धक्क्याने खचला. एवढ्या लहान मुलीला आता आपण एकटे कसे सांभाळणार हा प्रश्न त्याला पडला. तेवढ्यात त्याला विठोबाचे शब्द पुन्हा आठवले. छोट्याशा जनीला दमाने, “काळ्या देवाला भेटायला जाऊया का?” असे विचारताच जनीने आनंदाने मान डोलावली. एवढंसं आपलं पोर..! आपल्याविना कसं राहू शकेल? दामाजींच्या घरी तिला कोण सांभाळेल? अशा हजार चिंतांनी जनीच्या बापाचे हृदय पोखरत होते पण जनी मात्र वेगळ्याच आनंदात होती. विठोबाच आता तिच्या आयुष्याचं चांगल वाईट पाहणार आहे; हे जणू तिला आधीच समजले होते. तिचा नामया तेथे तिची वाट पाहत होता. पुढे नामदेवांच्याच सानिध्यात राहून तिला तिचा विठू भेटणार होता. पण, जनीच्या आयुष्याच्या दोऱ्या विठोबाच्या हातात सोपवल्या असल्याने आपण निश्चिंत व्हावे हे एका बापाच्या मनाला नीटसे पटत नव्हते. इथे जनी मात्र आपल्या खऱ्या घरी जाण्यासाठी आतुर होती. मजल दरमजल करीत दमा आणि जनी दामाजींकडे पोहोचले. त्यांच्याकडे जनीला सोडून जड अंतःकरणाने दमाने निरोप घेतला. त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याची आणि जनीची भेट कधी झालीच नाही.
          लोकांच्या दृष्टीने जनी ही आई बापाने टाकलेली पोर होती. दामाजींच्या घरातील एक मोलकरीण होती. कुणाही सामान्य व्यक्तीला जनी अत्यंत एकटी, परावलंबी वाटेल. कुणालाही तिच्या या परिस्थितीवर कीव यावी. पण, जनी मात्र आपलं सर्वस्व विठोबाला समजू लागली. आई, वडील दुरावल्याचे दुःख कोणालाही होईल. जनीही यास अपवाद नाही. पण या यातना सहन करतानाही ती देवाला आळवते;
“माय गेली बाप मेला l आतां सांभाळी विठ्ठला ll
मी तुझे गा लेकरू l नको मजशी अव्हेरू ll
मतिमंद तुझी दासी l ठाव द्यावा पायापाशी ll
तुजविण सखे कोण l माझे करील संरक्षण ll
अंत किती पाहासी देवा l थोर श्रम झाला जीवा ll
सकल जीवाच्या जीवना l जनी म्हणे नारायणा ll”
          अत्यंत सध्या शब्दात पण आर्त विनवणी जनी करते. तिच्या शब्दाशब्दातून तिचे अंतर्मन उलगडत जाते. कधी देवाला ती माय बाप म्हणते तर कधी सखा मानते. कधी लहान मुलासारखा हट्ट करते तर कधी रुसून बसते. राग आला तर कधी “अरे विठ्या अरे अरे विठ्या l मूळ मायेच्या कारट्या ll” असे चार खडे बोलही सुनावते. विठुरायाच्या चरणांवर आपले आयुष्य वाहते. एवढेच नव्हे तर कोण कुठच्या टोकाच्या गावाहून आलेली ही पोर चंद्रभागेच्या तीरी उभे असलेल्या विठुरायावर अगदी सहजच आपला हक्क असल्याचे सांगते. पंढरपूर हे तिचे माहेर असून येथे आलेल्या प्रत्येकाला मोक्ष प्राप्त होतो असे ठामपणे सांगते.
“बाप रखुमाबाई वर l माझे निजाचे माहेर ll
ते हे जाणा पंढरपूर l जग मुक्तीचे माहेर ll
तेथे मुक्ती नाही म्हणे l जनी न पाहे त्याचे वदन ll”
          एखाद्या अशिक्षित, समाजाने मागास ठरवलेल्या वर्गातील, मोलकरीण असलेल्या स्त्रिला मोक्षाचे विचार करता यावे हे नवल नाही का! नामदेवांच्यासोबत राहून जनीला लहानपणी थोडीफार शब्द ओळख झाली. त्याकाळी महिलांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी होते. तरीही नामदेवांने आग्रहाने जनीकडून अक्षरे गिरवून घेतली. ते कधी स्वतः तिचे अभंग लिहून काढत तर कधी जनाबाईच ते उतरवून ठेवत असत.  कोणतेच साचेबद्ध शिक्षण न घेताही जनाबाईंच्या अभंगात एक गोडवा जाणवतो. आज अभंगादी काव्य प्रकारांचे शालेय जीवनात पाठ शिकवले जातात. त्यातील रचना, विविध वृत्त यांचा अभ्यास केला जातो. शिक्षणाचा भाग असूनही अशा रचना आता सहसा कुणाला जमत नाहीत. असे रसाळ अभंग करणे हे वेड्या गबाळ्याचे काम नव्हे. तेथे एक अडाणी जना बोलता बोलता, अगदीच उत्स्फुर्तपणे अभंग रचत असे. तिची रोजची कामे, आजूबाजूच्या लोकांचा स्वभाव, विठोबावरील तिचे प्रेम असे अगदी साधारण विषय त्यांच्या अभंगातून आपल्याला दिसतात.
