सोमवार, १७ एप्रिल, २०१७

अन्नपूर्णा
            
          गोविंदवाडीमध्ये काहीतरी जादूच होती. लाखमोलाची माणसं ती! सण, उत्सव असो किंवा ओळखीच्याच काय तर कोणाही अनोळख्याला मदत करायची असो, सर्व अगदी एका कुटुंबाप्रमाणे एकत्र येत असंत. एकमेकांच्या सुखदुःखात असे काही एकाच रंगात रंगत असंत की कोणालाही त्यांचा हेव वाटावा! नाही म्हणायला काही खोचक भोचक मंडळी इथेही होती. पण, त्यांनाही सर्व आपलेपणाने वागवायची. इथे कोणाचंही पोरं, कोणाच्याही घरी खेळायला, जेवायला, अभ्यासाला, अगदी राहायलाही असायची. वाडीतील सुरकुतलेले हात कधी त्यांना गरमागरम खमंग थालीपीठ भरवत असंत तर कधी खरपूस रट्टेही देत होते. बरं यातही भेदभाव नाही! नाईकांच्या पिंट्याचा, सोमणांच्या राजूचा आणि आपल्या कार्ट्याचा अभ्यास घेताना जोशी काकू मनसोक्त कणिक तिंबून समाचार घेत असंत पण तिघांच्याही निकालाच्या दिवशी त्याच गोडधोड करत होत्या.
          वाडीमध्ये स्वामी समर्थांचं एक मंदिर होतं. केवळ वाडी नाही तर ठिकठिकाणाहून भाविक तिथे दर्शनासाठी येत असंत. स्वामींच्या प्रकट दिनाचा सोहोळा तर काय वर्णावा! आधीच उत्साही वाडी त्या दिवशी अधिकच गजबजून जात असे. पालखी काय, रोषणाई काय, विविध सांस्कृतिक कार्यक्रम अगदी सप्ताहभर चालत असंत. प्रत्येकजण आपल्यावर सोपवलेली जबाबदारी अत्यंत भक्तिभावानं पार पाडत असतानाच दुसऱ्याच्या कामात मदत करत असे. दर वर्षी प्रत्येक कुटुंबावर वेगवेगळी जबाबदारी असे. पण, स्वामींच्या नैवेद्याची जबादारी मात्र गोखले आजींकडेच होती. दोन तीन वर्ष ही जबाबदारीदेखील अन्य कुटुंबांकडे देऊन बघितली होती म्हणे. पण, दरवेळेस काही न काही असे घडत असे की गोखले आजींचा हात त्या नैवेद्याला लागल्यावरच तो पूर्ण होत असे. मग, उत्सवाचे दिवस सोडल्यास बाकी दिवसांमध्ये दररोज एकेक कुटुंब स्वामींसाठी नैवेद्याचं ताट मोठ्या प्रेमानं आणि सेवा भावानं  मंदिरात नेत असे. पण, आजींच्या हातचा नैवेद्य खाऊन स्वामींच्या चेहऱ्यावर जे तेज आणि आनंद दिसत असे तो इतर वेळेस दिसत नाही, असं सर्व म्हणायचे. स्वामींची अन्नपूर्णाच ती जणू!
          मला तर स्वामींचा मोठा धाक वाटत असे. बाकी सर्व देव स्मित करत असताना, स्वामी मात्र आपल्याकडे गंभीर मुद्रेने का बघत आहेत? आपण काही चुकलो का? आपण काय केलं की स्वामी आपल्याकडेही हसून बघतील? एकदा तरी असं दिवस येईल का? असे अनेक प्रश्न मनामध्ये रोज धिंगाणा घालत असंत. आईच्या ते लक्षात आलं होतं. मला अभ्यासाच्या, जेवणाच्या वेळेसही धाक दाखवताना आई नेहमी म्हणायची, “जो चांगला अभ्यास करतो, ताटातील पदार्थ संपवतो, त्याच्याकडे स्वामी हसून बघतात. नाहीतर चिडतात!” मग मी काही नं बोलता पानात वाढलेली नावडती भाजी किंवा गणिताचा अभ्यास संपवत असे. रोज स्वामींना कोमल मुद्रेने पाहण्याची प्रार्थना करत असे.
          तर, गुण्यागोविंदाने नांदणारी अशी आमची गोविंदवाडी...! पण, त्या वर्षी मात्र कोणालाच स्वामींचा प्रकट उत्सव अगदी ३ दिवसांवर आला तरीही काहीच करावे वाटत नव्हते. ठिकठिकाणाहून आलेले भाविक नेहमीच गजबजलेल्या आमच्या वाडीतील त्या खास दिवसांमध्ये असलेली भयाण शांतता पाहून नवल करत होते. वाडीतील जो माणूस दिसेल त्यांना आपलेपणाने याबद्दल विचारत होते आणि सत्य जाणून घेतल्यावर हळहळत होते. स्वामींची अन्नपूर्णाच स्वामींनी स्वतःकडे बोलावून घेतली होती. आता उत्सव कसा करावा? सर्वांसमोर मोठा प्रश्न होता.
          गोखले आप्पा... म्हणजे गोखले आजींचे पती... अगदी कडक शिस्तीचे. वाडीत कोणालाही काही प्रश्न पडला, संकट आलं तर पहिले त्यांना आप्पा आठवत असंत. आप्पा स्वतःदेखील अत्यंत संघर्षमय आयुष्य, अनंत अडचणी यांना तोंड देत खंबीर उभे होते. आजींच्या चेहऱ्यावर याचा सार्थ अभिमान नेहमी दिसत असे. त्यांच्या आयुष्यातील असे कठीण क्षण मोकळेपणाने सांगताना, पतीवरील प्रेम आणि अभिमानानं त्यांची प्रभा झळाळून निघे. अगदी तसेच तेज, तसेच समाधान स्वामींच्या चेहऱ्यावर आजींच्या हातचा नैवेद्य चाखून दिसते असं सर्व म्हणत असंत.
          डोंगरासारखे आप्पा,आजी गेल्यावर काडी मोडावे तसे आतून पुरते कोसळले. आयुष्यात नेहमी कडवट, कठोर अनुभव आणि त्यावर एकट्याने दिलेला लढा, यामुळे आप्पा थोडे जास्तच स्वाभिमानी होते. टोकाचे नास्तिक नसले तरीही फारसे भाविकही नव्हते. त्यांना मंदिरात कधी कोणी पाहिले नाही पण, आजींच्या भक्तिला कधी त्यांनी आडकाठीही केली नाही. कोणताही भाव कधीच ते चेहऱ्यावर दाखवून देत नसत. आजी गेल्यावरही त्यांनी खूप प्रयत्न करून डोळे वाहू दिले नाहीत. पण, सतत पाणावत असलेले डोळे ते किती वेळ झाकणार होते! आजींना मुखाग्नी देताना मात्र त्यांनी आभाळाकडे पाहून, “का केलेस रे हे असे?” असं देवाला विचारलं असेल का? जमेल तेवढं बाहेरून शांत राहू पाहणाऱ्या आप्पांचे डोळे दिवस दिवस भकास दिसत होते. रोज सकाळी फेरी मारताना टवटवीत दिसणारे आप्पा आता सुजलेल्या डोळ्यांनी, म्लान चेहऱ्यानं, फिरत होते.
          अशातच २ महिने गेले आणि उत्सवाचे दिवस असे भयाण शांततेत जात होते. देवा घरून हाक वाडीत अनेक घरांमध्ये आधीही आली आली होती. काही दिवसांच्या दुखवट्या नंतर सर्व सुरळीत होत असे. पण, आजींच्या जाण्याने मात्र पूर्ण वाडी सुन्न झाली होती. आता प्रकट दिन तोंडावर आल्यावर मात्र वाडीतील कुजबुज वाढू लागली. सर्वांसमोर एकंच प्रश्न होतं. “आता करायचं काय?” पण, आप्पा समोर आले की हा विषय बदलला जात असे.
          अवघ्या २ दिवसांवर आता उत्सव आला. त्या रात्री चर्चा चालू होती. अचानक आप्पा तिथे आले. “उद्या सर्वांनी नैवेद्य, भंडारा, बाकी उत्सवाची तयारी करण्यासाठी जे समान लागेल ते घेऊन यायचं. या पोरांना पाठवा आत्ताच वर्गणीसाठी.” कधीही मंदिरात न दिसलेला माणूस हे काय सांगतोय! सर्व अचंबित झाले. “उठणार का आता?” आप्पांच्या आवाजाने विचारांमधून बाहेर पडत सर्व उत्सवाच्या तयारीसाठी पांगले. पण, आप्पांच्या आवाजातला कंप, थकवा सर्वांना जाणवला होता. दुसऱ्या दिवशी सकाळपासून तयारी करून पुन्हा वाडी सजवण्यात आली. बऱ्याच दिवसांनी वाडीत चेतना जाणवत होती. पण, खरा प्रश्न तसाच उभा होता... आजींशिवाय नैवेद्य पूर्ण होणार कसा???
                    तरीही पहाटेपासून सर्व बायका नैवेद्याच्या तयारीला लागल्या. मंदिराच्या मागच्या भागातील मोकळ्या जागेत स्वयंपाक होत असे. सर्वांना जी शंका होती ती खरी ठरली. एकदा ताजं असून दुध नासलं, मध्येच सांडलवंड झाली. नेहमीचं प्रमाण घेऊनही भजी तेलात विरघळत होती. आतामात्र सर्वांच डोकं सुन्न झालं. काय करावं कळे ना झालं! वाडीभर हे सर्व पसरायला वेळ नाही लागला. आप्पांच्याही हे कानावर आलं. आम्हा मुलांचा ते अभ्यास घेत होते. पुस्तक बाजूला ठेऊन आप्पा उठले. कपडे बदलून बाहेर आले आणि एक वही त्यांनी उघडली. “अरे ही तर आजींच्या पाककृतींची वही!” मी लगेच ती ओळखली. वाडीतल्या सर्व आयाबायांची ती वही म्हणजे मदतीला धावून येणारी सखी. सर्व मोजमाप, क्लुप्ती, आजी त्यात लिहून ठेवत. कोणीही काही खास पदार्थ करायचा असेल की ती वही घेऊन जात असे. आप्पांनी नैवेद्याच्या शिऱ्याच पान उघडलं. आजींच्या छायाचित्राकडे पाहून, “हेच हवं आहे ना तुला!” असं काहीसं म्हणाले आणि झपझप बाहेर चालू पडले.
          पुस्तकं, वह्या आवरून आम्ही मुलं खाली आलो. बघतो तर काय! आप्पा एखाद्या सराईत बल्लवाचार्यासारखे उभे राहून शिरा करत होते. सर्वजण अचंबित होऊन ते दृश्य पाहत होते. पाच सहाशे जणांना होईल एवढा शिरा हा हा म्हणता झाला आणि त्यात एकही विघ्न आले नाही. “आता बाकी पदार्थ करा.” आप्पांच्या आवाजाने सर्व भानावर आले. काय चमत्कार! खरंच, सर्व पदार्थ आता बरोबर होऊ लागले. आप्पा संपूर्ण वेळ तिथेच उभे राहून एकेक सूचना, वहीत पाहून देत होते. सर्व स्वयंपाक वेळेत झाला. स्वामींना नैवेद्य दाखवण्यासाठी दामले गुरुजी ताट घेऊन मंदिरात गेले. तेवढ्यात कोणीतरी मोठ्यानं ओरडलं... आम्ही सर्व धावत बाहेर आलो.
          आप्पा जमिनीवर बसले होते... की कोसळले होते? लालबुंद चेहऱ्यावरून अश्रू ओघळत होते. “झालं का ग तुला हवं ते? तुझा नैवेद्याचा नेम नाही मोडला मी.” आम्ही सर्व अवाक्! “आता जे आहे ते गोड मानून घे रे बा, देवा!” आप्पांनी हात जोडले होते. दामले गुरुजी नैवेद्य दाखवून बाहेर आले. आपल्या जीवाभावाच्या मित्राला त्यांनी उभं केलं. जवळ घेतल. “आत ये. जरा शांत हो.” असं म्हणत त्यांनी आप्पांना आत नेलं. आज पहिल्यांदाच त्यांना कोणी मंदिराच्या आवारात पहिले. “तिच्या आठवणीने जीव पिळवटून निघतोय आणि दुसरीकडे तिचा नेम नाही चुकला, माझ्या हातून सेवा घडली याचं समाधानही आहे!” आप्पा बोलत होते.
          मला त्याचे अश्रू बघवत नव्हते. मी तडक गाभाऱ्यात स्वामींकडे धाव घेतली. “का असे कठोर झालात तुम्ही?” आज जाबच विचारणार होते. पण, आज स्वामी माझ्याकडे प्रसन्न मुद्रेने पहात होते. “आजींच्या हातचा नैवेद्य चाखुन स्वामी प्रसन्न दिसतात असं वाडीतले सर्व म्हणतात ते हेच का?” मला पहिल्यांदाच हे स्वरूप पाहायला मिळालं. आज असं कसं झालं??? मी थोडी अजून जवळ जाऊन स्वामींना निरखून पाहू लागले... आणि उत्तर मिळालं... त्यांच्या ओठांवर काही लागलं होतं... आप्पांनी केलेल्या शिऱ्याचे कण होते ते...!!!

