महावस्त्र
सियाच्या मैत्रिणीच आज लग्न
होतं. सगळे मित्र मैत्रिणी बऱ्याच वर्षांनी एकत्र भेटले. खूप मजा मस्ती धम्माल
केली. गप्पांच्या रंगलेल्या मैफिलीमुळे सियाचं घड्याळाकडे लक्ष राहिलं नाही.
रात्रीचे ९ वाजून गेले होते. भायखळ्याहून ठाण्याला आणि तिथून घरी पोहोचण्यासाठी
आता खूपच उशीर झाला आहे हे तिच्या लक्षात आले. तरीही सगळ्यांचा निरोप घेऊन बाहेर येण्यामध्ये
अर्धा तास गेलाच. सोबत एक मैत्रीण ठाण्यापर्यंत असणार होती म्हणून सिया तशी
निश्चिंत होती पण ऐनवेळी तिच्या मैत्रिणीने तिथून जवळच राहणाऱ्या तिच्या नातलगांकडे
राहायला जाण्याचे ठरविले. त्यामुळे आता सियाला एकटीलाच प्रवास करावा लागणार होता. कामानिमित्त
उशिरापर्यंत घराबाहेर राहणं हे तिलाच काय पण शहरात राहणाऱ्या महिलांसाठी नवीन
गोष्ट नाही. पण आज का कुणास ठाऊक सियाला काहीतरी विचित्र वाटत होतं.
लांब केस, नाजूक बांधा,
केवड्याच्या वर्णाची काया असलेली सिया आज लाल साडीमध्ये अजूनच सुंदर दिसत होती.
घराबाहेर पडताना तिच्या आजीने कौतुकाने तिच्या चेहऱ्यावरून बोटं फिरवली आणि कडाकड
आपल्या डोक्यावर मोडली. तरीसुद्धा काजळाचं एक बोट सियाच्या कानामागे लावूनच आजीने
तिला घराबाहेर पडू दिलं. लग्नाच्या हॉलमधून निघताना सियाने आपले लांब केस घट्ट वर
बांधले. गळ्यातला हार काढून रोजच्या वापरातली बारीकशी साखळी घातली. हातातल्या बाकी
बांगड्या काढून एकच जाड पण खोटा कंगण ठेवला आणि मगच ती घराच्या दिशेने निघाली.
या वर्षी थंडी जरा जास्तच
आहे. सियाचा हा अतिशय आवडता ऋतू. आई ओरडल्याशिवाय पोरगी अगदी नागपुरातही डिसेंबरमध्ये
शाल, स्वेटरशिवायच फिरायची. पण आज मात्र तिला चक्क मुंबईमध्ये गारवा जाणवत होता.
अंगात जराशी कणकण जाणवत होती. ट्रेनमध्ये खिडकीजवळ बसल्यावर गार वारा तिच्याशी
अजूनच लगट करू लागला. तिच्या आईने साडीवर शोभून दिसेल अशी शाल तिच्यासोबत हट्टाने
पाठविली होती. ती पिशवीतून घेण्यासाठी सियाने तिच्याजवळच्या सामानाकडे नजर टाकली.