          आज जवळपास प्रत्येक कामासाठी आपण विविध यंत्रांवर अवलंबून असतो. पूर्वीच्या काळी महिला वर्गाला ही सूट नव्हती. सडा सारवणे, निवड पाखडणे, जात्यावर दळणे, अशी असंख्य अंग मेहनतीची कामे जनी एकटीच मन लावून करीत असे. तिच्या कामाचा वेगही चांगला होता. कोणत्याही कामात चालढकलपणा नाही. भरपूर काम करूनही, एका क्षणाची विश्रांती न घेताही, ती सतत उत्साही असे. काय असेल या मागचे गुपित? सतत काम करण्याचा उत्साह कुठून येत असेल तिच्यामध्ये? यावर जनी म्हणते,
“झाडलोट करी जनी l केर भरी चक्रपाणि ll
पाटी घेउनी डोईवरी l नेऊनिया टाकी दुरी ll
ऐसा भक्तीसी भुलला l नीच कामे करू लागला ll
जनी म्हणे बा विठ्ठला l काय उतराई होऊ तुला ll”
          जनीच्या प्रत्येक कामात तिचा विठोबा तिची साथ देत असे. आपले प्रत्येक काम तोच करतो ही तिची दृढ श्रद्धा. आपण सामान्य माणसं.. त्यातून स्वतःला विज्ञाननिष्ठ अथवा बुद्धिप्रामाण्यवादी, अशी विशेषणं स्वतःच लावतो. अशा चष्म्यातून पाहिल्यास कुणाला हे सर्व एकटेपणात पिचलेल्या एका अबलेचे मानसिक खेळ वाटतील. पण हा चष्मा उतरवून स्वच्छ विचार केल्यास जनीचे विठूवरील प्रेम तिला कसे सबळ करते ते समजते. देव आपल्यावरील प्रेमाखातर आपली सगळी कामं वाटून घेत आहे, याचे जनीला कौतुक वाटते. आपल्यासाठी तो एवढी हलकी कामं करीत आहे या भावनेने सुखावणाऱ्या जनीला देवाचे उच्च स्थान लक्षात येते आणि तो केवळ आपल्यासाठी अशी कामं करीत आहे; त्यामुळे लोक त्याला नावं ठेवतील अशी अपराधीपणाची भावना तिच्या मनात येते. एवढा जगातील सर्व घटनांचा करता करवीता आज आपल्यासाठी कष्ट उपसत आहे, राबत आहे, या भावनेने सुखावत असतानाच जनीला आता या ऋणातून कसे मुक्त व्हावे? असा निष्पाप विचारही येतो. सोहम अथवा अद्वैताचे तत्त्व एकदा समजले की देव प्रत्येक कामात मदत कशी करतो हे कोडे अलगद उकलते. अगदी नेमक्या शब्दात हे तत्त्वही जनाबाई उलगडतात.