©वैदेही सच्चिदानंद शुभांगी शेवडे.

शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०१६

उशीर
         
            "तू हवं तेव्हा निघ. मी पोहोचेन वेळेतच... नेहमीप्रमाणे. पण, तू आजही उशिरा आलास तर मी थांबणार नाही. आज शेवटची भेटणार होते, तीही तशीच निघून जाईन." रस्त्यात वाट पाहत उभं राहण्याचा तिला अत्यंत तिटकारा. रागाने फणफणतच श्रेया घराबाहेर पडली. "आज काय तो सोक्षमोक्ष लावतेच. वेळ तर नसतोच कधी याला पण आता तर सतत चिडचीड! नेहमी वैतागून बोलतो." अशाच सगळ्या विचारात गढून गेली असल्याने पावसाळ्याचे दिवस असून ती छत्री घ्यायला विसरली. स्टेशन जवळ आलंच होतं एवढ्यात मुसळधार पाऊस सुरु झाला. छत्री विसरल्यामुळे स्वतःवरच वैतागली.
          चार पाच ट्रेन्स समोरून गेल्या, तरीही पावसामुळे तिला हताश होऊन, स्टेशनसमोर रस्त्यातच एका शेडखाली उभं राहावं लागलं होतं. "पाऊस नसता तरीही साहेबांची वाट पाहत असंच ठाणे स्टेशनबाहेर वाट पाहत थांबावं लागलंच असतं." तिची आतल्याआत धुसफूस सुरूच होती. पावसाचा जोर जरा कमी झाल्यावर तिने भराभर रास्ता ओलांडून प्लॅटफॉर्म गाठला. तर पुढची ट्रेन १५ ते २० मिनिटं उशिराने असल्याची घोषणा झाली. घड्याळाचा काटा पुढे जात होता तसा श्रेयाचा रागही वाढत होता. तेवढ्या वेळात दोन वेळेस श्रीकांतचा फोन येऊन गेला. तिने समजूनही दुर्लक्ष केलं. "फोन नाही उचलला की कसं वाटतं बघ आता!" तिने ठरवलं होतं. २० मिनिटांनी एक ट्रेन आली. तोपर्यंत गर्दी जास्त झाली असल्यामुळे श्रेया चढू शकली नाही. “किती वाजले?” तिने मोबाईल पाहिला. श्रीकांतचे ५ मिस कॉल!! "अरे वाह! रोज तर लक्षातही नसतं फोन वगैरे करावा असं. आज बरा वेळ मिळतो आहे!" तिने फोन पुन्हा बॅगेत टाकला. पाऊण तासांनी श्रेया ट्रेनमध्ये चढू शकली. "मी पोहोचलो आहे. ट्रेनचा गोंधळ आहे. सावकाश ये." "कुठे पोहोचलीस?" "मला काळजी वाटत आहे. मेसेज, कॉल पाहूनही उत्तर मुद्दाम देत नसशील तर असं करू नको, प्लिज." हा शेवटचा मेसेज वाचून तिने त्याला कॉल केला. बिचारा खरंच काळजीत होता. त्याच्या आवाजातून श्रेयाला ते लगेच समजलं. तरीही, आपला तोरा सांभाळत, तिने "आता वाट बघ आणि कसं वाटतं सांग!" असं तोंड वाकडं करत उत्तर दिलं. डोंबिवली ठाणे अर्ध्या तासाचं अंतर... पण, आज ट्रेन थांबत थांबत दिड तासाने ठाण्याला पोहोचली. तेवढ्या वेळात पाऊस, मोबाईलवरील गाणी, फोटोज, त्याचे अधूनमधून येणारे कॉल आणि मेसेज यामुळे तिचा राग मावळत होता. बऱ्याच दिवसांनी तो आपली वाट पाहतोय आणि त्याला अजून काळजी आहे, या विचाराने ती सुखावली होती.
          तशी श्रेयाही तापट. याबाबतीत अगदी श्रीकांतपेक्षा चार पावलं पुढेच. हे तिलाही मान्य आहे आणि मनापासून ती बऱ्याच वेळेस शांतपणे बोलायचा प्रयत्न करत असते. पण, आजकाल कामाच्या गडबडीत किंवा श्रेयाचा (अव)गुण लागल्यामुळे श्रीकांतही चिडका झाला आहे. कितीही "सोक्षमोक्ष लावायचा" ठरवलं तरीही दोघांनाही हे शक्य नाही हे माहित होतं. पण, तरीही एकमेकांपासून दूर जाण्याची भितीही होती. श्रेया स्टेशनबाहेर आली. समोरच तिला श्रीकांत दिसला. काळजी, आपण चुकलो असल्याची भावना, सगळं अगदीच स्पष्ट त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. श्रेया थोडी हट्टी आणि लाडोबा असल्यामुळे राग ओसरला असला तरी ती काही एवढ्यात ते दाखवणार नव्हतीच. आपल्याला उशीर झाला पण, श्रीकांत कारणं देतो तसं आपलं अजिबात नाही. ट्रेनमुळे गोंधळ झाला. असा सगळा विचार तिच्या मनात चालू होता. चिडल्यावर, भाव खाताना, एखादा टोमणा ती सहज मारते. अगदी तशाच सवयीप्रमाणे ती सॉरी म्हणतानाही सरळ बोलणार नव्हतीच.
          "सॉरी... मी वेळेतच निघाले होते. पण, ट्रेन आणि पाऊस... काय करणार मी! तुझ्या आधीच पोहोचले असते. पण, बरं झालं... आता कसं वाटतंय मला उशीर झाला म्हणून!" श्रीकांतला तिच्या असं बोलण्याची खोड चांगलीच सवयीची होती. आज तो यावर चिडणार नव्हता. त्याने शांतपणे तिच्याकडे पाहिले. " उशीर झालाच तुला! खरंय! जरा आधी आली असतीस आयुष्यात तर आणखी आनंद मिळाला असता. आता फक्त एक काम कर. उशीर झालाय हे ठिक पण आता कधीच जाऊ नकोस." त्याच्या उत्तराने ती चकित झाली. राग तर ओसरला होताच पण, त्याच्या पाणावलेल्या डोळ्यांनी उरलीसुरली कटुताही वाहून गेली. त्याने दिलेला रेनकोट तिने चढवला आणि बाईकवर बसून त्याला घट्ट मिठी मारून ती दोघं फुर्रर्र निघून गेली.