पर्स, रिटर्न गिफ्टची पिशवी तिला दिसली. पण, शाल कुठे राहिली? तिने गिफ्टच्या
पिशवीत पुन्हा एकदा पहिले. सिया शाल कुठेतरी विसरली होती. तिने साडीचा पदर दुसऱ्या
खांद्यावरून ओढून घेतला. पण तिच्या डिझायनर, झिरझिरीत साडीतून वार सहज आत शिरत
होता. कशीबशी अंग आक्रसून सिया बसली. थोड्यावेळाने तिला कसलीशी ऊब जाणवली. तिने डोळे
किलकिले केले. “थंड लाग राही है ना! गरम कपडा रखनेका अपनेसाथ|” एक अनोळखी स्त्री
प्रेमाने तिच्या अंगावर शाल पांघरत म्हणाली. “नही.. नही.. मै ठीक हू!” सिया
ग्लानीतच बोलत होती. “ठीक क्या? चेहरा देख अपना|” असं म्हणत त्या अनोळखी स्त्रीने
तिच्या कपाळाला हात लावला. “तुझे तो बुखार है| गोली दु क्या बुखारवाली? कहा जा रही
है तू? अकेली है क्या? बिमार है तो घर कैसे जायेगी?” एकापाठोपाठ एक एवढे प्रश्न
ऐकून सिया पूर्ण जागी झाली. “मै जाऊंगी अकेले.. नजदीक है घर मेरा|” असं खोटच सांगून
सिया तिला शाल परत करू लागली. “रख अपनेपास.. मैने देखा है तुझे थाना स्टेशनपे..|
अच्छी दिखती है, तो ध्यानमे है चेहरा तेरा| मैभी वही उतरनेवाली हू| उतरनेके बाद
दे| चलेगा मुझे|”
सिया आभार म्हणून कसंनुस
हसली. ही कोण कुठची बाई? आपल्याला स्टेशनवर पाहिलंय म्हणते आहे! विचित्रच भाषेत
बोलते आहे! पण किती मायेने शाल पांघरली तिने! ताप चढत असल्याने सिया विचार करता
करता पुन्हा ग्लानीत गेली. थोड्या वेळाने त्या स्त्रीने तिला हलवले. ठाणे स्टेशन आले
हे तिला नजरेनेच सांगितले. सिया उठली. त्या स्त्रीच्या तोंडात पान असल्याचे तिने पाहिले.
ट्रेन तशी रिकामी होती. तरीही आता ती स्त्री सियाच्या जवळून उठली आणि लांबच्या दारात
जाऊन उभी राहिली. गाडी थांबली. दोघी उतरल्या. ती स्त्री सियाकडे लक्ष न देता पटापट
पावल उचलीत चालू लागली. आत्तापर्यंत एवढ बोलणारी ही आता अशी का वागते आहे? सिया
गोंधळली. “जाऊ दे! आपल्याला काय!” असं विचार करून आपल्या दिशेने चालू लागली.
तेवढ्यात त्या स्त्रिची शाल आपल्याकडेच राहिल्याचं तिच्या लक्षात आलं. सिया मागे
वळली. त्या स्त्रीला “दीदी..दीदी..” म्हणून हाक मारू लागली. पण तापामुळे आवाज
फारसा निघत नव्हता.. ती कशीबशी त्या स्त्रीच्या मागे मागे जाऊ लागली. स्कायवॉकपाशी
ती स्त्री घुटमळली. तिच्या मागे झपाझप पावलं टाकून जाताना सियाच घामट निघालं होतं.
ती स्त्री आपल्याकडे पाहते आहे असं वाटून सिया तिला हातवारे करून बोलावू लागली. ते
पाहून ती स्त्री मुद्दाम पाठमोरी उभी राहिली आणि मोबाईलवर बोलू लागली. सिया थकली
होती. तिला दम लागला होता. ती जरा वेळ धापा टाकत तिथेच उभी राहिली. एवढ्यात तिच्या
खांद्यावर कुणाचातरी हात आला. तिने मागे वळून पहिले. एक जाडा, बुटकासा माणूस उभा
होता. त्याच्या जवळपास सर्व बोटांत सोन्याच्या अंगठ्या होत्या आणि गळ्यातही सोन्याच्या
जाडजूड साखळ्या.. तिला पाहून तो विचित्रपद्धतीने
“खिस्स..” असं आवाज करत आणि आपले घाणेरडे दात दाखवत हसला. सोबत एक उग्र दर्प..
बहुतेक दारूचा.. सियाला किळस आली. तो सियाच्या अजून जवळ येणार एवढ्यात सियाला मागून
धक्का बसला. त्या स्त्रीने पुढे येत त्या विचित्र माणसाचा हात पकडला. सियाला काहीच
समजत नव्हते. एवढ्यात एका रिक्षेचा हॉर्न वाजला. “किधर जाना है?” असं रिक्षेवाला
ओरडून विचारू लागला. हा तर राजू भैयाचा आवाज.. आपली भाची यांच्याच रिक्षेतून जाते.