“जोड जाली रे शिवासी l भ्रांत फिटली रे जिवाची ll
आनंदची आनंदला l आनंद बोधची बोधला ll
एकपण जेथे पाही l तेथे विज्ञप्ति उरिली नाही ll
ऐसी सद्गुरूची करणी l दासी जनी विठ्ठल चरणी ll”
          भगवंत आणि भक्त दोन्ही एकच अथवा भक्त हा भगवंताशी एवढा एकरूप होतो की त्याच्यामध्ये आणि भगवंतामध्ये काही अंतरच राहत नाही. जेथे नर आणि नारायण दोन्ही एकमेकांमध्ये विलीन होतात त्यास ‘अद्वैत’ असे म्हणतात. भक्त आणि भगवंत हे दोन अथवा भिन्न असे मानले जाते ते ‘द्वैत’. तर दोन स्वतंत्र अस्तित्व नसलेले किंवा एकमेकांपासून भिन्न नसलेले ते ‘अद्वैत’. त्यामुळेच भक्त आणि भगवंताचे, आत्मा आणि परमात्म्याचे मिलन म्हणजे अद्वैत होय. जेव्हा मीठाची बाहुली समुद्रतळ शोधायला समुद्रात उडी घेऊ पाहील तेव्हा तिचे स्वतंत्र अस्तित्व राहू शकेल का? ती त्या पाण्यात पूर्णपणे विरघळून जाईल. तसेच स्वतःचा शोध घेताना, आपल्या अविनाशी आत्म्याचा ठाव घेताना, मी म्हणजे कोण? या प्रश्नापाशी येऊन अडकायला होते. तेव्हा त्या परब्रह्मरुपास आपण एकरूप झालो की “अहं ब्रह्मास्मि” हे मूळ सूत्र समजते. एकदा आपल्यातील देवत्वाची ओळख आपल्याला पटली की कुकर्मांपासून आपण सहज दूर होतो. मानवी देहाला या लौकिक जगातील ज्या दुःखांचे ओझे वाटते ते जीवा शिवाच्या मैत्रीने दूर होते. या अद्वैताच्या अथवा सोहम तत्त्वाच्या अंगिकारामुळे जनाबाईचे पोरकेपण दूर झाले. श्रमांमुळे देहाला होणारे कष्ट आणि मानसिक यातनाही तेथेच थंडावल्या. आपल्यासोबत सतत विठोबा आहे; आपले दोहोंचे अस्तित्व एकच आहे त्यामुळे तो आपल्याला प्रत्येक कामात साथ देतो हे जनाबाईंचे विचार यातून आपल्याला समजतात. जेथे लहानसहान कुरबूरी, हेवेदावे संपले तेथे आनंदची आनंद झाला असे त्या सांगतात. “देह भाव सर्व जाय l तेव्हा विदेही सुख होय ll” अशी त्यांची अवस्था होते. मी-तू पणाची बोळवण झाल्यावर आता देवाला आपण आपल्या हृदयात पक्के अडकविल्याचा जनाबाईंना साक्षात्कार होतो. त्याला आपल्यापासून कोणीच हिरावून नेऊ शकत नाही, असा दृढ विश्वास त्यांच्या मनी उत्पन्न होतो.
“धरिला पंढरीचा चोर l गळा बांधोनिया दोर ll
हृदय बंदिखाना केला l आत विठ्ठल कोंडला ll”
          एखाद्या द्वाड, अल्लड, बदमाश लेकरास आईने पकडून ठेवावे एवढ्या सहजतेने ती विठ्ठलाला हृदयात बंद केल्याचे सांगते. ती आणि तो एक याच भावनेतून तिच्या कामांमध्ये तिला मदत करण्यासाठी स्वतः चक्रपाणी आल्याचे तिला जाणवते. जनीला मदतीला कुणी माणूस येत असावा असे काही जणांना वाटते. तसे जरी मान्य केले तरी अडीनडीला आपल्यासाठी धावून आलेल्या प्रत्येकात आपल्याला ईश्वरच सापडत असतो हे विसरू नये.
       देवाच्या उपासनेचा आणि त्यायोगे मोक्ष मिळवण्याचा साधा सरळ मार्ग म्हणजे नामस्मरण. देवाचे नाव सतत मुखात असल्याने राग, लोभ, अविवेकी विचार, अशा सर्व दुर्गुणांचा निचरा होतो. शांत, समाधानी वृत्तीचा, सगुण रूपाचा आपल्यात शिरकाव होतो, असे त्या म्हणतात. “मूळ गेले हो क्रोधाचे l ठाणे केले विवेकाचे ll” असे त्या सहज सांगतात. जनाबाई आणि नामसंकीर्तन हे समीकरणच जगावेगळे वाटावे असे आहे. “मला लागो हाची धंदा l रामकृष्णहरिगोविंदा ll” अशी कामना त्या व्यक्त करतात. आपण जी कामं दररोज करतो त्याचा आपल्याला कधी ना कधी कंटाळा येत असतो. मग कामात चालढकल कळत नकळतपणे होत असते. परंतु, जनाबाई नामस्मरणात एवढ्या गुंग होत की त्यांच्या प्रत्येक कामात त्यांना देवाचे अस्तित्व जाणवू लागले. मग कामातून पळवाट का शोधावीशी वाटेल कुणाला? एखाद्यावर जीव ओवाळून टाकणे किंवा समरस होऊन जाणे म्हणजे काय हे पुढील पंक्तींवरून सहज लक्षात येते.