-      ­ © वैदेही सच्चिदानंद शुभांगी शेवडे

रविवार, १५ मे, २०१६

गुलमोहोर

           "बाबा, या शेंगा बघा ना गुलमोहोराच्या! कशा पसरट आणि लांब आहेत. तुम्ही त्या गोष्टी सांगता त्यातल्या तलवारीसारख्या... की  दांडपट्टयासारख्या!"
          रविवारच्या निवांत दुपारी मी गॅलरीमध्ये असाच शून्यात नजर लावून उभा होतो. तोच आमच्या ५ वर्षांच्या तेजूने माझ्या पँटला पकडून मला हलविले. "बाबा, दोन शेंगा द्या ना खेळायला. हात लांब केलात की आल्याच हातात." आत्ता आत्तापर्यंत अम्, मम्, ब्बा, असे काहीसे आवाज काढणारी, माझा हात पकडून चालायला शिकणारी माझी बाहुली किती सहज आता केवढं काही सांगू शकते! मी आनंदाश्चर्याने तिच्याकडे पाहतंच राहिलो. तोच तिने पुन्हा मला हाक मारली. तिच्या हातात गुलमोहोराच्या शेंगा देऊन तिचा पापा घेतला. बाईसाहेब लगबगीने, खेळण्याच्या नादात आत पळून गेल्या. अगदीच तान्ही असल्यापासून तेजूचं हे लाडकं झाड असावं. तिच्या टप्पोऱ्या डोळ्यांनी ती गुलमोहोराची लाल भडक फुलं पाहून उत्साहाने हुंकार भरत असे.
          परवाच माझे आई बाबा इथे आले होते. आई सांगत होती, "तेजू अगदी तुझ्यावर गेली आहे हं! गुलमोहोराच्या फुलांचा सडा आपल्या दारात पडतो ना; तो पाहून 'लाल गालिचा', 'रेड कार्पेट', असं म्हणून चिमणी थुई थुई नाचली त्यावर. तुपण असाच नाचायचास गुलमोहोरांच्या फुलांवर." 
          खरंच! गुलमोहोराचा तो रंग, फुलं, ते झाड, सगळंच माझ्या मनाच्या अगदी जवळचं. लहानपणी मीदेखील तलवार तलवार खेळत असे त्या शेंगांसोबत. आमच्या जुन्या घरासमोरही असंच एक मोठं गुलमोहोराचं झाड आहे. तिथे मी तासंतास रेडिओवरील गाणी ऐकत, अभ्यास करत तर कधी नुसताच त्या सावलीत चटई अंथरून लोळत असे. गुलमोहोराच्या फुलांचा तो नाजूक, मऊ स्पर्श मला आजही आवडतो. त्या आवडीचे संदर्भ मात्र वयानुसार बदलत गेले. लहानपणी खेळाचे सोबती असलेली ही फुले नंतर तिची आठवण करून देणारी झाली.
          ती म्हणजे रमा; माझी बालमैत्रीण. पण महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षांमध्ये तिच्याबद्दल काहीतरी वेगळीच ओढ मला जाणवू लागली होती. एक दिवस आमच्या घरी रमा काही कामासाठी येऊन गेली. ती गेली पण इथे माझं मन बेचैन होतं. तिचा तो लाल रंगाचा पंजाबी सूट... अगदी तसाच लाल रंग या फुलांचा आहे. अंगणात चटईवर लोळत गुलमोहोराचं फुल हातात नाचवत मी पुन्हा पुन्हा रमाची आठवण काढत होतो. किंबहुना ती आपसूक येतंच होती... सतत... तिचं मनमोकळं हास्य, तिचा निर्मळ पण स्पष्ट स्वभाव, तिचा आजचा ड्रेस, तिचे तसेच लाल ओठ, गाल... बेचैनी वाढत होती. खिशातून पेन काढलं आणि त्याच गुलमोहोराच्या एका पाकळीवर मी आमची नाव एका बदामात लिहिली. घरी गेलो एक पुस्तक घेतलं आणि त्यात ती पाकळी ठेऊन दिली. नंतर कितीतरी दिवस गेले. ती पाकळी तिला देण्याचंच काय; मी तर त्या पाकळीबद्दल अगदी विसरलो होतो. महाविद्यालयात ते पुस्तक माझ्यासोबत असायचं पण मी इतक्यात ते उघडलंही नव्हतं. रमेने ते माझ्याकडून वाचायला घेतलं आणि माझ्यासमोरच उघडलं. नेमकी त्याचं पानात दडवून ठेवलेली ती पाकळी तिला दिसली. तिने ती हातात घेतली. किंचितशी लाजली. "किती दिवस अजून अशीच ही पाकळी पुस्तकात सुकवणार होतास? बरंय, जिच्यासाठी आहे तिच्याकडे स्वतःच आली ती. मलाही बरेच दिवस तुला हे सांगायचं होतं. पण, असं काही सुचलं नसतं रे मला. खूप सुंदर आहे हे. मी जपून ठेवेन." माझ्या मनातला आनंद ओळखून तो गुलमोहोरही भेभान होऊन वाऱ्यावर सळसळत होता. मग आमच्या भेटीगाठी वाढत गेल्या. गुलमोहोर मोहोरत गेला.
महाविद्यालायचं शेवटचं वर्ष सरलं. सुट्टयांमध्ये आम्ही आमच्या नेहमीच्या बागेत भेटत असू. तेही गुलमोहोराच्या झाडाखालीच. त्यानेच अंथरलेल्या गालिच्यावर हातात हात घालून आम्ही गप्पा मारत असू. आता पुढचं शिक्षण किंवा नोकरी यामुळे आम्हाला रोज भेटता येणार नाही म्हणून मी काहीसा विचारात होतो. दुराव्याच्या विचाराने तिचा आत्ताचा सहवास, स्पर्श, अधिक हवाहवासा वाटत होता. त्याच विचारात मी तिचा हात घट्ट पकडला आणि जवळ ओढला. साहजिकच ती जराशी जवळ आली. तिचा नेहमीचाच स्पर्श आज मात्र मला भलतीच मोहिनी घालत होता. मी तिला आणि जवळ घेतले आणि तिचे चुंबन घेण्यासाठी पुढे झालो. तोच तिने माझ्या हाताला जोरदार हिसडा दिला. मला काही समजलेच नाही! मी पुन्हा पुढे आलो. पुन्हा एकदा धक्का मारून माझ्याकडे अत्यंत रागीट कटाक्ष तिने टाकला. काय होतंय या भानावर मी अजून पुरता आलोच नव्हतो. पण गुलमोहोराचा रंग आता तिच्या डोळ्यात उतरला होता. चेहराही तसाच लालेलाल! "हात पकडणं वगैरे ठिक. पण लग्न नाही झालं अजून आपलं. असल्या गोष्टी मला चालणार नाहीत, सांगून ठेवते." ती उठली आणि निघून गेली. मी पार शरमिंदा झालो. अचानक गुलमोहोर भकास वाटू लागला.
          तिच्या एका वाक्याने मी आजवर सर्व स्त्रियांशी अधिक आदबीने वागतो. कदाचित पौगंडावस्थेतील मुलामुलींवर, त्यांच्या मानसिक, शारीरिक बदल आणि वागणुकीवर अभ्यास करून आता देशोविदेशी कार्यशाळा, चर्चासत्र, घेणारा मी... डॉ शैलेश मुजुमदार त्या एका झटक्यामुळे कुठेतरी घडला, असं म्हणायला हरकत नाही. एक झटका... माझा गुलमोहोर मला भानावर आणून तिथून निघून गेला.
          "मेरी झाँसी में नही दूँगी।" तेजूच्या आवाजाने मी आठवणींमधून बाहेर आलो. आमचं कन्यारत्न तिच्या आईची लाल ओढणी साडीसारखी गुंडाळून, हातात तलवार म्हणून शेंग घेऊन उभी होती. इवल्याशा वयातही झांशीच्या भूमिकेत रमलेल्या तिच्या चेहऱ्यावर करारी आणि ठाम भव होते! अगदी तसेच.... रमेच्या चेहऱ्यासारखे! उन्हात बराच वेळ उभी असल्याने तिचे गोबरे गाल लाल दिसत होते... रमेसारखेच!!! नाही... गुलमोहोराच्या पाकळ्यांसारखे!
          इतक्यात बायको माझ्यासाठी चहा घेऊन आली. मी बशीत चहा ओतला आणि तिला दिला. लग्नाआधी आम्ही असेच चहा पित असू. तिलाही ते आठवले आणि तिलाही तेच आठवले. ती किंचित लाजून हसली.  तोच रंग पुन्हा खुलला होता. मी माझ्या गुलमोहोरांच्या दोन फुलांकडे पाहत होतो. रमा आणि तेजू... आणि आमच्या पाठीशी माझा सवंगडी... तो टवटवीत गुलमोहोर!


