गुलमोहोर
"बाबा,
या शेंगा बघा ना गुलमोहोराच्या! कशा पसरट आणि लांब आहेत. तुम्ही
त्या गोष्टी सांगता त्यातल्या तलवारीसारख्या... की दांडपट्टयासारख्या!"
रविवारच्या निवांत दुपारी मी
गॅलरीमध्ये असाच शून्यात नजर लावून उभा होतो. तोच आमच्या ५ वर्षांच्या तेजूने
माझ्या पँटला पकडून मला हलविले. "बाबा, दोन
शेंगा द्या ना खेळायला. हात लांब केलात की आल्याच हातात." आत्ता आत्तापर्यंत
अम्, मम्, ब्बा, असे
काहीसे आवाज काढणारी, माझा हात पकडून चालायला शिकणारी माझी
बाहुली किती सहज आता केवढं काही सांगू शकते! मी आनंदाश्चर्याने तिच्याकडे पाहतंच
राहिलो. तोच तिने पुन्हा मला हाक मारली. तिच्या हातात गुलमोहोराच्या शेंगा देऊन
तिचा पापा घेतला. बाईसाहेब लगबगीने, खेळण्याच्या नादात आत पळून गेल्या. अगदीच
तान्ही असल्यापासून तेजूचं हे लाडकं झाड असावं. तिच्या टप्पोऱ्या डोळ्यांनी ती
गुलमोहोराची लाल भडक फुलं पाहून उत्साहाने हुंकार भरत असे.
परवाच माझे आई बाबा इथे आले होते. आई
सांगत होती, "तेजू अगदी तुझ्यावर गेली आहे हं!
गुलमोहोराच्या फुलांचा सडा आपल्या दारात पडतो ना; तो पाहून 'लाल गालिचा', 'रेड कार्पेट', असं
म्हणून चिमणी थुई थुई नाचली त्यावर. तुपण असाच नाचायचास गुलमोहोरांच्या
फुलांवर."
खरंच! गुलमोहोराचा तो रंग, फुलं, ते झाड, सगळंच माझ्या मनाच्या अगदी जवळचं. लहानपणी मीदेखील तलवार तलवार खेळत असे त्या शेंगांसोबत. आमच्या जुन्या घरासमोरही असंच एक मोठं गुलमोहोराचं झाड आहे. तिथे मी तासंतास रेडिओवरील गाणी ऐकत, अभ्यास करत तर कधी नुसताच त्या सावलीत चटई अंथरून लोळत असे. गुलमोहोराच्या फुलांचा तो नाजूक, मऊ स्पर्श मला आजही आवडतो. त्या आवडीचे संदर्भ मात्र वयानुसार बदलत गेले. लहानपणी खेळाचे सोबती असलेली ही फुले नंतर तिची आठवण करून देणारी झाली.
खरंच! गुलमोहोराचा तो रंग, फुलं, ते झाड, सगळंच माझ्या मनाच्या अगदी जवळचं. लहानपणी मीदेखील तलवार तलवार खेळत असे त्या शेंगांसोबत. आमच्या जुन्या घरासमोरही असंच एक मोठं गुलमोहोराचं झाड आहे. तिथे मी तासंतास रेडिओवरील गाणी ऐकत, अभ्यास करत तर कधी नुसताच त्या सावलीत चटई अंथरून लोळत असे. गुलमोहोराच्या फुलांचा तो नाजूक, मऊ स्पर्श मला आजही आवडतो. त्या आवडीचे संदर्भ मात्र वयानुसार बदलत गेले. लहानपणी खेळाचे सोबती असलेली ही फुले नंतर तिची आठवण करून देणारी झाली.
ती म्हणजे रमा; माझी बालमैत्रीण. पण
महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षांमध्ये तिच्याबद्दल काहीतरी वेगळीच ओढ मला जाणवू
लागली होती. एक दिवस आमच्या घरी रमा काही कामासाठी येऊन गेली. ती गेली पण इथे माझं
मन बेचैन होतं. तिचा तो लाल रंगाचा पंजाबी सूट... अगदी तसाच लाल रंग या फुलांचा
आहे. अंगणात चटईवर लोळत गुलमोहोराचं फुल हातात नाचवत मी पुन्हा पुन्हा रमाची आठवण
काढत होतो. किंबहुना ती आपसूक येतंच होती... सतत... तिचं मनमोकळं हास्य,
तिचा निर्मळ पण स्पष्ट स्वभाव, तिचा आजचा
ड्रेस, तिचे तसेच लाल ओठ, गाल...
बेचैनी वाढत होती. खिशातून पेन काढलं आणि त्याच गुलमोहोराच्या एका पाकळीवर मी आमची
नाव एका बदामात लिहिली. घरी गेलो एक पुस्तक घेतलं आणि त्यात ती पाकळी ठेऊन दिली.