“देव खाते देव पिते l देवावरी मी निजते ll
देव देते देव घेते l देवासवे व्यवहारीते ll
देव येथे देव तेथे l देवाविणे नाही रितें ll
जनी म्हणे विठाबाई l भरुनी उरलें अंतरबाही ll”
          आपल्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक गोष्टीत, चराचरात जनीला देव सापडत होता. एका वेगळ्याच पातळीवरील अलौकीक प्रेम आणि विश्वासाची प्रचीती यातून होते. आपल्याला आई, वडील, भाऊ, बहिण, नवरा, बायको, आदी सर्व नात्यांमध्ये ती व्यक्ती सदेह रुपात दिसत असते. त्यांच्यावर आपले मनापासून प्रेम असते परंतु, “भरुनी उरले अंतरबाही” एवढे समर्पण प्रत्येकाला खरंच अनुभवता येते का? येथे तर जनी चारचौघांना न दिसणाऱ्या, केवळ तिच्या मनःचक्षूंसमोर असलेल्या एका प्रचंड विशाल शक्तीकडे अगदी सहज, डोळे मीटून स्वतःला सोपवीत आहे. हे कुणा सामान्याला जमणे केवळ अशक्य! म्हणूनच या कठीण अश्या भक्तिमार्गाचे वर्णन “भक्ती ते कठीण इंगळाची खायी l” असे ती करते.
          देवाला कधी आईच्या मायेने, लाडाने हाक मारणारी जनी, कधी आपल्या मित्राला हाक मारावी एवढ्या सहज त्याला मनातील गुज सांगणारी जनी, असे जनाबाईंचे अनेक रंग आपल्याला त्यांच्या अभंगातून दिसून येतात. पण सर्वात महत्त्वाचे आणि देवाला स्वतःपाशी कायमचे बांधून ठेवणारे जनीचे रूप म्हणजे तिच्या मनाची अत्यंत व्याकूळ अशी अवस्था. विठ्ठलाला मायबाप समजणारी जनी त्याच्या भेटीच्या ओढीने हट्ट करते. ती विठोबाचे आधी कौतुक करते.
“रूप सावळे सुंदर l कानी कुंडले मकराकारll
गळा वैजयंती माळा l तो हा मदनाचा पुतळा ll ”
          कौतुकाला विठू भुलला नाही तर लाडीगोडीने बोलाविते. “ये ग माझे विठाबाईl ” अशी हाक मारते. तरीही विठूराया आला नाही तर मात्र हिरमुसून जाते. आणि “का ग न येसी विठ्ठला l ऐसा कोण दोष मला ll” असे विचारते. कधीकधी मात्र या भौतिक जगात रमणे अशक्य होत असल्याने ती अजूनच कळकळीने हाक मारते.
“का गे निष्ठुर झालीसी l मुक्या बाळाते सांडिसी ll
तुज वाचोनिया माये l जीव माझा जावो पाहे ll
प्राण वारीयले कंठी l जनी म्हणे देई भेटी ll”
          अशा आर्त हाकेकडे कानाडोळा करणे देवाला जमणे कठीणच. लहान बाळ आपल्या आईला बोलावते आहे जणू तशी जनी विठोबाला आळविते. मग तो पंढरीचा राजा सगळी कामं बाजूला सारून जनीला भेट देत असे. तिला मायेने जवळ घेत असे. कुशीत घेऊन शांत करीत असे. मग जनी पुन्हा हसतमुखाने येईल त्या प्रसंगांना सामोरे जायला तयार होत असे. त्या भेटीमुळेच तिच्या अंगात अतिशय उत्साह आणि ताकद येत असे.
          जनाबाईंच्या अभंगातून केवळ त्यांचे विठू माऊली आणि नामदेवांप्रती असलेले प्रेमच व्यक्त होत नाही तर निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताबाई, चोखामेळा, आदी संतांविषयी तिच्या मनात असलेला आदरभावही व्यक्त होतो. वयाचे अंतर पाहता जनाबाई ज्ञानेश्वरांपेक्षा मोठ्या पण ज्ञानदेवांची आध्यात्मिक खोली, त्यांचा अभ्यास त्या जाणून होत्या. वेदशास्त्रांच्या अभ्यासातील चारही भावंडांची समज त्यांना माहिती होती. त्यांच्या अनेक अभंगातून ज्ञानेश्वरांविषयीचे त्यांचे प्रेम व्यक्त होते. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि आदिशक्ती अशाप्रकारे जनाबाई या भावंडांचा उल्लेख करतात.  