-      © वैदेही सच्चिदानंद शुभांगी शेवडे. 

सोमवार, २५ एप्रिल, २०१६

    नंदादिप

           "आलीस, रूपा! ये ये बाळ, बस." बऱ्याच वर्षांनी तो आवाज कानी आला. आता आवाजात थकवा होता पण तेच प्रेम, तोच आपलेपणा जाणवला! लग्नानंतर पहिल्यांदाच मी अनुजाच्या घरी गेले. पण काकूंनी पूर्वीसारखेच हसत स्वागत केले त्यामुळे मधली ८ वर्ष जणू गायबंच झाली असं वाटलं. 
          अनू माझी वर्ग मैत्रीण. अगदी बालवर्गापासून कॉलेजपर्यंत आम्ही दोघी एकत्रच होतो. दर काही दिवसांनी एकमेकींकडे येणं जाणं होत असे. पुढे लग्न होऊन मी यूएसला गेले आणि आमचा संपर्क कमी झाला.  आता यूएसला आमच्या जवळच अनुजा तिच्या नवऱ्यासोबत राहायला आल्यावर आमची भेट अधूनमधून होत असे. काकूंचे निर्मळ, तजेलदार डोळे सतत डोळ्यांसमोर येऊ लागले. जुन्या आठवणी ताज्या होऊ लागल्या तशा त्या एकेक करून उड्या मारून वर येऊन काकूंच्या भेटीची ओढ तीव्र लागल्या. तिच्या आईच्या हातच्या एकेक पदार्थांची आणि त्यांच्याकडील नंदादिप यांचीही आठवणही आली. परदेशात अशा आठवणी जास्तच डाचतात. अनू तिच्या आई वडिलांबद्दल फारशी काही बोलत नाही, हे आत्तापर्यंत माझ्या लक्षात आलं होतं. कदाचित त्यांच्याशी तिचं तेवढंसं बोलणंही होत नसावं!... माझा आपला एक अंदाज. एकदा तिला ओझरतं याबद्दल विचारूनही पाहिलं पण तिच्या उत्तरावरून आम्ही आता त्या पूर्वीसारख्या एकमेकींना सगळं सांगणाऱ्या मुली राहिलो नाहीत आणि वयासोबत बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत, हे लक्षात आलं. एव्हाना मला अनूचा भाऊ वेगळा राहतो आणि आता आई बाबा दोघंच घरी असतात असं समजलं होतं. यूएसला नवीननवीन होते तेव्हा इतरांशी ओळख होई तो एकटेपणा काय असतो याची कल्पना मला आली होती. त्यामुळे तिथे आपल्या दोन्ही मुलांची आठवण काढत अनूचे आईवडील आपल्याच देशातही आठवणींच्यासोबत परकेपणाने आपल्याच माणसात वावरत असतील, हे मी जोखले होते. त्यांना भेटायची इच्छा अधिक तीव्र झाली. परवाच भारतात आले आणि काल काकूंना फोन करून भेटायला येते असं कळवलं.
          काकू कशा असतील? पूर्वीप्रमाणेच आम्ही एकमेकींशी बोलू का? काय बोलावं? एवढ्या वर्षांनी आज मी कशी आले भेटायला, असं विचारलं तर उत्तर काय देऊ? मनात असंख्य विचार आणि हातात एक लहानशी भेट घेऊन मी त्यांच्या दारात उभी होते. पण, काकूंच्या पूर्वीसारख्या स्वागताने मनातलं मळभ दूर झालं. घरात पाऊल ठेवताच मटरच्या करंज्यांचा खमंग वास नाकात शिरला. "तुला आवडतात नं करंज्या! कालंच यांना सांगून बाजारातून मटार आणले." काकू मायेने डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. मला त्यांच्या एवढ्या प्रेमाने उगीचंच भरून आल्यासारखं झालं. सोबतच आपण एवढी वर्ष काकूंना भेटलो नाही, याबाबत अपराधी वाटू लागलं. 
          बराच वेळ गप्पा झाल्या. काका, काकूंनी बोलून दाखवलं नाही तरीही अनू आणि तिचा भाऊ इथे फारसे फिरकत नाहीत किंवा काही हवं नको पाहत नसावेत हा माझा समज अधिकाधिक घट्ट होऊ लागला. तडे गेलेल्या, पोपडे निघालेल्या भिंतींप्रमाणे नाती विद्रुप झाल्याचा मला भास होऊ लागला. कारण काय असेल हे मला माहित नाही आणि मला त्याच्याशी काही कर्तव्यही नाही. पण आपल्याच आई वडिलांशी कोणी एवढं फटकून कसं वागत असेल हे मला समजत नव्हतं. 
          अनू आता माझ्याजवळच राहते हे त्यांना माहित नव्हतं. किंबहुना ते युएसला आधी राहायचे तिथून दुसरीकडे शिफ्ट झाले हेच त्यांना माहित नव्हतं. काकूंनी नेहमीप्रमाणे सारवासारवी केली. पण, "मुलगी लग्न करून भारताबाहेर गेली, फोन वगैरे नसतोच तिचा आणि मुलगा इथे जवळच राहत असूनही बऱ्याच महिन्यांनी त्याच्या आईने अनेक निरोप पाठवले की अर्ध्या एका तासासाठी पाहुण्यासारखा येऊन जातो... एकूण काय पाखरं घराट्यातून उडून गेली की ती परत येतील ही आशा ठेवणंच चूक." काकांच्या एका वाक्याने माझा अंदाज खरा ठरला होता. काकूंनी शिताफीनं डोळ्यातलं पाणी लपवलं. 
          थोडा वेळ कोणीच कोणाशी बोललं नाही. मग काकू उठल्या, देवापाशी दिवा तेवत होता. काकूंनी वात सारखी केली आणि जरासे तेल घातले. काकूंकडे देवासमोर नेहमीच एक दिवा तेवत असतो. दर काही दिवसांनी एक दिवा नेमाने घासला जाई तेव्हा दुसरा घासलेला दिवा देवापाशी ऐटीत विराजमान होत असे. नेमाने स्वच्छ, लखलखीत केला जाणारा आणि बारा महिने, चोवीस तास अखंड तेवणारा तेजस्वी दिवा! आज मात्र तो काळवंडलेला दिसत होता. बरेच दिवस घासला गेला नसावा. मी आणि अनू लग्नाच्या वयाच्या झालो तेव्हा एकदा काकूंनी आम्हाला जवळ बसवलं. दिवा लख्ख चमकवताना त्या म्हणाल्या, "हा दिवा सासूबाईही असाच अखंड तेवत ठेवत. मी घरात आले तेव्हा मला त्या म्हणाल्या की ही आपली परंपरा आहे. यातून दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. या घरात आपण दिव्यासारख्या सतत प्रकाश देत राहायचं आणि ज्याने आपल्याला एवढं भरभरून सुख दिलं आहे, त्याच्या पायाशी अंधार होऊ द्यायचा नाही. तुम्ही पोरीही लग्न कराल तेव्हा हे लक्षात ठेवा की तुम्हाला दोन्ही घरं अशीच प्रकाशमान करायची आहेत आणि याबद्दल देवाचे नेहमी  ऋणी राहायचं." हातातील दिवा आमच्या डोळ्यांसमोर धरून पुढे त्या म्हणाल्या, "बरं, हा दिवाही अस्सा हवा. स्वच्छ आणि चमकदार. दिव्याला काजळी धरता कामा नये. आपलं घरही असंच हवं. कोणाच्या मनात एकमेकांबद्दल काही मळ नको." हे सांगताना त्या ज्योतीचे तेज असलेले काकूंचे चमकणारे डोळे आणि दिव्यासारखे स्वच्छ, लखलखीत असे काकूंचे अंतरंग मला आजही स्पष्ट आठवले. एकटेपणाचं दुःख पचवूनही कोणतीही तक्रार न करता त्या देवाकडे त्यांच्या दोन्ही मुलांसाठी सुख, भरभराट मागत होत्या, हे सांगायला तिथे कोणा अन्य व्यक्तीची गरज नव्हती. 
          त्यांचा प्रेमळ स्वभाव आणि होणारी घुसमट यामुळे मी गलबलून गेले. त्यांना भेटवस्तू दिल्या आणि निरोप घेतला. "पुन्हा ये गं वेळ असेल तेव्हा. किती बरं वाटलं आज आलीस ते. सुखी राहा. जे मनात आहे ते मिळो" मी पाया पडत असताना काकू म्हणाल्या. निघताना पुन्हा एकदा त्या दिव्याकडे नजर गेली. पूर्वीपेक्षा तो जरासा मिणमिणता झाल्यासारखा जाणवला. एवढी काजळी साचल्यावर असंच होणार म्हणा!