परिचित आवाजामुळे सियाला हायसे वाटले. “हम इधरीच है| इसको पुछ|” असं बोलून ती
स्त्री त्या विचित्र माणसाला आपल्या जवळ ओढू लागली. तरीही त्या माणसाची नजर सियावर खिळून होती. हे काहीतरी विचित्र आहे
असं लक्षात येऊन सिया रिक्षेत बसली. “क्या ताई? तुम इधर?” राजू भैय्याचा लगेच सवाल..
मग सियाने सर्व कथा कशीबशी त्याला सांगितली. “अच्छा है आप यहा थे|” सिया म्हणाली.
“मेरेको शीला दीदी का फोन आया, तो में इधर चला आया| लेकीन वो वही रुकी और आपके तरफ
इशारा करके आपको पुछनेको कहा|” राजू भैय्या पटकन म्हणाला. पण नंतर “कोण शीला दीदी?,
तिने का बोलावलं?” असं खोदून खोदून विचारल्यावरही राजू भैय्या उत्तर देईना. ताप
चढत होता त्यामुळे सियाला जास्त बोलताही येत नव्हतं. ती घरी आली आणि तिला लगेच झोप
लागली.
दुसऱ्या दिवशी उठल्यावर,
कणकण गेल्यावर तिला कालच्या गोष्टींचा अर्थ उमगू लागला. एका विचित्र घटनेमधून
आपल्याला त्या कोणा अनोळखी ‘शीला दीदीने’ वाचवले, म्हणून तिने देवाचे आभार मानले.
तिची शाल स्वच्छ धुवून काढली. राजू भैयाला ती परत करायला सांगितली तर “दीदी काम जो
करती है वो मजबुरी है| पर दिलकी अच्छी है| आपने उसकी चीज लोटादी तो उसे बुरा
लगेगा|” असं म्हणून त्याने शाल घेण्यास नकार दिला. सिया ऑफिसला जाताना ठाणे स्टेशनवरून
जात असे. शीला दीदीने तिला तिथे पहिले होते, असं दीदी म्हणाल्याचे तिच्या लक्षात
आले. मग ऑफिसला जाताना सिया रोज ती शाल आपल्या सोबत ठेऊ लागली. कधीतरी शीला दीदीला
ती देऊन आभार मानावे असं तिच्या मनात होतं. पण शीला दीदी काही सियाला दिसली नाही.
काही दिवसांनी ऑफिसमध्ये काम
करत असताना सियाचे बॉस तिच्या केबिनमध्ये एका जोडप्याला घेऊन आले. अचानक सगळे
आपल्या केबिनमध्ये आले म्हणून सिया गडबडीत उठली.. त्यामुळे डेस्कवरील काही सामानही
खाली पडले. “सिया, बस.. बस.. हे कांताशेठ. आपले खूप जुने कस्टमर. नेहमी
आपल्याकडूनच सर्व परिवारासोबत ट्रीपला जातात. आत्तासुद्धा आपली पत्नी, तीन मुले
आणि आई, वडील यांच्यासोबत त्यांना ट्रीप करायची आहे. मला जरा वेळ नाही आहे. तू
सांभाळ.” असं म्हणून बॉस निघून गेले. सियाने नेहमीप्रमाणे स्मित हास्य करत त्यांना
कुठे जायला आवडेल हे पाहण्यासाठी नेहमीसारख्या गप्पा सुरु केल्या. शेठ्जींची बायको
त्यांच्यापेक्षा फारच लहान वाटत होती आणि तिने अंगावर भरजरी कपडे आणि ठसठशीत
दागिने घातले होते. त्यामुळे सियाचे लक्ष तिच्याचकडे होते. “ये ना बडे वो है| तो माँ
बापुजीको मंदिर वगेरा होना.. और इनको अच्छा सिनरी होना..|” असं ती लाजत लाजत
म्हणाली. यावर कांताशेठ हसले. “खिस्स..” त्या आवाजामुळे सियाने पटकन त्यांच्याकडे
पहिले. बायकोने केलेल्या कौतुकाने खुश होऊन कांताशेठ आपल्या दाही बोटातल्या
अंगठ्यांनी काचेवर ताल धरून आपले घाणेरडे दात दाखवत हसत होते. अंधारातला तो किळसवाणा
चेहरा या कांताशेठचाच होता हे तिच्या लक्षात आले. तरीही चेहऱ्यावर तसे काही भाव न
आणत तिने त्यांना हवी तशी एक टूर करून दिली. ते दोघे आनंदात तिथून निघाले. जाता
जाता “थेंकू हा|” असं म्हणत कांताशेठ तसेच हसले तेव्हा सियाच्या अंगावर पुन्हा
एकदा सरसरून काटा आला. ती त्याच विचारात खाली वाकली आणि डेस्कवर पुन्हा समान ठेऊ
लागली. तिच्यासमोर आत्ता तो किळसवाणा माणूस बसला होता. त्याला बायको आहे, मुलं
आहेत, आई वडिलांनाही सोबत घेऊन, त्यांची मर्जी राखत हा माणूस एकीकडे वागतो आणि
दुसरीकडे रात्री.. शीsss.. विचार करावा तेवढी किळस सियाला वाटू लागली. डेस्कवरून पडलेले
पेन घेण्यासाठी कांताशेठ बसला होता त्या खुर्चीपाशी ती आली. तिथेच खाली शीला दीदीची
शालही मागाशी गडबडीत उठण्याच्या नादात पडल्याचे तिला दिसले. तिने शाल उचलंली.