“सदाशिवाचा अवतार l स्वामी निवृत्ती दातार ll
महाविष्णूचा अवतार l सखा माझा ज्ञानेश्वर ll
ब्रह्मा सोपान जाला l भक्ता आनंद वर्तला ll
आदि शक्ति मुक्ताबाई l दासी जनी लागे पायी ll”
          जेमतेम अक्षर ओळख असलेल्या, घरकाम करणाऱ्या, चाकोरीबद्ध आयुष्य जगणाऱ्या जनाबाईंचे हटयोग, इडा, पिंगळा, सुषुम्ना, अश्या कुंडलिनी जागृत करणाऱ्या ब्रह्मनाड्यांवरील ज्ञानही चकित करणारे असेच होते. भल्या भल्यांना कित्येक वर्ष साधना करूनही यातील बोध होत नाही. पण या विश्वाचा कारभार सांभाळणाराच तिचा सखा होता. त्यामुळे तिला कोणी काही न शिकवताही आपोआपच हे ज्ञान मिळत होते. “रक्त वर्ण त्रिकूटस्थान l श्री हाट पाहे श्वेतवर्ण ll” ही हटयोगावरील त्यांची रचना थक्क करणारी आहे. शुद्ध पण साध्या भाषेत त्यांनी यात हटयोग उलगडून दाखवला आहे. त्यांच्या आध्यात्मिक अभ्यासाबाबत, उत्स्फूर्त अभंगांच्या कौशल्याबाबत त्या “बाई मी लिहिणे शिकले सद्गुरुरायापाशी ” असे एवढेच नम्रपणे म्हणत.
          एवढे विविध विषयांवरील ज्ञान एकवटले असलेल्या जनाबाई कधी जात्यावरच्या ओव्याही रचत असत. “दळीता कांडिता l तुज गाईन अनंतll” असे त्यांच्या मुखातून सहज येत असे. जात्याचे आणि त्यातून दळून बाहेर पडणाऱ्या पीठाचे रूपक योजून त्या “प्रपंच दळण दळीले पीठ भरिले l सत्त्वाचे आधण ठेविले पुण्य वैरिले l पाप ते उतू गेले l” असे गात असत. तर घरातील लहान मुल रडत असताना त्याला कडेवर घेऊन मायेने “माझे अचडे बचडे l छकुडे गे राधेचे रुपडे l” असे लाड करीत जोजवत असत. अशुद्ध भाषेत बोबडे बोल बोलणारी, आई, वडिलांविना पोरकी झालेली, नामयाची दासी जनी, ते कथाकीर्तन करून तत्कालिन पुरुष संतांमध्ये आपला वेगळा ठसा उमटवलेली ‘संत जनाबाई’ हा प्रवास कोणालाही अचंबित करणारा असाच आहे. नामदेवांच्या घरी काम करणारी एक मोलकरीण विठोबाची लाडकी सखी झाली. नामदेवांच्या सहवासात, विठुरायाच्या कृपेने तिला दिव्य ज्ञान प्राप्त झाले. आज जनाबाईंचे सुमारे साडे तीनशे अभंग उपलब्ध आहेत. याशिवाय थालीपाक आख्यान, कृष्णजन्म, बालक्रीडा, काला, अशी अनेक आख्यान काव्यांची निर्मितीही त्यांनी केली. पाळणा, नवलकाव्य, कूट, विविध संतांच्या आयुष्यातील प्रसंग, दशावतार, असे विविध विषय त्यांनी काव्यातून हाताळले. असे असले तरीही अन्य संतांपेक्षा जनाबाईंचे साहित्य अत्यल्प उपलब्ध आहे. परंतु, त्यांच्या प्रत्येक रचनेतून त्यांची आध्यात्मिक, वैचारिक बैठक, प्रगल्भ प्रतिभा सतत जाणवते. नामदेवांच्या चरित्रातून आपणास जनाबाईंची ओळख होते. त्यांच्या अभंगादी काव्यांमधून त्यांचे अंतरंग उलगडत जाते. त्यांचे स्वतंत्र चरित्र सांगणारे साहित्य अत्यल्प आहे; हे दुर्दैवच मानावे लागेल. तरीही त्यांच्या अभंगाच्या वेलीवरील फुले टिपत, त्यातील मंद मंद गंध आणि मधुकणांची मेजवानी आपल्याला चाखता यावी यासाठी हा केलेली ही धडपड..!

-      वैदेही सच्चिदानंद शेवडे.