- © वैदेही सच्चिदानंद शुभांगी शेवडे.

मंगळवार, १ मार्च, २०१६

चिऊ काऊची गोष्ट

          ते दिवस अजबच होते! मन्तरलेले! काऊ आणि चिऊ नुकतेच एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दिवसभर फोन, व्हॉट्सअॅपवर गप्पा आणि तरीही रोज संध्याकाळी भेटण्यासाठी नवनवे बहाणे.... बाईकवर बसून चिऊ आणि काऊ दूर दूर फिरायला जायचे. मागे बसलेल्या चिऊचा चिवचिवाट काऊ बाईक चालावता चालवता ऐकत असे. जात्याच् सुन्दर असलेली चिऊ गप्पा मारू लागली की आणिक मोहक दिसायची. काऊला चिऊकडे एकटक पाहण्याची खोड... फिरत असताना तिचा चेहरा तो सतत बाईकच्या आरशातून पाहत असे. चिऊच्या ते लक्षात आलं की ती लाजत असे. लटकासा राग आणि भरपूर काळजी डोळ्यात आणून ती त्याला ओरडत असे. काही दिवसांनी चिऊ काऊचे लग्न झाले आणि दिवस पलटू लागले. अनेक गोष्टी बदलू लागल्या.

           आता एकमेकांशी फोनवरुन सतत बोलणे होत नव्हते, कुठे बाहेर फिरायला जाणे राहिले नव्हते. आपलं घरटं अधिकाधिक सुरक्षित करण्यासाठी दिवस रात्र कष्ट करत काऊ त्याच्या कामात व्यस्त... चिऊदेखील मन लावून तिच्या नव्या जबाबदारी पार पाडण्यात मग्न. पण तरी पूर्वीच्या दिवसांसारखी मजा आता राहिली नाही हा साल तिच्या मनाला पोखरत होता. आता ते चिऊ काऊ नव्हतेच जणू! या गोड नावांऐवजी आता त्यांच्या खऱ्या नावाने ते एकमेकांना संबोधू लागले. रोजच संध्याकाळी फिरायला जाणारी ही जोडी आता फक्त केवळ काही लग्न समारंभासाठी बाहेर पडू लागली. काऊचा वाढदिवस, काऊची पदोन्नती, पगारवाढ, त्या दोघांच्या पहिल्या भेटीचा, मागणी घातल्याचा दिवस,... असे कितीतरी दिवस चिऊने कुठेतरी बाहेर जाऊन साजरे करण्याबद्दल काऊला सुचवलेही पण कामाच्या गडबडीत त्याला वेळ मिळत नव्हता. हॉटेलमधून काहीतरी घरी मागवण्यापलीकडे आता काही फारसा उत्साह त्यांच्यात राहिला नव्हता. काऊचे आपल्यावर पूर्वीसरखे प्रेम उरले नाही या विचाराने चिऊ पछाडली होती. काऊला मात्र याची कल्पनाही नाही. आता चिऊनेही स्वतःला घर आणि पुढील शिक्षणामध्ये गुंतवून घेतले होते. तरीही तिच्या मनात काऊचे आपल्यावर आता प्रेम नाही ही भीती होतीच. असेच काही दिवस गेले. चिऊच्या परीक्षेचा निकाल लागला. ती उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली. काऊला फोन करायला गेली तर नेहमीप्रमाणे फोन कट! तिचा आंनद लगेच ओसरला. तिने मेसेज पाठवून निकाल कळवला. बराच वेळ काऊने तो वाचलाही नसल्याचे तिला दिसत होते. चिऊ हिरमुसली, तिला भरुन आलं. जुन्या आठवणी डोळ्यांसमोरुन झरझर जाऊ लागल्या. रडता रडता केव्हातरी चिऊला डोळा लागला.