नंतर कितीतरी दिवस गेले. ती पाकळी तिला देण्याचंच काय; मी तर
त्या पाकळीबद्दल अगदी विसरलो होतो. महाविद्यालयात ते पुस्तक माझ्यासोबत असायचं पण
मी इतक्यात ते उघडलंही नव्हतं. रमेने ते माझ्याकडून वाचायला घेतलं आणि माझ्यासमोरच
उघडलं. नेमकी त्याचं पानात दडवून ठेवलेली ती पाकळी तिला दिसली. तिने ती हातात
घेतली. किंचितशी लाजली. "किती दिवस अजून अशीच ही पाकळी पुस्तकात सुकवणार
होतास? बरंय, जिच्यासाठी आहे तिच्याकडे
स्वतःच आली ती. मलाही बरेच दिवस तुला हे सांगायचं होतं. पण, असं
काही सुचलं नसतं रे मला. खूप सुंदर आहे हे. मी जपून ठेवेन." माझ्या मनातला
आनंद ओळखून तो गुलमोहोरही भेभान होऊन वाऱ्यावर सळसळत होता. मग आमच्या भेटीगाठी
वाढत गेल्या. गुलमोहोर मोहोरत गेला.
महाविद्यालायचं
शेवटचं वर्ष सरलं. सुट्टयांमध्ये आम्ही आमच्या नेहमीच्या बागेत भेटत असू. तेही
गुलमोहोराच्या झाडाखालीच. त्यानेच अंथरलेल्या गालिच्यावर हातात हात घालून आम्ही
गप्पा मारत असू. आता पुढचं शिक्षण किंवा नोकरी यामुळे आम्हाला रोज भेटता येणार
नाही म्हणून मी काहीसा विचारात होतो. दुराव्याच्या विचाराने तिचा आत्ताचा सहवास,
स्पर्श, अधिक हवाहवासा वाटत होता. त्याच
विचारात मी तिचा हात घट्ट पकडला आणि जवळ ओढला. साहजिकच ती जराशी जवळ आली. तिचा
नेहमीचाच स्पर्श आज मात्र मला भलतीच मोहिनी घालत होता. मी तिला आणि जवळ घेतले आणि
तिचे चुंबन घेण्यासाठी पुढे झालो. तोच तिने माझ्या हाताला जोरदार हिसडा दिला. मला काही
समजलेच नाही! मी पुन्हा पुढे आलो. पुन्हा एकदा धक्का मारून माझ्याकडे अत्यंत रागीट
कटाक्ष तिने टाकला. काय होतंय या भानावर मी अजून पुरता आलोच नव्हतो. पण
गुलमोहोराचा रंग आता तिच्या डोळ्यात उतरला होता. चेहराही तसाच लालेलाल! "हात
पकडणं वगैरे ठिक. पण लग्न नाही झालं अजून आपलं. असल्या गोष्टी मला चालणार नाहीत,
सांगून ठेवते." ती उठली आणि निघून गेली. मी पार शरमिंदा झालो.
अचानक गुलमोहोर भकास वाटू लागला.
तिच्या एका वाक्याने मी आजवर सर्व
स्त्रियांशी अधिक आदबीने वागतो. कदाचित पौगंडावस्थेतील मुलामुलींवर, त्यांच्या
मानसिक, शारीरिक बदल आणि वागणुकीवर अभ्यास करून आता देशोविदेशी कार्यशाळा,
चर्चासत्र, घेणारा मी... डॉ शैलेश मुजुमदार त्या एका झटक्यामुळे कुठेतरी घडला, असं
म्हणायला हरकत नाही. एक झटका... माझा गुलमोहोर मला भानावर आणून तिथून निघून गेला.
"मेरी
झाँसी में नही दूँगी।" तेजूच्या आवाजाने मी आठवणींमधून बाहेर आलो. आमचं
कन्यारत्न तिच्या आईची लाल ओढणी साडीसारखी गुंडाळून, हातात
तलवार म्हणून शेंग घेऊन उभी होती. इवल्याशा वयातही झांशीच्या भूमिकेत रमलेल्या
तिच्या चेहऱ्यावर करारी आणि ठाम भव होते! अगदी तसेच.... रमेच्या चेहऱ्यासारखे! उन्हात
बराच वेळ उभी असल्याने तिचे गोबरे गाल लाल दिसत होते... रमेसारखेच!!! नाही...
गुलमोहोराच्या पाकळ्यांसारखे!
इतक्यात बायको माझ्यासाठी चहा घेऊन
आली. मी बशीत चहा ओतला आणि तिला दिला. लग्नाआधी आम्ही असेच चहा पित असू. तिलाही ते
आठवले आणि तिलाही तेच आठवले. ती किंचित लाजून हसली. तोच रंग पुन्हा खुलला होता. मी माझ्या
गुलमोहोरांच्या दोन फुलांकडे पाहत होतो. रमा आणि तेजू... आणि आमच्या पाठीशी माझा
सवंगडी... तो टवटवीत गुलमोहोर!
-
© वैदेही सच्चिदानंद शुभांगी शेवडे.
सुंदर लिखाण
उत्तर द्याहटवा