सियाने धुवून स्वच्छ केलेल्या त्या शालीवर आत्ताही कांताशेठच्या घाणेरड्या चपलांचे
ठसे उमटले होते...!!
© वैदेही शेवडे.
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाअशा कितीतरी दुर्दैवी शीला दीदी आणि निर्लज्ज कांताशेठ असतील नाही ��
उत्तर द्याहटवाकथा सुंदर लिहिल्येस :)
सियाच्या मनाशी माझं मन एकात्म केलत.. एकदम उत्तम लेखन
उत्तर द्याहटवाखुप सुरेख मांडणी केली आहेत आपण . . .सुशिक्षित काही डोळ्यासमोर उभे राहिले. एका स्त्रीला जे प्रसंग रोजच्या जिवनात अनुभवायला येतात त्याचे वर्णन छान केले आहे. अजून अशाच ब्लॉग ची अपेक्षा ठेवतो
उत्तर द्याहटवाखूप सुंदर लिहितेस तू... एक मात्र नक्की, तुझ्या लेखानी अनेकांचे डोळे उघडणार आहेत आणि ज्यांचे डोळे उघडे आहेत ते अजून तीक्ष्ण होणार आहेत... अशीच लिहिती रहा... ट्याग केल्याबद्दल धन्यवाद... जियो... :) :) :)
उत्तर द्याहटवाकमाल लेखन ..!!वाचताना घटना आपल्या समोर घडत आहेत असे वाटते ..मस्त..!!
उत्तर द्याहटवाअप्रतिम सुंदर. मस्त लिहितेस वैदू.
उत्तर द्याहटवाchhaan.....
उत्तर द्याहटवाchan lihile aahes
उत्तर द्याहटवामस्त. अगदी मोजक्याच शब्दात मोठा परिणाम साधलाय . शेवट काय असेल याची उत्सुकता लागून रहाते. पण या फिक्शनच्या नादात तुझे नेहमीचे " सिध्दहस्त" लिखाणाला विसरू नकोस. ते जास्त भावते.
उत्तर द्याहटवाखूपच झकास जमली आहे लघु कथा वैदुताई .
उत्तर द्याहटवाअचूक प्रसंगवर्णना मुळे तेडोळ्यासमोर उभे करतेस तु. तपशीलही उत्तम भरले गेले आहेत . पण राहून राहून सारखी तुझी "सुख ? ? " आठवत होती . सुख अर्वार्थाने परिपूर्ण वाटली. रागावू नकोस पण ही कथा तेव्हढी polished नाही उतरली . अर्थात हे माझ व्यक्तिगत मत झाल . कथा खूप आवडली पण चांगल्याची तुलना नेहमीच सर्वोत्तामाशी होते त्याला मी तरी काय करॊ.! शुभेच्छा. लिहिती रहा.
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाChaan, sope shabda, sahaj mandani tarihi utkanthavardhak...
उत्तर द्याहटवाअप्रतिम सुंदर.........
उत्तर द्याहटवा