          संध्याकाळी तिला जाग आली तीच काऊच्या आवाजामुळे..."चिऊ, ऊठ. मी बघ चित्रपटाची तिकीट आणली आहेत. गेल्या आठवड्यात सांगत होतीस न् पहायचा आहे तुला तो चित्रपट. चल, आवर आता लवकर." चिऊला हे स्वप्नच वाटत होतं. शेवटी काऊने तिला हलवलं तेव्हा तिच्या लक्षात आलं. ती काही न बोलता उठली. दोघे बाहेर गेले. चित्रपट पाहिला. आज काऊ जास्तच आनंदात दिसत होता. चिऊला मात्र या बदलाचं कारण समजंत नव्हतं. चित्रपटानंतर पूर्वीप्रमाणे आवडत्या ठिकाणी त्यांनी मनसोक्त पाणीपुरी आणि मग आईसक्रीम खाल्ले. चिऊला अजूनही काहीच आकलन होत नव्हते. बाईकवरुन घरी जाताना काऊने चिऊचे हात पुढे ओढुन त्याच्या कमरेभोवती कडे तयार केले. "चिऊ, बोल ना ग काहीतरी... गप्प का? मी आज खूप आनंदात आहे. कसं काय घर आणि सगळं सांभाळून अभ्यास केलास गं!" कितीतरी वेळ तो चिऊचं भरभरुन कौतुक करत होता आणि पूर्वीसारखंच सतत आरश्यामधून चिऊकडे पाहत होता. कितीतरी दिवसांनी तिला पूर्वीचा काऊ प्रत्यक्षात दिसत होता. काऊ बोलतंच होता. त्याचे आनंदाचे क्षण साजरे करायला त्याच्याकडे वेळही नव्हता आणि आज आपल्यासाठी तो आपल्यापेक्षा जास्तच आनंदात आहे. एवढे दिवस तो आपल्यावर प्रेम नाही म्हणून कामात व्यस्त नव्हता तर आपल्या सुखासाठीच धडपडत होता, हे चिऊच्या लक्षात येत होते. आज मात्र चिऊ काही बोलत नव्हती. तीदेखिल आरश्यामधून एक टक काऊकडे बघत होती. बोलत असताना काऊ जास्तच सुन्दर दिसतो असं तिला आजंच समजलं होतं!
   © वैदेही सच्चिदानंद शुभांगी शेवडे

गुरुवार, २ जुलै, २०१५

शुभ्राची दैनंदिनी
११ जून २०१५
          
          आज बऱ्याच दिवसांनी जरा वेळ मिळाला आहे. मिळाला कसला! काढलाच.. मुद्दाम! अगदी ठरवून..! आता असेच सारे दिवस भरपूर कामाचे.. तारेवरची कसरत करायचे..! पुन्हा लिहायला वेळ कधी मिळेल ठाऊक नाही. तशी दैनंदिनीला अधूनमधून बुट्टी मारणे मला नवीन नाही. पण, किमान काही महत्त्वाच्या नोंदी, आठवणी जपून ठेवायलाच हव्या म्हणून हा खटाटोप.

          ५ जून २०१५, डॉक्टरांनी दिलेल्या तारखेच्या चांगले २० दिवस आधी अचानक आगमन करून आमच्या बाळ राजेंनी सर्वांचीच धांदल उडवली. नेमक्या त्याच दिवशी सासूबाई निलूच्या लग्नासाठी ४ दिवस काढून सुरतेस गेल्या होत्या. माझी तब्येत, काही हवं / नको, सर्व व्यवस्था पाहून, मला चार चार वेळेस विचारून गेल्या त्या. आता या बाळोबाला सर्वांना चकित करायची आणि वेळेआधीच जग पहायची एवढी घाई झाली असेल, असं कोणाला माहित होतं! मला कळा सुरु झाल्या.. कसबसं स्वतःला सावरत सचिनला फोन केला.. ऑफिसला जाण्यासाठी अर्ध्या वाटेपर्यंत पोहोचलेले बाळाचे बाबा माघारी फिरले.. येताना आमच्या जवळच राहणाऱ्या त्याच्या शैला मावशीला मदतीसाठी घेऊन आला.. आमची ही पहिलीच वेळ आणि त्यात घरी मोठं कोणीच नाही.. तेव्हा शैला मावशीची खूप मदत झाली. कारमधून त्वरित मला हॉस्पिटलमध्ये आणलं. सकाळपासून कळा देऊन देऊनही रात्री ११ वाजता माझी सुटका झाली. एवढ्या कळा, सर्वांची धावपळ, हॉस्पिटलचं कुबट वातावरण.. बाळ आता लवकरच आपल्या कुशीत असेल याची हुरहूर..! पण या सगळ्यातही माझ्या डोक्यात एक वेगळंच द्वंद्व चालू होतं..! हो.. मी चक्क भांडत होते.. कोणाशी? स्वतःशी.. नशिबाशी.. परिस्थितीशी.. देवाशी.. की आईशी??

          ही चिडचीड, असा त्रागा, याचा काय फायदा? उलट स्वतःलाच त्रास.. आणि आता बाळालाही.. गरोदर असताना अनेकदा स्वतःला असं समजावून पाहिलं. पण, मनाचं असंच असावं. जे विचार नको असतात म्हणून मनाला गच्च आवळायला जावं, तेवढंच उसळी मारून ते वर येतात.. बोचत राहतात! त्यात हे हार्मोनल चेंजेस म्हणजे भावनांचा झोपळाच.. मस्त वर वर जाणारा.. पोटात खड्डा पाडत खाली येणारा!

          तशी मी आईची बरेचदा आठवण काढत असते. बरेचदा नशिबाला दोष देत असे. पण, बाळ होते वेळीही तीच फक्त माझ्या मनात आंतर्बाह्य व्यापली होती. “ती आज इथे असती तर मी “जा” म्हणाले असते तरीही गेली नसती कुठे बाहेर.” वाक्य पूर्ण होईपर्यंत, “पण, गेली तर खरी निघून..” दुसरं वाक्य हजर.. “पण, ते तिच्या हातात नव्हतं.” “पण, त्रास तर झालाच नं.. तुला आणि सगळ्यांनाच!” बापरे.. किती हे विचार! अनेस्थेशियापेक्षा विचारांनीच बधीर झाल्यासारखं झालं.

          आई हे जग सोडून गेली तेव्हा खूप लहान होते मी. शाळकरी पोर! ईशान तर माझ्याहून लहान.. काही दिवस घरातील गडबड पाहून गोंधळले. सर्वजण नानापरी, “आई कुठे आहे?” या प्रश्नावर उत्तर देत होते. तात्पुरतं मन त्या थापांत रमत होतं. पण, दिवसपाणी झाले आणि सर्वजण आपापल्या घरी निघून गेले. मग मात्र हे काहीतरी विचित्र आहे, हे जाणवलं. घरभर शोधलं आईला, रडरड रडले, चिडले, फेकाफेक केली. शेवटी बाबांनी जवळ घेऊन थोपटलं. “आई आता कधीच दिसणार नाही.” असं मला म्हणाले. ते रडणं माझं शेवटचं होतं. मग सर्वांसमोर कधीच रडले नाही मी. एकट्यात रडत, राग काढत, मोठी झाले. मित्र मैत्रिणींच्या आईमध्ये, कधी कुणा ओळखी तर कधी अनोळखी स्त्रीमध्ये आई शोधात.. कधी तिची कल्पना करत, दिवस काढत राहिले. मोठी झाले, वयात आले, तेव्हा जगातील एवढी मोठी गोष्ट सांगायला, समजवायला, आईच नव्हती जवळ! सर्व मैत्रिणी त्यांच्या आईनी काय सांगितलं याबद्दल? काय काळजी घ्यावी? पहिल्या नाहाण्यानंतर कशी ओवाळून भेटवस्तू दिली! असं सांगत असत. मी एकटी आतल्या आत धुसफुसत पण आतुरल्या कानांनी त्यांचे क्षण साठवत असे. मग मात्र आईची आठवण म्हणजे रागच येई मनात. देवाचाही आणि तिचाही.. केवळ तिरस्कार..! वेडेपणाच होता तो.. आता समजतंय! पण ते मोठे होत असतानाचे दिवसही असे विचित्रच असतात. अजून वय वाढलं. महाविद्यालयात जाऊ लागले.. कोडकौतुकाची सवयच नुरली होती. आता महाविद्यालयात जाण्याआधी आणि  आल्यावर घरातले सर्व काम आणि ईशानचा अभ्यास ही वेगळी जबाबदारी अंगावर आली. आपल्याला इतरांसारखी मजामस्ती करायला वेळच नाही. आपल्याकडे आई नाही आपल्याला काय हवं आहे हे सर्व समजून घेण्यासाठी...  हळूहळू मनाविरुद्ध, झगडत का होईना परिस्थिती मान्य करावीच लागते.. तशी केली. आजवर आई गेल्यामुळे काय काय नाही करता आलं आणि ती कसं आपल्याला काहीच न देता गेली.. त्यामुळे तिला/ देवाला दोष देत आले. आपलं आपण सगळं शिकलो.. जबाबदार झालो.. एकटे राहू शकतो.. असा किमान इतांना दाखवता येण्याजोगा एक वेगळंच दृष्टीकोन आला. अधूनमधून नातेवाईक, “शकुसारखी/ आईसारखी दिसतेस हो अगदी.. सुंदर!” किंवा “शकूसारखी सगळ्यांची काळजी घेणारी आणि लाघवी पोरं आहे!” म्हणतात. बाबा मी केलेल्या स्वयंपाकाचं कौतुक डोळे भरल्या नजरेने करून, “अगदी तुझ्या आईसारखी सुगरण आहेस!” म्हणत, तेव्हा त्याचा आनंद होत नव्हता. काहीच वाटेना झालं होतं! माझ्या लग्नात बाबाच काय पण आईची फारशी आठवण असणे शक्यच नसलेला ईशानही, “आई आत्ता हवी होती.” म्हणून रडला तेव्हाही मी मात्र कोरडीच होते. “काहीच दिलं नाही आईनी आपल्याला आणि पोरकं करून निघून गेली.” माझा हा एकंच तोरा!

          तुझी तिथी कधी मी लक्षात ठेवली नाही की कधी देवाला किंवा तुला फुलं वाहिली नाहीत!  पण, बाळाला हातात घेतलं आणि कसं कोण जाणे अचानक लक्षात आलं.. तू गेलीस ती हीच तारीख! तू गेलीस तेव्हापासूनच स्वतःच्या कोशात, भ्रमात असलेल्या या ‘स्वयंभू शुभ्रेचा’ जन्म झाला होता. पण नाही..! खरा जन्म आता झाला आहे.. बाळाची अंघोळ, बाळाला न्हाऊ माखू घाला, त्याला सांभाळ आणि सोबतच घरातल्या सर्वांच करा.. ईशानच्या वेळेस तुझी ही अशी धावपळ मी पहिली होती. तुझ्या माहेरी  तूदेखील फार लहान वयात घराची जबाबदारी उचलली होतीस असं मामा नेहमी सांगतो. त्यामुळेच माझ्यातही हा गुण आला. तू देखणी होतीस म्हणून मी आहे. सुगरण होतीस म्हणून मी आहे. काळजी घेणारी, मायाळू होतीस म्हणून मी आहे. एवढी वर्ष तू नाहीस म्हणून तुला शोधत, स्वतःशी भांडत राहिले. पण, आता समजलं.. तू कुठेही गेली नाहीस मला सोडून.. माझ्यातच होतीस तू.. आणि राहशील.

    © वैदेही सच्चिदानंद शुभांगी शेवडे

गुरुवार, २६ फेब्रुवारी, २०१५

चक्र

           “अग कुमुद, ये ये.. अशी दारातच काय उभी! सोनं द्यायला आलीस ना? मग लाजायचं काय एवढं त्यात?” वैद्य काकूंनी कुमुदचा हात धरला आणि तिला पलंगावर बसवलं. “प्रेम करताना लाजत नाहीत; आता कसली आली आहे एवढी लाज?” वाती वळता वळता काकूंच्या सासूने होणाऱ्या नात सुनेला टोमणा मारला. “असू द्या हो आई.. आजकालची मुलं ठरवतात आपलं आपण.. आणि कुमुदला तर आपण लहान असल्यापासून पाहत आहोत. आपल्या डोळ्यासमोरच मोठी झाली ही पोर. आता चार खोल्या सोडून इथे येणार राहायला एवढाच काय तो फरक. मुलगी शिकलेली आहे, गुणी आहे, आपल्या किशोरला आवडते. दोघ सुखाचा संसार करतील बघा.” एवढ्यात किशोर आतून बाहेर आला. “अरे वाह! आज साडीत!” कुमुद अजूनच लाजून, खाली मान घालून बसते. “आता चारचौघात कौतुकंपण करा हो.. आपण ठरवलेल्या बायकोची..” असं म्हणत वैद्य आजी आत निघून गेल्या. काकूंनी कुमुदचा हात दाबला आणि मुक्यानेच तिला मनाला लावून घेऊ नको असं सांगितलं. “आजीचं मनावर घेऊ नकोस.. ती अशीच. जरा प्रेमाने बोलणार नाही तोंडावर. पण परवाच धाकट्या मामीला कौतुकाने सांगत होती, आमची नात सून लाखात एक आहे. सुंदर तर आहेच पण हुशारही आहे. एम ए झाली आता. पुरण पोळ्याही अगदी पटापट करते हो!” असं म्हणत किशोरनेही तिची समजूत घातली. आपल्या कौतुकाने सुखावून कुमुद खुदकन हसली. किशोर सोनं देऊन आईच्या पाया पडला. कुमुदही सोनं देऊन लगेच नमस्कार करण्यासाठी वाकली. काकूंनी तिला मायेनं जवळ घेतलं आणि गालावरून हात फिरवून चुंबन घेतलं. वडिलांनी एकट्याने वाढवलेल्या कुमुदच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. ते लक्षात येताच किशोरने काहीसे विनोदी बोलून वातावण हलक केलं. या त्रिकुटाच्या गप्पा सुरु झाल्या.

          एवढ्यात आजूबाजूची चार पाच लहान पोरं हातात आपट्याची पानं घेऊन आली. कुमुदने त्यांना आपट्याची पान वाटण्या मागची गोष्ट सांगितली. मग काकूंनी त्या प्रत्येकाच्या हातावर घरी बनवलेली खोबऱ्याची वडी दिली. ती खाऊन झाल्यावर ही वानरसेना पुढच्या घरी निघाली. ती जात आहेत तोवर चाळीतील वरच्या मजल्यावरच्या कदम वहिनी आपल्या दिपाला घेऊन आल्या. वडी तोंडात टाकत म्हणाल्या; “आमच्या बयेला पातळ नेसायची हौस. पण मला सातवा महिना आहे ना.. वाकता येत नाहीये आणि पलंगावर उभी केली तरी हिची वळवळ फार. जरा तुमच्या पद्धतीच लुगडं नेसवा ना काकी.” पूर्ण चाळीत कजाग म्हणून प्रसिद्ध असलेली ही कदम वहिनी. पण वैद्य काकूंच्या प्रेमळ स्वभावामुळे त्यांच्याशी नेहमीच आदराने बोलत असे. काकूंनी दिपाला सुंदर नटवली आणि कदम वहिनींच्या हातात तिच्यासाठी केलेले लाडू दिले. कदम वाहिनीने घरी जाऊन “तुमच्यापेक्षा त्या काकींना बघा माझी किती काळजी!” असे सासूला सुनावले.

          वैद्य काकू आपला मुलगा आणि होणाऱ्या सुनेसोबत गप्पा मारीत होत्या. अधुनमधून चाळीतली लहान पोरं, नवीन लग्न झालेली जोडपी, अन्य चाळकरी, किशोरचे मित्र, जवळचे नातेवाईक, यांची ये जा चालूच होती. तशीही निमकरांची चाळ नेहमी गजबजलेली असायची. सुखदुःखात हे चाळकरी एकमेकांच्या सोबत असायचे. चाळीत सर्वांची दार नेहमीच बिनधास्त उघडी असायची. पाटणकरांचं एकंच, नवीन लग्न झालेल्या आणि घरात दोघंच राहत असलेलं असं घर होत. नाहीतर बाकी सर्व घरात २ – ३ पिढ्या एकत्र आनंदात नांदत होत्या. दोघे नवरा बायको कामावर जाताना दाराला कुलूप लावून जायचे. पण किल्ली शेजारच्यांकडे असायचीच. चाळीत कोणाकडेही पाहुणे आले की लहानश्या खोल्यांमध्ये गर्दी होत असे. तेव्हा पाहुण्यांच्या आंघोळीसाठी आणि दुपारी वामकुक्षीसाठी चाळकरी खुशाल पाटणकरांची खोली वापरत असत. कदम वहिनी स्वतःच्या आणि जावेच्या पोरांसह चाळीतल्या बाकी पोरांनाही दंगा केल्यावर खुशाल रट्टे देत. कधी जेवायला, कधी पत्ते, कॅरम खेळायला एका घरी बाकी काही चाळकरी जमायचे तेव्हा ते अगदी नात्यातले असावे एवढे एकाच रंगत न्हायलेले दिसायचे.

          चाळीच्या फाटकासमोर एक मोटारगाडी थांबली. चाळीच्या मालकीणबाई न चुकता सणासुदीला सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी येत असत. पण गेलं वर्षभर त्या इथे फारशा आल्या नव्हत्या. त्या आत आल्यावर चाळकरी त्यांच्या भोवती जमले. सर्वांची त्यांनी आस्थेने चौकशी केली. “मागच्या वर्षी आमच्या अरविंदाचे अपघाती निधन झाले तेव्हा तुम्ही गणेशोत्सव साजरा केला नाहीत ते समजले.” मालकीणबाई बोलत होत्या. “अहो लीला ताई, तुमच्या अरविंदाला आम्ही लहान्या असल्यापासून खेळवला होता. आमच्या पोरांसोबत त्यालाही कधी खाऊ दिला होता. तुम्ही कधी परक्यासारख्या वागल्या नाहीत आमच्याशी. घरात काही अप्रिय घटना घडली तर कसला आलाय सण!” गोडसे काका त्यांना म्हणाले. लीला ताईंनी नम्रपणे हात जोडले आणि यापुढे पुन्हा सर्व सण साजरे करूया, असं म्हणाल्या. थोड्यावेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि त्या निघून गेल्या.

          वैद्य काकू काही कामासाठी आत निघून गेल्या. किशोर आणि कुमुद पाय मोकळे करण्यासाठी खाली उतरले. “जोडा कसा शोभून दिसतोय!” असं सर्वांनी त्यांना सांगितलं. समवयस्कांनी चेष्टा केली. चाळीसमोरच्या बागेतील बाकड्यावर जाऊन दोघं बसले. दोघांना लग्न अगदी साधसं हवं होतं. “हीच वेळ आहे पैसे कमावण्याची आणि जमवण्याची. आत्ता लग्नात वगैरे खर्च करण्यापेक्षा आपण हे पैसे जपून ठेऊ. आज इथे लहानश्या चाळीत आपण भाड्याने राहतो. घरी पाहुणा आला की आमची रवानगी बाहेर होते झोपायला. खूप अडचण होते. हेच आयुष्य मला आपल्या मुलांसाठी नकोय. थोडं मोठ आणि आपलं स्वतःच घर हवंय मला.” चाळीतल्या काही जणांनी एवढ्यात आजूबाजूच्या चाळींमध्ये किंवा गावाबाहेर घरं घेतली होती आणि आपलं बस्तान हलवलं होतं. तरीही प्रत्येक सणाला ते निमकर चाळीत हजेरी लावत होते. किशोरलाही असेच वेध लागले होते. पण, त्याच्या आणि वडिलांच्या नोकरीची जागा या घरापासून जवळ होती. इथे आसपास आता इमारती होत असल्याने आणि नवनवीन उद्योगांच्या कचेऱ्या येत असल्याने जागांचे भाव वाढले होते. त्यामुळे इथेच जागा घेणे किंवा ही जागा सोडणे यापैकी काहीच सध्या शक्य नव्हते. किशोरची यामुळे होणारी चिडचीड, घुसमट लक्षात घेऊन कुमुद मात्र त्याला काही वर्षांनी नक्की जवळच जागा घेता येईल असं समजावत नेहमी आधार देत होती.

          अशीच बरीच वर्ष गेली. निमकरांची चाळ अशी जुनी ओळख जाऊन त्या जागेला पार्क व्ह्यू असे नाव मिळाले. मोठा टॉवर उभा राहिला. प्रत्येक मजल्यावरची दार आता बंद असतात. चाळीतील सार्वजनिक गणेशोत्सवाचे चाळीसोबातच विसर्जन झाले. पार्क व्ह्यूमध्ये सातव्या मजल्यावर राहणाऱ्या पटवर्धनांच्या नीताने आज पहिल्यांदाच त्यांच्या शेजारी राहणाऱ्या अरोरा आंटीच्या घराची बेल वाजवली. आपल्या आजारी भावाला शेजारच्या घरातून येणाऱ्या कर्कश आवाजाचा त्रास होतो आहे म्हणून वैतागून नीता त्यांच्याकडे गेली होती. ५ – ६ वेळा बेल वाजवल्यावर आंटीने दार उघडले. “घंटी तो चालू हे.. लेकीन आवाजही नाही सुना.. क्या हुआ?” असं तिने नीताला विचारलं. नीताने आवाज कमी करण्याची विनंती केली. त्यावर “अरे डियर डोन्ट से आंटी.. अँड वो नौ दिन कुछ खाया पिया नाही ना ताकदवाला.. तो आज दशेहरा पार्टी है| नॉईस तो होगा ही ना! तुमलोग जरा अडजस्ट करो ना आज|” असं म्हणून दार लावून घेतलं. नीता फणफणत घरी आली. आजारी भावाकडेही तिने वैतागून पहिले. घरी कोणीच नव्हत आणि याच्या आजारपणामुळे तिला मित्रमैत्रिणींसोबत बाहेर जाता आलं नव्हत. इतक्यात तिची आजी आली. मुलाला बरं नाही म्हणून त्यांच्या सुनेनं धाकट्या जावेला फोन करून काही दिवस आधीच त्यांना बोलवून घेतले. एक महिना धाकट्या तर एक महिना मोठ्या मुलाकडे त्यांची सोय (?) केली असते. आजीने नातीच्या हातात आपट्याचं पान दिलं आणि डोक्यावरून हात फिरवून म्हणाली; “जा बाळ, मित्र मैत्रीण, इमारतीतील सगळे, यांच्याकडे सोनं देऊन ये. मी साडी नेसवू का तुला? की निषादच्या वाढदिवसाला घातलेला पंजाबी ड्रेस घालशील? तोंड कसं उतरलंय पहा! काही खायला करून देऊ का आधी?” नीता खूपच वैतागली, “व्हॉट रब्बीश आजी! हे असलं पान देऊन काय मिळतं तुम्हाला? उगीच झाडांना तोडून टाकता. मरतात ती तुमच्यामुळे... आणि प्लीज.. इथे कोणी असं घरोघरी जात नाही.. साडी नेस म्हणे! तू बस इथे. मी चालले फ्रेंड्ससोबत केएफसीला चिकन खायला. मम्माला सांग उशिरा येणारे घरी, उगीच फोन करू नकोस.” आजीला मात्र झाड कुठे कोणी तोडतंय आणि आपण झाड तोडतो असं म्हणणारी ही त्या कोंबडीची मान तोडून खाणार आहे या विचारानेच अंगावर शहारा आला. नेहमीप्रमाणे आजी गप्प बसली. शेजारून चित्र विचित्र गाण्यांचा आवाज होताच. नातवाला झोप लागली होती. घरात आता कोणीच नव्हतं. शेजारी कोणीच ओळखीचं नाही... त्यामुळे ती बसली टीव्ही लावून.

          पार्क व्ह्यू समोर एकाने आपली बाईक थांबवली. मागे बसलेल्या मुलीने काही विचारण्याआधी तो म्हणाला, “इथे आधी माझे आई बाबा राहायचे. या टॉवरमध्ये नाही.. चाळ होती इथे. बघ ना.. आता कसला मस्त टॉवर झालाय! आपला फ्लॅट केवढा लहान वाटतो! मलापण अश्या टॉवरमध्ये जागा घ्यायची आहे. जमेल?” मागे बसलेल्या तरुणीने त्याचा हात धरला आणि म्हणाली, “जमेल की.. तू इंजिनिअर आहेस, मी प्रोफेसर आहे. जमवू पैसे आणि घेऊ नवीन घर. वेळ लागेल पण अशक्य नाही अगदीच.” त्याने मागे वळून समाधानाने तिच्याकडे पहिले. “पण सध्या बाईक स्टार्ट करा मिस्टर अभिषेक किशोर वैद्य. आपल्याला इथून आपल्या घरी पोहोचायला किमान दीड तास तरी लागणार आहे. आई बाबा जेवायला थांबले असतील.” तो भानावर आला. बाईक सुरु करून भुर्र निघाला...!

    © वैदेही सच्चिदानंद शुभांगी शेवडे